अष्टपैलू झुंजार पत्रकार : माधव गडकरी.



माधवराव गडकरी यांच्याशी माझी पहिली भेट झाली ती गोव्यात ते गोमंतकचे संपादक असताना. माझे वडील बंधू, पत्रकार ग.गो.राजाध्यक्ष यांच्यासोबत. दोघांचीही चांगली मैत्री होती. तसे माधवराव पत्रकारीतेत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणूनच गणले जात. एक झुंजार असे पत्रकार. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ साली मुंबईत झाला. त्यांचे बालपण लेमिंग्टन रोडवरील टोपीवाला चाळीत गेले. पुढे ते ठाण्यात राहायला गेले.   जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे तासकर मास्तर त्यांचे आजोबा. तसे पाहीले तर या प्रतीभा संपन्न व्यक्तिमत्वाची पत्रकारीतेची सुरुवात झाली ती ठाण्यातील 'निर्धार' या साप्ताहिकातून. त्यानंतर दिल्ली येथे आकाशवाणीवर ते कार्यरत राहीले. पुढे १९६२ साली 
टाइम्स ग्रुपने महाराष्ट्र टाइम्स हे पहीले मराठी दैनिक सुरु केले, तेव्हा त्याचे पहीले संपादक होते द्वा. भ. कर्णिक. त्यांनी गडकऱ्यांना प्रथमच अश्या मोठ्या वृत्तपत्रात आणले, आणि गडकरी  महाराष्ट्र टाइम्सचे उप संपादक झाले. लोकसत्ता  ह्या सुप्रसीद्ध वृत्तपत्राशी स्पर्धा होती त्यांची.  तेथे सुमारे पाच वर्षे काम केल्यानंतर त्यांना गोव्यामध्ये 'गोमंतक' या प्रसिध्द वृत्त पत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तेथे काम करीत असताना माधवरावांनी जेथे जेथे भ्रष्टाचार होता, खोटेपणा होता त्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. कधीच कोणाची खुषामत न करणार्या त्यांच्या लेखणीमधून राजकारणीही सुटले नाहीत. यावेळी गोव्याचे मुख्य मंत्री बांदोडकरांशीही त्यांना संघर्ष करावा लागला. पण त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीपुढे गडकरी नमले नाहीत. त्यांचा रोषही गडकरींना पत्करावा लागला. पण माधवराव झुकले नाहीत. त्यामुळे त्याना ‘ गोमांतक ‘ सोडावे लागले. पुढे जेव्हा ते मुंबईला सकाळ या वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून आले, त्यावेळी गोव्यातील जनतेला त्यांचा आधार गेल्याप्रमाणे वाटले. याच गोवेकरांनी तेथून परततांना त्यांचा सत्कार करून  त्यांना  मारुती गाडी भेट म्हणून दिली.

सकाळ हे वृत्तपत्र डॉ. ना भि. परुळेकर यांनी प्रथम पुण्याला सुरु केले होते. अनेक वर्षे सकाळ पुण्यातील एक महत्वाचे पत्र म्हणून त्याकडे वाचक पहात होते. जोडीला मुंबईहून प्रसीद्ध होणारे  स्वराज्य हे साप्ताहीक देखील होते. सकाळचा चेहरा हा पारंपारीक होता, त्यामुळे त्याला आधुनीकतेची जोड मिळणे आवश्यक होते. त्याच वेळी डॉ. परुळेकरांची इच्छा होती की सकाळ मुंबईतूनही प्रसीद्ध करावा. आणि गडकरींना ती एक सुवर्णसंधी मिळाली. १५ नोव्हेम्बर १९७६ या दिवशी गडकऱ्यांनी 'मुंबई सकाळ'चे संपादकपद स्वीकारले. त्यावेळी सकाळच्या केवळ सात हजार प्रती छापल्या जात होत्या. परत 'लोकसत्ता' व 'महाराष्ट्र टाइम्स' या दोन बलाढ्य दैनिकांच्या स्पर्धेत मुंबई सकाळला स्वतःचे स्थान निर्माण करायचे होते. सकाळची सुत्रे हातात घेतल्यावर गडकरीनी  सकाळ या वृत्तपत्राचा  चेहरा मोहराच बदलून टाकला. संपादक व वाचक यांचा सुसंवाद घडवावा या हेतूने येथेच त्यांचे ' चौफेर ' सदर सुरु झाले. व त्यांची चौफेर नजर सर्वत्र फिरू लागली. 'चौफेर' सदरातून ते वाचकांशी रोज संवाद साधू लागले.  त्यांनी जेजे पाहीले होते, वाचले होते त्याचीच पेरणी गडकरींनी चौफेर मधून केली. आणि त्यांनी वाचकांना रोज सदर वाचण्याची सवय लावली. या सदरचे 'चौफेर ' हे नांवही त्यांना क्रिकेट सामन्यातील मराठीतील धावते समालोचन चालू असताना चौफेर टोलेबाजीचा वृत्तांत दिला जात होता त्यावरून हे नांव त्यांनी आपल्या सदराला दिले, व ते एकदम फिट्ट बसले. आणि सकाळ हे मुंबईतील एक प्रमूख वृत्तपत्र बनले. पुढे त्यांच्या या चौफेर सदराने सरकार दरबारी आपली खास अशी दखल घेण्यास भाग पाडले. मात्र यासाठी गडकरी बरेच वाचन करीत असत. दिल्ली,मद्रास, कोलकाता अश्या शहरातील वृत्तपत्रे ते रोज रात्री नियमीत वाचीत असत. देशांत कोठेही घटना घडल्या तर तेथे हजर राहण्याचा प्रयत्न करीत. त्यावरूनही लिखाण होत गेले. ' वृत्तपत्रात जे प्रसीद्ध होते, त्यामधून टिकते ते साहीत्य, जे टिकत नाही ते वृत्तपत्रीय लेखन' ही त्यांची विचारधारा होती. मागासलेल्या प्रदेशांचे व लोकांच्या विकासाचे अनेक प्रश्न चौफेरने मांडून त्यांना न्याय दिला, त्यांचा विकास केला. त्याच बरोबर अनेक सामान्य लोकांचे न सुटणारे प्रश्न असोत, सरकार दरबारातील लाल फितीत अडकून पडलेल्या सामान्यांच्या समस्या असोत, चौफेरने अश्या गोष्टींना नेहमीच उचलून धरून न्याय मिळण्यास मदत केली आहे.  मग ते अंतुलेंचे सिमेंट प्रकरण असो, बाबुराव सडवेलकर यांच्या विरोधातील शिक्षकांचे प्रकरण असो, त्यांनी अनेकांचे भ्रमाचे भोपळे फोडले ! पुढे या चौफेर सदरात प्रसीद्ध झालेल्या निवडक लेखांचे सहा भाग त्यांनी पुस्तक रूपाने प्रकाशीत केले.

१९८४ मध्ये माधवराव लोकसत्ताचे संपादक झाले. तेव्हा त्यांची जबाबदारी वाढली. त्यांचा लोक संग्रह अफाट होता, त्यात भर पडू लागली. येथे त्यांचे ' चौफेर ' पुन्हा सुरु झाले. त्यांच्या लोकसत्तेच्या कार्यालयातील केबिनची दारे सर्वांसाठी उघडी असत. त्यामुळे अनेक अन्यायग्रस्त त्यांच्या कडे आपली गाऱ्हाणी घेवून येत. त्यांच्या प्रकरणात लक्ष घालून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचे काम ते करीत असत. त्यांचे वाचन अफाट होते. कोणी काय लिहिले आहे, काय प्रसिध्द झाले आहे, यावर त्यांचे बारीक लक्ष असे. आपल्या या चौफेर मधून गडकरींनी नेहमीच अन्यायावर कोरडे ओढले. मग समोरील व्यक्ती वा संस्था कितीही मोठी असो. यावेळी आठवण यायची ती आचार्य अत्रे यांच्या घणाघाती लेखणीची. अनेक विस्मृतीत गेलेल्यांना त्यांनी प्रकाशात आणले. यातूनच वसईच्या एका वृद्धाश्रमात पडून राहिलेल्या शांता हुबळीकर या दुर्लक्षित अभिनेत्रीला प्रकाशात आणून तिच्याकरिता फंड जमा केला, व तिचे आयुष्य सुसह्य केले. शासनाच्या १० टक्के या कलावंतासाठी असलेल्या  सदनिकांची माहिती बऱ्याच जणांना नसायची. त्यामुळे मुख्य मंत्र्यांच्या जवळ असलेले काही मोजकेच लोक त्याचा फायदा करून घेत. त्याची माहितीही त्यांनी या स्तंभातून दिली, व अनेकांना त्या मिळू लागल्या. मंगेश म्हसकर या झोपडपट्टीत राहणाऱ्या विध्यार्थ्याने शालान्त परीक्षेत सर्व प्रथम येवून एक इतिहास घडविला. त्यावेळी ' मंगेश म्हसकरला घर द्या ' हा अग्रलेख लिहून त्यांनी तत्कालीन मुख्य मंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडून त्याला दहा टक्के कोट्यातून एक सदनिका देवविली. 


माधवरावांनी अफाट लेखन केले. त्यांचे वाचनही तसेच अफाट होते. त्यांचे पार्ल्यातील घर संपूर्ण पुस्तकांनी आणि पारितोषिकांनी भरलेले होते. त्यांच्या आयुष्यातील घडलेली एक गोष्ट म्हणजे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या ' रिडल्स ऑफ राम ॲंड कृष्ण' या त्यांच्या महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या ग्रंथातील लिखाण. राम कृष्णाची शासकीय स्तरावर झालेल्या या निंदेवर गडकऱ्यांनी जेव्हां आपल्या चौफेर या स्तंभामधून 'सरकारी पातळीवर राम कृष्णाचा उद्धार', हा लेख लिहीला, आणि एकच खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरे यांनी  शिवसेनेचा  मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना सदर परिशीष्ट त्या ग्रंथातून काढून टाकण्याची विनंती केली, व मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण यांनी तसे आश्वासनही दिले. पण लगेचच बाबासाहेबांच्या अनुयायांचा प्रचंड मोर्चा निघाला व त्यांनी हुतात्मा स्मारकावर गोंधळ घातला. पुढे छगन भुजबळ यांनी त्याचे शुद्धीकरण करवले. त्यावरही  बरीच टीका झाली. मात्र गडकऱ्यांनी सदर लेख उजेडात आणून तो वाचायला लावले एवढे मात्र खरे. मध्ये ते
 रत्नागिरी येथे भरलेल्या १९९० सालच्या  साहित्य संमेलनाला गेले असता कांही हिंदुत्ववादी संघटनेच्या अनुयायांकडून  त्यांच्या घराच्या दरवाज्यात बॉम्बस्फोट करण्यात आला. निमित्त होते ' राम जन्म भूमी' संदर्भात लिहिलेल्या एका लेखाचे. ही बातमी कळली तेव्हा किंचितही विचलित न होता त्यांनी घरी कोणाला शारीरिक दुखापत झाली आहे का, याची चौकशी केली. आणि माधवराव संमेलन आटोपूनच घरी परतले. '''आपल्याला राम कधीच पावला नाही. मग तो रिडल्सचा असो वा अयोध्येचा !'' असे उद्गार त्यांनी त्यावेळी काढले


पत्रकारीतेच्या निमित्ताने गडकऱ्यांनी जवळ जवळ सर्व देशभर तसेच साधारण ३/४ जगाचा प्रवास केला. तेव्हां त्यांना जाणीव झाली की, माणसाने इतिहासाचे ओझे फार बाळगू नये. एकदा ते पानिपतला पेशव्यांचा जेथे पराभव झाला ती जागा पाहण्यास गेले. तेथील एकाला त्यांनी विचारले, ती मराठ्यांची लढाई कोठें झाली होती? तो आपल्या हिंदीत म्हणाला, कलतक तो ऐसा कुछ हुवा नही. त्यावर गडकऱ्यांनी त्याला मराठ्यांच्या इतिहासाची माहीती दिली. तेव्हां तो सहज म्हणून गेला, ' तब मैं कहाँ था?' हे त्याचे उत्तर गडकऱ्याना फार आवडले. त्यातून त्यांना कळले की, इतिहासातून माणूस कांहीही शिकत नाही हाच इतिहासाचं धडा आहे. आपण इतिहासांतील त्या काळामध्ये नव्हतो त्याला किती महत्व द्यायचे यालाही कांही मर्यादा आहेत. आपल्या जीवनात माधवरावांनी जे काय पाहीले, अनुभवले, ते सारे त्यांनी आपल्या लेखांद्वारे, पुस्तकांद्वारे मांडले आहे. समाजातील अनेक वंचीताना आपल्या लेखणीने भरघोस सहाय्य केले. समाजातील अनेक अनीष्ट प्रथांवर, भ्रष्टाचारावर त्यांनी कठोरपणे कोरडे ओढले. त्यांच्या संपादकीय कारकीर्दीचा, लेखनाचा वेळोवेळी गौरव झाला. तसेच आचार्य अत्रे पुरस्कारासहीत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत पण करण्यात आले. त्यात १९९० साली मिळालेल्या पदमश्री पुरस्काराचाही समावेश आहे. आपल्या या पत्रकारीतेच्या वाटचालीत माधवरावांचे अनेक मान्यवरांशी संबंध आले. त्यापैकी कांही म्हणजे, द्वा.भ.कर्णीक, तर्कतीर्थ लक्षुमणराव जोशी, कुसूमाग्रज, बा. भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, मंगेश पाडगांवकर, मधू मंगेश कर्णीक हे होत. आणि त्यांच्याशी स्नेहाचे संबंधही जुळले.

माधवरानी एकदा सांगीतले की कष्टाच्या मानाने त्यांना खूप कमी मिळाले, पण आनंद मात्र खूप मिळाला.शेवटी यश महत्वाचं की आनंद महत्वाचा याचं गणित कोणी मांडलं तर मी म्हणेन की आनंद तितकाच महत्वाचा असून तो आपण किती घेतो, त्याचबरोबर तो इतरांना किती देतो हेही तितकेच महत्वाचे आहे. त्यांना आयूष्यात चांगल्या लोकांचा सहवास मिळाला याबद्दल त्यांना नेहमीच अभीमान वाटे. जगामध्ये नवेनवे जे काय घडते ते ते पाहण्याची त्यांची उत्सूकता वाढत राहीली. आजचा जो काळ आहे तो पाहता ध्यानांत येते की कोण कोणाचा मित्र आहे हे जाणवतच नाही तर कोण कोणाचा शत्रू आहे हेच जाणवतं. तुमची एकदा लढाई सुरु झाली की तुमचे मित्र लांब उभे राहून लढाई पहात असतात. तुम्ही एकदा यशस्वी झाला की, ते तुमच्या जवळ येऊन उभे राहतात, तुम्हांला हार घालायला ते तयार असतात. परंतू तुमचा पराभव झाला की तें दिसेनासे होतात. एखादाच चांगला मित्र असतो जो पराभवाच्या वेळीही तुम्हांला भेटतो, आणि साथ करतो. म्हणूनच आपण पुढे जात असतो. ही माधवरावांची जीवनावरची व्याख्या होती.त्यांना नेहमीच आकर्षण वाटले ते साहित्याचे, साहित्यिकांचे. यावेळी त्यांना गोविंदाग्रजांचे शब्द आठवतात. ते म्हणाले होते, ' तुम्हांला जर कधी माझे स्मारक करावस वाटलं तर ते तुम्ही फर्ग्युसन कॉलेजच्या दरवाजात अश्या ठिकाणी करा की जिथं विद्वान जातील आणि त्या विद्वानांची धूळ माझ्या मस्तकावर उडेल.' म्हणजे या धुळीचा आणि मातीच्या नात्याचा अभ्यास केला आणि त्याच्या मागोमाग तुम्ही गेला तर तुम्हांला जाणवेल की तुमच्या मातीशी इमान, तुमच्या राज्याशी इमान, भाषेशी इमान, तुमच्या साहित्याशी इमान या गोष्टीत कधीही तडजोड होऊ शकत नाही. ही माधवरावांची पत्रकारीतेची विचारधारा होती.


माधवराव मुंबई विद्यापीठाचे सिनेटचे सदस्य म्हणून आल्यावर आमच्या भेटी नेहमी होवू लागल्या. सोबत सुभाष भेंडे, भालचंद्र नेमाडे, विनय सहस्त्रबुद्धे पण असायचे. कधीकधी मी त्यांच्या एक्स्प्रेस टॉवर मधील त्यांच्या कार्यालयातही जात असे. तेथे प्रदीप वर्मा, संजय रावूत, सतीश नाईक असे मित्रही भेटत. माझी जेजेच्या डीनची निघालेली ऑर्डर येथील काही कंपू असलेल्या लोकांनी रामदास आठवले यांच्या करवी रद्द करून तब्बल दोन वर्षे मला ते हक्काचे पद मिळू दिले नाही, ते प्रकरण देखील गडकरींनीच शासनाच्या नजरेला आणून मला न्याय मिळवून दिला. त्यांची निवृत्तीनंतरही सततची कामे सुरूच असत. या अथक परिश्रमामुळे त्यांना हृदय विकाराचा झटका आला, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. तेव्हा मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या चौफेर प्रवासावर थोडी बंधने आणली. पण घरून देखील त्यांचे लिखाण सुरूच असायचे. आपले सदर ते इ-मेलने पाठवीत असत. आणि परदेश वाऱ्याही सुरूच राहायच्या. त्यात विमानात चढणे उतरणे हेही त्यांच्या तब्येतीला घातकच होते.-पण अश्या गोष्टींकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. कामातच त्यांना आनंद मिळत असे.

माधवराव गडकरी हे पत्रकारीतेतील एक दीपस्तंभ म्हणून ओळखले जावेत. त्यांच्या केबिनमध्ये सर्वाना मुक्त संचार असे. अनेक लोक गाऱ्हाणी घेऊन येत. त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचा वेदनांवर फुंकर घालणे ही त्यांची कामे सुरूच असत. विविध चळवळींच्या पाठीशी ते खम्बिरपणे उभे रहात. त्यांची लेखणी सतत जागरूकतेने तळपत असे. अनेक भाषणे ते देत असत. लोकसत्तेमध्ये असतांना अग्रलेखासोबतच एखादे सदर कसे लोकप्रीय करावे ते त्यांनी दाखवून दिले. अफाट वाचन, उदंड लेखन यांनी त्यांचे व्यक्तीमत्व भारून निघालेले होते. स्वतःचे असे खास स्थान गडकरींनी पत्रकारीकेत निर्माण केले होते. पुढे ते पुण्याला रहायला गेले. आणि तेथूनच ती मन सुन्न करणारी अभद्र बातमी आली. सतीश नाईकांचा फोन आला,' गडकरी गेले !' दिवस होता १ जून २००६. माझ्यासहीत कित्येक लोकांचे अन्याय दूर करणारा मसीहा गेला. अनेक सामान्य जनांचा आधारवड गेला. २५ सप्टेंबर हा दिवस माझ्या आयूष्यात दोन व्यक्तींच्या निमित्ताने चांगलाच ध्यानांत राहीला आहे. या दोन्ही व्यक्ती कश्या ना कश्या तऱ्हेने माझ्या जीवनात आल्या, ज्यांच्या रूपाने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची संधी प्राप्त झाली. त्यापैकी एक म्हणजे ब्या. नाथ पै व दुसरे माधवराव गडकरी. योगायोग म्हणजे दोघांचाही जन्म दिवस एकाच दिवशी.
२५ सप्टेंबर! एकदा दोघेही त्या दिवशी दिल्लीत होते, व सकाळी दोघांनीही एकमेकांचे अभीष्टचिंतन केले. अश्या या माधवरावांची पत्रकारीता महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही!

-मं.गो.राजाध्यक्ष

( २५ सप्टेंबर २०१८ रोजी माधवरावांचा ९० वा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली )


Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

माझे वडील कलाकार होते :

अक्षरांची प्राचीन सौंदर्यदृष्टी जपलेला कला प्राध्यापक : प्रा. रमेश खापरे.