रंगानंदात रंगलेली कलावंत : प्रफुल्ला डहाणूकर
खूप खोलवर अन शोषून घेणारे अवकाश दाखवीतात.
सदैव स्तब्ध असे!
ज्यातून शांत अशी अवस्था जाणवते.
जणू कांही त्या निरव शांततेच्या
निवांत पोकळीत
मनाला सामावण्यासाठी उघडलेली
एक खिडकी आहे,
ज्यातून अंतर्मनाला शांत अशी
स्थिरता लाभते "
गोमंतकाच्या भूमीने आजवर या देशाला अनेक कलाकार दिले आहेत. त्यामध्ये जसे पुरुष कलावंत आहेत, तश्याच स्त्री कलावंतही आहेत. मग ते संगीत क्षेत्रात असो, नाट्य वा चित्रकला क्षेत्रांत असो. विशेषतः चित्रकारांना भावतो तो येथील हिरवागार निसर्ग. माडाच्या वाड्या, हिरवीगार कुळागरे, मासेमारी करणारे कोळी आणि विविधतेने नटलेलं लोकजीवन. याच सहवासात हे कलावंत वाढत गेले, त्यातील अंश सामावत गेले आणि आपल्या कलेद्वारे आविष्कृत करू लागले. या कलाकारांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण विश्व् उजळवून टाकले. अश्याच या कलावंतांच्या मालिकेतील एक नांव म्हणजे जेष्ठ व श्रेष्ठ अश्या आघाडीच्या चित्रकार श्रीमती प्रफुल्ला डहाणूकर हे आहे.
कला वर्तुळात प्रफुल्ला डहाणूकर मोठ्या तडफेने वावरतांना दिसत. मूळच्या जोशी असलेल्या प्रफुल्लाचा जन्म गोव्यातील बांदीवडे येथे १ जानेवारी १९३८ रोजी झाला. त्यांची शैक्षणीक कारकीर्दच मुळी कला व संगीत यांच्या पोषक वातावरणांत सुरु झाली. पण त्यांनी आपल्या आयुष्यातील कर्तबगारीचा संपूर्ण कालखंड मुंबईत व्यतीत केल्यामुळे मुंबई ही त्यांची कर्मभूमी ठरली. कलेची निसर्गदत्त देणगी मिळालीच होती, पण या कलेला शास्त्रशुद्ध बैठक देण्यासाठी प्रफुल्लाने मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. जे.जे. मध्ये त्या एक हुशार विद्यार्थिनी म्हणून गणल्या जात. जे.जे.मधील त्यांच्या कारकिर्दीत भारतीय कला शैलीत त्यांनी आपली कला आविष्कृत केली. प्रफुल्लाचे व्यक्तीमत्व आकर्षक होते. उंच बांधा, चेहऱ्यावर सतत हास्य अन प्रसन्नता, बोलण्यांत असलेला ठामपणा यामुळे ती वर्गात सतत उठून दिसत असे. तिचे निर्दोष रेखाटन अन ज्ञान या गोष्टींमुळे कित्येकदा वर्गात शिक्षक नसताना त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असत. त्यांची रेखाटने सुधारून देत असत. चित्रकलेइतकाच त्यांचा इतर सांस्कृतीक उपक्रमामध्येही सहभाग असे. त्यामुळे विद्यार्थीवर्गात त्या अतीशय लोकप्रिय होत्या. सर्वाना सतत मालवणी चिमटे काढणारे धोंड मास्तर त्यांना त्यांच्या उंचीवरून ' शिडी' म्हणून संबोधायचे. प्रफुलाचा वावर सर्वत्र असल्याने त्या कशामध्ये आहेत यापेक्षा त्या कश्यात नाहीत, हेच म्हणावे लागे.
प्रफुल्ला विद्यार्थी असतांना 'टाइम्स ऑफ इंडिया'चे शेवटचे युरोपियन कला दिग्दर्शक वाल्टर लॅंगहॅमर यांचा पगडा मुंबईच्या कला वर्तूळावर जबरदस्त पडला होता. त्यांचे वास्तववादी शैलीतील रेखाटन, ठळक असे पॅचेस मधून मारलेले ब्रशचे फटकारे, मानवी शरीर सौष्ठव सर्वच कलाकारांना मोहवीत असे. एके दिवशी जे.जे.मध्ये त्यांचे व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षीक ठेवण्यांत आले. लॅंगहॅमर या नांवानेच विद्यार्थी एका दडपणाखाली होते. ज्यांच्याबद्दल एखाद्या दंतकथेप्रमाणे ऐकलेल्या गोष्टी आज प्रत्यक्ष पाहायला मिळणार याच हेतूने मुले एकमेकांशी कुजबुजत होती. अन एवढ्यात अधिष्ठाता गोंधळेकरांसोबत लॅंगहॅमर यांचे वर्गात आगमन झाले. आल्याआल्याच त्यांनी आपला ऍप्रॉन चढवीला. आवश्यक त्या रंगांच्या ट्यूब्ज त्यांनी पॅलेटवर पिळल्या. यावेळी प्रफुल्ला मॉडेल म्हणून बसण्यासाठी कांही विद्यार्थिनींना गळ घालीत होत्या. लॅंगहॅमर यांनी जेव्हां हे पाहीले तेव्हां ते प्रफुल्लालाच म्हणाले, "Young girl, why don’t you come and sit here as the model?” अन प्रफुल्लाला हाताला धरून त्यांनी नेले अन पोर्ट्रेटसाठी तिचाच वापर केला. याचा परीणाम एवढाच झाला की प्रफुल्लाला त्यादिवशी त्प्रायांचे प्रात्यक्षीक पहायला मिळाले नाही. केवळ वीसच मिनिटे लॅंगहॅमर काम करीत होते. त्यानंतर त्यांनी प्रफुल्लाला उठण्यासाठी खूण केली. प्रफुल्ला जागेवरून उठल्या, अन जेंव्हा त्यांनी आपले पोर्ट्रेट कॅनव्हासवर उतरलेले पाहीले तेव्हां त्यांच्या तोंडातून एकाच शब्द बाहेर पडला, 'अरेच्चा'. एक अद्वीतीय कुंचल्याची करामत ती पहात होती. ही आठवण त्या जेव्हां मला सांगत होत्या त्यावेळी मला आठवतो तो त्यांचा भावुक चेहरा. गतस्मृतींच्या आठवणीत गेलेला. आजही त्यांचे ते पोर्ट्रेट जे.जे.च्या भिंतीवर पहायला मिळते. तेव्हांपासून आपण शिकत असतांना इतरांना मदत करण्याचा जो वसा त्यांनी घेतला होता, तो अखेरपर्यंत त्यांनी जोपासला.
१९५५ मध्ये प्रफुल्लाने उच्चकला शिक्षण पूर्ण केले. अंतीम परीक्षेत सर्वप्रथम येऊन अत्यन्त मनाचे असे जे.जे.चे सुवर्ण पदक त्यांनी पटकाविले. त्याच वर्षांपासून त्यांच्या कला कारकिर्दीची घोडदौड सुरु झाली. १९५६ पासून सातत्याने त्यांनी आपली प्रदर्शने भरविण्यास सुरुवात केली. बॉंबे आर्ट सोसायटीच्या वार्षीक प्रदर्शनामध्ये त्यांना पोर्ट्रेटचे रौप्य पदक मिळाले. १९६१ मध्ये प्रफुल्ला यांना फ्रान्स सरकारने स्कॉलरशीपवर 'इकोले दा ब्यूक आर्टस् अँड आलतीया सेव्हन्टीन' या संस्थेत ग्राफ़िक आर्ट शिकण्यासाठी पॅरीसला आमंत्रित केले. येथे त्यांना सुप्रसीध्द मुद्रा चित्रकार हेटर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास मिळाले. पॅरीस मधील काळात त्यांनी आपल्या पेंटिंगची प्रदर्शने इंग्लंड, हंगेरी, जर्मनी, स्वित्झरलँड, आस्ट्रेलीया, जपान, पोर्तुगॉल, आईसल्यांड, फ्रान्स अश्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांमधून त्यांचा सहभाग राहीला. विशेष म्हणजे १९७८ मध्ये लंडनमध्ये ब्रिटीश हायकमीशनने त्यांचे खास प्रदर्शन आयोजीत करून प्रफुल्लेच्या कलेचा उचीत प्रकारे गौरव केला.
प्रफुल्ला जोशी यांचा विवाह सुप्रसीध्द लेखक व उद्योजक श्री दिलीप डहाणूकर यांच्याशी झाला व त्या प्रफुल्ला डहाणूकर झाल्या. व अल्पावधीतच हे नांव भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्राच्या क्षितिजावर कायम तळपू लागले. आरंभीच्या काळांत प्रफुल्लताईंची पेंटिंग्स ही निसर्गाशी जवळीक साधणारी होती. तिच्या सुरुवातीच्या कामावर छाप होती ती निसर्गरम्य असे देखावे, जे हिरव्यागार झाडीने वेढलेले, डोंगर दऱ्या दाखवणारे, ग्रामीण भागांतील गांवे, तेथील शिवारे यांनी युक्त अशी. मात्र नंतर तिच्या कामातून जाणवू लागली ती तिची तीव्रता, जणू ती खुद्ध प्रफुल्लाच्या व्यक्तिमत्वाचाच विस्तार होती. तिचे भाव, तिची धारणा हेच तिच्या पुढील चित्रांतून व्यक्त होत गेली. त्यांचा केंद्रबिंदू हा हळूहळू ठरावीक भागाकडे न रहाता तो समानतेकडे झुकू लागला. त्यातून तिचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण, तिचे तत्वे ही तिच्या चित्रांमधून दिसू लागली. प्रफुल्ला ही आकाराकडून निराकाराकडे झुकत होती. तिच्याच शब्दांत सांगायचे तर पुढे ही लॅंडस्केप न रहाता ‘माईंड स्केप' झाली. अगदी रास्त शब्द वावरला होता प्रफुल्लाताईनी !
या माइण्डस्केपमधून जाणवतात ते प्रफुल्लाताईचे वेगवेगळे मूड्स व कल्पना. लोणावळा येथील सुंदर अश्या झाडीने वेढलेल्या, त्यातून झिरपणाऱ्या सूर्य किरणांच्या कवडशांच्या हलणाऱ्या डुलणाऱ्या ठिपक्यांचा सहवासांत, समोरील निळेशार आभाळ व हिरवेगार डोंगर यांच्याशी संवाद साधत प्रफुल्लाचे पेंटींग चालू असे. तेंव्हा त्यांना जाणवे की त्यांच्याकडून कोणतेही पेंटींग कधीही संकल्पीत केले जात नव्हते. तिच्या अंतर्मनाला जे जाणवत असे तेच जणू तिच्या हाताला मार्गदर्शन करून कॅनव्हासवर उतरवत असे. त्यासाठी कोणतीही विशिष्ठ अशी विषयकल्पना ( थीम ) त्या ठरवत नसत. यासोबतच त्यांचा आवडता राग तोडी स्वतःशी गुणगुणत त्यांचे काम चालू असायचे. चित्र-संगीताचा एक अलौकीक मिलाफच असे तो!
स्वतःची अशी खास शैली निर्माण करणाऱ्या प्रफुल्लाताईनी विश्वातील अवकाशाचा वेध घेण्यास आरंभ केला, त्यावेळी त्यांना जाणवले की, या विश्वामध्ये प्रचंड उलथापालथ होत असते. अनेक घडामोडी घडत असतात. पण अवकाश हे चिरंतन आहे. कालमानानुसार वस्तूंचं आकारमान बदलत असतं, तरीही अवकाशात काहीही स्थित्यंतर होत नाही. ते अबाधीत रहातं. व या रौद्र निसर्गातील संपूर्ण क्रोध, त्यातील शांतता न ढळवता स्वतःमध्ये सामावून घेते. आणि या तत्त्वज्ञानाने, अनुभवाने प्रेरीत होऊन त्यांच्या चित्रांनी आकार घेतला. आणि यातूनच प्रफुल्लताईंच्या 'माईंड स्केप्स' व इटर्नल स्पेस' या मालीका घडल्या.
'इटर्नल स्पेस' या मालीकेतील पेंटिंग्स प्रफुल्लाताईनी लक्ष्मी या देवतेच्या आकारावरून स्फूर्ती घेऊन आविष्कृत केली. रेखाटनासाठी त्यांनी ब्रश हा प्रसंगानूसार वापरला. वास्तववादी आकृतीबंधातील रेखाटने, निसर्गचित्रे ही ब्रश वापरून त्यांनी केली. नाईफचा वापरही त्या करत. त्यामध्ये त्या निष्णात होत्या. त्यांच्या जुन्या घराच्या भिंतीवर १९५० सालापासून बाबूराव पेंटर यांनी रंगविलेले कमळावर रेलून बसलेल्या लक्ष्मीचे पेंटींग विराजमान झाले होते. या लक्ष्मीच्या चित्रापासून प्रेरणा घेऊन तिने त्याला आधुनीक मानवी रूप दिले. लक्ष्मी हे धनाचे, संपत्तीचे, वैभवाचे प्रतीक त्या मानीत असत. आणि याचीच जाणीव प्रफुल्लाताईनी तिच्या अंतर्मनाने तिला करून दिली. यातून लक्ष्मीचे अमूर्त आकार निर्माण झाले. व ते कॅनव्हासवर रोलरचा वापर करून तिने साकारले. धनाचा अखण्डित प्रवाह दाखविण्यासाठी कॅनव्हासच्या एका टोकांपासून दुसरीकडे जाणाऱ्या रेषा, आकार दाखविले. त्यासाठी रंगही मर्यादीत वापरले. या अमूर्त आकारांनी तिने अर्थव्यवस्थेच्या अवकाशांत विखुरलेल्या मौल्यवान वस्तू तिने रेखाटल्या. व यातून लक्ष्मीच्या प्रतीकाचे मुलतत्व दर्शवले. आणि या चित्रमालिकेला तिने नांव दिले 'ईंटर्नल स्पेस' . तिच्या या अमूर्ततेकडे वळणाऱ्या चित्रांमध्ये जाणवते ती उफाळणारी तेजस्वी अशी रेषा अन रंग जे एक विस्तारीत अशी चिंत्तनशील घनता, जी निसर्ग आणि मानव यांची यतार्थता दाखवीते. चित्रकलेच्याच नव्हे, तर कलांच्या प्रत्येक दालनामध्ये प्रफुल्लाताईनी विश्वासाने पदार्पण केले. अनेक कला माध्यमांतून त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. विशेषतः त्यांनी केलेली म्युरल्स यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शिवसागर इस्टेट, इंडीयन ऑइल कॉर्पोरेशन, बिर्ला म्युझियम पिलानी, अमेरीकन ब्यांक, कल्पतरू अश्या अनेक मान्यवर संस्थांसाठी प्रफुल्लाताईनी कांच, सिरॅमीक, लाकूड, धातू, रेझीन, फायबर या सारख्या माध्यमातून साकारलेली म्युरल्स त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात.
आता प्रफुल्ला डहाणूकर हे नांव अनेक कला संस्थांशी जुळले गेले होते.जहांगीर आर्ट ग्यालरी, आर्टीस्ट सेंटर, बॉंबे आर्ट सोसायटी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट अश्या तोलामोलाच्या संस्थांची संघटनात्मक जबाबदारीची कामे त्या समर्थपणे पार पाडत. शिवाय अश्या संस्थांना जेव्हां आर्थिक मदतीची गरज भासे, तेव्हां प्रफुल्लाताईचा एक शब्द पुरेसा असे. मध्यन्तरी 'बॉंबे आर्ट सोसायटी'कडून होतकरू कला विद्यार्थ्यांसाठी एक कायमस्वरूपी शिष्यवृत्ती द्यावी असा विचार पुढे आला. त्यासाठी अर्थातच पैशांचे पाठबळ हवे होते. आणि प्रफुल्लाताईनी ही जबाबदारी उचलली. त्यावेळी त्यांच्या नजरेसमोर आलेले चित्रकार एम.एफ.हुसेन. त्यावेळचे एक चलनी नाणे. त्यांच्याकडून पेंटींगचे प्रात्यक्षीक करवून त्या पेंटींगचा लिलाव करायचा, व ते पैसे शिष्यवृत्तीसाठी वापरायचे अशी ती कल्पना होती. प्रफुल्लताईंच्या शब्दाला नकार देणे हुसेनना श्यक्यच नव्हते. पण सरळपणे काम केले तर ते हुसेन कसले? त्यांनीही एक अट घातली. मी पेंटींग करेन, पण त्यासोबत पंडीत भीमसेन जोशींनी गायन करायला हवे, हीच ती अट. आणि आपापल्या क्षेत्रातील दोन दिग्गजांना एकत्र आणून पेंटींग व शास्त्रीय गायन अशी एक आगळी वेगळी जुगलबंदी घडवून आणण्याचा चमत्कार केवळ प्रफुल्ला डहाणूकर याच करू जाणे शक्य होते. एन.सी.पी.ए. मध्ये झालेल्या या समारंभातून जमलेल्या पैशांमधून हुसेन यांच्या नावे शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. पण हुसेन यांनी आपण गुरुस्थानी मानलेल्या चित्रकार बेंद्रे यांच्याही नांवाचा अंतर्भाव केला व 'हुसेन-बेंद्रे स्कॉलरशिप' या नावाने ती शिष्यवृत्ती देण्यात येऊ लागली.
होतकरू कलावंतांना प्रफुल्लाताई नेहमीच मदतीचा हात देत. त्यांना गॅलरी मिळवून देणे, त्यांच्या चित्रांची विक्री करून देणे अश्या अनेक गोष्टींसाठी त्या आपला हात पुढे करीत. मात्र त्याच्यामध्ये कलेचा अंश त्यांना जाणावा लागे. अनेक होतकरूंना त्यांनी प्रकाशात आणले. गोव्याच्या कला अकादमी तसेच गोवा कॉलेज ऑफ आर्ट या संस्थांशी त्या खूप जवळून सहभागी होत्या. प्रा. दामू केंकरे यांच्या सोबत त्यांनी या संस्थेच्या उभारणीत हातभार लावला होता. त्यांच्या प्रगतीकडे त्याचे बारकाईने लक्ष असे. कला अकादमीचे राज्यस्तरीय प्रदर्शन असो, वा गोवा कॉलेज ऑफ आर्ट मधील विदयार्थ्यांच्या सोयी असोत प्रफुल्ला जातीने त्याकडे लक्ष देत असत.
२००७ साली प्रफुल्लताईंच्या नेत्रदीपक व यशस्वी कला कारकीर्दीची पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या संपूर्ण कला कारकिर्दीचा आढावा घेणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रफुल्लताईंचा संपूर्ण कलाविष्कार यातून उलगडला होता. ललीत कला अकादमीसह अनेक कला चळवळींशी जोडल्या गेलेल्या प्रफुल्लाताईंची चित्रे आज अनेक म्युझियम,काॅर्पोरेशन, बॅंका, हॉटेल्स, व खासगी संग्राहकांकडे आहेत. अनेक कला संस्थांच्या बैठका असत, तेव्हां चर्चा कितीही गंभीर स्वरूपावर चाललेली असो, तेथे एकदा का प्रफुल्लताईंचा प्रवेश झाला की वातावरण एकदम हलके फुलके होत असे. क्वचीत प्रसंगी त्या चार खडे बोलही सुनवायला मागे पुढे पहात नसत. एखादी गोष्ट जर त्यांना पटली नाही तर त्या आपले म्हणणे तडफदारपणे मांडत. सर्वच जेष्ठ कलाकारांना अधिकारवाणीने चार शब्द सांगणाऱ्या प्रफुल्लाताईच होत्या. सर्वानाच यांच्या विषयी आदर वाटत असे
प्रफुलाताई बऱ्याच बोलक्या होत्या. त्यांच्याशी गप्पा मारणे हा एक आत्मीक आनंद होता. मग त्या एखाद्या कलादालनात असोत वा फोनवर. त्या भरभरून बोलत असत. सर्वच क्षेत्रांत त्या वावरत असल्याने असंख्य आठवणींचा खजीना त्यांच्यापाशी असे. त्या सांगताना त्यांचा उत्साह ओसंडू जात असे. यातून अनेक गमतीच्या गोष्टी उघड होत. हुसेन-भीमसेन जोशी यांच्या चित्र-गायन समारंभाच्या वेळी हुसेन यांनी या प्रसंगाचे चित्रण कोणीही करायचे नाही असे स्पष्ट सांगीतले होते. केवळ त्यांचा मुलगाच ते करणार होता. यावर प्रफुल्लताईंनी सोसायटीच्या रेकॉर्डसाठी निदान एक सीडी द्यायची विनंती केली. त्याप्रमाणे हुसेन यांच्याकडून सीडी आलीही.काही दिवसांनी जेव्हां ती सीडी पाहीली तो काय? ती त्या समारंभाची, पेंटिंग-गायनाची नसून कोणत्यातरी एका लग्नाची होती. असाच एकदा प्रफुल्लताईंचा फोन आला. मी चित्रकार लॅंगहॅमर यांच्यावर एक लेख लिहीला होता, तो कोणीतरी त्यांच्या कानावर घातले होते. त्या मला म्हणाल्या, तू लॅंगहॅमरवर एक सुंदर लेख लिहिल्याचे माझ्या कानांवर आले. मला त्याची एक कॉपी पाठवून दे. माहीती आहेना, लॅंगहॅमर आमच्या आवडीचा चित्रकार. त्याने जे.जे.मध्ये माझे पोर्ट्रेट केले त्यावेळची गम्मत सांगते म्हणून त्यांनी ती सर्व हकीकत मला पुन्हां ऐकवीली. पुन्हां विषय निघाला गायतोंडेंचा, जितेंद्र अभिषेकींचा! जणू गत स्मृतीत जाऊन त्या भारावून बोलत होत्या. त्यातून जाणवत होत्या त्या संगीत, साहित्य, थेटर, चित्रकला आदी सर्वच क्षेत्रांत अधिकारवाणीने वावरणाऱ्या प्रफुल्लाताई. बोलता बोलता त्यांनी एक आनंदाची बातमी सांगीतली. मला म्हणाल्या, 'मी माझे आत्मचरीत्र लिहायला घेतले आहे. निरनिराळ्या कलाक्षेत्रातील लोकांशी संपर्क आल्यामुळे बऱ्याच आठवणी मनात आहेत. बरेचसे लिहून झाले आहे. आणि या माझ्या आत्मचरित्राचे शीर्षकही तयार आहे. ‘रंगानंदात रंगले मी' ! प्रफुल्लताईंचे असलेले कला व संगीताचे नाते पहाता एवढे समर्पक शीर्षक आणखी कोणते असणार? या आपल्या आत्मचरीत्रात त्या नक्कीच आपल्या कला वाटचालीतील अनेक रंजक स्थळे रसिकांना दाखवतील यांची खात्री होती. ते केवळ त्यांचे आत्मचरीत्र नसेल, तर गेल्या पन्नास वर्षातील कला-संगीत संस्कृतीचा घेतलेला डोळस व सौंदर्यपूर्ण आढावा असेल!
१ मार्च २०१४. या दिवशी मी शिवनेरीने पुण्याला चाललो होतो. वाटेत प्रवासात असतांनाच प्रा. नरेंद्र विचारे यांचा फोन आला, ' प्रफुल्लाताई गेल्या!' क्षणभर सुन्न झालो. त्या दिवशी अनेक संस्था, कला महाविद्यालये, कला विद्यार्थी, होतकरू कलावंत या सर्वाना आपण पोरके झाल्याची जाणीव झाली असेल. संपूर्ण कला क्षेत्र स्तब्ध झाले. पण प्रफुल्लाताई गेल्या असे तरी कसे म्हणावे? आमच्या हृदयात तर आम्ही त्यांना देवाप्रमाणे जपले आहे. त्यांच्या अफाट कलाकृतींनी त्यांना अजरामर तर केलेच आहे. शिवाय उदयोन्मुख, होतकरू कलाकारांना उत्तेजन मिळावे, त्यांच्या कलेला दाद मिळावी, तसेच त्यांची विक्री होण्यासाठी त्यांना कलारसिक आश्रयदाते मिळावेत यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या प्रफुल्ला डहाणूकर यांचे हे मौलीक काम अविरथ चालू रहावे यासाठी त्यांचे पती दिलीप डहाणूकर व अन्य कांही नामवंत कलाकारांनी "प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशन " हा एक सार्वजनीक ट्रस्ट उभारला. प्रफुल्लताईंची कांही पेंटिंग देशभरातील प्रफुल्लाच्या चाहत्या नामवंत अश्या कलाकारांनी व कला संग्राहकांनी दिलेल्या पेंटिंग्सची विक्री करून त्या रकमेतून ह्या ट्रस्टची उभारणी झाली आहे. कलाकारांनी कलाकारांसाठी निर्माण केलेली ही संस्था असून प्रफुल्लताईंचा स्नेहाचा, मदतीचा व धीराचा हात सतत अश्या तरुण कलाकारांच्या पाठीवर रहाणार आहे. पूर्वीप्रमाणेच न थांबता, न थकता!प्रा. मं.गो.राजाध्यक्ष








Comments
Post a Comment