ॲरो मॅन : जे.सी. लिएण्डेकर
विसाव्या शतकाच्या आरंभाला अमेरीकन मोठी मासीके आणखीनच मोठी झाली. तो काळ ना फोटोग्राफीचा होता ना आधुनीक तंत्रज्ञानाचा. त्यामुळे अश्या दर्जेदार मासिकांना सजविणारे बोधचित्रकारही त्याच दर्जाचे असत. एकापेक्षा एक सरस असे. आणि यामुळे अमेरीकन प्रकाशन व्यवसायही मोठ्या प्रमाणावर वाढला. प्रत्येक आठवड्याला हे कलाकार-बोधचित्रकार लाखो वाचकापर्यंत आपल्या मुद्रीत कलाकृती सादर करीत असत. अमेरीकन बोधचित्रांचे ते सुवर्णयुगच होते. आज दूरदर्शन जे कार्य करत आहे, ते त्या काळांत वृत्तपत्रे अथवा मासिकांमधून पानापानांतून विखूरलेली बोधचित्रे करीत असत. अश्या त्या चित्रयुगीन कालखंडात दोघा चित्रकारांनी स्त्री व पुरुष अशी दोन व्यक्तिमत्वे आपल्या कलेद्वारे अजरामर केली. त्यापैकी स्त्रीचे चित्रण करणारे चित्रकार होते चार्ल्स गिब्सन, ज्यांनी निर्माण केली 'गिब्सन गर्ल' ( जिने अमेरीकन स्त्रीला आधूनिक स्त्रीचे रूप दिले आणि पुढील कांही वर्षे अमेरीकन तिच्या प्रेमात पडले.) या गिब्सन गर्लने पूर्वीचा कांहीही वारसा नसलेल्या अमेरीकन स्त्रीचे नवे आलेख निर्माण केले.
दुसरे पुरुषाचे व्यक्तित्व साकारणारे कलाकार होते 'जे. सी. लिएण्डेकर.' आज आपण सर्वच यरो शर्टचा 'ॲरो मॅन' पाहतो ते व्यक्तीमत्व जे.सी.लिएण्डेकर यांनी चितारले. व ते स्वतः 'ॲरो मॅन‘ म्हणून जगभर प्रसिध्द झाले. अर्थात त्या काळात तो 'ॲरो कॉलर मॅन' म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी शर्टला बदलणाऱ्या कॉलर वापरण्यांत येत असत. जे.सी.हे अद्याप 'ॲरो मॅन' म्हणूनच ओळखले जातात. हा 'यरो कॉलर मॅन' अमेरीकन फॅशनच्या जगतात एक नवा इतीहास निर्माण करणारा ठरला. त्याचा चौरसाकृती करारी चेहरा, धारदार नाक, थोडासा गर्वीष्ठ वाटणारा असा हा 'ॲरो मॅन' अमेरीकेमध्ये मर्दानी सौंदर्याचे प्रतीक बनला. जन्माने अमेरीकन नसलेल्या त्याच्या या निर्मात्याला प्रसीद्धी मात्र अमेरीकेत मिळाली. जोसेफ ख्रिस्तियन लिएण्डेकर यांचा जन्म दक्षीण जर्मनीमधील मोठांबूर या गांवी २३ मार्च १८७४ रोजी झाला. तीन वर्षांनी त्याचा लहान भाऊ फ्रॅंक झेवीयर याचाही जन्म जर्मनीमध्येच झाला. पुढे त्यांचे वडील १८८२ मध्ये अमेरीकेतील शिकागो या शहरी स्थलांतरीत झाले. १६ वर्षाच्या जोसेफने शिकागो येथील जे.मेन्झ या एनग्रेव्हिन्ग फर्म मध्ये उमेदवारी करण्यास सुरुवात केली. एका बाजूला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी पैशांची गरज होती. त्याचबरोबर दुसरीकडे एनग्रेव्हींगच्या तंत्रज्ञानामध्ये शिक्षण घेणेही आवश्यक होते. यामुळे आरंभालाच जोसेफच्या चित्रकलेच्या कौश्यल्याचा पाया भरभक्कम झाला. त्याचा त्याला पुढील आयुष्यात आपले भवितव्य घडवीण्यास मौलीक उपयोग झाला. पुढील पाच वर्षे लिएण्डेकरने पैसे साठविणे व मनःपूर्वक काम करणे या दोन गोष्टींनाच स्वतःला वाहून घेतले. १८९६ मध्ये जोसेफने 'सेंचुरी' मासिकाच्या पोस्टर स्पर्धेत मानाचे असलेले प्रथम पारितोषिक मिळवले. आणि एक यशस्वी बोधचित्रकार म्हणून जे.सी.लिएण्डेकर यांनी आपली विजय पताका रोवली. लगेचच त्यांना डझनभर नामवंत मासिकांची मुखपृष्ठे करण्याची संधी मिळाली. एक सक्षम असा सर्जनशील कलावंत उदयाला आला होता. ज्याने मग मागे वळून कधी पाहीलेच नाही
साठवलेले पैसे, पारितोषिकाची रक्कम आणि थोडी पालकांची मदत या आधारावर जोसेफला पॅरीस येथे जाऊन कला शिक्षण घेणे श्यक्य झाले. जाताना त्याने आपला लहान भाऊ फ्रॅंक झेवीयर यालाही सोबत घेतले. फ्रॅंक हा देखील चित्रकलेत वाटचाल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यालाही या कलेत विलक्षण गती होती. मात्र जोसेफची त्या कलेतील लहानपणापासूनची गती पाहीली असल्यामुळे त्याच्या पालकांनी जो ला नेहमीच आवश्यक त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे लहान भावाकडे दुर्लक्ष होऊन त्याला कोणत्याही प्रकारचे उत्तेजन वा प्रोत्साहन पालकांकडून मिळू शकले नाही. फ्रॅंकचेही चित्रकलेतील कौशल्य आपल्या मोठ्या भावापेक्षा अजीबात कमी नव्हते. पण जरी पालकांकडून दुर्लक्ष झाले, तरी जोसेफने त्याला आपलेसे केले. दोघेही एकमेकांच्या आधाराने वाढू लागले. आर्ट स्कुलमध्ये जो ने पारंपारिक कला शिक्षण घेणे पसंत केले. त्यावेळी पॅरीसमध्ये कल होता 'पॉप्युलर आर्ट'चा! तुलु लॉट्रीक, अल्फान्स मुचा, ज्यूल्स केरट यांची भित्तीपत्रके पॅरीसभर मोठ्या प्रमाणात दिसत.या सर्वानीच लिएण्डेकर बंधूंना आकर्षीत केले. विद्यार्थी वयातच जो ने एवढे कौश्यल्य आत्मसात केले, की त्याचे विद्यार्थी दशेतील काम संस्थेने आपल्या संग्रहालयामध्ये कायमस्वरूपी प्रदर्शीत करून ठेवले, जे पुढे दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब हल्ल्याने नष्ट झाले. वीस वर्षानंतर जेव्हां नॉर्मन रॉकवेल तेथे गेले, तेव्हां त्यांना आढळून आले की, अद्यापही ती संस्था, तेथील विद्यार्थी हे जे.सी.लिएन्डेकर बद्दलच बोलत असतात.
जो व फ्रॅंक अमेरिकेला परतले व शिकागो येथे त्यांनी आपला स्टुडीओ सुरु केला. दोनच वर्षात त्यांनी अपार यश मिळवले. व त्यांनी आपला स्टूडीओ न्यूयॉर्कला हलवला. १९०१ मध्ये कांही दशलक्षाच्या घरात खप असलेल्या प्रतिष्ठीत अश्या 'सॅटरडे इव्हीनिंग पोस्ट' या नियतकालिकेचे मुखपृष्ठ करण्याचा मान जो ला मिळाला. पुढे त्यांनी एकूण ३२१ मुखपृष्ठे तयार केली. त्यावर स्वतःचा असा खास ठसा त्यांनी उमटविला. आणि जे.सी.लिएण्डेकर हे नांव एक सर्वश्रेष्ठ बोधचित्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचवेळी तेथील एक अग्रगण्य कंपनी 'क्लट पी. बॉडी अँड कंपनी' ने आपल्या 'ॲरो' या शर्टला लावण्याच्या सुट्या कॉलरसाठी जाहिरातीचे काम त्यांना दिले. त्यासाठी जो ने चित्रीत केलेला देखणा, आकर्षक, थोडासा अलीप्त वाटणारा, थोडा अहंकारी आणि मर्दानी सौंदर्य असलेला 'ॲरो कॉलर मॅन' हा रातोरात अमेरीकेचा हिरो ठरला. शेकडो वेगवेगळ्या घाटणी असलेल्या काॅलर त्या काळांत लिएन्डेकरच्या ‘ॲरो मॅन’ने विकल्या.
छायाचित्रणाची मदत नसलेल्या त्या काळांत लिएण्डेकरच्या ॲरो मॅन ने जी सनसनाटी घडवली तिची आजच्या काळांत कल्पनाही येणे श्यक्य नाही. त्याचे अनेक फॅन तयार झाले. 'ॲरो मॅन'ला पत्रांचा पूर लोटू लागला. केवळ महिन्याभरातच १७००० पत्रे आली. एवढेच नव्हे, तर अमेरीकन स्त्रियांकडून त्याला लग्नाच्या मागण्याही येऊ लागल्या. एवढी अमेरीकन लोकांच्या मनात 'ॲरो मॅन'ने स्वतःविषयी सत्यता निर्माण केली होती. १९०३ ते १९४३ या कालावधीत 'सॅटरडे इव्हीनिंग पोस्ट'च्या प्रत्येक अंकावर तसेच मधूनमधून काढलेल्या खास अंकांवर लिएण्डेकरची मुखपृष्ठे दिसू लागली. नववर्षाला जो मुखपृष्ठावर लहान बालक दाखवीत असे. ही त्याची पद्धत पुढे 'पोस्ट'ने कायम ठेवली होती. अतीशय बारकाईने काम करण्याची जो ची पद्धत होती. कित्येकवेळा तेच पेंटिंग ते आपले समाधान होईपर्यंत परत परत करीत असत, जेणे करून चित्र निर्दोष व्हावे. यामुळे कित्येकदा दिलेली वेळ त्याना पाळता येत नसे. चित्रांसाठी ते लहान लहान स्केचेस करित असत व नंतर त्यावर चौरस आखून ते मोठे करीत. त्यांची काम करण्याची पद्धत देखील स्वतंत्र अशी होती. गोल अथवा चपट्या ब्रशने प्रथम ते पातळसा वाॅश मारून घेत. त्यातील गडद वा सावलीचा भाग ते पारदर्शक ठेवत. नंतर प्रकाशावरील भागावर जाड रंगलेपन करत तेव्हां चित्रामध्ये खोली जाणवत असे. काम करीत असताना त्यांच्या ब्रशचे फटकारे असे कांही फिरत की ज्यामधून त्यांच्या चित्रांमध्ये एक स्वतंत्रता निर्माण झाल्याची दिसून येई. आपल्या चित्रांमधून इतक्या सुंदररित्या ते वस्त्र प्रावरणे दाखवीत की त्यावरील शरीर सौष्ठवाप्रमाणे चुण्या दाखविणे हे देखील तितक्याच प्रभावीपणे ते आविष्कृत करीत. जोसेफ यांच्या कामावर त्यांचा तांत्रिक भागही तितकाच प्रभावीपणे दिसून येतो. सुंदर मांडणी असलेले संकल्पन करून त्यातून तो चांगल्यातून अती चांगले, अती सुंदर करून निर्मिती करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची भौमितिक रेखाटन सरळ रेषेतून वक्रता आणीत असे. विशेष करून वास्तववादी शैली असूनही त्यातून आणलेली सुलभता पाहणाऱ्याला मोहून टाकीत असे. अत्यंत बारकाईने केलेल्या त्यांच्या चित्रणातून जसा कपड्याचा पोत जाणवत असतो, तसेच बुटाच्या तळाचाही भाग असो किंवा गळ्यातील टाय वरील बारकाव्याचे केलेले चित्रण, अगदी कॅमेऱ्यालाही श्यक्य होणार नाही असे होते.
सॅटरडे इव्हीनिंग पोस्ट प्रमाणेच लिएण्डेकर यांना प्रॉक्टर ग्याम्बल, केलॉग, पियर्स, ॲरो आटोमोबाइल्स, याचसोबत आर्म फोर्सेस पर्यंत सर्वांची कामे त्यांच्याकडे चालून आली ती त्यांच्या अद्वितीय कला कौश्यल्यामुळे. त्यांच्या कामातून त्यांची अत्यंत संवेदनक्षम असे निरीक्षण शक्ती दिसून येते. यातूनच जोसेफने स्वतःची खास अशी चित्रशैली बनवली. यासोबत त्यांनी लहान मुलांच्या मासिकांसाठी केलेल्या चित्रातून जाणवते ती त्याच्यातील गमतीशीर आणि मुलांना भावणाऱ्या अश्या शैलीत केलेली बोधचित्रे. तसेच आई आणि मुलांमधील एक विशुद्ध असे प्रेम देखील त्यांनी चित्रित केले. शृंगारिक वातावरणामध्ये त्यांनी त्यामागील चोरटी लज्जा दाखवली. तीच तीव्रता त्यांनी एखाद्या खेळाडूच्या बाबतीत त्याची इच्छाशक्ती दाखवताना केली. लढाईची अनेक बोधचित्रे त्यांनी आविष्कृत केली. त्यातील त्यांचे सैनिकांचे निरीक्षण इतके बारकाईने केले होते की त्यांच्या गणवेषापासून त्यांच्या उभ्या राहण्याच्या, विशीष्ट पोझीशन घेण्याच्या क्रीया लक्षवेधी असत.
जोसेफ लिएण्डेकर यांचे चित्रकला व प्रकाशन संस्था यातील महत्वाचे योगदान म्हणजे, त्यांनी केलेल्या बोधचित्रांनी मुखपृष्ठांना लघु पोस्टरचा दर्जा मिळवून दिला. त्यांनी सजावट केलेली नियतकालिके स्टॅंडवर येतांक्षणीकच दर्शकांना आकर्षीत करीत असत. तात्काळ त्यांची विक्री होत असे. जे.सी.लिएण्डेकर यांचे अनेक भक्त निर्माण झाले. त्यांचा मागोवा घेऊ लागले. विशेष म्हणजे नॉर्मन रॉकवेल या जगप्रसिद्ध बोधचित्रकारानेही त्यांचा मागोवा घेतला होता. स्वतःला ते त्यांचा शिष्य म्हणवून घेऊ लागले. पण त्याचबरोबर नॉर्मन रॉकवेल यांनी लिएण्डेकर यांच्या शैलीचा प्रभाव आपल्या चित्रावर बिलकूल पडू दिला नाही. आणि ते दोघेही मैत्रीच्या नात्यांनी घट्ट बांधले गेले.
जोसेफने अमाप पैसे कमावले. तसे ते खर्चही केले. ते म्हणतच असत की, ‘गरजेपेक्षा जरा जास्तीच खर्च करावा, म्हणजे तुम्ही सतत कामामध्ये मग्न रहाता आणि मनापासून काम करता,' दोघेही लिएण्डेकर बंधू मोठ्या ऐषारामात रहात असत. ते 'ॲरो मॅन ' प्रमाणेच देखणे होते. उंचीने थोडेसे कमी असलेले हे दोघे बंधू रस्त्यावरून चालू लागले की, त्यांच्यामध्ये एक लष्करी शिस्त जाणवत असे. नंतर त्यांनी ग्रीनवीच शहरांत भव्य अश्या घरात स्थलांतर केले. शहराच्या मध्यवर्ती भागात आपला स्टूडीओ उभा केला. मात्र फ्रॅंकने घरीच काम करण्याचे ठरवीले. १९१४ मध्ये न्यू रोचेल मध्ये जोसेफने स्वतःचे आलीशान घर बांधले. हे घर फ्रान्समधील एखाद्या महालाची आठवण करून देणारे होते. चौदा खोल्यांच्या या घराच्या आसपास कैक एकर जमीन होती. अश्या प्रकारे मोठ्या ऐषारामात या बंधूनी आपले आयूष्य घालविले. एकमेकांवर विश्वास ठेवून वागणाऱ्या या बंधूंचा मित्रपरिवारही सारखाच होता. पेंटींग मधेही दोघांचे साम्य होते. मात्र फ्रॅंक हा लहानपणापासून जो च्या सावलीत वाढला असल्यामूळे त्याच्या कामात जो इतकी सफाई नव्हती. पेंटींग करतांना हे लिएण्डेकर बंधू रंग व तेल यात एका माध्यमाचे मिश्रण करीत ज्यामूळे त्यांची चित्रे टवटवीत वाटत. मात्र त्या माध्यमाचे त्यांनी गुपीत ठेवले होते. केवळ दोघा बन्धुशिवाय ते कोणालाही माहीत नव्हते. कोणी चित्रकार त्याचा शोध लावेल या हेतूने ते आपली चित्रेही बाहेर प्रदर्शीत करत नसत. पण त्यांची चित्रे ही सर्वांनाच मोहीत करीत हे एक अबाधीत सत्य आहे.
जो च्या चित्रांमधील एका महीलेच्या प्रेमात पडून एक कॅनेडीअन इसम कॅनडातून तिची भेट घेण्यास थेट न्यूयॉर्कला जोच्या स्टुडीओत पोचला. त्याचे नांव होते चार्ल्स बीच. चार्ल्स हा अतीशय देखणा, सुदृढ शरीरयष्टीचा एखादा ॲथलेट शोभावा असाच होता. एखाद्यावर त्याची छाप चटकन पडत असे. जो ने त्याचा प्रथम 'ॲरो मॅन' साठी वापर केला. पुढे त्याने जो च्या जीवनात असा प्रवेश केला की त्याच्या खुशामतीमुळे जो संपूर्ण त्याच्या आहारी गेला. त्याच्या दैनंदिन जीवनांतील तो एक सहकारी झाला. परीणामी फ्रॅंक अन जो मधील दरी वाढत गेली. जो ने अखेरपर्यंत आपल्या कुटुंबियांना सहाय्य केले होते. त्यावरही बीचच्या आगमनाचा परीणाम झाला. अखेर या गोष्टी सहन न होऊन फ्रॅंक घराबाहेर पडला. पुढच्याच वर्षी फ्रॅंक मरण पावला. जो ला तो फार मोठा धक्का होता. त्याच्या निधनाने जो एकदम खचला. पुढे तो घरीच काम करू लागला. पण अजून त्याच्या वाट्याला दुर्दैवाचे तडाखे यायचे होते. १९४३ मध्ये 'पोस्ट'चे संपादक बदलले. नवीन संपादकांना वाटले की, जोसेफची कला 'पोस्ट'च्या जुन्या जमान्याशी बांधीलकी आहे. त्यांना आताच्या काळाप्रमाणे नवीन कांही हवे होते. त्यामुळे 'पोस्ट'शी असलेले जे.सी.लिएण्डेकर यांचे चाळीस वर्षांचे संबंध संपूष्टात आले. हळूहळू प्रसिद्धीपासून जो दूर जाऊ लागले. आर्थीक चणचण भासू लागली. अमाप पैसा मिळवला असला तरी त्यांनी तो साठवला मात्र नव्हता. कलेच्या विश्वात वावरणाऱ्या जे.सी.लिएण्डेकर मनाने पूर्ण खचले होते. आणि २५ जुलै १९५१ रोजी बीच सोबत बागेत बसले असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन जो चे निधन झाले.
विपूल अशी चित्रसंपदा मागे ठेवणाऱ्या 'ॲरो मॅन' व 'सॅटरडे इव्हीनिंग पोस्ट'ची मुखपृष्ठे सजवणाऱ्या या कलावंताची स्वाक्षरीच इतकी कलात्मक होती की, त्यांना प्रसिद्धीला आणण्यास त्यांची चित्रेही पहाण्याची आवश्यकता नव्हती. केवळ त्यांच्या स्वाक्षरीवरच जे.सी.लिएण्डेकर प्रसीद्ध झाले असते. पुढे ‘सॅटरडे इव्हीनिंग पोस्ट’ ची मुखपृष्ठे त्यांना एकलव्याप्रमाणे गुरु मानणारे नॉर्मन रॉकवेल यांनी करण्यास आरंभ केला. जे.सी.लिएण्डेकर यांनी ‘सॅटरडे इव्हीनींग पोस्ट’ साठी एकूण ३२१ मुखपृष्ठे बनवीली. पुढे नॉर्मन रॉकवेल यांनी आपल्या गुरूचा मान राखण्यासाठी, त्यांचे रेकॉर्ड मोडले जाऊ नये या हेतूने ३२० म्हणजे जो ने केलेल्या मुखपृष्ठापेक्षा एक कमी करून गुरूला मानवंदना दिली!
प्रा. मं.गो.राजाध्यक्ष







Excellent!! मझा आला!
ReplyDeleteअरूण, धन्यवाद! तुझ्या प्रोत्साहनामुळे हुरूप वाढतो.
Delete