चित्रपट सृष्टीतील फुललेला वसंत : वसंतराव जोगळेकर
आपल्या चित्रपट सृष्टीत कांही नांवे आदरणीय अशी आहेत, त्यापैकी एक नांव म्हणजे वसंतराव जोगळेकर. हिंदी मराठी अश्या दोन्ही चित्रपट निर्मितीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. एक गुणी, स्वरूपसुंदर, हसतमुख, कल्पक असे निर्माते दिग्दर्शक म्हणून वसंतरावांकडे आदराने पाहीले जाते. वसंतराव हे विदर्भातले. २५ सप्टेंबर १९१४ साली यवतमाळ येथे त्यांचा जन्म झाला. वडील प्रख्यात वकील होते. घरचे सधन. तो काळही छोटे कुटुंब असण्याचा नव्हता. वसंतरावांच्या पाठीवर चार भाऊ ' आणि तीन भगीनी अश्या कुटुंबाने जोगळेकरांचा वाडा गजबजून गेला. म्याट्रीक पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथे झाल्यावर पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूर येथे वसंतराव गेले. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत त्यांचे घरी येणे होत असे. सर्व भावंडात देखणे असल्याने सर्वांचेच ते आवडते होते. त्यात त्यांना नाटके बसविणे, दिग्दर्शीत करणे याची खूप आवड होती. त्या काळात त्यांनी ' आंधळ्यांची शाळा' हे नाटक बसवले होते. पुढे कोल्हापूर येथे ' प्रफुल्ल' चित्र मध्ये वसंतरावांच्या 'चिमुकला संसार' या चित्रपटाचे दिग्दर्शन म्हणून काम चालले होते. एका बाजूला त्यांचे 'माझे बाळ' या चित्रपटांचीही काम चालले होते. तिथे एक चिमुरडी मुलगी मनसोक्त फिरत होती. उत्तम गात होती. नृत्यातील पदन्यासही तालावर करीत होती. त्या मुलीला सर्वत्र मुक्त संचार होता. ती सहजगत्या अभिनय देखील करीत होती. सर्वांचाच कौतुकाचा विषय ठरलेली ती चिमुरडी मुलगी म्हणजे पुढे गानसम्राज्ञीचे अढळपद मिळवलेली भारतरत्न लता मंगेशकर होय! याच लता मंगेशकर यांनी आपल्या पार्शवगायनाची सुरुवात केली तीच वसंतराव जोगळेकर यांच्या ' आपकी सेवामे' या चित्रपटातून. त्यामध्ये त्यांनी पहीले गाणे गायले. पुढे वसंतराव यांच्याशी त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची इतकी जवळीक व घरोबा झाला, की वसंतरावांच्या कोणत्याही चित्रपटात गायल्यानंतर लतादीदींनी मानधन म्हणून एक पैसाही कधी घेतला नाही.
या काळात बडोद्यावरून आलेली एक देखणी अभिनेत्री चित्रपट श्रुष्टि गाजवत होती. प्रभात फिल्म कंपनीत व पुढे भालजी पेंढारकर यांच्याकडे त्या काम करीत होत्या. खानदानी सौंदर्य आणि कसदार अभिनय या दोन्ही पातळीवर उचस्थानी असलेल्या त्या गुणी अभिनेत्री होत्या सुमती गुप्ते. भालजींकडील त्यांचा 'थोरातांची कमळा' व पुढे 'सुनबाई' हे चित्रपट यशस्वी ठरले. पुढे मास्टर विनायक यांच्याकडे त्यांनी 'गजाभाऊ' याचित्रपटात काम करत असतांनाच प्रफुल्लच्या 'चिमुकला संसार' वसंतराव दिग्दर्शीत करीत होते. या देखण्या व कल्पक दिग्दर्शकाने त्यांचे मन हिरावून घेतले. याची परीणीती प्रेमात झाली व पुढे विवाहात! आप्पा पेंडसे यांनी मध्यरात्री या दोघांचा विवाह लावून दिला. तारीख होती २ सप्टेंबर १९४४. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी आली, ' सुनबाईंचा चिमुकला संसार' सुमती गुप्ते या सुमती जोगळेकर झाल्या. एका सर्जनशील व्यक्तीत्वाला तितकीच समर्थ अशी कल्पक जोड मिळाली.दिग्दर्शक म्हणून वसंतरावांनी आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या नंदकिशोर या चित्रपटाच्या एका प्रसंगाचे काम प्रभात मध्ये चालू आहे, हे कळल्यावर अनेक निर्माते दिग्दर्शक तेथें दाखल झाले. त्यात राजा परांजपे देखील होते. या चित्रपटात एक्स्ट्रा म्हणून काम करणाऱ्या कुमुद व कुसुम सुखटणकर या दोघा बहीणीकडे राजाभाऊंचे लक्ष गेले. व पुढे राजाभाऊंचा ' लाखाची गोष्ट' हा चित्रपट तसेच पुढील काळात मराठी चित्रपट सृष्टी त्या दोघीनी रेखा व चित्रा या नांवाने गाजवली. मधल्या काळात पुण्याला वसंतरावांनी सरस्वती सिनेटोनचा 'किती हसाल' हा चित्रपट एकवीस दिवसात पूर्ण केला होता. त्यानंतर ते मुंबईतच चित्रपटाच्या कामात व्यस्त झाले. त्याच दरम्यान त्यांचे लहान बंधू बाळ जोगळेकरही छायाचित्रणाच्या निमित्ताने मुंबईला आले. पुढे वसंतराव यांच्या चित्रपटाचे छायाचित्रण बाळ जोगळेकरांनी करू लागले.
राम-लक्ष्मणाप्रमाणे हे दोघे बंधू चित्रपट व्यवसायात गाजू लागले.याच दरम्यान दुसऱ्या महायुद्धाची अप्रत्यक्ष झळ आपल्या देशाला बसली होती. तशातच बंगालला दुष्काळाची प्रचंड झळ बसली. मुंबईच्या साहीत्य संघात एक उत्तम प्रतीचे थेटर बांधले जावे म्हणून मास्टर विनायक यांनी डॉ.भालेराव यांनी सुरु केलेल्या नाट्य महोत्सवासाठी लग्नाची बेडी हे नाटक बसवले होते. त्यात स्वतः विनायकसहित वसंतराव, सुमती गुप्ते, मीनाक्षी, बाबुराव पेंढारकर आप्पा पेंडसे अश्यांच्या भूमिका होत्या. बंगालच्या दुष्काळाला मदत करण्यासाठी विनायक यांच्या मनांत एक वेगळीच समाजसेवेची कल्पना अली. ग.दि.माडगूळकर यांनी दुष्काळाच्या पार्शवभूमीवर एक गीत लिहीले. 'लग्नाची बेडी'चा प्रयोग झाला, की हे सर्व कलाकार झोळी घेऊन प्रेक्षकांमधून हिंडत. पाठीमागे लतादीदी, मीनाक्षी हे गीत गात असत. त्यामुळे सर्व प्रेक्षवर्ग भारावून जात असे, व यथाशक्ती त्या झोळीत काहीतरी टाकत असे. नंतर जमा झालेला हा मदत निधी बंगाल दुष्काळ निधीकडे सुपूर्द करण्यात येत असे.
१९४८ च्या सुमारास वसंतरावांनी ' साखरपुडा' चित्रपटाच्या निर्मितीस सुरुवात केली. प्रौढ , नोकरी करणाऱ्या स्त्रियांवर येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणारी विभावरी शिरुरकर (मालतीबाई बेडेकर ) यांची कथा होती ती. पुढे १९५०-५१ च्या दरम्यान एम.एण्ड टी. प्रॉडक्शन कंपनीने ' नंद किशोर' ह्या श्रीकृष्णाच्या जीवनावर बिग बजेट चित्रपट काढायचे ठरवीले. याचे दिग्दर्शनही वसंतरावांनाच देण्यात आले. पौराणीक चित्रपट असल्याने यात अनेक ट्रिकसीन व अद्भूत घटना येणे हे स्वाभाविकच होते. राधेच्या भूमिकेसाठी नलीनी जयवंत हिची निवड झाली होती. त्याकाळात नलिनीबाईंची कामे वाढत चालली होती. त्यांनी सांगितलेले पैसे अवाढव्य होते. व प्रत्येक बैठकीच्या वेळी त्यांची रक्कमही वाढत जाई. त्यामुळे स्टुडिओचे मालक वैतागून गेले व त्यांनी दुसरी अभिनेत्री घेण्याचे ठरवून नलिनीबाईंना तसे कळविले. पण काही दिवसांनी बाळ जोगळेकरांनी स्वतः त्यांची भेट घेऊन विनंती करताच त्या तयार झाल्या. पुढे त्यांचा स्नेह जोगळेकर कुटुंबियांशी वृद्धिंगत झाला तो अखेरपर्यंत. या चित्रपटात राजन जावळे हे अनाम च्या भूमिकेत तर कंस झाले होते बाबूराव पेंढारकर.
आता वसंतराव जोगळेकर हे एक खणखणीत नाणे बनले होते. त्यांनी स्वतःची ' पंचदीप प्रॉडक्शन' ही चित्रपट निर्मिती संस्था महालक्ष्मीच्या फेमस स्टुडीओमध्ये सुरु केली. तेथे १९५८ मध्ये त्यांनी ' कारीगर' या हिंदी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. नायक होते अशोककुमार. अशोक कुमार यांच्याशी वसंतरावांची घनिष्ठ मैत्री होती. अगदी घरगुती संबंधच म्हणा ना! तसेच मंगेशकर कुटुंबियांशी देखील. जोगळेकरांच्या प्रत्येक समारंभाला ही दोन्ही कुटुंबे अगत्याने हजेरी लावीत असत. कारिगरची कथा ही त्याकाळातील प्रसीद्ध अश्या 'बायसीकल थीफ' या चित्रपटावर बेतली होती. यामध्ये अशोककुमारने आपल्या उत्कट अभिनयाची पराकाष्टा केली होती. अशोककुमार यांची एक सवय होती ती म्हणजे संपूर्ण प्रसंगावर दिग्दर्शकाशी चर्चा करायची. पण एकेकदा या प्रकारात त्यांचं स्थळकाळाचे भान हरपून जात असे व अगदी लहानश्या प्रसंगावरही दिवसभर चर्चा चाले. पण यातून एक उच्च असे प्रसंग चित्रित होत असत. आणि याला संगीत होते सी. रामचंद्र यांचे. कारीगर नंतर पुढचा चित्रपट पंचदीप ब्यानरखाली सुरु झाला. नांव होते 'आंचल'. या चित्रपटाची जोडी होती अशोककुमार निरुपा रॉय यांची. त्या काळातील गाजलेली जोडी. सोबतीला होते धुमाळ, नंदा, सीमा, मधू आपटे इत्यादी मराठी कलावन्त. यातील ' गा रही है जिंदगी,' ' सावरिया रे अपनी मीरा को भूल न जाना' ही गीते लोकप्रिय झाली. याचेही संगीत सी रामचंद्र यांनीच दिले होते. पुढे या आंचल च्या कथेवरून मधू मुव्हीज साठी सुमतीबाईंनी ' जानकी' हा मराठी चित्रपट निर्माण केला. यामध्ये ' सावरियारे अपनी मीरा को' या गाण्याला ' विसरू कशी श्रीरामा तुला' हे गीत केले होते सुधीर मोघेंनी. ते अत्यन्त लोकप्रिय झाले. हृदयनाथ मंगेशकर यांनी या चित्रपटाची कर्णमधुर गाणी संगीतबद्ध केली होती. पुढे १९६३ साली एक भव्य असा सामाजीक चित्रपट निर्माण करण्याच्या हेतूने वसंतरावांनी पु.ल.देशपांडे यांच्या ' सुंदर मी होणार' या नाटकावर आधारीत चित्रपट वर्षभरातच पडद्यावर आणला. त्याचे नांव होते ' आज और कल' एक करारी संस्थानीक, त्याची चार मुले, मोठी मुलगी पायाने अधू नायक डॉक्टर. यात अशोककुमार, सुनील दत्त, नंदा, तनुजा, देवेन वर्मा असे हरहुन्नरी कलाकार होते. संगीत दिले होते रवी यांनी.म्हैसूरच्या रामबाग प्यालेस या राजवाड्यात चित्रीकरण झाले होते. यातील 'तख्त न होगे ताज न होगा' 'ये वादीया ये फिजाये' 'इतनी हसीन इतनी जंवा रात क्या करे' ही रफींची गाणी अद्यापही लोकप्रीय आहेत.
वसंतराव आणि सुमतीबाई हे जोडपे जणू एकमेकांसाठीच बनले होते. खानदानी सौंदर्य, देखणेपण, वसंतरावांकडे पाहीले की वाटे हा माणूस कॅमेऱ्यापाठीं न रहाता कॅमेऱ्यासमोर असता तर चित्रपटसृष्टीला एक अभिनयसंपन्न व रूपवान कलाकार मिळाला असता. वसंतरावांसारखा दिलदार व प्रेमळ माणूस, आणि आपल्या मंगल प्रकाशाने सर्व दिशा उजळून टाकणाऱ्या व सतत तेवत असणाऱ्या निरांजनाप्रमाणे त्यांची सोबत करणाऱ्या सुमतीबाई हा जोडा लक्ष्मी-नारायणाप्रमाणे शोभत असे. स्टुडीओत हे दोघेही एकत्र दिसले की लता मंगेशकर त्यांना हसून, वाकून नमस्कार करीत असत. एक दिवस त्यांनीच सांगीतले की, या दोघांना पाहील्यावर लक्ष्मी-नारायणाचे दर्शन घडल्याचा आनंद होतो. वसंतराव जसे चित्रपट क्षेत्रांत यशस्वी होते, तसेच त्यांच्या संसारातही तितकेच आनंदी होते. सुमतीबाईंना छान छान पदार्थं करून इतरांना खायला घालण्यास मनोमनी आनंद होत असे. ते माझे चुलत सासू सासरे असल्याने ( माझ्या पत्नीचे सख्खे काका-काकी ) आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्याकडे जात असू. वसंतरावांना आप्पा या नांवाने संबोधीत असत. आमचे ते आप्पाकाका व सुमती काकी असत. तेथे गेल्याबरोबर त्या माझ्या पत्नीला घरी फोन करून सांगण्यास सांगत की, घरी जेवणाची वाट पाहू नका. येथेच जेवण करून येऊ. मग विशेषतः मासळीचे पदार्थ असले की त्यांच्या हातची चव कांही वेगळीच असे. त्याकाळात माझ्याकडे फोन नव्हता. कधी बोलवायचे असले की आपल्या सुंदर अश्या अक्षरांत पत्र लिहून ते पाठवीत असत. वसंतरावांच्या सुखी, आनंदी संसारवेलीवर तीन सुंदर कळ्या उमलल्या. मीरा, चंदा व मधूश्री या तीन गोड मुलींनी जन्म घेतला. पुढे त्या कळ्या उमलल्या. आणि या दरम्यान वसंतरावांनी सुमतीबाईंच्या कथेवर आधारित ' शेवटचा मालुसरा' हा चित्रपट काढला. त्यातही अशोककुमार यांनी अभिनय केला आहे. अशोककुमार यांचा हा पहीलाच मराठी चित्रपट.
१९६८ साली वसंतरावांच्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त केला. त्याचे नावंही मोठे काव्यमय होते. ' एक कली मुस्काई'! याचे फेमस मध्ये कांही चित्रीकरण झाले. यात सर्वच नावाजलेले कलावन्त होते. अशोककुमार, निरुपा रॉय, धुमाळ, नाना पळशीकर, महमूद आणि तो काळ गाजवीत असलेला नायक जॉय मुखर्जी. व नायिकेच्या भूमिकेत होती वसंतरावांची कन्या 'मीरा.' आपल्या संतापी, तापट वडिलांसमोर असहाय झालेल्या मुलीची भूमिका मीराने छान साकारली. संगीत होते मदन मोहन यांचे. 'न तुम'बेवफा हो', 'मैं तो पी की नगरीया' हे दिलवाडा टेम्पल मधील अवीट अशी गाणी या चित्रपटाने दिली. भारतात जेथे जेथे हिल स्टेशनवर चित्रीकरण होत असे, त्या प्रत्येक हिल स्टेशनची सौंदर्य स्थळे 'एक कली मुस्काई' मध्ये एकत्र आणली आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी वसंतरावांनी पंचदीप तर्फे सर्व तंत्रज्ञाना त्यांच्या कुटुंबासह नैनिताल येथे नेले. सर्वच जण एखाद्या सहलीला गेल्याप्रमाणे खुश होते. मोहन वाघ याना तर जोगळेकर कुटुंबीयांप्रमाणेच मानीत असत.
वसंतरावांना देशासाठी त्याग केलेल्या थोर व्यक्तींविषयी नेहमीच आदर वाटत असे. मग ते कोणत्याही विचारसरणीचे असोत. जसे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आदर वाटत होता, तसाच म. गांधीजी विषयी देखील होता. याच भावनेने प्रेरित होऊन त्यांनी महात्मा गांधी जन्म शताब्दीचे निमित्त साधून एक चित्रपट निर्माण करण्याचे त्यांनी ठरवीले. या चित्रपटांत गांधीजींचे साक्षरता - कुटुंब नियोजन- अस्पृश्यता निवारण हे विचार प्रामुख्याने दाखवले जाणार होते. यामध्ये कानन कौशल ( इंदूमती पैंगणकर ) व अझीझ मिर्झा हे कलाकार होते. समाज प्रबोधनाचा मार्ग दाखवणारा हा चित्रपट सरकारने अनुदान द्यावे म्हणून वसंतरावांनी खूप प्रयत्न केले. पण तेथील एकंदरीत कारभार पाहून त्यांनी नाद सोडला. महोत्सव संपला, गांधीजी मागे पडले. तेव्हा त्यांना कुसुमाग्रजांच्या अचूक शब्दात केलेले वर्णन आठवले. गांधीजींच्या पाठीशी फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती राहील्या आहेत. यानंतर वसंतरावांची हिंदी चित्रपट निर्मिती थांबली.
'जानकी' या चित्रपटाच्या आधी १९७६ साली 'मधू मुव्हीज' या ब्यानरखाली वसंतरावांनी जुळवाजूळव केली ती एका मराठी चित्रपटासाठी. एका चाकोरीतून चाललेल्या मराठी चित्रपटाला छेद देणारा हा चित्रपट होता. यामध्ये त्यावेळचे खणखणीत वाजणारे नाणे होते ते काशीनाथ घाणेकर हे अष्टपैलू अभीनेते. जोडीला होत्या आशा काळे. यांच्याबरोबर राजा गोसावी, धुमाळ, संजीवनी बिडकर, लालन सारंग यांच्याही महत्वपूर्ण भुमीका होत्या. संगीत होते हृदयनाथ मंगेशकर यांचे. यातील सस्पेन्स अतीशय सुंदररीत्या ठेवला होता. वातावरणाला पोषक असे पार्श्वसंगीत तसेंच हृदयनाथ मंगेशकर यांचे कर्णमधूर संगीत ही चित्रपटाच्या यशात मानबींदू ठरले होते. ' रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा', हे महेंद्र कपूर यांचे गीत, चित्रपटाचे गूढ वाढवीत होते. आशा भोसले यांची 'काजळ रातीनं ओढून नेलं', 'आला आला वारा' ही गीते, तसेच 'गोमू संगतीनं माझ्या तू येशील का' हे हेमंत कुमार -आशा भोसले यांचे कोळी गीत आजही तितकेच लोकप्रिय व ओठावर खेळणारे आहे. यानंतर मुंबई दूरदर्शनने त्यांच्याकडून बहीणाबाई चौधरी यांच्यावर ' बहीणाबाई - किसान कवियित्री' हा खास लघु चित्रपट बनवून घेतला होता. त्यामध्ये भक्ती बर्वे यांनी बहिणाबाईंची भूमिका केली होती. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली गीते गायली होती उत्तरा केळकर यांनी. दूरदर्शनच्या या निर्मितीला भक्ती बर्वे यांच्या कसदार अभिनयाने आणि त्यावर चढलेला खास असा जोगळेकरी टच मिळाल्यामुळे हा काव्यमय लघूपट एक उच्चांक गाठून गेला. असाच एक लघुपट पुणे दूरदर्शन सुरु झाल्यावर त्यांच्यासाठी 'आम्ही पुणेकर' देखील त्यांनी बनवीला होता.
वसंतरावांची मित्रमंडळी देखील तेवढीच त्यांची चाहती होती. त्यांचा '९७, वरळी सी फेस' हा बंगला अश्या लोकांच्या गप्पांचा अड्डाच होता. अनेक कलाकार, पत्रकार, साहित्यीक, लेखक मंडळींचा त्यात समावेश असे. त्यामध्ये राजन जावळे, आप्पा पेंडसे, डॉ. काशीनाथ घाणेकर, श्रीकांत मोघे, कुमारसेन समर्थ, मोहन वाघ, अच्युत बर्वे अश्या नामवंतांची हजेरी असे. त्यावेळी हसतमुख असे गौर वर्णी उंचेपुरे, देखणे, डोक्यावर भरगच्च रुपेरी कुरळे केस, अशी स्वच्छ पांढऱ्या कपड्यातील वसंतरावांची मूर्ती सुहास्य वदनाने स्वागताला हजर असे. जोडीला सुमतीबाई असत. पाहुण्यांसाठी खाणे पिणे त्या पहात. त्यांच्या घरी एखादा समारंभ असला की झाडून सर्व जोगळेकर कुटुंबीय त्यांच्याकडे जमा होत. एवढे त्यांनी सर्वांना बांधून ठेवले होते. सर्वच त्यांना वडीलकीचा मान देत. आणि कांही विशेष समारंभ असला की, अनेक मराठी हिंदी चित्रपट क्षेत्रांतील नामवंत असत. त्यामध्ये अशोककुमार, लतादीदी व आशा भोसले हे प्रामुख्याने असतंच. अशोककुमार यांच्याशी त्यांची अनेक दशकांची जिवलग मैत्री होती. वसंतरावांच्या कोणत्याही चित्रपटात अशोककुमार उर्फ दादामुनी हजेरी लावीत. अगदी मराठी चित्रपटांत देखील. वसंतरावांच्या सान्नीध्यात एखादी व्यक्ती आली की ती त्यांचीच होत असे. बराच मोठा मित्रसंग्रह त्यांनी जमवला होता. सर्वच त्यांच्या प्रती आदर व्यक्त करीत असत. वयोमानानुसार जेव्हां शरीराने साथ देण्याचे थांबवीले तेव्हां अनेक आठवणींनी ते त्रस्त होत असत. अखेरच्या दिवसांत त्यांना अंथरुणावर रहावे लागले. त्यांचे अनेक मित्र त्यांना भेटायला येत असत. अशोककुमार जेव्हां आले, तेव्हां त्यांनी आपल्या प्रिय मित्राचा हात हातात घेऊन काही क्षण ते गप्प राहीले. व बाहेर येताच त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आणि अखेर ३० जानेवारी १९९३ चा तो दुर्दैवी दिवस उजाडला. अवघ्या हिंदी -मराठी चित्रपट सृष्टीवर आपल्या कर्तबगारीने, सृजनशीलतेने, आणि आनंदी स्वभावाने मोहीनी घातलेल्या या वसंताचा अस्त झाला. देवघरातील देव्हारा रिक्त झाला. स्वतःच्या हिमतीवर रुपेरी पडद्यावर सोनेरी स्वप्नाला पूर्तता देणाऱ्या एका मराठमोळ्या कल्पक अश्या दिग्दर्शकाने या जगाचा निरोप घेतला.
-मं.गो.राजाध्यक्ष
( २५ सप्टेंबर रोजी वसंतराव जोगळेकर यांचा १०४ वा जन्म दिवस. त्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली )







Comments
Post a Comment