बाप्पाचा महीमा



एक दिवस असाच निघालो फेर फटका मारण्यास घराबाहेर
दिसल्या झुंडीच्या झुंडी जाताना
करत बाप्पाचा जयजयकार, प्रचंड घोषणा देत,
स्वतःचा आवाज कमी पडेल की काय, म्हणून त्याला डी जे ची जोड देऊन
फिल्मी गाण्यांच्या लयीवर नाचत गात, 
साऱ्या गांवाला जागे करीत 
गाढ झोपलेल्याना कर्ण कर्कश आवाजाने उठवून
ऐकायला लावीत होते हा जयजयकार 
म्हाताऱ्या कोतारे, मुले, गर्भवती महीला, झाडावरील पक्षी, प्राणी
सर्वच जण उठले ऐकून हा ध्वनीचा गजर
बाप्पा जागा व्हायच्या आधीच सर्व प्रजा उठून तत्पर
म्हटले आपणही जावे बाप्पाच्या दर्शनाला सत्वर
पहावे त्याला डोळे भरून, साठवून घ्यावे त्याचे रूप आपल्या मनांत
करावे त्याला वंदन मनोमनी
पाय वळले त्याच जथ्यात आणि चालू लागले वाट राजाच्या दर्शनाला
पण जातो तो काय?
सर्वत्र प्रचंड अश्या गर्दीच्या लोंढ्यात लांबच लांब माणसांच्या रांगा
एक दुसऱ्याला दिसेना, दुसरा तिसऱ्याला ओळखेना
तू कधी आलास? मी परवा, तू कधी? मी काल, मी तर रात्रभर येथेच झोपलो होतो,
अश्या एकापेक्षा एक प्रतीक्रिया ऐकू येऊ लागल्या.
पण या गर्दीत माझ्या बाप्पाला कसा मी शोधू? कसे त्याचे चरणस्पर्श करू?
कसे त्याच्या पायावर माझे मस्तक टेकून त्याचे आशीर्वाद घेऊ?
एवढ्यात लगबगीने बाप्पाचे सेवक धावू लागले
वाटेत येईल त्याला तुडवू लागले, कोणाला गचांडी पकडून ढकलून देऊ लागले,
नंतर कळाले, बाप्पाच्या दर्शनाला कोणी राजकारणी, कोणी अभिनेता,
कोणी त्यांची मुलेबाळे येणार आहेत,
त्यांना आदराने, मानाने, बाप्पाकडे नेण्याची ही तयारी चाललेली आहे
सामान्य भक्त काय? ते तर रोजचेच आहेत. जास्तीत जास्त थोडे जास्ती वेळ थांबतील,
आल्याआल्या त्यांना ढकलून दुसऱ्यांसाठी जागा मोकळी करू,
पण हे मोठे लोक, ज्यांच्यामुळे आपल्या राजाचे महत्व वाढले,
आमचा सन्मान झाला, त्यांचे उपकार कसे विसरू?
मीही उदासपणे जमले तर पुढच्या वर्षी लवकर येणाऱ्या बाप्पाचे दर्शन घ्यावे
म्हणून उलट्या पाऊली परत फिरलो
येतांना जरा आडवाट केली, गरीबांच्या वस्तीतून, भोळ्या भाबड्या लोकांच्या वस्तीतून वाट काढली
तेथे एकजण त्यांचे डोळे पुसत होता, त्यांच्या दुःखावर मलम लावत होता.
भुकेल्यानां घास भरवत होता. पाठीवरून मायेचा हात फिरवीत होता.
दिन दुबळ्यांची सेवा करीत होता,
जवळ जाऊन निरखून पाहीले, तेव्हां ओळखीचा भास झाला,
बाप्पाच्या डोळ्यांतील भाव आपुलकीचा वाटला
जवळ जाऊन विचारता बाप्पा म्हणाला, अरे, हेच माझे खरे भक्त!
यांच्याच सोबत मी वावरत असतो.
यांच्या मुलाबाळांशी खेळत असतो
मांडवात दिसते ती केवळ माझी प्रतीमा, रांग लावण्याची तसदी न घेणाऱ्या,
ऐषारामात वाढलेल्या, माझ्यावरील भक्तीचे प्रदर्शन मांडणाऱ्या लोकांना रिझवणारी,
घेऊन येतात सोने चांदीची आभूषणे, पैशांच्या थैल्या, ज्याची मला ना आस, ना गरज
यांना माहीत नाही मीच तो या चराचर श्रुष्टीचा निर्माता, मला काय हे मोहविणार ?
पण माहीत आहे का?
हे माझ्यासाठी नसतेच मुळी, असते ते त्यांचा दानशूरपणा, श्रीमंती, ऐश्र्वर्य
आणि वैभव दाखविण्याची एक कृती,
मी असतो नाममात्र, एक माध्यम,
आणि खरे सांगू का?
अरे हे मुळी माझ्या दर्शनाला येत नाहीतच, माझ्या मंडपातले माझे सेवक म्हणवणारे
यांचेच दर्शन मला घडवतात. ते आले की त्यांच्या ललकाऱ्यानी
आसमंत दुमदुवून सोडतात, त्यांचा एक कृपा कटाक्ष आपल्यावर पडावा
म्हणून त्यांच्यापुढे लाचारीने वावरतात
तेव्हां मी मात्र तेथे नसतो,
मी गुपचूप माझ्या भक्तांमध्ये येतो, त्यांची सेवा गोड मानून तृप्त होतो,
आणि माहीत आहे का? मी येथे केवळ दहा दिवसापुरताच नसतो,
तर कायमचा रात्रंदिवस त्यांच्यातच वावरत असतो!

मी बाप्पाला मनोमन वंदन केले, त्याच्या चरणावर डोके टेकून
मनसोक्त आशीर्वाद घेतले, आणि मला खरेच पटले

"देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी"

-मं.गो.राजाध्यक्ष

( बोधचित्र : हर्षद राजाध्यक्ष )

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :