मुंबईची लावण्यवती : छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस
या मुंबापुरीत दररोज हजारो लोक आपल्या भवितव्याची स्वप्ने बाळगून येत असतात. या महानगरात आपल्या रोजगाराची, पोटापाण्याची सोय होत असल्याने येथेच स्थायीक होतात. कांही भाग्यवान जागा मिळवून राहतात, तर काहींना डोक्यावर छप्पर नसले, तरी मिळेल त्या जागेचा आसरा घेऊन तिला आपल्या मालकीची बनवितात. अश्या स्वप्ने बाळगणाऱ्या कैक तरुणांचे काय होते, त्याचे अगदी वास्तववादी चित्रण के. अब्बास यांनी सुमारे पन्नास एक वर्षांपूर्वी काढलेल्या आपल्या 'शहर और सपना' व राष्ट्रपती पदकाने सन्मानीत केलेल्या चित्रपटांत केले आहे. देश्याच्या कानाकोपऱ्यातून एखादी व्यक्ती मुंबईला येते, तेव्हां ती प्रथम पोहोचते ती बोरीबंदर येथील ‘व्हिक्टोरीया टर्मिनस’ ( आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वर. या नगरीत आलेला नवागत या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या वास्तूला डोळे भरून पाहून घेतो. तिच्या भव्यतेपुढे तो दिपून जातो.कदाचित तेच त्याचे पहीले व आत्मीयतेने केलेले निरीक्षण असेल. कारण नंतर लक्षावधी मुंबईकरांप्रमाणे एका मागोमाग येणाऱ्या प्रवाशानी तुडुंब भरलेल्या लोकलमधून उतरून घाईघाईने स्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी तोही त्यात सामील झालेला असेल. मिनिटा मिनिटांवर आयुष्यक्रम आखलेल्या मुंबईकराला नंतर या वास्तूकडे मान उंचावून पहायलाही वेळ नसतो. डोळ्याला झापड लावलेल्या घोड्याप्रमाणे त्याचे धावणे होते. याच देखण्या स्थानकाला पूर्वी ‘ मुंबईची म्हातारी' असे संबोधत. पण मला ती नेहमीच एक लावण्यवतीच जाणवली. आसुसल्याप्रमाणे तिचे सौंदर्य न्याहाळावे अशी!
प्रत्येकजण आपापल्या वैयक्तीक विवंचनेत येथे वावरत असतो. लोकांचे लोंढेच्या लोंढे येथून सदैव आतबाहेर करीत असतात. त्यात स्त्री पुरुष मुलेमुली यांचा समावेश असतो. कुणी कामाचे ठिकाण गाठण्यासाठी तर कोणी आपल्या शाळा कॉलेजला पोचण्यासाठी धांवत असतात. रोज तिकिटांसाठीही या स्थानकांत प्रचंड रांगा लागलेल्या असतात. मग ती स्थानीक लोकलच्या प्रवासासाठी असो, वा लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी. पण अश्याच एखाद्या क्षणी जर कोणी शेजारीच असलेल्या खांबावरील नक्षीकाम पाहीले तर आपली नजर आच्छर्याने थक्क होते. हळूहळू आपली नजर वरवर जाते. तेथील स्टार चेंबरच्या छतावरील नक्षीकाम पहाताना आपण ज्या कामासाठी आलो आहोत, त्याचा क्षणभर विसर पडतो. अश्या प्रकारचे वास्तू शिल्पकलेचे नितांत सुंदर उदाहरण असलेले रेल्वे स्थानक केवळ या मुंबईचेच नव्हे, तर साऱ्या भारताचे भूषण ठरलेले आहे.
'ग्रेट इंडीयन पेनिनसुला' अथवा जी. आय.पी. या रेल्वे कंपनीच्या मुंबईच्या कार्यालयासाठी नवीन इमारत बांधायचे ठरले, तेव्हां जी.आय.पी. कंपनीने शासनाच्या सार्वजनीक बांधकाम खात्याला त्यांचा वास्तूविशारद देण्याची विनंती केली. वास्तवीक रेल्वे ही खाजगी कंपनी असल्याने सरकारवर तशी बांधीलकी नव्हती. पण रेल्वे स्थानकाचे महत्व ओळखून बांधकाम खात्याने फ्रेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या तरुण, कल्पक व तडफदार वास्तुविशारदाची सेवा रेल्वेला दिली. कारण सरकारी अधिकारीही कला संस्कृतीशी भावनीक रित्या जुळलेले असण्याचा तो काळ होता. यावेळी स्टीव्हन्स केवळ तीस वर्षे वयाचे होते. नुकतीच त्यांनी मुंबईची 'सेलर होम' ( आताचे पोलीस मुख्यालय ) ही इमारत बांधून पूर्ण केली होती. व त्यामुळे स्टीव्हन्स हे प्रसिद्धीच्या वलयात आले होते. मूळ मुंबादेवी मंदीराच्या जागेवर व फणशी तलावाजवळ या नवीन रेल्वे स्थानकाची रचना करण्याचे काम स्टीव्हन्सना आव्हानात्मक नक्कीच होते. त्या काळांतील वास्तूशास्त्रात एक भव्यदीव्य विक्रम करण्याची संधी त्यांच्यापुढे चालून आली होती. तिचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला नसता तर नवलच!
१८७६ मध्ये स्टीव्हन्सनी या वास्तूच्या आराखड्याना आरंभ केला. हे संकल्पन करतांना त्यांनी गॉथिक - साॅर्सेनिक वास्तूशैलीचा मोठ्या कल्पकतेने वापर केला. भव्य अश्या त्या वास्तूची अलंकारीक अशी सौंदर्यस्थळे आपल्या मनांत कल्पून त्यानुसार संपूर्ण आराखडा बनविणे हे केवळ अश्या कल्पक व सृजनशील वास्तुविशारदाचेच काम होते. आणि ते शिवधनूष्य स्टीव्हन्स यांनी लीलया पेलले. १८७७ मध्ये या वास्तूच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. व एक दशकांत म्हणजे १८८७ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. त्याकाळात ब्रिटीशांची वास्तूरचनेबाबत कांही ठाम मते होती. देशाच्या विवीध भागात वेगवेगळ्या वास्तुशैलींचा वापर त्यांच्याकडून केला जात असे. कोलकात्याला क्लासीकल, मुंबईला गॉथिक, मद्रासला सॅरसेनिक व बाकी हिंदुस्थानभर इंग्लीश कॉटेजीस लादण्यात येत असत. त्यानुसार मुंबईला गॉथिक शैली वापरण्यात येत असे. स्वतः स्टीव्हन्स हे पुनरुज्जीवित गॉथिक शैलीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी पौवार्त्य वास्तुशैलीचा युरोपियन शैलीशी सुंदर मिलाफ केला व या वास्तूचे काम मोठ्या कौश्यल्यपूर्णरीत्या केले. पहाताक्षणीक नजरेचे पारणे फेडील अशी वास्तू त्यांनी उभारली. इमारतीच्या बांधकामातही उच्च प्रतीचे मार्बल, नक्षीदार टाईल्स, रंगीत दगड, खिडक्यांसाठी स्टेनग्लासेस यांची जणू मुक्तहस्ते उधळणंच केली होती. या इमारतीच्या मध्यभागी मोठा घुमट असून चोहोबाजूनी वर निमुळते होत जाणारे मनोरे उभारले आहेत. भारतात त्याकाळी प्रथमच खालून कोणताही आधार न देता अश्या प्रकारचा घुमट बनविला जो त्या इमारतीला एखाद्या मुगुटाप्रमाणे दिसतो. त्यामुळे ही इमारत पाहणाऱ्याच्या मनांत एकदम भरते. दुसरे म्हणजे या इमारतींसमोरील प्रचंड अशी मोकळी जागा हीदेखील या इमारतीचे सौंदर्य नजरेत साठविण्यात मदत करते. हे भाग्य अन्य कोणत्याही इमारतीच्या वाट्याला आले नाही. इमारतीच्या घुमटावर 'प्रोग्रेस' हे प्रगतीचे प्रतीक असलेली भव्य अशी शिल्पाकृती आहे. साडेसोळा फूट उंचीच्या या प्रगती देवतेच्या उजव्या हातात मशाल असून तिने आपला डावा हात गतीशील चक्रावर ठेवला आहे. रेल्वे ही जणू प्रगतीचे चिन्हच आहे हे दर्शविण्यासाठी या शिल्पाकृतीची निर्मिती करण्यात आली होती.
याशिवाय इमारतीच्या दर्शनी भागावर जे घड्याळ दिसते, त्याखाली राणी व्हीक्टोरीयाचा उभा असा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र स्वातंत्र्यानंतर परकीय खुणा असू नयेत या भावनेने त्याला तेथून हलविण्यात आले. अद्यापही तेथील मोकळी जागा ओकीबोकी दिसते अन तेथील खुणा दर्शवीत असते. त्याखालच्या भागात जी शिल्पे केली आहेत, ती तंत्रज्ञान व शास्त्र, व्यापार तसेच कृषी या विषयावर आधारित आहेत. प्रवेशद्वारावरील फाटकाच्या खांबावर एका बाजूला इंग्लंडचे प्रतीक म्हणून राजेशाही सिंहाचा पुतळा असून डावीकडे भारताचे प्रतीक म्हणून बंगालचा वाघ दाखविण्यांत आला आहे. यातील प्रत्येक गोष्ट ही अर्थपूर्ण असून ही सर्व शिल्पे थॉमस अर्प या ब्रिटीश शिल्पकाराने बनवीली असून त्यासाठी खास भारतामधून पोरबंदर सॅंड स्टोन इंग्लंडला नेण्यात आला होता. इमारतीच्या एका भागावर जी.आय.पी. कंपनीच्या दहा संचालकांचे चेहरे उठाव शिल्प रूपात बद्ध केले असून त्यामध्ये सर जमशेटजी जीजीभाई व जगन्नाथ शंकरशेठ हे दोन भारतीय संचालक आजही तेथे दिसतात. याशिवाय अवाढव्य अश्या या इमारतीवर अगणीत अशी शिल्पे, सुबक नक्षीकाम आहे की ज्याची नोंदही करणे केवळ अशक्य आहे. याचबरोबर अलंकारीक असे लोह व पितळी धातूंचे कठडे हेही जागोजागी दिसून येतात व या सौंदर्यात भर घालतात. यातील प्रत्येक गोष्ट ही अभ्यासपूर्ण आहे.
या ऐतिहासिक इमारतीचे संकल्पन करतांना स्टीव्हन्स यांनी इतक्या बारकाईने विचार केला होता की, इमारतीच्या दर्शनी भागावर तसेच खांबांच्या तळभागावर मानव, पशू, पक्षी, पाने,फुले याच्या अलंकारीक आकाराचे देखणे खोदकाम केले आहे. त्याचेही सवीस्तर आराखडे स्टीव्हन्सनी तयार केले होते. तसेच इमारतीच्या सौंदर्याला जराही बाधा येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली होती. अगदी पाणी बाहेर फेकणारे पाईपसुद्धा बाहेरून दिसू नयेत म्हणून त्यांना गॉथिक गॉरगाईल्स (काल्पनिक पशू ) यांचा वापर केला असून या स्थानकाच्या सौंदर्यात ते अधीकच भर घालतात. आणि हे सर्व करायला त्यांनी मदत घेतली ती स्थानकासमोरीलच जगप्रसीध्द सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या वास्तूशास्त्र-शिल्प विभागाचे प्रमूख जॉन लॉकवूड किपलींग यांची. १८६५ मध्ये लॉकवूड किपलींग जेव्हां स्कुल ऑफ आर्ट मध्ये रुजू झाले, तेव्हां त्यांनी भारतीय समाजजीवन आपल्या कलेद्वारे चांगलेच आविष्कृत केले. आल्या आल्या त्यांना क्रॉफर्ड ( आताची महात्मा फुले मंडई ) मार्केटच्या प्रवेशद्वाराची उठाव शिल्पे अन आतील कारंजा तयार करण्याचे काम मिळाले. याच किपलिंगनी स्टीव्हन्सनी केलेल्या आराखड्यानुसार जे.जे.चे विद्यार्थी अन निष्णात शिक्षक यांच्याकरवी शिल्पे करून शिल्पशास्त्राचा एक अजोड नमूना उभा केला. अश्या या लॉकवूड किपलींग यांचा पुत्र रुडयार्ड हा जे.जे.च्या डीन बंगल्यात जन्माला आला अन पुढे एक थोर साहीत्यिक, कवी, व नंतर नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला.
स्टीव्हन्स यांना ही वास्तू पूर्ण करण्यास दहा वर्षे लागली. प्रथम बोरीबंदर असे नांव असलेल्या या स्थानकाचे १८८७ साली महाराणी व्हिक्टोरीयाच्या गोल्डन ज्युबीली दिनानिमित्त या वास्तूचे नामकरण ' व्हिक्टोरीया टर्मीनस' असे करण्यात आले. पुढे १९९६ मध्ये या स्थानकाचे नांव 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' करण्यात आले. व पुन्हां २०१७ साली पुन्हां ' छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस असा नामविस्तार करण्यात आला. असे एकंदर चार वेळा या ऐतिहासिक वास्तूचे नामकरण करण्यात आले आहे. या वास्तूच्या रूपाने ब्रिटिशांनी भारताला दिलेला हा एक अमूल्य ठेवा समजला जातो. अश्या या भव्य इमारतीच्या घुमटावरील 'प्रगती देवता' या शिल्पावर पन्नास एक वर्षांपूर्वी वीज पडली व तिचे मस्तक आणि उजवा हात भंग पावला. त्याची दुरुस्ती करून पुन्हां पूर्ववत करण्यासाठी इंग्लंडला नेण्याचा विचार झाला. त्यासाठी भारतातून पोरबंदर स्टोन नेण्याचेही ठरले. पण ते अतीशय खर्चीक होत होते. ज्या जे.जे.स्कुल ऑफ आर्टचा या वास्तूच्या उभारणीत मौलीक हातभार लाभला होता, त्याच आर्ट स्कुलने ही समस्या सोडविली. तुटलेले मस्तक व हात आर्ट स्कुलच्या शिल्पकला विभागात आणण्यात आले. विभागप्रमूख प्रा. मांजरेकर यांनी विद्यार्थी व कारागीरांच्या मदतीने ते यशस्वीरीत्या पूर्ण केले व क्रेनच्या साहाय्याने ते वर चढवून मूळ जागेवर बेमालूमरीत्या बसविण्यांत आले. ते बसवण्यासाठी 'ॲराल्डाईट' ॲडेसिव्हचा वापर करण्यात आला. पुढे ॲराल्डाईटने आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी या घटनेचा वापरही केला.
वास्तू शिल्पकलेचे एक सुंदर उदाहरण म्हणून ख्याती पावलेल्या या इमारतीचे ताजमहाल खालोखाल पर्यटकांकडून छायाचित्रण करण्यात आले आहे. या वास्तूच्या निर्मितीने एफ.डब्ल्यू. स्टीव्हन्स यांची ख्याती सर्वत्र झाली. या वास्तुरचनेचे जे स्वप्न त्यांनी पाहीले होते, ते साकारण्यात जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या कला विद्यार्थ्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. या यशाने स्टीव्हन्स यांना स्वतंत्रपणाने काम करण्याची जिद्द निर्माण होऊन त्यांनी १८८४ मध्ये स्वतंत्रपणे काम करण्यास आरंभ केला. यानंतर त्यांना मुंबई महापालिकेच्या इमारतीचे संकल्पन करण्यासाठी आमंत्रीत करण्यात आले. वास्तवीक या कामासाठी त्याकाळातील जॉन विरेट, जॉन बेग व किसहोम यांनी इंडो- सोर्सेनिक शैलीत वास्तू संकल्पना सादर केल्या होत्या. पण गॉथिक शैलीचा ठाम पगडा तसेच व्हिक्टोरीया टर्मीनस हे भव्य स्थानक संकल्पीत केलेल्या व गॉथिक शैली गाजवणाऱ्या स्टीव्हन्स यांच्यां नांवलौकीकामुळे त्यांच्याकडे म्युनीसिपल कॉर्पोरेशनच्या इमारतीचे काम सोपविण्यात आले. स्टीव्हन्स यांच्या यशाची ही पावतीच होती. समोरासमोरच या दोन इमारती डौलाने उभ्या राहिल्या.
ही वास्तू निर्माण करून प्रसिद्धी पावलेल्या स्टीव्हन्सनी पुढे फोर्ट भागांतील अनेक इमारती उभारल्या. त्यांचे शेवटचे काम हे चार्टर्ड ब्यांकेच्या इमारतीचे होते. असा हा मुंबईच्या वैभवात भर घालणारा थोर वास्तूविशारद मलेरियाच्या आजाराने ५ मार्च १९०० रोजी कालवश झाले. आणि शिवडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यांत आले. आज जरी ते देहाने आपल्यात नसले तरी त्यांच्या कलाविष्कारामुळे ते कायमचे प्रत्येक मुंबईकराशी तादात्म्य पावले आहेत. मात्र जसे या देखण्या स्थानकाने मानाचे, अभिमानाचे, गौरवाचे दिवस पाहीले तसेच त्याने कांही दुःखाचे, भीषणतेचे व्रणही अंगावर झेलले.
२६ नोव्हेंबर २००८ ची काळरात्र होती ती. सर्व चाकरमाने आपापल्या घरी परतण्याच्या ओढीने या स्थानकाच्या कुशीत शिरत होते. आणि या मुंबईवर पाकिस्तानी अतिरेक्यांचा भीषण हल्ला झाला. रात्रीचे ९.३० वाजले होते. या स्थानकाच्या मागच्या बाजूने दोन अतिरेकी हातात ग्रेनेड व ए के ४७ घेऊन घुसले व त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. नशीबाने गाड्यांच्या घोषणा करणाऱ्या निवेदकाला कांहीतरी अघटीत घडत आहे असा संशय येऊन त्याने लोकांना तशी सूचना दिली. रात्री सुमारे पावणे अकरापर्यंत सुरु असलेल्या अतिरेक्यांच्या या अंदाधुंद गोळीबारांत ५८ लोक मृत्युमुखी पडले, अन १०४ जखमी झाले. सर्वत्र
हाहाःकार माजला होता. किंकाळ्या फुटत होत्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यालयातून कसाब या निर्दयी कसाबाचे छायाचित्र घेण्यात एक छायाचित्रकार यशस्वी झाला. व शहीद तुकाराम ओंबळे या पोलीसाने आपले प्राण पणाला लावून त्याला जित्ता पकडला. पुढे हा अतीरेकी भारत सरकारने फासावर लटकावला.
अश्या या आपादमस्तक नक्षीदार कोरीव कामाचे अलंकार लेवून १३१ वर्षे अभिमानाने उभ्या असलेल्या या लावण्यलतिकेला युनेस्कोच्या जागतीक ऐतिहासीक वारसा समीतीने 'जागतीक ऐतिहासीक वारसा वास्तू' म्हणून खास दर्जा देऊन या मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला जागतिक दर्जावर नेले, हे प्रत्येक भारतीयाला खचीतच गौरवास्पद आहे. मात्र तेंव्हा मी तेथे बसविलेल्या प्लाकचे छायाचित्र घेण्यास गेलो, तेंव्हां माझ्या नजरेस पडले की एका भिंतीवर सार्वजनीक बांधकाम खात्याच्या एका कामगाराने आजूबाजूला कसेतरी सिमेंट फासून बसविल्याप्रमाणे सदर वारसा मिळालेली प्लाक बसवली आहे. ना त्याला होती कलात्मक जागा, ना कलात्मक चौकट, ना त्यामागे होती सौंदर्यदृष्टी! अजूनही वाटते की, या इमारतीचे अविभाज्य अंग असलेल्या महाराणी व्हिक्टोरीया राणीचा भव्य पुतळा जो या संपूर्ण इमारतीच्या शिल्परचनेसोबत जाणारे शिल्प होते, ते या इमारतीसोबत हवेच होते. ते तेथून निखळून काढल्यामुळे दर्शनी भागावरील ही जागा ओकीबोकी दिसते. ते वास्तवीक या इमारतीचाच एक भाग होते. नाहीतरी आज संपूर्ण बॅलार्ड इस्टेट ही ब्रिटिशांचीच देणगी आहे. आपले राष्ट्रपती भवन, पार्लमेंट हाऊस, रिझर्व्ह बॅंक, या सर्वच इमारती कांही ब्रिटिश वास्तुविशारदांच्या सृजनशीलतेचा आविष्कार म्हणूनच आपणास मिळाल्या आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही इमारत देखील आमच्या गौरवाचे स्थान आहे. तसेच या इमारतीमध्ये एफ.डब्ल्यू.स्टीव्हन्स यांचाही कलाकार या नात्याने अर्धपुतळा उभारला तर ते यथोचीत होईल. या वास्तूची जपणूक करणे व भावी पिढयांना अभिमानास्पद वाटेल अश्या रीतीने हा वारसा जपणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे.
-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष









Comments
Post a Comment