अमृत चित्रांचा देशी वाण :अमृता शेरगील
ब्रिटिशांच्या राजवटीमुळे भारतीयांच्या सामाजीक तसेंच आर्थीक, पारंपारीक आणि कला जीवनावर खूप मोठा परीणाम झाला होता. यामुळे आपल्या सभोवतालच्या वातावरणलाही फार मोठा धक्का पोचला होता. आणि विशेष करून येथील कला जीवनावर देखील काही कमी आघात झाले नव्हते. देशांतील पारंपारिक कला शिक्षण देणारे दिवस मागे मागे पडत चालले होते. त्या काळात जी कला विद्यालये स्थापन झाली होती, त्यामध्ये बहुदा निव्वळ पाठशालेय शिक्षण दिले जात होते. ज्या दोन महान अश्या कला संस्था तेव्हां स्थापन झाल्या त्यापैकी एक होती बंगाल स्कुल, ज्यांनी प्राचीन भारतीय चित्रशैलीचे व विशेषकरून त्यातील प्रणय, शृंगार चित्राविष्कार करण्यावर भर दिला. व दुसरे होते बॉंबे स्कुल, जेथे पाच्छात अकॅडमिक चित्रशैलीचे अंधानुकरण केले जाऊ लागले. त्याचे पुनर्निर्माण करण्यात येऊ लागले. या दोन्ही कला प्रवाहासोबत जाणारे कलाकार चाचपडत होते ते एखाद्या मार्गदर्शकासाठी. या कठीण प्रसंगात दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरेल असे व्यक्तित्व त्यांना जाणवत नव्हते. या कालावधीत अंधारात चाचपडणाऱ्या नवोदीत कलाकारांच्या पिढीला प्रकाशाचे किरण दाखविण्यासाठी एक भक्कम अश्या मार्गदर्शकाची गरज होती, ती पोकळी भरून काढण्याचे काम केले तेही कोणी पुरुषाने नव्हे, तर एका स्त्री कलाकाराने. पंजाबमधील एका महीला कलाकाराने, अमृता शेरगील हिने! आणि तिच्या येथील आगमनाने केवळ पंजाबच नव्हे, तर संपूर्ण भारत तिने आपल्या झंझावाती कलाविष्काराने ढवळून काढला
अमृता शेरगील ही खरेतर जन्माने भारतीय नव्हे. सरदार उमरावसिंग हे एक मोठ्या शाही घराण्यांतील शीख गृहस्थ होते. प्रथम पत्नी निवर्तल्यानंतर ते हंगेरीला गेले. तेथे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या हंगेरीयन स्त्री अँटोनियर हिच्याशी त्यांनी विवाह केला. अँटोनियर ही स्वतः उत्कृष्ट पियानो वादक होती. उमरावसिंग तर संस्कृतचे गाढे विद्वान तत्वज्ञ होते. लग्नानंतर ते परत हंगेरीला बुधापेस्ट येथे गेले.तेथेच अमृताचा जन्म ३० जानेवारी १९१३ साली झाला. सरदार उमरावसिंग १९२१ साली भारतात परतले व सिमला येथे स्थायिक झाले. येथेच अमृताचे शिक्षण झाले. येथेच तिला चित्रकला या विषयाची गोडी लागली. अमृताला त्या वयातच रंगांची अनिवार ओढ उत्पन्न झाली. हाती येईल त्या कागदावर ती रंगानेच चित्र काढी. लहानपणी तिचे घर तिच्या रंगकामाने पूर्ण सजलेले असे. आणि या रंगांच्या सप्तरंगी ओढीने क्वचीतच तिने पेन्सीलला हात लावला असेल.
अमृताच्या आईच्या कलासक्त नजरेने मुलीचे कलागुण ओळखलेच होते. त्याला वाढीला लावण्याचा तिचा प्रयत्न होता. तिच्या अलौकिक बुद्धिमत्तेने अमृताच्या कलागुणांना पूर्णपणे वाव मिळावा म्हणून तिच्या नजरेसमोर केवळ इटली व पॅरीस आले, ज्यांनी अनेक १९ व्या व विसाव्या शतकात अनेक समकालीन कला चळवळींना व ऐतिहासिक कला परंपरांना जन्म दिला होता. आणि त्यामुळेच १९२४ मध्ये अमृताला घेऊन ती इटलीला गेली. तेथील नामांकीत अश्या कला संस्थेत तिचे नांव दाखल केले. पण तेथील कडक शिस्त अमृताला थोडी जाचक ठरली होती, तरी तेथील चांगली बाजूही तिला जाणवत असल्याने तिचा कलाविष्कार भक्कम होत होता. त्याचे तिने नेहमीच कौतूक केले. बरेच इटालीयन पेंटर तिला अनुभवायला मिळाले. त्यांच्या कलाविष्काराचा तिने भरपूर अभ्यास केला. पॅरीस मधील पॉल गोग्यां, व्हॅन गॉग यासारख्या चित्रकारांच्या चित्रांचा बराच प्रभाव तिच्यावर पडला. १९२९ मध्ये पॅरीस येथील 'इकोले नॅशनल डेस ब्यूक्स आर्ट' मधून अमृताने फाईन आर्टची पदवी घेतली.
द टोर्सो'हे तिच्या चित्रांपैकी एक, जे न्यूड स्टडीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणून ओळखले जाते. त्यातील ठळकपणा, रेखाटन, आणि नियमबद्धता हे खास गुण त्या चित्रातून तिने व्यक्त केले होते. त्यानंतरचे 'यंग गर्ल' या चित्राला टीकाकार, कलातज्ञ व कलाप्रेमींनीं खूपच उचलून धरले. आणि अमृता तिच्या 'कॉन्झर्वेशन' या चित्रामुळे 'ग्रॅन्ड सलोन इन पॅरीस' ची असोसिएट म्हणून निवडली गेली. यशाच्या एकेक पायऱ्या चढणारी एक तरुण तशीच पहीली आशीयायी महीला हा सन्मान मिळवणारी अमृता शेरगील होती. येथे तिला अनेक चित्र गॅलरीज, म्युझियम्स, सलोन्स याना भेटी देण्याची संधी मिळाली, ज्यामुळे तिच्या कलेत परिपक्वता आली. येथे तिने अनेक समकालीन तसेच ऐतिहासिक पेंटर यांच्या चित्रांचा सखोल अभ्यास केला. यूरोपमधील अमृताच्या वास्तव्यातील कला ही विशेष करून करून शैक्षणिक पद्धतीची होती. १९३४ पर्यंत तिने भर दिला होता तो बहुदा स्टील लाईफ, न्यूड स्टडी, पोर्ट्रेट्स अश्या प्रकारची कामे करण्याचा.
अमृता प्रसिद्धीला आली होती. पण अजूनही ती पूर्ण समाधानी नव्हती. स्वतःच्या शैलीच्या शोधात ती मग्न होती. सर्वांप्रमाणे एका पारंपारीक वाटेने जाणे तिच्या मनाला पटत नव्हते. ती परंपरा सोडून एका एका वेगळ्या वाटेवर चालण्याचा तिचा प्रयत्न चालूच होता. पॅरीसमध्ये आपणाला हवी ती शैली आत्मसात होणार नाही याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली. आणि येथेच तिला भारतीय माती खुणवू लागली. भारतातील तेजस्वी अश्या पिवळसर काळसर जमीनीचा सुगंध तिला आकर्षू लागला. त्यातील दरवाळाने ती मोहरून उठली. जरी भारत ही तिची जन्मभूमी नसली तरी पितृभुमीच्या ओढीने ती आसुसली गेली. येथील दीन-दुःखी चेहरे, गरीबी, कारुण्य यातच तिला तिची कला जाणवू लागली. आणि १९३४ साली अमृता शेरगील भारतात परतल्या. एकदा घरी परतल्यावर तिने फ्रान्स व इतर पाच्छात्य कलेवरून आपली दृष्टी काढून ती भारतीय जीवनावर वळवली. अमृता भारतात आली ती एखाद्या परदेशी पर्यटकाप्रमाणे येथील सृष्टी सौंदर्य पाहण्यास नव्हे, तर येथील दरवळच्या मोहाने. आणि येथे तिला हवे ते मिळाले. भारतीय जीवन अनुभवण्यासाठी तिने स्वतः साडी परीधान केली. तिने सर्व भारतभर प्रवास करून येथील लोकजीवन अनुभवले. तिने शहरे त्याच बरोबर खेडी पाहीली. तेथील सौंदर्य व त्याचसोबत ओंगळपणा देखील पाहीला. यातूनच तिला आपल्या चित्रांना विषय मिळू लागले. म्हणून आपल्या चित्रांचे विषय तिने नेहमीच गरीबी, खेडूत, भिकारी असेच ठेवले. ती आपली चित्रे केवळ दिसेल ते काढल्याप्रमाणे काढत नसे, तर त्यांना ती स्वतःच्या भावनांची जोड देत असे. आपल्या चित्रांमध्ये दाखवलेले भारतीय चेहरे उदास, दुःखी, गरीब अन भुकेलेले प्रथम तिने शिमल्यात पाहीले. मग दक्षीण भारतात, आणि आयुष्याच्या अखेरीस दिवस काढलेल्या पंजाबात! १९३६ च्या सुमारास अमृताने अजंठाला भेट दिली. तेथे तिला शुद्ध अश्या चित्रांची शाश्वत अशी उदाहरणे मिळाली. त्यांचाही प्रभाव तिच्या चित्रांवर आढळतो. तसेच सुलभीकरण, अनावश्यक गोष्टींना न दर्शवणे, रंगसंगती तिच्या चित्रातून आढळते. पाच्छात तंत्रज्ञान आणि भारतीय चैतन्य यांची सुरेख जोड तिने घडवली. त्यापूर्वी कोणत्याच कलाकाराने ते केले नव्हते.
अमृताने जेथे जेथे भेटी दिल्या, तेथील विषयांवर तिने चित्रे काढली. अमृताने आपल्या हंगेरीयन मामेभावाशी विवाह करण्याचे ठरवीले. तेही केवळ जीवनांत एक स्थैर्य लाभावे या विचाराने. पण तिच्या आई वडिलांचा याला विरोध होता.स्वतःच्या मामेभावाशी विवाह करणे तिच्या वडिलांना पसंत नव्हते; तर एका श्रीमंत व्यक्तीशी तिचा विवाह व्हावा म्हणून आईचा तिला विरोध होता. पण आई वडीलांचा विरोध पत्करून १९३८ साली अमृताने डॉ. व्हिक्टर इगन याच्याशी हंगेरी येथे विवाह केला. तिच्या नवऱ्याने तिला तिचे जीवन स्वतंत्रपणे जगण्याची पूर्ण मुभा दिली होती. वर्षभरातच ते दोघे भारतात आले व नंतर लाहोर येथे स्थायीक झाले. हे अमृताच्या आयुष्यातील अखेरचे पर्व होते. तिच्या ग्रामीण जीवनाच्या रेखाटनाचा शेवटचा काळच म्हणायला हवा.
अमृता शेरगीलनी रंगवलेल्या चित्रांमध्ये आपल्याला दिसतात निस्तेज असे चेहरे. उपासमारीने ग्रासलेले पुरुष आणि स्त्रिया. पहाडी खेडूत. तिच्या चित्रांची शीर्षके आहेत 'हिल मेन' 'हिल वुमन'''ब्राईट टॉयलेट' 'ब्रम्हचारी' स्वतः स्त्री असल्याने कदाचीत तिने आपल्या चित्रांचे विषय स्त्रिया अन त्यांचे उद्योगधंदे असेच बहुदा ठेवले. शेवटच्या कालावधीत तिने आपल्या चित्रांवरील नैसर्गिकतेला थोडे बाजूला सारून त्यांना आधुनिकतेची व काल्पनिकतेची जोड दिली. विशेषतः आकृतीच्या छाया दाखविणे तिने बंद केले. दिसते तसे रेखाटण्या ऐवजी केवळ काल्पनीक आकारावर आकृतीची गोलाई ती दाखवीत असे. चित्रांमध्ये तिने कधीही कृत्रीम प्रकाशाचा वापर केला नाही. शुद्ध सूर्यप्रकाशात तिची चित्रसाधना सुरु असे. तिने शेवटी शेवटी केलेल्या 'रेड क्ले एलिफंट ' व तत्सम चित्रे या शैलीवर आधारित आहेत. येथेच तिने आधूनिक भारतीय चित्रकलेचा पाया घडविला.
अमृता शेरगील हे नांव व तिची चित्रे यांनी केवळ पंजाबातच नव्हे, तर संपूर्ण भारतात पाया रचला गेला. एवढेच नव्हे तर भारतातील कला वर्तुळात तिने चेतना जागृत केल्या. अमृताने अनेक सम कलाकालीन कलाकारांना आपल्या चित्रांद्वारे तसेच व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन केले. मुख्यत्वे करून ज्या पारंपारिक पद्धतीचे अंधानुकरण करून चित्रनिर्मिती करणाऱ्या कलावंतांना तिने या एकाच ठिकाणी साठून राहीलेल्या व कधीच पुढे न जाणाचा प्रयत्न न केलेल्या परंपरा मोडून वाहत्या प्रवाहाशी मिसळण्यास सांगीतले. या परंपरा कधी काळी महान होत्या, भव्य होत्या, शुद्ध अन निर्भेळ होत्या. पण कालानुरूप त्या आज केवळ नियमबद्ध आहेत. त्या तोडा आणि अशी काही निर्मिती करा, जी या मातीशी आणि भारतीयत्वाशी आपले नाते जोडेल, असा बहुमोल सल्ला तिने भावी कलाकारांना दिला. आधूनिक चित्रकलेचा एक संदर्भ म्हणून अमृताने लौकीक मिळविला. भारतीय कलेला एक नवे दालन तिने उघडून दिले. अमृताने सर्व कलाजीवन ढवळून काढले. अनेक पुरुष पेंटर तिच्या प्रभावाखाली त्यावेळी आले. पण दुर्दैवाने एकही स्त्री कलाकाराने तेव्हां त्यांची वाट चोखाळली नाही. पंजाबमधील लोकजीवनाची रूढी ती बदलू शकली नाही. सौंदर्यशास्त्राचा अभाव असलेल्या तेव्हाच्या लोकांनी स्वतःच्या मुलींना कला शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले नाही. सुमारे ५०च्या दशकापर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यानंतर मात्र अनेक पंजाबी महीला या क्षेत्रांत दिसू लागल्या. त्यापैकी काहींवर अमृता शेरगिलच्या चित्रांचा प्रभाव होता.
अमृताने स्वतःचे 'सेल्फ पोर्ट्रेट' बनविले त्यावेळी ती म्हणाली, 'जो चित्रकार स्वतःचे व्यक्तीमत्व बनवतो तो त्या चित्रामध्ये स्वतःचे रक्तच मिसळत असतो.' अमृता शेरगील पाच्छात्य वातावरणात वाढूनही भारतीय ग्रामीण जीवनात रंगली. त्यांची दुःखे तिच्या चित्रांचा विषय ठरले.तिच्या आयुष्याची दुसरी व शेवटची अशी अवस्था १९३८ मध्ये सुरु झाली ती तिच्या अखेरपर्यंत. लाहोरवर अमृताने बेसुमार प्रेम केले. तेथील जनतेशी आपल्या चित्रांतून संवाद साधावा या हेतूने तिने लाहोरला स्वतःच्या पेंटिंगचे भव्य असे प्रदर्शन करण्याचे ठरवीले. त्याच्या व्यवस्थेसाठी ती रोज तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत असे. तेथील फेलिटीज हॉटेल मध्ये हे प्रदर्शन भरले जाणार होते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शनाचा मुहूर्त होता. पण ३ डिसेम्बर १९४१ रोजी अमृता आजारी पडली. अंथरुणावर पडून राहीलेली अमृता फिकट अन निस्तेज दिसत होती. तिच्या डॉक्टर पतीने तिच्यावर उपचार चालवले होते. पण त्या उपचारांना दाद न देता तिने मंगळवार दिनांक ५ डिसेंबर १९४१ रोजी या जगाचा निरोप घेतला. हांसती खेळती अमृता देवाघरी गेली. केवळ अठ्ठावीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या स्त्री कलाकाराने आपले तसेच भारताचे नांव जगात पोचविले. पण तिच्या चाहत्यांनी ठरल्याप्रमाणे तिच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन लाहोर येथील ' पंजाब लिटररी लीग हॉल' मध्ये भरवून तिला एक आगळी श्रद्धांजली वाहीली.
अमृता शेरगील ही आता राष्ट्रीय संपत्ती झाली आहे. तिची चित्रे भारताबाहेर जाऊ शकत नाहीत. आज अमृता शेरगिलची बरीच चित्रे दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनीक कला संग्रहालयाच्या संग्रहात आहेत.
- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष




Comments
Post a Comment