माणूसकीचे मानदंड :
एखाद्या माणसात माणूसकी नाही असे जेव्हां आपण म्हणतो म्हणजे काय ? म्हणजे इतर प्राणी आणि माणूस यात असलेला फरक. आपणाला मन आहे, मेंदूचा विचार करण्याची ताकद निसर्गाने आपणास दिली आहे. त्यायोगे माणसाने पाळायचा मानव धर्म आपण पाळला पाहीजे हे आपण समजू शकतो. जसे माझे हक्क अबाधीत राहीले पाहीजे हे विचारात घेऊन मी त्यांची जपणूक करतो, त्याचप्रमाणे समोरच्यालाही हे अधीकार आहेत हे मात्र आपण सोयीस्कररीत्या विसरतो. प्रत्येक माणसाला त्याचा स्वाभीमान असतो, व त्याला ठेच पोचवण्याचा आपल्याला कांही एक हक्क नसतो, ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आमच्याकडे एक अध्यापक होते. ते हाताखालच्या लोकांना नेहमीच कमी लेखत. मात्र त्यांच्या फायद्याचे गणित जेव्हां असे, तेव्हां त्यांना शिपायाशीही बरोबरी चालत असे. मात्र एरवी त्यांना आपले पद, आपला राजपत्रीत अधिकाऱ्याचा दर्जा, आपली नोकरीतील सेवा जेष्ठता या सर्वच बाबींची नोंद त्यांच्या मनांत घट्ट कोरलेली असे. शिपायाला पान आणण्यास सांगीतल्यावर तो बिचारा शिपाई दूरवर जाऊन त्यांचे पान घेऊन येत असे, पण कित्येकदा ते पान उघडून पाहील्यावर त्या शिपायाची धडगत नसे, कारण एकदा त्यात १२० जर्दा त्यांना कमी दिसे तर कधी खिमाम कमी लावलेला असे. व त्या शिपायाची पायपीट पुन्हां त्या पानवाल्याकडे होत असे. याचा परिणाम असा झाला की एकदा त्या पानाचे पैसे शिपायाने आपल्या खिश्यातून काढून त्यांना दिले व सांगीतले की आपण पुन्हां मला पान आणायला सांगू नका. सदर अध्यापकांना दुसऱ्यांच्या फिरक्या घेण्यांत मजा येत असे, पण दुसऱ्याने जर कधी यांची त्याच हक्काने टिंगल केली तर मात्र लगेचच यांच्यातील वर्ग १ चा अधीकारी जागा होऊन ते त्याला त्याची जागा दाखवीत असत. आमचे प्राध्यापक दामू केंकरे सर आम्हांला नेहमी सांगत की, तुमचे अधीकार, तुमची वर्ग १, वर्ग २, ह्या गोष्टी केवळ तुमचे कार्यालय, तुमचे पगार पत्रक यासाठीच असतात. त्यांची सीमा तेवढीच असते . एकदा का तुम्ही रस्त्यावर आला की एखादा हमाल आणि तुम्ही यामध्ये कांहीच फरक नसतो. तुम्ही दोघेही समान नागरीक असता. आणि हे तत्व मी अखेरपर्यंत पाळले.
सरकारी कार्यालयात बहूदा चतुर्थ श्रेणी कामगार ह्यांना नेहमीच स्वतःचे खासगी नोकर असल्याप्रमाणे अधिकाऱ्यांकडून वागणूक दिली जाते. जणू ते सरकारचे नसून या व्यक्तींचेच सेवक असतात. आमच्याकडील एका अधिकाऱ्यांना सवय होती की आल्याआल्या ते एका शिपायाला पान आणण्यास पाठवीत. ते आणल्यावर उघडून पहात. व त्यात जर का १२० तंबाखू अथवा किमाम कमी दिसल्यास त्याला ओरडून पुन्हा परत पाठवून दुसरे पान आणायला पाठवीत. त्या छळणूकीमुळे शेवटी त्या शिपायाने एकदा स्वतःच्या खिशातून पैसे काढून त्यांना दिले, व पुन्हां आपल्याला पान आणायला सांगू नका अशी तंबी दिली. या महाशयांना हाताखालच्या लोकांशी चेष्टा मस्करी करण्यात, त्यांची टिंगल टवाळी करण्यात मजा येत असे. पण त्यांच्यापैकी कोणी जर यांच्याशी सलगी दाखवली, तर यांच्यातील क्लास १ अधीकारी जागा होऊन त्यांची हजेरी घेत असे. आमच्यातील दुसऱ्या कला महाविद्यालयातील एक प्राध्यापक तर त्यांच्या नसानसात अधिकारी भरलेला होता. ते लायब्ररीत गेले की ग्रंथपालाला हाताच्या इशाऱ्यानेच कपाटातील पुस्तके दाखवून शिपायाच्या हातात त्यांची चवड देत असे व स्वतः टॉक टॉक करीत पुढे व मागून पुस्तकांचे ओझे उचलून शिपाई अशी वरात निघत असे. या प्राध्यापक महाशयांनी नेहमीच आपला अधिकाऱ्याचा आब राखला होता. असेच एकदा मी माझ्या रुम मध्ये संस्थेचे वार्षिक शिल्पांजलीचे काम माझ्या सहकारी मित्रांसोबत करीत बसलो असताना कॅम्पस मधील दुसऱ्या एका संस्थेचे प्रिन्सिपॉल आले. आम्ही सर्वजण हसत खेळत वावरत असलेले पाहून त्यांना जरा विचित्र वाटले. नंतर बाकीचे लोक गेल्यावर ते मला म्हणाले, ह्या हाताखालच्या लोकांना तुम्ही एवढ्या जवळ यायला कसे देता ? मी तर माझ्या स्टाफला स्वतः मी कधी बोलावले तरच खुर्चीवर बसण्यास संगती. जर ते त्यांच्या कामासाठी माझ्याकडे आले तर त्यांनी उभे राहूनच बोलले पाहीजे. मी त्यांच्याकडे बघतच राहीलो. म्हटले, अहो तुम्ही आता ब्रिटिशांच्या जमान्यात रहात नाही आहात. आणि असे जर आपली अधिकार शाही दाखवीत बसलो तर अशी सर्जनशील कामे होतील का ! आणि मी माझें पद फक्त सरकारी कागदपत्रावर सह्या करण्यासाठी वापरतो. माझ्या दृष्टीने माझा सर्व स्टाफ मला सारखा आहे. कोणी जेष्ठ नाही, कोणी कनीष्ठ नाही. आणि सर्वच सांगतील मी माझ्या कारकिर्दीत मी कसा वागलो. संस्थेतील कार्यालयीन कर्मचारी असोत, शिक्षकवर्ग असो, वा शिपाई असोत, या सर्वानाच मी सारखीच माणुसकीची वागणूक दिली. त्यामुळे हे सर्व लोक अजूनही मी कधी संस्थेत गेलो की आपुलकीने मला भेटायला येतात, माझे काही काम असल्यास आपुलकीने करतात. मीही या सर्वाना हक्काने काही सांगू शकतो. हीच संपत्ती आपल्याला आनंद देऊन जाते. एरवी अधिकाराने वागलेल्या साहेबांशी तो निवृत्त झाल्यावर संस्थेत कधी ते आले तरी कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. बघून न बघितल्यासारखे करतात. तेव्हां त्यांना कळते की आपण या लोकांवर अधीकार गाजवून आयूष्यात काय गमावलं आहे ते.
मध्ये एकदां श्री शं. ना. नवरे यांचा एक लेख वाचला होता, त्यात त्यांच्या एका मित्राची गोष्ट त्यांनी सांगीतली होती. एकदा ते त्याच्या घरी गेले असता तो मित्र काही पत्रे लिहीत बसला होता. एवढी पत्रे कोणाला लिहीतो आहे हे जिज्ञासापोटी त्यांनी विचारताच तो मित्र म्हणाला, आज म्युनिसिपालटीच्या काही लोकांनी न सांगता येऊन समोरील खड्डा बुजवला. त्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांना मी त्या लोकांना हे पत्र लिहून त्यांची माहीती लिहून धन्यवाद दिले आहेत. मागे एकदा बस कंडक्टरने मला बस भरलेली असताही आत अदबीने घेऊन मला बसण्यास जागा करून दिली. मी त्याचा ब्याच नंबर लिहून घेतला होता. घरी येताच मी बेस्ट च्या जनरल मॅनेजरना त्याचा ब्याच नंबर लिहून त्याने एक वयस्क प्रवाशांप्रती दाखविलेल्या माणुसकी बद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझ्या भावना सदर कंडक्टरला कळविण्याची विनंती केली होती. कित्येकदा रस्त्यावर हे कामगार उघडे बोडके उन्हातान्हांत कामे करीत असतात. तेव्हां कधीकधी मी घरी चहा बनवून त्यांना पाजतो. तेवढीच त्यांना तरतरी येते. रस्त्यावर सतत उभे राहून वाहतूक नियमन करणारा पोलीस दिसला की त्याला पाण्याची बाटली देतो. तेव्हां माझ्याच मनाला समाधान वाटते. अहो, या लोकांवर आम्ही कामासंदर्भात नेहमीच ताशेरे ओढत असतो. ते कामचुकार आहेत, कामे करीत नाहीत, म्हणून त्यांच्याबद्दल त्यांच्या ऑफिसात तक्रारी करतो. पण शेवटी तीही माणसेच आहेत. जसे त्यांच्या कामचुकारपणामुळे आपण त्यांच्या तक्रारी करतो, तसेच त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची कां दखल घेत नाही ? म्हणूनच माझा हा त्यांच्या चांगल्या कामाला दिलेला एक कृतज्ञतेचा सलाम असतो. त्यांच्या खात्यालाही कोणीतरी आपल्या विभागातील लोकांच्या चांगल्या कामाची दखल घेते यांचा आनंद असतो. म्हणूनच मीही आमच्या इमारतीत, आजूबाजूला दिवसरात्र काम करणारे कामगार असले की आवर्जून त्यांच्यासाठी चहा बिस्किटे देतो. थंड पाण्याची बाटली देतो, तेव्हां त्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून जाणारा आनंद दिसतो. जणू कोणीतरी त्यांच्या पाठीवरून आधाराचा हात फिरवीत असल्याची जाणीव त्यांना होते.
याच शं.ना.नवरे यांनी एकदां मला त्यांना आलेला अनुभव सांगीतला होता. एकदा पुण्याला ट्रेनने जातांना समोर बसलेल्या गृहस्थांनी आपल्या पिशवीतून कांही छोटी छोटी कागदी पाकिटं काढली व जेथे डोंगर दिसले तेथे तेथें ते ती पाकिटं फेकू लागले. सर्व आटोपल्यावर ते परत जागेवर येऊन बसताच नवरे यांनी त्यांना या बाबतीत विचारताच ते म्हणाले, मला रस्त्यात अथवा आम्ही जांभळे वगैरे जे खातो अथवा त्याच्या बिया मी नेहमी अश्या कागदी पिशव्यात साठवून ठेवतो. नंतर पावसाळ्यांत कधी येथून ट्रेनने जातांना मी अश्या डोंगरात त्या टाकतो. पुढे पावसाच्या पाण्याने त्याला कोंब फुटून त्याचे पुढे वृक्ष होतात. व पुढे कधी मी या डोंगराकडे पाहतो तेव्हां या गर्द हिरव्या पाचूच्या डोंगरावर माझाही एक प्याच आहे या जाणीवेने मी आनंदाने मोहरून निघतो. पुढे आपल्या एका लेखांत शं.ना.नवरे यांनी ही घटना लिहीली आहे. असे कितीतरी अनुभव आपण घेत असतो, गाठीशी बांधत असतो. पण आपणापैकी कितीजण त्याचे आचरण करतात?
माणुसकीच्या गोष्टी कधी कोणी शिकवू शकत नाही. त्या आपणच आपल्या अंगवळणी पाडाव्या लागतात. दुसऱ्यांच्या सुखदुःखाशी समरस व्हावे लागते. तुमची एखादी लहानशी कृती देखील दुसऱ्याच्या डोंगराएवढ्या दुःखावर फुंकर घालू शकते. त्याचा एखाद्या छोट्याश्या गोष्टीसाठी तुम्ही दिलेले श्रेय त्याला त्याच्या जीवनात खंबीरपणे पाय रोवायला मदत करते. यावेळी मला आठवतो तो आमच्याकडचा कदम शिपाई. उंचापुरा, तब्येतीने धडधाकट, नेहमी सर्वांच्या मदतीला धावून जाणारा. आणि एका पैशाचीही अपेक्षा न करणारा. हाक मारताच धावून येणारा. असा हा कदम मोठा भाग्यवान होता. त्याचे सर्वच शासकीय इस्पितळातील डॉक्टरांशी अगदी स्नेहाचे संबंध होते. आणि त्याचा लाभ तो केवळ जे.जे.च नव्हे तर संपूर्ण शिक्षण खात्याच्या अधीकारी वर्गाला तो करून देत असे. मग ते जी.टी. हॉस्पिटल असो, जे.जे. हॉस्पीटल असो किंवा सेंट जॉर्जीस अथवा कामा हाॅस्पीटल असो, सगळीकडेच त्याची वट होती. कोणालाही सहजी तो तेथे घेऊन जात असे, व तेथील डॉक्टर अगदी स्नेहभावाने त्यानें आणलेल्या पेशन्टला औषधोपचार करीत. सर्वच डॉक्टरांकडे त्याला थेट प्रवेश असे. यामध्ये मी जी माणुसकी पाहीली तिला दुसरी तोड नाही. बरे, याचा कार्यालयीन दर्जा कांही फार मोठा होता असे नाही. केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचारी. पण आम्ही कोणी त्याला कधी दुय्यम वागणूक दिलीच नाही. वडीलधाऱ्या माणसाप्रमाणेच तो आम्हां सर्वांना आमचा देवदूत वाटत असे. अशी माणसे आयुष्यात भेटायलाही फार मोठे भाग्य लाभते. आणि ते आम्हाला ते लाभले!
या मुंबई शहरांत जिथे आपणांस प्रत्यक्ष जवळचे नातेवाईक थारा देत नसतात, तेथे एखादे असेच तुळशी वृंदावन आपणांस आपल्या पवित्र आणि मंगल अश्या माणुसकीच्या नात्याने बांधून घेते व आपले भवितव्य उज्वल करते. मला आठवतो तो दिवस २६ जुलैचा! या मुंबई शहरावर पावसाने वक्रदृष्टी केली आणि हां हां म्हणता संपूर्ण मुंबई पाण्यात बुडाली. कोणी आपल्या वाहनांत अडकले, कोणी बस मध्ये, तर कोणी ट्रेनमध्ये. मग अनेक तास काढून थोडे पाणी ओसरल्यावर प्रत्येकजण रेल्वे रुळाच्या सोबतीने पायी चालत चालत आपापली घरे गाठण्यासाठी निघाले. आणि दोहोबाजूंच्या झोपडपट्टीतील लोक कोणी चहा घेऊन, पोहे, बिस्किटे घेऊन सर्वांना खायला देत होते. आपुलकीने आग्रह करीत होते. येथेच जाणवतो परमेश्वर असल्याचा दाखला. एरवी झोपडपट्टीतील लोकांना पाहून नाके मुरडणारे, त्यांना आपल्या सुंदर शहराचा कलंक मानणारे हे सुखवस्तू लोक एवढेही समजून घेत नाहीत की झोपडपट्टीत रहाणारे मजेने रहात नाहीत. ती परिस्थीचीची गरज असते. याच झोपडपट्टीतून आपल्याला मंगेश म्हसकर सारखा शालान्त परीक्षेत प्रथम येणारा विध्यार्थी मिळाला. येथूनच अनेक प्रज्ञावंत तयार होतात. आणि याच झोपड्पट्टीमधील लोकांच्या मनोमंदीरातील तुळशी वृन्दावनासमोरील मंद पणे ठेवणारे निरांजनाच्या स्निग्ध प्रकाश आपणास पाहायला मिळाला. आणि दुसरीकडे बुडाखाली गाड्या घेऊन फिरणारे दक्षिण मुंबईकरांना या शहर बुडवी पावसाचे कांहीच पडले नव्हते. ते आपापल्या सुटीचे नियोजन करण्यात गुंतले होते. आणि त्या गरीब लोकांच्या मंगल प्रकाशापुढे या उच्चवर्गीय लोकांच्या नेत्रदाहक भगभगाटही निस्तेज पडला होता. आणि हीच खरी माणूसकी, मानवता धर्म. जो जाती पाती, धर्म अधर्म, श्रीमंती गरीबी याच्या पलीकडे जाऊन जपला जातो.
आणि अश्या आपल्या इतरांशी वागण्यामुळे आपली प्रतीमा त्यांच्या मनांत उतरत असते. तुमचे काम कितीही चांगले असो, वा तुम्ही कोणत्याही मोठ्या पदावर विराजमान झाला असाल, शेवटी तुमची इतरांशी ठेवलेली वर्तणूकच तुमच्या कामी येते. तुमच्याबद्दल आदराची, त्वेषाची किंवा आकसाची भावना हीच आपली वागणूक दुसऱ्याच्या मनात आपण आविष्कृत करू शकतो. तेच आपल्या आयुष्याच्या मिळकतीचा जमाखर्च असते. आता आपल्या घरी एकेकाळी आपण नेहमी ज्याची वाट पहात असतो तो आपला मित्र पोस्टमन पहा ना! कितीजणांना याचे नांव माहीत असते? कारण पोस्टमन हाच त्याचा चेहरा आणि हीच त्याची ओळख.बिचारे पत्रांची पिशवी खांद्याला लटकावून, शिवाय आपल्या हातात जवळपास द्यायच्या पत्रांचा गठ्ठा हातात धरून, आणि कानावर बहूदा पेन्सीलचे थोटूक लावलेला असा हा पोस्टमन कोणी कधी विचारांत घेतलाच नाही. आणि त्याचे काम केवळ पत्रे वाटणेच नसायचे तर गावाकडील अशिक्षीत लोकांना पत्रे वाचून दाखविणे हेही त्याचे काम असे. आणि महत्वाचे म्हणजे मुंबईसारख्या शहरांत उंचच उंच इमारतीमध्ये अनेक मजले चढउतर करीत पत्रे वाटणाऱ्या या देवदूताकडे कोणीच कधी आदराने पहात नाही. कधी कोणी त्याला चहा विचारत नाही की कधी सणासुदीला कोण आपल्या आनंदात त्याला सहभागी करून घेत. आपल्या देशात हातात भाला घेऊन धावणाऱ्या रनर पासून पुढे पोस्टमन म्हणून घरोघरी संदेश वाहक म्हणून पोचणाऱ्या या ऋण कधीच आपणाकडून फिटणार नाही.
अश्या लोकांच्या भावनांशी आपण जर का कधी एकरूप होऊ शकलो तर त्यानाही किती आनंद होईल आपले कुटूंब किती मोठे आहे, तेही नुसते आकाराने नाही तर मनानेही मोठे असलेले. सूख, आनंद आपणा प्रत्येकाकडे भरभरून आहे. ते आपण कसे आणि कोणाला वाटतो, यावरच सर्व गोष्टी अवलंबून असतात.
"Be nice to the people on your way up,
because you’ll meet them on your way down”
—Wilson Mizner
आणि आपण हेच ध्यानांत ठेवणे आवश्यक आहे की, आपण जेव्हां प्रगतीच्या आलेखावरून वर वर चढत असतो तेव्हां त्या वाटेवर जे जे आपणांला भेटत रहातात त्यांच्याशी प्रेमाने, ममतेने, माणुसकीने वागले पाहीजे. कारण जेव्हां आपण उतरणीला लागतो, तेव्हां हीच माणसं आपणाला हात द्यायला भेटत असतात, तत्पर असतात!
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष

Comments
Post a Comment