एशियन पेंटचा 'गट्टू' : डॉ. ग.मं.रेगे




( ज्यांनी जाहीरात कलेच्या कल्पनेतून आम्हां अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविल्या, अनेकांना सुसंस्कृत केले, अश्या विद्वान, व्यासंगी, चतुरस्त्र, सर्जनशील कलाकार गुरूला, डॉ. गजानन मंगेश रेगे सरांना, आजच्या ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त आदरपूर्वक शब्द सुमनांजली )
 

कांही प्राध्यापक आपल्या कायमच्या लक्ष्यात राहतात ते, त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या विद्ववत्तेमुळे, कांही त्यांच्या विक्षिप्तपणामुळे, त्यांच्या तुसडेपणामुळे तर कांही त्यांच्यात असे कोणतेच गुण नसल्यामुळे. पण आम्हांला लाभले ते एक गुरुवर्य ज्यांच्यात असे बरेचशे गुण होते. आपण वामनमूर्ती असलो तरी हे जग आपल्या पायाखाली नमवू अशी महत्वाकांक्षा बाळगणारे. कांहीशे कोपीष्ट, बरेचशे प्रेमळ असे. साधारणपणे आम्ही तृतीय वर्षात असतांना ते आमच्या वाट्याला आले. तत्पूर्वी जेजे मध्ये ते आम्हांला नेहमी दिसत असत. तेही अगदी त्यांच्या योग्यतेच्या अगदी जवळच्या व्यक्तीशीच त्यांचे संभाषण होत असे. त्यांच्या लेक्चरविषयी आम्ही वरीष्ठ विद्यार्थ्यांकडून ऐकत असू. त्यांच्या शिस्तबद्ध वागणुकीबद्दलही बरेच ऐकून होतो. आणि त्या व्यक्तीचे नांव होते डॉ. गजानन मंगेश रेगे. अर्थात हे नांव कानांवर पडल्यावर कांही विशेष बोध होणार नाही. पण तेच 'बंडू रेगे’ म्हटले की जाहीरात क्षेत्रांतील तमाम व्यक्ती एका सुरात म्हणतील, अरे! हे आपले गट्टू रेगे!' एवढे जाहीरात क्षेत्रांमध्ये या व्यक्तीने काम केले आहे. रेगे हे जेव्हां या स्कुल ऑफ आर्ट मध्ये विद्यार्थी होते, त्याकाळात कलाकाराने उच्च विद्याविभूषित असणे कवचितच असायचे. रेग्यांनी उपयोजीत कला शिक्षण घेतलेच, शिवाय तत्वज्ञान-मानसशास्त्र- या विषयांमध्ये त्यांनी बी.ए. केले. समाजशास्त्राची एम.ए. ची पदवी मिळवली. त्यानंतर ते लंडनला गेले. तेथील 'कॉलेज फॉर डिस्ट्रीब्युटिव्ह ट्रेड्स' या संस्थेतून त्यांनी जाहीरातविषयक उच्च शिक्षण संपादन केले व तेथील 'रिचर्ड्स वूड एन्ड पार्टनर्स' या जाहीरात संस्थेमध्ये मार्केटींगचे कार्यही केले. एवढा अनुभव गाठीशी बांधून रेगे भारतात परतताच त्यांनी 'एशियन पेंट्स' या रंगाच्या कंपनीत प्रसीद्धी प्रमूख म्हणून सूत्रे हाती घेतली.


एशियन पेंट्सची विविध प्रकारची उत्पादने होती. त्याकाळात कंपनीला स्वतःचे नांव प्रामूख्याने बाजारात आणायचे होते. कमीतकमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रसीद्धी कशी मिळवायची यासाठी संकल्पन धोरण ठरविण्याची जबाबदारी रेग्यांवर आली. ही कल्पना कशी लढवावी, आपले वेगळेपण कसे दृश्यांकन करावे याकरीता काहीतरी स्वतःचे असे वैशीष्ठ्य दिसले पाहीजे या हेतूने विचारांची सुरुवात झाली. अन यातूनच साकारल्या एका खट्याळ मुलाच्या कारवाया. आणि त्या खट्याळ मुलाला चेहरा दिला तो सुप्रसीध्द व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी. आणि हा मुलगा एशियन पेंटचा बोधचिन्ह बनला. पुढे या मुलाच्या खोड्याही बऱ्याच वाढल्या. हातात रंग आणि ब्रश घेऊन तो दिसेल तो पृष्ठभाग रंगवू लागला. यामधून आरामखुर्चीत झोपलेल्या आजोबांचे टक्कलही सुटले नाही!  आणि यातूनच त्यांचे घोषवाक्य ठरले, ‘ एनी सर्फेस नीड पेंट, नीड्स एशीयन पेंट्स!’ मात्र ह्या जाहीराती लोकांपर्यत पोचतात की नाहीत, याबद्दल संचालक जरा साशंकच होते. त्यासाठीही रेग्यांनी एक शक्कल लढविली. त्या मुलाचे नामकरण करण्याची एक स्पर्धा त्यांनी जाहीर केली. त्यासाठी २५० रुपयांचे बक्षीस ठेवले. एशियन पेंट्स मध्ये नांव सुचविण्यासाठी लोकांकडून पत्रांचा वर्षाव सुरु झाला. त्यामुळे पुन्हां मुदत वाढवून बक्षीसाची रक्कमही ५०० रुपये करण्यात आली. हा काळ होता १९५९-६० चा! शेवटी सुमारे ४७ हजार पत्रांमधून निवड समितीने 'गट्टू' हे नांव स्वीकारले. मात्र गमतीची गोष्ट अशी झाली की, त्यावेळी श्री रेळे व श्री आरस या दोघा मुंबईकरांनी 'गट्टू' हेच नांव सुचविल्यामुळे बक्षीस विभागून देण्यात आले. व तेव्हांपासून जाहीरात वर्तुळात रेग्यांनाही 'गट्टू' असे संबोधण्यात येऊ लागले. नंतर रेगे यांनी डॉ. घुर्ये या नामांकीत समाजशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'विचार प्रसारण व समाजकल्याण' हा प्रबंध पूर्ण करून मुंबई विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविली व ते डॉ.रेगे झाले!

डॉ. रेगे हे एक अजब रसायन होते. त्यांचे इंग्रजी जितके प्रभावी होते, तितकेच मराठी देखील रसपूर्ण होते. दोन्हीही भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. त्यातच त्यांना लाभलेली स्मरणशक्ती. तिच्या जोरावर ते जेजे उपयोजीत कला संस्थेमध्ये अभ्यागत व्याख्याते म्हणून 'जाहीरात कला आणि कल्पना' हा विषय शिकवायला येत, तेव्हां कोणतेही संदर्भ हाती न घेता कैक व्यावसायीक उदाहरणे देत त्यांचे व्याख्यान चालू असे. त्यावेळी या विषयाला शैक्षणीक पुस्तक नव्हते. पण रेग्यांकडे होता तो व्यावसायीक क्षेत्रांतील गाढा अनूभव. जाहीरात कला हा विषय शिकवणारा जाहीरात क्षेत्रांशी निगडीत असावा लागतो. त्यामुळे रेगे हे एकमेव होते. काळा कोट, गळ्यात बो, हातात 'कूल' सिगरेट, दुसर्अया हातात आपला प्रबंध अश्या  वकीली थाटात ते वर्गात शिरले की त्यांच्या तोंडावर एक तुच्छतेचा भाव जाणवे. सर्व विद्यार्थी स्तब्ध होत असत. वारंवार येऊनही एकाद्या विद्यार्थ्यांचे नावंही त्यांना माहीत असे की नाही हे देखील जाणवत नसे. पण एकदा त्यांचे सुरेख अश्या सोप्या इंग्रजीमध्ये येरझाऱ्या घालत ते लेक्चर देत, तेव्हां सर्व विद्यार्थी त्यात मग्न होत. मात्र ते जेव्हां मराठीत व्याख्यान देत, तेव्हां त्यात चुकूनही एखादा इंग्रजी शब्द येत नसे. आणि रेगे हे व्यवसायिक क्षेत्राशी निगडित असल्याने तेथील घडामोडीवर त्यांचे सतत लक्ष असे. त्यामुळे उदाहरणे देतांना ते नेहमी ताज्या घटनांचा विचार करीत. आणि येथूनच आम्हांला कळू लागले की जाहीराती बनवतांना ग्राहकांचं मानसशास्त्र कसं अभ्यासावे लागते, उत्पादनाचा दर्जा कसा राखावा लागतो, आणि एखादा ब्र्यांड कसा तयार करावा लागतो.

डॉ. रेग्यांना सर्वच विषयांचे अफाट ज्ञान होते. त्यामुळे काव्य, शास्त्र, नाट्य, कला, साहीत्य, व्यापार या क्षेत्रांतील नामवंतांशी त्यांची जवळीक होती. जे.जे.मध्ये तर केंकरे सरांसोबत या लोकांच्या मैफिलीच जमायच्या. केंकरेंचे सर्वच दरबारी रेगे यांचेही जवळचे होते. त्यातच रेगे याना वाक्या वाक्यागणिक शाब्दीक कोट्या करण्याचा नाद होता. समोरच्याला आपली गुगली कधी गेली आहे याचा पत्ताही लागत नसे. एकदा गोवा कला अकादमीचे सचीव खेडेकर आले असताना ते केंकरे सरांना म्हणाले, अरे दामू, माझे पेन गेले रे! त्यावर शेजारीच बसलेल्या रेग्यांनी त्यांना विचारले, खिशात ॲनासीन आहे का? बिचारे खेडेकर खिश्यात हात घालून चाचपडू लागले. जेव्हां सर्वजण खदखदून हसू लागले तेंव्हां कोठे खेडेकरांना आपल्या पेन चा विनोद कळला. अत्यंत हजरजबाबी असलेले रेगे वाक्यागणिक कोट्या करीत असत. अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास होता. एकदा त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली होती.तेव्हां इस्पितळांत असताना त्यांनी वैद्यकीय विषयावरील बरीच पुस्तके वाचली. जेव्हां त्यांना तपासण्यासाठी इंटर्नशिप करणारे वैद्यकीय विद्यार्थी येत तेव्हा ते एखाद्या तद्न्य डॉक्टरप्रमाणे त्यांच्याशी चर्चा करीत. त्यांच्या केसपेपरवरील डॉ.रेगे हे नांव पाहून कितीतरी दिवस ते रेग्यांना वैद्यकीय डॉक्टरच समजत होते. मधेच त्यांना वाटले की, आपण कायद्याचा अभ्यास करावा. व त्यांनी अभ्यास करून प्रथम वर्षाची परीक्षाही दिली. त्यात त्यांनी उत्तम गुणही मिळवले. पण तेही त्यांनी अर्धवट सोडले. पण आपली विद्वत्ता दाखवण्याची संधी ते सोडत नसत.


मी जेव्हां जेजे मध्ये अध्यापक म्हणून आलो तेव्हां या रेगे सरांशी माझी जवळीक झाली. तसे पाहीले तर रेगे सर हे एका ठिकाणी कधीच रमले नाहीत. सतत नोकऱ्या बदलणे हा त्यांचा छंदच होता. जेजे मध्ये अभ्यागत व्याख्याते म्हणून जरी ते कार्यरत असले तरी, जेजेचेच पूर्णकाळ असल्याप्रमाणे ते वागत. १९६६ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपयोजीत कलेच्या प्राध्यापक पदासाठी एक जाहीरात दिली होती. केंकरे सर त्यांना म्हणाले, बंड्या, जाहीरात आली आहे. मुलाखतीला जाऊन ये. नाहीतरी येथेच असतोस बराच वेळ. आणि रेग्यांनी अर्ज केला. व ' आता येतो पहा तुमच्यात' असे येथील मित्रांना त्यांनी बजावले. अन खरोखरीच ते निवडले गेले. एवढा जबर आत्मविश्वास होता त्यांच्याकडे. मुलाखतीच्या वेळी त्यांचाच लोगो घेऊन लोगो कसा नसावा याबाबतीत त्यांचीच मुलाखत आपण कशी घेतली हे ते रसभरीत वर्णन करीत. पण येथेही केवळ सात-आठ महीने काढून त्यांनी राजीनामा दिला. एका चाकोरीत काम करणे हा त्यांचा पिंडच नव्हता.

मात्र येथून माझे अन रेगे सरांचे घनिष्ठ असे घरगुती संबंध जडले. दादर येथील रुईया कॉलेजजवळील दत्त सदन  ही इमारत त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची होती. अनेक वेळा मी तेथे जात असे. रेग्यांच्या आवडता छंद म्हणजे स्वयंपाक करणे. विशेषतः मांसाहारी( मासळीचे). त्यांची आई खास मासळीचे पदार्थ करीत असे. कधीकधी रेगेसर स्वतः सिटीलाईटच्या मार्केट मधून मासळी निवडून आणून स्वतः बनवीत. स्वतः बनवून दुसऱ्यांना खाऊ घालण्यांत त्यांना एक प्रकारचे समाधान वाटत असे. कैक वेळा मी त्यांचा हा पाहुणचार घेतला आहे. विनोद हा रेग्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. शाब्दीक कोट्या तर ते सतत करीत असतंच. त्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नव्हता. वर्गामध्येही व्याख्यान देत असताना गंभीर चेहरा ठेवून ते एखादा विनोद असा काही पेरत की सर्व वर्गामधील मरगळ जाऊन हास्याच्या स्फोटाने वर्ग दणाणून निघे. बऱ्याच वेळा ते एखाद्या किश्श्यामध्ये स्वतःला गुंतवूनही सांगत असं. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानात एकप्रकारचे चैतन्य जाणवत असे.    भारतामध्ये आजमितीस 'जाहीरात कला आणि कल्पना' या विषयावर कोणीही पुस्तक लिहीले नव्हते. पाठयपुस्तक तर अस्तित्वातच नव्हते..डॉ. रेगेंनी ही गरज ओळखली. अपार परीश्रम घेऊन त्यांनी इंग्रजी मध्ये ' आयडिव्हर्टीयाझिंग आर्ट एन्ड इडिअस' हे पुस्तक लिहीले. पुढे त्याचीच मराठी आवृत्ती ' जाहीरात कला आणि कल्पना' या नावाने प्रसीद्ध केली. आज देशभरात हे पुस्तक सर्वच कला महाविद्यालयातून पाठयपुस्तक म्हणून वापरले जाते. त्यांचा खरा पिंड हा शिक्षकाचाच होता. विद्यार्थ्यांसाठी ते सतत धडपडत असत. व्याख्यानासाठी ते लायब्ररीतून आणि जाहीरात संस्थांमधून अनेक केस स्टडी मिळवून विद्यार्थ्यांना समजावून देत. विध्यार्थी ज्ञानाने परीपूर्ण असावेत यासाठी त्यांची धडपड सुरु असे. आमच्याकडे टिकेकर नावाचे एक प्राध्यापक होते. त्यांना एकदा राज्य कला प्रदर्शनाचे अधिकारी म्हणून नेमण्यांत आले होते. त्यावेळच्या प्रदर्शनाच्या माहीती पत्रकात अनेक चुका त्यांना दिसल्या. त्यांनी पेन घेऊन एखादा प्रूफ रीडर ज्याप्रमाणे चिन्हे देऊन सरळ तो कलासंचालक माधवराव सातवळेकर यांच्याकडे पाठवून दिला. त्यावर सातवळेकरांनी टिकेकर व रेगे या दोघांनाही बोलावून घेतले व रेग्यांना म्हणाले अहो, हे आपलेच सर्वांचे काम आहे. तुम्ही जरा सर्वच तपासून द्या. व टिकेकरांनाही त्यांनी समज दिली की छापण्यापूर्वी तुम्ही नीट लक्ष द्यायला हवे. बाहेर पडल्यावर रेगे टिकेकरांना म्हणाले, तू टिकेकर असलास तरी मी टीकाकार आहे हे ध्यानांत ठेव


प्रा. दामू केंकरे यांच्या खटपटीने गोव्याला कला महाविद्यालय सुरु झाले. पुढे शैक्षणीक तज्ञ म्हणून रेग्यांचे त्या महाविद्यालयाशी  घनिष्ठ असे संबंध आले. इतके की, ते त्या संस्थेचे पालकच म्हणून ओळखले जायचे. तेथील अभ्यासक्रम आखणे, परीक्षा पद्धती ठरवीणे, प्रबंध तयार करून घेणे या सर्वच गोष्टी रेग्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायच्या. त्या कारणाने आम्हां दोघांच्याही गोव्याच्या अनेक वाऱ्या व्हायच्या. गोव्यात गेले की वेळात वेळ काढून शांतादुर्गेच्या मंदीरात जाऊन कुलस्वामिनीला अभिषेक करून ते यायचे. इतके ते भावीक होते. अर्थात यामध्ये त्यांच्या विनोद बुद्धीत खंड पडत नसे. एकदा असेच समविचारी कलावन्त गप्पा मारीत बसलेले असताना रेग्यांचा शब्दाशब्दागणिक कोट्या करण्याचा उद्योग चालूच होता. त्यातून सर्वानीच रेग्यांना गळ घातली की, अश्याच विषयावर एखादे नाटक लिहा. आणि रेग्यांनी हे आव्हान स्वीकारले. व त्यातूनच त्यांचे 'दिसतं तसं नसतं' हे फार्सिकल नाटक त्यांनी लिहिले. त्याचे प्रयोगही झाले. पण अश्या विनोदांना दृश्य स्वरूप नसल्याने हे नाटक फार दिवस तग धरू शकले नाही. त्यांच्या डोक्यात एखादी कल्पना शिजली की ती सत्यात आणण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करीत असत. मध्यन्तरी त्यांनी कोलकात्याच्या बाटिक चपलांचा उद्योग केला. कांही दिवसांनी तो गुंडाळून रंगीत माश्यांची पैदास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते गोरेगांव येथे पूर्वेला पांडुरंगवाडी येथे राहायचे. एकदा त्यांनी मला ते पहायला बोलावले. घरी जातो तो काय? संपूर्ण घरभर काचेची रंगीत पाण्याने भरलेली असंख्य ऍक्वेरियम. आतमध्ये मनमोहक, रंगीबेरंगी, चिमुकले असे मासे इकडून तिकडे फिरत होते.

देशभरातील सर्वच कला महाविद्यालयामधून त्यांचे पुस्तक वापरले जात असल्याने अनेक राज्यातील कला विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क होता. यामुळे रेग्यांची सतत धावपळ होत असे. या माणसाला स्वस्थ, आराम करताना मी कधीच पाहीले नव्हते. कोलकात्त्याचा स्टेट्स्मन हे त्यांचे कोडी सोडविण्याचे आवडते वृत्तपत्र. चर्चगेटच्या व्हीलर स्टॉलवर त्यांचे रोजचे अंक यायचे. मग एखाद्या दिवशी ते बरेच अंक एकत्र घेऊन जात असत. मध्यन्तरी दोन वर्षे मी नागपूर येथील कला महाविद्यालयात होतो. तेथे रेगेंचे लहान बंधू रामदास पेठेत रहात असत. आम्ही नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना एक आठवडा त्यांना बोलावले होते. त्यावेळी नागपुरात चांगली मासळी मिळत नाही म्हणून त्यांनी मुद्दाम आमच्यासाठी मुंबईहून खेकडे आणले होते ते स्वतः करून त्यांच्या घरी आम्हांला खायला घातले. रात्री १०.३० वाजता त्यांची नागपूर-दादर एक्सप्रेस ही गाडी होती. नेमके त्याचवेळी आमचे एक सहाध्यायी प्रा. वैद्य तेथे त्यांना भेटण्यास आले. वैद्यांची खूप बोलण्याची सवय होती. त्यांचे बोलणे थांबेचना. गाडीला उशीर होतो हे पाहून रेगेंची चुळबूळ सुरु झाली. शेवटी मीच वैद्यांना थांबवले व ते जाताच रेगे म्हणाले, राजा, तुझा वैद्य नाडीच सोडेना रे! त्याही परिस्थीतीत मला हसू आवरेना.

रेग्यांचे हस्ताक्षर अतीशय सुंदर होते. अगदी कर्सीव्ह पद्धतीत ते लिहीत. आम्ही परीक्षेचे पेपर लिहिण्यास विद्यापीठात बसत असू त्यावेळी पेपरची भाषा आणि लिखाण हे डॉ. रेगे इतके सुंदररीत्या करीत की एकदा प्रा. साठ्ये म्हणाले, बंड्या, हे तू कॅलिग्राफिक पेनने लिहिशील तर सुंदर कॅलिग्राफी करशील. संध्याकाळी कॉलेजमध्ये परतल्यावर मला घेऊन ते कॉलेज समोरील 'हिमालया' या गेहानीच्या स्टोअर मध्ये गेले आणि त्यांनी कॅलिग्राफिक पेनचा सेट विकत घेतला. आणि खरोखरीच त्यांनी उत्कृष्ट अशी कॅलिग्राफी साकारण्यास सुरुवात केली. रेगे सरांची मला पावलोपावली मदत होत असे. त्यांच्यासाठी मी कांही कामेही केली. त्यांच्या पुस्तकासाठी लेआऊट केली. त्यांच्या टायपोलॉग साठी काम केले.  बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवतीर्थावरील प्रदर्शनामध्ये त्यांचा सहभाग होता. एखाद्या प्रोजेक्टवर कसा विचार करायचा हे ते सांगत. माझ्या नागपूर येथील दोन वर्ष्यांच्या वास्तव्यामध्ये वेळ फुकट न घालवता त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगून त्यांनी मला 'सिम्बोलॉजी' या विषयावर एक प्रोजेक्ट करायला लावले, त्याचा मला खूप उपयोग झाला. सिम्बॉल कसा सादर करावा हेही ते अभ्यासपूर्वक सांगत. मुख्य म्हणजे माझा त्या विषयावर सखोल अभ्यास झाला, जो मी पुढे माझ्या विद्यार्थ्यांना देऊ शकलो. संध्याकाळी आम्ही दोघे एकत्रच ट्रेनने निघत असू.


परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचे शोधनिबंध वाचणे हा त्यांचा आवडीचा विषय असे. कोणी मुलाने पूर्वीचा एखाद्याचा वापरला असेल तर त्यांच्या ते तात्काळ लक्षांत येत असे. काही आवडलेले शोधनिबंध ते घरी वाचण्यासाटी घेऊन जात. आमची परीक्षेच्या व्हायवा ची तयारी पूर्ण झाली होती. असेम्ब्ली हॉल मध्ये सर्व मांडले होते. इतक्यात रेगे सर तेथे आले. हातात एक पिशवी होती. आत आलेच ते मला त्यादिवशी मला थकलेले जाणवले. मी त्यांच्यासाठी आरामखुर्ची मागवली व त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. नंतर आम्ही दोघेही चर्चगेटला निघालो. मी त्यावेळी बोरीवली येथे रहायला गेलो होतो. स्टेशनवरून त्यांनी आपले स्टेट्स्मनचे अंक घेतले. मला म्हणाले, राजा, मी आता आतमध्ये उभा राहू शकणार नाही. मी त्यांना सांगितले, सर, मी आत जाऊन जागा पकडतो. तुम्ही सावकाश या! व आम्ही जागा पकडून बसलो. काही वेळातच ते पूर्ववत झाले. परत नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या. शुक्रवारची संध्याकाळ होती ती. शनिवार-रविवार सुट्टी. सोमवारपासून परीक्षा सुरु. सोमवारी वेळेवर येरे, असे म्हणून गोरेगांवला ते उतरून गेले. आणि रविवारी आमचे मित्र राजा शेटगे सकाळीच माझ्या घरी आले आणि म्हणाले 'रेगे सर गेले' क्षणभर मी सुन्न झालो. तसेच आम्ही त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तेथे प्रा. साठ्ये व  जाहीरात एंटरप्राइझचे अरुण काळे हे दोघेच दिसले. त्यांचा मित्रपरिवार इतका प्रचंड होता, की कोणाला समजण्यापूर्वीच ते अनंतात विलीन झाले. त्यांच्या पत्नीची आम्ही भेट घेतली तेव्हां कळले की, डॉक्टरांनी त्यांना चार-पाच दिवसांपूर्वीच तपासून इस्पितळात दाखल होण्यास सांगीतले होते. पण रेग्यांचे वैद्यकीय ज्ञान येथेही आडवे आले. गॅसमुळेच आपल्या छातीत त्रास होत असल्याचे त्यांनी पत्नीला सांगीतले. नेहमी प्रमाणे डायजिनच्या गोळ्या चघळल्या. पण शनीवारी जेव्हां खूपच त्रास होऊ लागला तेव्हां मात्र त्यांनी आपल्या पत्नीला स्वतःला इस्पितळात दाखल करण्यास सांगितले. पण...
तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष


Comments

  1. Nicely written. Very interesting and informative article sir. Thank you.

    ReplyDelete
  2. Nice and nostalgic. Reminded me of my wonderful association with Dr Rege.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :