कला क्षेत्रातील ज्ञानकोष. बाबुराव सडवेलकर.


 



 
बाबुराव सडवेलकर आज आपल्यात नाहीत हेच मुळी खरे वाटत नाही. वाटते की नेहमीप्रमाणे त्यांचा फोन येईल व ते म्हणतील, ' हे पहा राजाध्यक्ष, माझी दोन कामे तुमच्याकडे आहेत....' असे म्हणून ते आपली कामे समजावून देणार. आणि ' तुम्हाला जर तसदी देतो आहे' असे आपल्या नम्र स्वरात सांगणार. बाबुरावांना आर्ट स्कूल मध्ये मी प्रथम पाहीले ते १९६२ साली. तेथे ते प्राध्यापक होते. ठेंगणीशी मूर्ती, टापटीपीची राहणी, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भर टाकणारी त्यांची काळी दाढी, पुढे वयोमानानुसार ती राखाडी झाली तेव्हा त्यांना ती अधिकच खुलून दिसू लागली. त्यांचा कलेचा सखोल अभ्यास, इंग्रजीवर असामान्य प्रभुत्व, विध्यार्थ्यांना म्युरल, पेंटिंग, कला इतिहासापासून सर्वच विषय समरसतेने शिकविण्याची हातोटी यामुळे बाबुराव विध्यार्थ्यामध्ये लोकप्रिय झाल्यास नवल नाही. आणि यावर कळस चढविणारा त्यांचा नम्र आणि मृदू स्वभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वात भरच टाकीत असे

२८ जून १९२८ रोजी सावंतवाडीला जन्माला आलेले बाबूराव पुढे कोल्हापूर येथे आले. कोल्हापूरात शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्यातील चित्रकला त्यांना अस्वस्थ करून सोडत असे. कोल्हापूर तर कलेचे माहेरघर या नात्याने 'कलापूर' म्हणूनच ओळखले जाई. या कलापुरात बाबुराव पेंटर, बाबा गजबर, गणपतराव वडणगेकर, माधवराव बागल, गणपतराव कांबळे, आबालाल रहमान असे दिग्गज कलाकार कार्यरत होते. तेथेच बाबूरावांचा कला अभ्यास सुरु झाला. पुढे वडिलांचा विरोध व मुलाच्या चित्रकलेच्या वेडापायी आपले दागीने गहाण ठेवणाऱ्या आईचा आशीर्वाद घेऊन मुंबईला पळून आलेल्या बाबुरावांनी आपल्या मावशीकडे राहून जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला, आणि अत्यन्त प्रतीकूल परिस्थीतीत आपली कला साधना सुरु केली.  जेजेत आल्यावर त्यांना त्रिंदाद, भोंसुले, हळदणकर, आचरेकर, पळशीकर यांची कामे पाहायला मिळाली. विशेषतः त्यांच्या पोर्ट्रेट्सनी बाबुरावांवर खूप प्रभाव पाडला. शेवटच्या वर्षी वार्षीक प्रदर्शनाच्या वेळी बाबुरावांनी केलेल्या एका पोर्ट्रेटकडे तीन गोऱ्या व्यक्ती खूप निरखून पहात त्या पोर्ट्रेटचा आस्वाद घेत होत्या. नंतर त्या व्यक्ती संचालकांकडे येऊन त्यांनी ते पोर्ट्रेट केलेल्या विद्यार्थ्याला बोलावण्यास सांगीतले. बाबूराव तेथे येतांच त्यांतील एकाने बाबुरावांना जवळ घेऊन कवटाळले व म्हणाले, 'खरोखरीच तू महान आहेस!' जेव्हां बाबुराव सडवेलकर यांना ती व्यक्ती कोण आहे ते कळले तेव्हां त्यांचे डोळे भरून आले. ते होते टाइम्स ऑफ इंडियाचे कला दिग्दर्शक वाॅल्टर लॅंगहॅमर. भारतीय वातावरण संपूर्णपणे अभ्यासलेला एक जबरदस्त ताकदीचा परदेशीय चित्रकार! 

१९५३ साली जी.डी.आर्ट झाल्यावर बाबुरावांना एक वर्षाची जे.जे.ची फेलोशीप मिळाली. नंतर जे.जे.मधेच त्यांना अध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा व्यासंग, कला तपश्चर्या, आणि बौद्धीक पातळी यांच्या संयोगामुळे बाबुरावांना फुलब्राईट स्कॉलरशीप मिळाली. व त्यांनी 'कला शिक्षणामधील आधूनिक पद्धती' शिकण्यासाठी अमेरीकेला प्रयाण केले.  नेमका हाच काळ अमेरीकेच्या कला क्षेत्रांत ॲबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझम'ला प्रतीष्ठा मिळवून देणारा होता. त्याच काळात इतर अनेकांप्रमाणे त्यांनाही ज्या 'बाहाऊस'चे आकर्षण वाटे असे अनेक शिक्षक अमेरीकेत स्थलांतरीत झाले होते. व तेथील दिग्गजात गणले जात होते. त्यांच्याशीही बाबुरावांची वैचारीक देवाण घेवाण होत असे. आणि मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन सडवेलकर भारतात परतले. तेथून परतल्यानंतर त्यांनी परत अध्ययन सुरु केले.


बाबूराव जरी पेंटर होते, तरी ते एक उत्तम कला शिक्षक आणि कला शिक्षणतज्ञ होते. त्यांची बुद्धीमत्ता अफाट होती. विषयाचे ज्ञान अलौकिक होते. साहित्याची उत्तम जाण होती.  त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांतून व्याख्यानासाठी आमंत्रीत करण्यात येत असे. यामध्ये 'आर्ट सोसायटी ऑफ इंडिया', 'इंडो अमेरीकन सोसायटी', 'एस एन डी टी महीला विश्व विद्यालय', 'आई आई टी', न्याशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट', 'फिल्म व टेलिव्हीजन संस्था' अश्या तोलामोलाच्या संस्था अंतर्भूत होत्या. कला इतिहासाचे व रसग्रहणाचे गाढे अभ्यासक असलेल्या सडवेलकरांनी अनेक कला उपक्रम राबवीले. यामध्ये खडकवासला येथील 'राष्ट्रीय संरक्षक प्रबोधिनी' कुरुक्षेत्र व मोगल कालीन युद्धाची भव्य भित्तिचित्रे, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमधून सहभाग, नवी दिल्ली येथील ललीत कला दालनांमधील उभारलेले 'महाराष्ट्रातील पारंपारीक कला' हे प्रदर्शन, तसेच 'बॉंबे आर्ट सोसायटीच्या शताब्दी प्रदर्शनां निमीत्त केलेला अभ्यासपूर्ण अहवाल यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. १९५४ ते १९६१ दरम्यान अनेक मानाची पारितोषिके मिळविलेल्या बाबुरावांनी ६१ पासून स्पर्धामधून भाग घेण्याचे बंद केले. त्यांनी मराठीमधील मौज, सत्यकथा, ललीत अश्या नामांकीत नियतकालिकांमधून कला विषयक मौलीक लेखनही केले.

अमेरिकेत असताना त्यांनी केलेल्या कला शिक्षण पद्धतीवर आधारीत स्वाध्यायीका त्यांनी येथील विद्यार्थ्यांकडून करवून घेतल्या.  तेथील शिक्षण पद्धती ते जे.जे.मध्ये रुजवू पहात होते.  पण १९७१ मध्ये वरीष्ठांसोबत झालेल्या मतभेदामुळे त्यांनी जे.जे.स्कुल ऑफ आर्टचा राजीनामा दिला व ते जे.जे. मधून बाहेर पडले. पुढे त्यांना गोवा सरकारने त्यांच्या नवीन कला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून आमंत्रीत केले पण ओढाताणीची परिस्थीती असूनही बाबूरावांनी त्याला नकार दिला. पण पुढे महाराष्ट्र राज्याचे कला संचालक म्हणून १९७६ साली ते पुन्हा परतले. यावेळी सर्वच अध्यापक वर्ग सुखावला. कारण सर्वांनाच बाबुराव आपल्यातील वाटत असत. त्यांचा आल्या आल्या आम्ही संस्थेमध्ये सत्कार करून अभिनंदन केले. आणि येथेच माझ्या अन बाबुरावांच्या तारा जुळल्या. मी त्याकाळी बरेच संशोधनात्मक प्रकल्प करीत असे. आणि सडवेलकर सर त्यात कित्येकदा मार्गदर्शन  करीत असत.मी जेव्हां शिक्षक म्हणून जे.जे.मध्ये आलो, त्यावेळी साठ्ये सरांमुळे त्यांच्याशी माझी ओळख झाली होती. नंतर स्कुल ऑफ आर्ट मध्ये माझे जाणे येणे सुरु झाले, तेथे अनेक शिक्षकांशी माझी सलगी झाली. पण बाबूरावांच्या मितभाषी आणि आदरणीय व्यक्तिमत्वामुळे त्यांच्याशी सलगी करणे थोडे कठीणच वाटत असे. पण हेच बाबूराव माझ्या पुढील आयूष्यात माझे एकप्रकारे गुरु अन मार्गदर्शक ठरले!


१९५५ पासून बाबूराव 'बॉंबे ग्रुप'चे सदस्य झाले. त्यांतील मोहन सामंत, हरी अंबादास, गाडे, सदानंद बाक्रे, हुसेन यांच्या साथीने सडवेलकरांचीही चित्रे प्रदर्शीत होऊ लागली. या चित्रकारांच्या सहवासांत असणाऱ्या बाबुरावांनी चित्रे विशेषतः अमूर्त धाटणीची असत. पण तितक्याच ताकदीने त्यांनी वास्तववादी चित्रेही आविष्कृत केली. एकीकडे 'बॉंबे आर्ट सोसायटी'चे 'बॉबी' या चित्रांसाठी त्यांनी संस्थेचे सुवर्ण पदक मिळवले, आणि दुसरीकडे 'व्हेनीस बिएनाले'  प्रदर्शनांत सहभाग घेतला. १९७६ साली ते जेव्हां कला संचालक पदी आले ते कांही उपयुक्त अश्या योजना मनाशी बाळगूनच! राज्यातील कला
महाविद्यालये ही केवळ पाटी टाकल्याप्रमाणे काम करणारी नसावीत तर कलेसोबतच त्यांची बौद्धीक पातळीही उच्च व्हावी या हेतूने ते प्रेरीत झाले होते. कला शिक्षक हा उच्च विद्या विभुषित, व्यासंगी व संशोधक वृत्तीचा असावा याकडे ते खास लक्ष देत असत. शासकीय कला विषयक कामाचा दर्जा वाढावा या भावनेने त्यांनी सतत त्याचा पाठपुरावा केला. आणि यातूनच सुंदररीत्या संकल्पीत केलेल्या दैनंदिन्या, रायगडावरील मेघडंबरी, विधानभवनावरील अशोकस्तंभ अशी उच्च प्रतीची कामे त्यांच्या कारकीर्दीत घडली. चित्रकलेबद्दल प्रसंगीक लिखाण करण्याचे कामही ते करीत असत. आकाशवाणीवर चित्रकलेविषयी अनेक भाषणे त्यांनी केली. लेखनासाठी आवश्यक असणारी शिस्त आणि बैठक त्यांच्याकडे होती. सनावळींचे तपशील, चित्रकलेचे दस्तावेजीकरण, चित्रातील दुर्मीळता आणि कालावधीवर अधिकृतपणे भाष्य, हे त्यांच्या अंगी असलेले दुर्मीळ गुण होते. खरोखरीच महाराष्ट्र राज्याला लाभलेला बाबूराव सडवेलकर नावाचा एक मौल्यवान हिरा होता हा! 


शासनाची सर्व कलात्मक कामे ते मलाच देत असत. अश्यात एकदा बदली प्रकरणावरून त्यांच्या विरोधात काही अध्यापकांनी संप केला. वास्तविक आम्हा उपयोजित कला शिक्षकांचा त्यात संबंध नव्हता. पण आम्ही त्यात ओढलो गेलो. त्या आधी त्यांनी मला बोलावून आग्रहाने राज्य कला प्रदर्शनाचा अधिकारी होण्यासाठी गळ घातली होती. त्यावर्षी कोल्हापूर येथे प्रदर्शन भरले होते. अतिशय भपक्यात ते प्रदर्शन संपन्न झाले. कोल्हापूर म्हणजे बाबुरावांचे तसे कलाक्षेत्रच होते. रवींद्र मेस्त्रीसह सर्वच कलावंतांचे सहाय्य ते प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी झटत होते. त्या रात्री बाबुरावांचे कला विषयावरील भाषण सर्वच कला रसीकांना एक आनंदाची पर्वणी देऊन गेले.  साऱ्या कोल्हापुरात या प्रदर्शनाची चर्चा होत होती. दुसऱ्या वर्षी स्थळ होते औरंगाबाद. मी बाबुरावांसोबत गेलो होतो. त्या काळात बाबूरावांनी एक नवा उपक्रम सुरु केला होता. शालेय, कला संस्था येथील विध्यार्थ्यांना कलेचा शास्त्रोक्त अभ्यास व्हावा, त्यांना कला रसग्रहण समजावे या हेतूने कला संचालयात ' कला विषयक फिल्म विभाग ' सुरु केला होता. त्यामध्ये कलाविषयक फिल्म दाखवून त्यांचे रसग्रहण रसिकांसाठी तज्ञ व्यक्तींकडून करण्यात येत असे.  व तो  विभाग बाबूरावांनी माझ्या ताब्यात दिला होता. आम्ही औरंगाबादहून परतलो तो येथे संप सुरु झाला. सर्व शिक्षकांचा एककलमी कार्यक्रम होता, तो 'बाबुराव सडवेलकर हटाव'  पुढे अनेक बऱ्या वाईट खुणा मनावर कोरून संप मिटला. पण त्यामध्ये मोठी हानी झाली ती बाबुरावांनी आखलेल्या अनेक उपक्रमांची. त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांची.विद्यार्थी अन शिक्षक यासाठी योजलेल्या कार्यक्रमांची. जी कधीही भरून येऊ शकणारी नव्हती. 

कला शिक्षणासाठी त्यांच्या काही ठोस योजना होत्या. आर्ट स्कूल मध्ये विध्यार्थ्यांना शिकविताना ज्या काही उणीवा भासत त्या त्यांनी कार्यान्वित करायच्या ठरविल्या. कलेचा आनंद सामान्य लोकांनाही घेता यावा यासाठी त्यांनी कला रसग्रहणाचा अभ्यासक्रम तयार केला. जहांगीर आर्ट ग्यालरी मध्ये व्याख्याने, चित्रफिती, याद्वारे त्यांनी तो लोकांसमोर आणला. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आदि विविध ठिकाणी असलेल्या कला संस्थेमधील शिक्षक वर्गाला एकत्र आणून त्यांच्यामध्ये वैचारिक देवाण घेवाण करविली. ग्रामीण भागातील कला जनतेपुढे यावी या हेतूने अनेक कला शिक्षकांना निरनिराळ्या ठिकाणी पाठवून त्यांच्याकरवी ही कला जनताभिमुख केली. यातूनच सावंतवाडीची 'गंजिफा' व 'लाकडी खेळणी', तसेच 'पिंगुळीची चित्रकथी'  त्यांनी महाराष्ट्रात उजेडात आणली. जोडीला वाई येथील 'मोतीबाग' या रास्ते वाड्यातील व मेणवली मधील नाना फडणीसांच्या वाड्यातील भित्तिचित्रे यांचा शोध घेऊन त्यांनी त्या आधारे महाराष्ट्र राज्याच्या दैनंदिनी बनविल्या. व त्या पारितोषिक विजेत्या ठरल्या.  तसेच शासनाच्या कला संग्रहासाठी कांही चित्रे खरेदी करून त्यांचा संग्रह करणे हा उपक्रमही त्यांनी यशस्वीपणे राबविला. यामध्ये रावबहादूर धुरंधर, हळदणकर, वारली पेंटिंग्स, चित्रकथी पेंटिंग्स, भागवत पुराण पोथी यांचा समावेश आहे. दरवर्षी राज्य कला प्रदर्शनाच्या वेळी या महान व दुर्मीळ कलाकृती ते एक स्वतंत्र विभाग करून जनतेसाठी त्या प्रदर्शीत करीत असत. अनेक रसीक याचा लाभ घेत.

महाराष्ट्र राज्यात निरनिराळ्या ठिकाणी जी कला महाविद्यालये आहेत, त्यातील कला शिक्षकांना एकत्र आणून त्यांचा समन्वय राखावा या हेतूने अनेक चर्चासत्रे आयोजित केली. यामुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, धुळे, सोलापूर आदी विविध ठिकाणी असलेली कला महाविद्यालये एकत्र येऊन त्यांची वैचारीक देवाण घेवाण सुरु झाली. त्यामुळे शिक्षकानाही स्वताचा दर्जा वाढविण्यास मदत झाली. याचबरोबर त्यांचे स्वताचे संशोधनही सुरूच असे. एखादी नवी गोष्ट समजली कि रात्रंदिवस त्यावर त्यांचा अभ्यास सुरु असे. पण अश्या या कलासक्त कलाकाराच्या आयुष्यात केवळ उपेक्षा आली. मग ती जेजेच्या आवारातील असो वा शासनाकडून. शासनाचा उत्कृष्ठ कला संग्रह व्हावा या हेतूने बाबूरावांनी अनेक कलाकृती जमविल्या. आज त्यांची काय परिस्थिती असेल सांगता येत नाही. अखेर त्यांचा निवृत्तीचा दिवस आला. त्यादिवशी त्यांनी अत्यंत भावनास्पर्शी भाषण करून आपल्या कार्याचा लेखाजोखा दिला. सर्वांचेच डोळे तेव्हा पाणावले होते

पुढे माझा त्यांच्याशी वारंवार संबंध येवू लागला. मी अधिष्ठाता झाल्याचा त्यांना खूप आनंद झाला होता. मध्यंतरी मी नागपूरला असताना राज्य कला प्रदर्शनाच्या निमित्ताने ते आले होते. रवि भवनवर आम्ही गप्पा मारीत बसलो असता अचानक ते म्हणाले, राजाध्यक्ष, मला तुम्ही मुंबईला हवेत. माझी बरीच सांस्कृतिक कामे तुमच्यावाचून राहिली आहेत ! त्याच वर्षी मी मुंबईला परतलो. बाबुराव सतत कार्यरत होते. अश्यातच त्यांची पत्नी त्यांना अर्ध्या वाटेवर सोडून गेली. तेव्हा ते पूर्ण खचले होते. तरीही त्यांनी स्वताला संशोधनात गुंतवून घेतले होते.  या काळात बाबुरावांनी त्यांच्या पत्नीच्या चित्रांचे एक प्रदर्शन भरविले. त्याच्या विक्रीतून आलेली रक्कम त्यांनी  जहांगीर कला दालनाकडे सुपूर्द करून त्यांनी दरवर्षी आपल्या पत्नीच्या नावे ' विजू सडवेलकर पुरस्कार ' हा एका महिला कलाकारासाठी पुरस्कार जाहीर केला. कला संचालक या नात्याने बाबुराव संपूर्ण महाराष्ट्र फिरले होते. तेव्हां त्यांना अनेक अश्या स्त्रिया भेटल्या, ज्यांना ते 'ग्रासरूट आर्टीस्ट' म्हणून मानायचे. यामध्ये भटक्या जमातीमधील , धुळ्यातील व खानदेशातील उत्कृष्ठ असे भरतकाम व कशिदा काढणाऱ्या होत्या. पूण्यात सिरॅमिक पॉटरी करणाऱ्या आढळल्या. दुर्दैवाने अश्या स्त्रियांना त्यांची कला जोपासण्याचे शिक्षण कधीच मिळत नसे. अथवा यापैकी कोणी मदतीसाठी कला संचालनालयाकडे पोचू शकत नसे. यामुळे 'विजू सडवेलकर पुरस्कार' हा कोणत्याही प्रकारची कला आविष्कृत करणाऱ्या राज्यातील महिलेला देण्यात यावा हा विचार यात मांडण्यात आला.  त्यांच्यातील सुप्त कलागुण प्रकाशात आणण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम होता. आम्ही दोघेही एकदा गोवा येथे कला अकादमीच्या गोवा राज्य कला प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून गेलो होतो. त्या रात्री हॉटेलवर त्यांनी बराच वेळ निरनिराळ्या विषयावर भाष्य केले. अनेक कलाकारांच्या कलाकृतीवर सांगितले. आपण हाती घेतलेल्या अनेक पुस्तकांच्या विषयावर ते बोलले. आपले रोजचे खाणे देखील कश्या प्रकारचे असते, हे देखील ते सांगत होते. एखाद्याला गुंग करेल असे त्यांचे विद्वता प्रचुर बोलणे असे. ऐकणारा त्यात पूर्ण समरस होऊन जात असे.

'विजू सडवेलकर पुरस्कारा'च्या पहिल्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या श्रीमती ज्योत्स्ना कदम ! अर्थातच त्याची आमंत्रण पत्रिका, मानपत्र या सर्वांचे संकल्पन, छपाई माझ्याकडेच असे. शोभा डे यांच्या हस्ते हा पुरस्कार कदमांना प्रदान करण्यात आला. मात्र जहांगीरच्या हॉल मध्ये हा समारंभ झाला, तेथे कोणाचे तरी प्रदर्शन होते. शोभाला ती ज्योत्स्ना कदमांचीच वाटली. व तिने त्या चित्रांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. अर्थात तिची काहीच चूक नव्हती. दुसऱ्या वर्षी मी त्यांना यासाठी पुरस्कार विजेत्यांच्या चित्रांचा  एखादा स्लाईड  शो असावा हे सांगताच त्यांनी दुसऱ्या वर्षी सुधा मदन यांच्या पुरस्काराच्या वेळी तसे करण्याचे ठरविले. नेहमी प्रमाणे डीझाईनचे काम माझ्याकडेच होते. समारंभाची तारीख ठरली होती २४ नोव्हेंबर २०००. माझ्याशी बोलून त्यांनी मानपत्राचा मसुदा पाठविला. त्यावेळी कधी नाही तो त्यांनी आपल्या पुस्तकांच्या संग्रहाचा विषय काढला. म्हणाले, " माझ्या नजरेसमोर आज फक्त तुम्ही आहात जी माझी पुस्तके तुमच्या संस्थेतील लायब्ररी मध्ये संभाळाल. तेव्हा माझी पुस्तके थोडी थोडी तुमच्याकडे पाठवतो." असे म्हणून त्यांनी काही पुस्तके पाठविली व मला पत्रही दिले. बुधवारच्या रात्री त्यांनी समारंभासाठी सर्व स्लाईड लावून ठेवल्या. त्यावरच्या नोंदी उतरून ठेवल्या. त्या रात्री सरांनी आपल्या मुलाला बोलावून घेतले होते. एरवी ते एकटेच राहत असत. रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम चालले होते. नंतर तृप्त मनाने ते झोपी गेले. अन अकल्पित घडले. सकाळी त्यांचा मुलगा चहासाठी त्यांना उठवायला गेला...पण बाबुराव कधीच गेले होते. ती त्यांची शेवटची रात्र ठरली होती. मी सरांकडून शिल्पान्जलीच्या सहस्त्रकाच्या  अंकासाठी त्यांच्या आवडत्या विषयावर, राजा रविवर्म्यावर  एक खास लेख लिहून घेतला होता. तो त्यांचा शेवटचाच लेख असावा. अन सुधा मदन बद्दल आणि पुस्तकाबद्दल त्यांनी मला लिहिलेली पत्रेही बहुदा शेवटचीच असावीत !

बाबुराव सडवेलकर यांच्याबरोबर जेजेतील एक अभ्यासू, चिंतनशील असे पर्व संपूष्टात  आले.  त्यांचे जाणे हे एका संस्थेचे लोपणे आहे. सडवेलकरांचे कार्य एखाद्या संस्थेशी तुलना करण्यात येईल अश्या प्रकारचे होते. अनेक शिष्य निर्माण करणारे व त्यांना मार्ग दाखवणारे ते एक दीपस्तंभ होते. असा कला संचालक पुन्हा कधीही होणे शक्य  नाही.  केवळ चित्रकलेच्याच नव्हे, तर त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्राचीही फार मोठी हानी झाली.त्यांच्या बरोबर  काम करण्याची, फिरण्याची मला बरीच संधी मिळाली. प्रत्येक वेळी त्यांच्या सहवासात मला नवीन शिकायला मिळत असे. महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ असावे यासाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने कला विश्वातील एक ज्ञानकोष हरपला. जे.जे. स्कुल ऑफ आर्ट   ज्या नावांमुळे ओळखले जाते त्यातील एक वरच्या स्तरावरील नाव होते, " बाबुराव सडवेलकर " एक आदरयुक्त नांव  जे माझ्या हृदयात सतत कोरलेले आहे !

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष

Comments

  1. सर अप्रतिम मांडणी

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’