जाहीरातीत भारतीयत्व रुजवणारा सर्जनशील : पियूष पांडे
भारतीय जाहीरात क्षेत्रांत कांही दिग्गजांनी तिचा चेहरा मोहरा बदलण्याचे कार्य केले. ते होते भाई पत्की, अरुण कोलटकर, र.कृ. जोशी असे दिग्गज. जाहीरात क्षेत्रांत काम करणारे एक तर अमेरीकेसारख्या देशातून शिक्षण घेतलेले असत. त्यांच्यावर साहजीकच तेथील पगडा असे. सुंदर चेहऱ्याची मॉडेल्स, चकचकीत कपडे, रुबाबदारपणा, विशेषतः परदेशी जाहीरातींवर आधारीत या जाहीराती संकल्पीत केल्या जात. पण एका व्यक्तीने या जाहीरात क्षेत्रांत प्रवेश केला आणि या प्रकाराला छेद देण्याचा प्रयत्न केला. जाहीराती ह्या आपल्याला जवळच्या वाटाव्या, त्यातील लोक आपल्या आजूबाजूचे असावेत, त्यांची बोली ही आपलीच वाटावी इतकी घरगूती असावी या हेतूने त्याने जाहीराती संकल्पीत करण्यास आरंभ केला. आणि अल्पावधीतच त्यानं हे भारतीय जाहीरात क्षेत्र काबीज केले. आणि ही व्यक्ती म्हणजे 'ओ एन्ड एम' या जाहीरात संस्थेचे क्रिएटीव्ह डायरेक्टर श्री पियूष पांडे ! आरंभी पियूष पांडे यांनी ओ एन्ड एम मध्ये क्लायंट सर्विसींग पासून सुरुवात केली होती. पण अल्पावधीतच त्यांच्यातील सर्जनशीलता पाहून त्यांना क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून नेमले गेले.आणि सुरु झाला एक सर्जनशीलतेचा झंझावाती प्रवास.
मूळचे उत्तर प्रदेशातील हे पांडे घराणे पुढे वडीलांच्या नोकरीनिमित्ताने राजस्थान मध्ये स्थायीक झाले. सात बहीणी, पियूष व प्रसून हे दोघे भाऊ व आई वडील यांचे ११ जणांचे मोठे कुटूंब होते त्यांचे. मात्र घरातील एकूण एक निरनिराळ्या क्षेत्रांत पारंगत असल्याने कसलीही समस्या असली की त्यांतील कोणीना कोणी तिचे निरसन करीत असे. कोणी गायक, कोणी वादक, लेखक, कवी, अश्या सर्वगुण संपन्न अश्या सर्जनशील घरात जन्म झाल्याचा आनंद पियूष यांना नेहमीच होतो. म्हणून पीयूष आपल्या घराला 'गुगल' असे संबोधतात. जाहीरात क्षेत्रांत सर्वप्रथम पदार्पण करणारी त्यांची बहीण इला अरुण ही होती. लहान भाऊ प्रसून हा देखील या क्षेत्रात गाजत होता. फेविकॉल, फेविक्विक यांच्या फिल्म बनविण्यात प्रसून यांचा महत्वाचा वाटा होता. आज आपण जो कोणी आहे, त्याचे पन्नास टक्के श्रेय ते प्रसूनला देतात. याशिवाय त्यांच्या आयूष्यात आलेली त्यांची 'सिक्रेट क्रिएटिव्ह डायरेक्टर' व ओगिल्व्हीची उपाध्यक्ष असलेली नीता, जिच्याशी त्यांचा सहा महिन्यांत विवाह झाला. नंतर तिने नोकरी सोडून स्वतः एक क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून ती प्रस्थापीत झाली. व तेंव्हापासून पियुष यांच्या प्रत्येक कामावर तिचा अभिप्राय घेणे हे नित्याचे झाले. ती त्यांचे प्रेरणास्थान बनली. एक दिवस एका रोमँटिक क्षणी तिने पियुष यांचे गाल पकडून ' उगली उगली उश' म्हटले . आणि त्यातूनच पुढे पॉंड्स ची ती तब्बल दहा वर्षे चाललेली जाहीरात जन्माला आली.
पियूष यांच्या आयूष्यात क्रिकेट देखील तितकेच महत्वाचे ठरले. सत्तरीच्या दशकात क्रिकेटने त्यांच्यावर मोहीनी घातली होती. रणजी मध्ये ते खेळलेही आहेत. या क्रिकेटच्या टुर्नामेंटपायी त्यांनी संपूर्ण भारत उभा आडवा पायाखाली घातला. या प्रवासात त्यांना पाहायला, शिकायला, अनुभवायला मिळाली ती विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती. तिचा नाद. रंग,संगीत, वेगवेगळे खाद्य पदार्थ, आणि भाषा! व यात त्यांना अनेक शहरे, खेडी, गांवे यांचे दर्शन झाले. व भारतातील सौंदर्य आजमावता आले. या क्रिकेटचा उपयोग त्यांनी जाहीरातींमध्येही केला. आठवते ना ती कॅडबरी डेअरी मिल्कची फिल्म? चॉकलेट चघळत आपल्या मित्राची बॅटींग पाहत असलेली मुलगी, आता मित्राचा कॅच जाणार या हेतूने डोळे मिटून घेते. पण त्याचा सिक्सर जाऊन तो म्याच जिंकतो तेव्हां ती झटकन सगळी बंधने तोडून बेहोषपणे नाचत मैदानावर जाऊन त्याला आंनदाने मीठी मारते. पुढे कॅडबरीच्या अनेक जाहीरात मोहीमा त्यांच्याकडून झाल्या. अमीताभ बच्चनची 'पप्पू पास हो गया' ही जाहीरात कोणीच विसरू शकत नाही. एके काळी चॉकलेट हे लहान मुलांसाठीच असते, या कल्पनेला छेद देऊन त्याच कॅडबरीला मिठाईचा दर्जा हा पियूषनी दिला. 'कुछ मिठा हो जाय' ही त्याची टॅगलाईन ठरली. येथून पुढे कॅडबरी चॉकलेट हे केवळ मुलांसाठी न रहाता ते लहान थोर आबालवृद्धांसाठी एक मिठाईच्या रूपात येऊन त्याच्यातून 'थोडीसी पेटपूजा' होवू लागली.
१९८८ साली लोकसेवा संचार परिषदेने राष्ट्रीय एकात्मतेवर एक फिल्म बनविण्याचे काम 'ओ एन्ड एम'चे क्रिएटीव्ह डायरेक्टर व पियूष यांचे वरीष्ठ श्री सुरेश मलीक यांना दिले. त्यासाठी मलीक यांनी पियूष यांना काम करण्यास सांगीतले. भारत हा विविधतेने नटलेला, वैभवशाली वारसा असलेला देश आहे. अनेक वेष, अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म अशी त्याची ओळख आहे. व या सर्वांना प्रेमाने बांधून ठेवणारी गोष्ट आहे ती म्हणजे 'राष्ट्रीय एकात्मता,' आणि हा सूर जपण्यासाठी हवी आहे ती शांती. ज्यामूळे आपल्या भारताचे एका महान राष्ट्रांत रूपांतर करू शकतो. आणि यावर पियूष पांडेनी राष्ट्रभक्ती दर्शवणाऱ्या त्या अमर ओळी लिहील्या,
'मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा,
सुर की नदीया हर दिशा मे, बहते सागर से मिले
बादलोंका रूप लेकर, बरसे हलके हलके
मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा'
भारताच्या प्रत्येक प्रांतातून, त्यांच्या बोलीतून हे गीत गायले गेले. पंडीत भीमसेन जोशी पासून ते लता मंगेशकर यांच्यापर्यंत गायल्या जाणाऱ्या या गीतांमध्ये सामान्य माणसापासून ते सेलेब्रिटी, गायक, संगीतकार, खेळाडू, अभीनेते या सर्वांनाच एकत्र गुंफलेल्या या अमर गीताला संगीत दिले ते अशोक पत्की यांनी व लुईस ब्यांक यांनी ते सर्वोच्च बिंदूवर नेवून पोचवले. आज जणू ते एक प्रती राष्ट्र्गीतच बनले आहे. यातील बोल आपल्या मनांत उद्याच्या आशा पल्लवीत करतात. हे गीत १५ ऑगस्ट १९८८ या स्वातंत्र्य दिनादिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या भाषणा पाठोपाठ दूरदर्शनवर प्रक्षेपीत करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मतेचा एक नवा सूर त्यातून आळवला गेला.
कोणत्याही गोष्टीतून कांहीतरी शिकणे हे पियूष यांच्या जन्मजात स्वभावात आहे. त्त्यांच्या मनात एक लहान मूल लपून बसलेले आहे. लहानपणी घरी फर्नीचर बनवायला येणाऱ्या सुताराशी त्याचे काम पहात ते गप्पा मारीत असत. रस्त्याचा कडेला बसून चपला-बूट-दुरुस्ती करणारा चर्मकारही यातून सुटला नाही. तसेच सायकलचे पंक्चर काढणारा देखील! या लोकांची काम करण्याची पद्धत. त्यातील कौशल्य, काम नीट झाले पाहीजे ही तळमळ, त्यांना बरेच कांही शिकवून गेली. त्यांना आपले गुरु मानले. आणि हीच तत्वे त्यांनी आयुष्यभर आपल्या जाहीरात क्षेत्रांत वापरली. फेव्हिकॉलच्या जाहीरातींवर काम करायला सुरुवात केल्यावर त्या सगळ्या मंडळींशी त्यांना पुन्हां संवाद साधता आला. गरज आहे तेथे विनोदाचा वापर केला, तर आवश्यकता असेल तेथे भावनाशील झाले. विनोदाचा उत्तम परीपाक म्हणजे त्यांची फेव्हिकॉल- फेविक्विक- मेन्टोस- एमसील ही उत्पादने. वास्तवीक फेव्हिकॉल ह्या उत्पादनाला तसे कोणी हात लावायला तयार नसे. कारण त्यांच्या मते त्यात विशेष कांही करण्याजोगे नव्हते. पण पियूषजीनी त्याचा केवळ चेहरा मोहराच बदलला नाही, तर त्या उत्पादनाला आपल्या खास अश्या शैलीने उच्च पातळीवर नेवून ठेवले. यामध्ये अतिशयोक्ती अलंकाराचा योग्य वापर केला. आणि फेव्हिकॉलच्या विनोद निर्मीती करणाऱ्या एकेक जाहिरातींनी जन्म घेतला आणि त्याच सोबत ग्राहकांच्या हृदयाचा ठावही घेतला. यातली पहीली जाहीरात होती ती 'दम लगाके हैशा.' टग ऑफ वार दाखवणाऱ्या या फिल्ममधे राजकुमार हिराणी यांनी भूमिका केली होती. ‘फेवीकाॅलका जोड है, टुटेगा नही’ हा संदेश त्यात दिला होता. दुसऱ्या एका जाहीरातीत एक अंडी फोडणारा सुतार, जेव्हां बरेच ठोकून अंडे फुटत नाही म्हणून वर पाहतो तो त्याला दिसते की ती कोंबडी फेविकॉलच्या डब्यावरील दाणे खात आहे. तसेच राजस्थान मधील परंपरेला अनुसूरून एका गाडीमध्ये आत बाहेर असे असंख्य प्रवासी कोंबलेले दिसतात. व मागे फेव्हिकॉलचा बोर्ड असतो. त्यामुळे ते चिकटून बसलेले असतात. असा एकही प्रसंग नसेल जो त्यांनी फेवीकाॅल साठी वापरला नसेल. मग त्यात मिशीवाली आली, मल्लखांब आला. व हा सिलसीला चालूच राहीला.
त्याचबरोबर ‘फेविक्विक’ या उत्पादनाच्या जाहीरातीचीही दखल घ्यावी लागेल. एक सूशीक्षित असा गृहस्थ मासे पकडण्यासाठी गळ टाकून प्रतीक्षेत बसलेला असतो. एवढ्यात दुसरा एक अडाणी माणूस हातात एक काठी घेऊन येतो. त्याला फेविक्विकचे कांही थेम्ब लावतो आणि पाण्यात धरताक्षणीक त्याला मासे चिकटतात अन ते घेऊन हसत हसत हसत निघून जातोही! एमसीलची जाहीरात तर कोणीच विसरू शकणार नाही. बापाचे शेवटचे श्वास घेणं चालू असतं अन इकडे त्याचा मुलगा त्याच्या इच्छापत्रावर बापाकडून एकेक शून्य वाढवून घेत असतो. शेवटी मनाजोगती शून्यं पडल्यावर मुलगा संतुष्ट होतो व इकडे बाप शेवटचा श्वास घेतो. आनंदी झालेला मुलगा उठत असतानाच वरून एक पाण्याचा थेम्ब गळून नेमका सुरुवातीच्या आकड्यावर पडतो अन शिल्लक राहतात केवळ शून्ये. एमसील वापरले असते तर ही वेळ आली नसती. तसेच वाघा बॉर्डरवरील चेंज ऑफ गार्डस समारंभाच्या वेळी भारतीय व पाकिस्तानी सैनिक आपापले पाय काटकोनांत उंचावतात. नेमके त्यावेळी पाकीस्तानी सैनिकाच्या बुटाचा सोल सुटलेला असतो. बूट आणि त्या सैनिकाचे तोंड दोन्हीही उघडी होतात.आणि त्याचवेळी भारतीय सैनीक आपल्याजवळील फेविक्विक त्याला देऊन त्याची लाज सांभाळतो. कसे एखाद्या गंभीर प्रसंगाला विनोदाची झालर लावून ‘फेविक्विक’ सारख्या घरगूती उत्पादनाचे मूल्य वाढवीले जाते याचे हे उत्तम उदाहरण पियूष पांडेनी घालून दिले आहे. आणि यासोबत फेविक्विकची टॅगलाईन होती 'चुटकीमे चिपकाये'.
पियूष पांडेनी नुसत्या जाहीराती बनवल्या नाहीत, नुसत्या प्रसारीत केल्या नाहीत, तर लोकांना त्या पहायला लावल्या, वाचायला लावल्या, अनुभवायला लावल्या, इतकेच नव्हे तर त्या प्रमाणे कृतीही करायला लावली हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. पूर्वी केवळ ग्राहकांचे मानसशास्त्र आणि उत्पादनाचा विक्री बिंदू विचारात घेऊन जाहीराती बनवल्या जात. त्याचे संशोधन चाले ते उच्च स्तरावर. पण पियूषनी त्यांचे संशोधन केले ते त्यांच्या मुळाशी जाऊन. त्यांच्यात वावरून. त्यांची बोली बोलून. त्यांच्यात राहून, त्यांचे खाणे खाऊन. आणि यातूनच त्यांना जाणवली ती भारतातली विविधता. हेच खरे त्यांचे संशोधन होते. त्यांच्या जाहीराती बनू लागल्या त्या प्रत्येकाला आपणच त्यात आहोत, आपणासाठीच ही जाहीरात बनवली आहे असे वाटू लागले. जाहिरातीने केवळ उत्पादनाविषयी न सांगता त्यातून एक कथा निर्मिती करण्याची पद्धत पियूष पांडेनी जाहीरात क्षेत्रांत आणली. ग्राहकांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच वाटू लागल्या. आणि यातूनच निर्माण झाली 'फॉर्च्यून कुकींग ऑइल'ची आजवरची सर्वात मोठी जाहीरात फिल्म. एक दिवस पियूष याना प्रणव अदानी यांचा अहमदाबादहून फोन आला व त्यांनी तात्काळ त्यांना भेटायला बोलावले. ताज मध्ये मिटींग झाली. विषय होता फॉर्च्युन कुकींग ऑइल या ब्रॅन्डला नवजीवन देण्याचे. त्याने सुरुवातीलाच सांगून टाकले, 'सबको रुलादे यार, ऐसा कुछ बनावो जो ॲड ना लगे.' पुढे त्यांनी सांगीतले, 'बहोत सामुसे तल लीये, यार, अब ऐसा कुछ कर जो पहुँचे कहीं.' पियूषना हे एक आव्हानच होते. कागदावर कागद कल्पना उतरवू लागले. चर्चा होऊ लागल्या. किचन अथवा तळणे दाखविल्याशिवाय कुकींग ऑईलची जाहीरात कोणी पाहीलीच नव्हती. शेवटी एक कल्पना प्रणवला पटणारी आणि त्याच्या गरजा पुरवणारी बनली. यामध्ये तळण्याची दृश्ये नव्हती. किचनचा प्रसंग नव्हता. यातील कल्पना व आशय डोळ्यांत पाणी आणणारा नक्कीच होता. एक तरुण इस्पितळात बेडवर पडून आहे. उपचार चालू आहेत. खाणे घेत नाही. तेथे त्याची आजी रोज जेवणाचा डबा घेऊन चार मजले चढून येत असते. पण बाहेरील खाण्याला मनाई असल्याने नर्स त्याला नकार देते. आजी वारंवार सांगून पहाते की आपल्या हातची डाळ खाल्ल्यावर त्याची तब्येत सुधारेल. रोज येण्याचा नियम ती चुकवत नाही. शेवटी त्या नर्सला पटविण्यात ती यशस्वी होते आणि आपल्या हाताची डाळ त्याला भरवते. व तिच्या नातवात अचानक सुधारणा होते. आणि शेवटी ही फिल्म 'फॉरचून कुकींग ऑइल''च्या पॅकवर स्थिरावते. ही फिल्म करताना एक मोठे इस्पितळ हवे होते. पण भारतात असे रिकामे इस्पीतळ मिळणे श्यक्यच नव्हते. तेंव्हा बुढापेस्ट मध्ये असे रिकामे इस्पितळ असल्याचे समजल्यावर सर्व फिल्म तेथे चित्रीत करण्यात आली. ही फिल्म आजवरच्या जाहीरात फिल्ममधील मोठी फिल्म समजली जाते.
असेच रेल्वेच्या बाबतीतही घडले. रेल्वेबद्दल पीयूषना अत्यंत आत्मीयता आहे. कारण त्यांच्या आयुष्यात बराच रेल्वे प्रवास त्यांनी केला आहे. संपूर्ण देशाला जोडणारी ही भारतीय रेल देशाचा एक मानदंड ठरली आहे. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आधी काही आठवडे पियूषना रेल्वे बोर्डाकडून बोलावणे आले. रेल्वे या कॉमनवेल्थ गेमचे प्रायोजक असल्याने त्यांना या गेमच्या दरम्यान दाखविण्यास एक फिल्म तातडीने हवी होती. रेल्वेकडे तशी फिल्म उपलब्ध नव्हती. व तशी बनविण्यास तितका अवधीही नव्हता. आपण करू शकाल का? पियूषना त्यांनी विचारणा केली. अर्थातच! तुमच्यामुळेच तर माझी कारकीर्द घडली आहे. पियूषने भरवसा दिला. आणि कांही दिवसांतच ओगिल्व्हीने एक मनोरंजक फिल्म तयार केली. लहान मुले जशी तोंडाची झुकझूक गाडी करून खेळत असतात, तशीच एक प्रचंड अशी मानवी रेलगाडी करून ती शहरातील रस्त्यावरून धावते आहे अशी ती कल्पना होती. त्याला जोड दिली ती अशोककुमार यांच्या 'रेल गाडी, रेलगाडी, झुक झुक झुक झुक' या गाण्याची. याला घोषवाक्य होते, ' देश का मेल-भारतीय रेल.' ही फिल्म जेव्हां त्या समारोपात दाखवली गेली तेव्हां तेथील असंख्य प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवीत रेल्वेला अभिवादन केले.
पियूष पांडेंच्या बाबतीत पाहीले की त्यांनी एखादी कल्पना लढवली की ती सर्वमान्य होत असे. त्याची टॅगलाईन ही सर्वतोमुखी होत असे. मग ती कॅडबरीची ' कूछ मिठा हो जाय' अथवा ‘कुछ खास है हम सभी मे' ह्या ओळी असोत, किंवा टायटनसाठी वापरलेली मोझार्टची सिंफनी असो, आपणाला एका धुंद वातावरणांत घेऊन जातात. या संगीताच्या बाबतीत त्यांचे वरीष्ठ सुरेश मलीक ह्यांनी त्यांना कल्पना दिली होती की संगीत हे तुम्ही ग्राहकांवर लादू शकत नाही. विशेष करून उत्पादनाचे नांव त्या गाण्यात परत परत वापरू नये. याचा बोध घेऊनच पियूषनी संगीताचा वापर आपल्या जाहीरातीत मोठ्या कल्पकतेने केला. आणि त्यांचे स्वतःचेही संगीताचे ज्ञान त्याला पोषक असेच होते. अशीच एक खास अशी त्यांची जाहीरात मोहीम आठवते ती म्हणजे 'एशियन पेंट्स'ची जाहीरात मोहीम. 'हर घर चुपचापसे ये केहता है | क्या अंदर इसके कौन रहता है |’ एका सुंदर भावविश्वात घेऊन जाणारी कविता, त्यासोबत आपणाला त्या कल्पनेत गुंफणारी त्यामागील एकेक भावस्पर्शी कथा. भावनीक जाहिरातीचा एक उत्कट अनूभव! तशीच त्यांची ‘मेरावाला ब्ल्यू’ ही देखील एशीयन पेंट्सची जाहीरात गाजली. याचप्रमाणे त्यांनी मॅक्सटच ते ऑरेंज ते हच ते वोडाफोन या कंपनीच्या पग या कुत्र्यासोबत केलेल्या जाहीराती. छोटा मुलगा, त्याचा विश्वासू कुत्रा, तो जाईल तेथे त्याचा मागोवा घेत जात असतो. याचे घोषवाक्य होते, ‘Wherever you go, our network follows.’ या जाहीरातीला पार्श्वगीत होते ते पियूष यांनी लिहून त्यात एक चैतन्य निर्माण केले. हीच गोष्ट त्यानी ‘एस बी आय लाईफ’ साठी केलेल्या जाहीरातीत पहाण्यांत येते. एक वरीष्ठ नागरीक आपल्या पत्नीला वैलेंटाईन डे ला जेव्हां हिरा भेट देतो, तेव्हां पत्नी म्हणते, आता या वयात काय मी हिरा वापरू? तेव्हां पती सांगतो, अग, हिऱ्याला कुठे माहीत आहे तुझं वय? वृद्धपकाळातील एकाकी जीवनात कांही सुखद क्षण मिळवण्याची संधीच एसबीआय लाईफ त्यांना मिळवून देते. या जाहिरातीने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला. अशीच गोष्ट कॅन्सर सोसायटीसाठी केलेल्या एका जाहिरातीची. बस मधून जातांना शेजारी सिगरेट ओढत उभ्या असलेल्या एका तरुणाला बसलेला वृद्ध इसम स्वतः उभा राहून बसायला जागा देतो. पाठीमागून आवाज येतो, 'धूम्रपान करणाऱ्याविषयी सहानुभूती बाळगा. त्यांच्या आयुष्याचे अगदी थोडेच दिवस शिल्लक आहेत.' आपल्या भावना ढवळून काढील अशी ही घटना आहे. विचार करण्याजोगी. त्यामागील गांभीर्य जाणवणारी!
शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी केलेली भारतीय जनता पक्षाची जाहीरात मोहीम. तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे नांव पंतप्रधानपदाच्या पदासाठी जाहीर केले होते. आणि शेवटी हे काम ओगिल्व्हीकडे आले. मतदारांच्या भावनांचा सूक्ष्म विचार करणे या विचाराने पियुशनी आपला रोख त्यादिशेने वळविला. एका ओळीपर्यंत ते येऊन पोचले. ' अबकी बार, मोदी सरकार.' मतदारांच्या भावनांशी एकरूप होईल असा संदेश द्यायला हवा होता. अगदी दोहे वाटतील अश्या जाहीराती साध्या भाषेत करण्यात आल्या. ' बहूत हुई गुंडागर्दी, लूटमार; अबकी बार मोदी सरकार.' टीव्हीसाठी त्यांनी लोकांचेच म्हणणे वापरायचे ठरवीले. काळ्या पार्श्ववभूमीवर चित्रीत केलेली एक व्यक्ती, अगदी खऱ्या व्यक्तींना घेऊन त्यांनी या जाहीराती बनविल्या. खरी माणसे, खऱ्या कहाण्या, आणि खरे मुद्दे यांनी या जाहीराती मतदारांच्या मनामनात रुजल्या. सर्व भारतीय भाषांमधून त्या प्रसारीत झाल्या. आणि त्या सगळ्या बोली भाषेत होत्या. 'अबकी बार, मोदी सरकार’ हा तिचा पाया होता. आपण संकटात असतांना आपल्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवून 'काळजी करू नकोस. चांगले दिवस येणार आहेत' हे ज्या पद्धतीने म्हणतो, तसेच ही 'अच्छे दिन आनेवाले है' ह्या ओळीत देखील तोच विश्वास मिळत होता. मोदींच्या विजयात या जाहीरातींचा फार मोठा वाटा होता, यांत शंकाच नाही.
अमिताभ बच्चन सोबत पियूषनी बऱ्याच जाहीराती केल्या. त्या दोघांचा सूर खूप छान जमला. अमिताभची कॅडबरीची 'पप्पू पास हो गया' ही जाहीरात किंवा कॅडबरीमधील अळ्यांच्या बाबतीत जेव्हां अमिताभनी खूपगंभीर रित्या मुलांचा विश्वास आपण गमावता कामा नये या हेतूने केलेली विश्वासदर्शक जाहीरात या अमिताभनी खूपच अभ्यासपूर्ण रीतीने केल्या. गुजरात पर्यटनासाठी केलेल्या अमिताभ यांच्यासोबतच्या सर्वच जाहीराती खूपच गाजल्या. पोलीओ डोसच्याही जाहीराती अश्याच भावनीक होत्या. मुलांना पोलीओच्या दोन थेंबांचा डोस देण्याची विनंती करणारे अमीताभ त्यांत दिसत होते. मात्र एकदा पियूषनी त्यांना त्यांचा पूर्वीचा अँग्री यंग मॅन दाखवायचा ठरवला, तोही या पोलिओच्या डोससाठी. अमीताभ यांना प्रथम आच्छर्य वाटले. मी कसा काय ओरडणार लोकांवर? पण पियूषनी जाणवून दिले की त्यांच्या याच ॲंग्री यंग मॅनच्या भूमिकेवर लोकांनी प्रेम केले होते. आता तुम्ही जे त्या पालकांना रागावून सांगणार ते दरडावणे प्रेमापोटी, काळजीपोटी, एखादे वडील माणूस आपल्या मुलाबाळांवर काळजीपोटी ओरडते असे असेल. आणि अर्थातच ही जाहीरात देखील यशस्वी झाली.
पियूष पांडेनी जाहिरातीचे विश्व स्वतःच्या बळावर फिरविले. केवळ पुस्तकी शिक्षणाने आपणास सर्व बाबतीत पारंगत होता येत नाही, त्यासाठी हवा असतो समाजात वावरण्याचा अनूभव, हाच अनूभव तुम्हांला डिझाईन शिकवतो, व्यवस्थापन शिकवतो, मार्केटिंग शिकवतो. मुख्य म्हणजे ग्राहकाचे मानसशास्त्र शिकवतो. असे विविध गुरु त्यांना त्यांच्या आयूष्यात भेटले. लहानपणीचे छंद त्यांच्या कामी या क्षेत्रांत उपयोगी ठरले. अश्या या सर्जनशील माणसावर पारितोषिकांची अक्षरशः त्यांच्या कारकिर्दीत खैरात झाली. 'भारतीय जाहीरात विश्वातील सगळ्यात प्रभावी व्यक्तीमत्व' म्हणून इकॉनॉमिक टाइम्सने त्यांना सतत दहा वर्षे गौरवीले. २००० साली 'ॲड क्लब ऑफ मुंबई'ने फेविक्विकच्या त्यांच्या जहिरातीला शतकातली सर्वोत्कृष्ठ जाहीरात आणि कॅडबरीच्या त्यांच्या कामाला शतकातली सर्वश्रेष्ठ जाहीरात मोहीम असे गौरवीले. २००२ मध्ये मिडिया एशिया पुरस्कार सोहळ्यात 'क्रिएटिव्ह पर्सन ऑफ द इयर' असा सन्मान त्यांना मिळाला. 'कान्स'ला दुहेरी सुवर्णपदक आणि 'लंडन इंटरनॅशनल अवार्ड्स' मध्ये तिहेरी ग्रॅंड प्रिक्स मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ओगिल्व्हीने 'कान्स' मध्ये तब्बल पन्नास लायन पुरस्कार मिळवले आहेत. २००२ मध्ये द वन शो अवाॅर्डची 'सिल्वर पेन्सिल' मिळवणारे ते पहीले भारतीय ठरले. २०१६ मध्ये भारत सरकारने 'पदमश्री' हा मानाचा किताब देऊन त्यांच्या देदीपयमान सेवेचा गौरव केला. आणि भारतीय जाहीरात क्षेत्राला अभीमान वाटेल असा फ्रांस मधील कान्स महोत्सवात त्यांना व त्यांचे बंधू प्रसून यांना 'लायन ऑफ सेंट मार्क' हा सर्वोच पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्काराचे ते पहीले एशियन व्यक्तीत्व ठरले.
एका यशस्वी माणसाची ही यशोगाथा! ज्याने बालपणापासून अनुभवलेल्या, पाहीलेल्या अनेक घटना आपल्या मनाच्या कप्प्यात अलगद ठेवून दिल्या. त्यांचाच आधार घेऊन त्यांना जाहीरातीत आणल्या. त्यांच्या जाहीरातींमधून दिसते ती काव्यमय सुरावट, संगीतातील बाज, शब्दांची मौक्तिके, त्यावर चढवलेले कल्पनेचे इमले, आणि त्याला लावलेल्या सोनेरी पंखानी स्वच्छंदपणे केलेला गगनविहार. जो आपल्या थेट मनाशी जाऊन भिडतो, आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतो. कधी आपल्याला हसवतो, कधी भावनाशील बनवतो तर कधी डोळे अश्रूंनी भिजवतो. आरंभी १९८२ साली ओ अँड एम मध्ये अकाऊंट डायरेक्टर म्हणून सुरुवात केलेल्या पियूषजीनी अल्पावधीतच त्यांच्यातील सर्जनशीलतेमुळे क्रिएटिव्ह मध्ये शिरकाव केला. तेथून पुढे क्रिएटीव्ह डायरेक्टर, नंतर नॅशनल क्रिएटीव्ह डायरेक्टर, नंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर, पुढे ओगिल्व्ही वर्ल्डवाईड मध्ये समावेश व सध्या 'चेअरमन अँड चीफ क्रिएटीव्ह ऑफीसर ओगिल्व्ही साऊथ एशिया' या सर्वोच्च पदावर ते कार्यरत आहेत. आपले अनेक शिष्य त्यांनी घडवले. तेही आज कान्स मध्ये त्यांच्या शिरस्त्याप्रमांणे काळ्या कपड्यात जावून असंख्य पारीतोषिके पटकावतात. आजही ओगिल्व्ही या महाकाय जाहीरात एजन्सीची सर्जनशीलता तशीच अबाधीत आहे. तोच विश्वास जपला आहे. उत्पादकांना त्यांच्याकडूनच जाहीराती करून हव्या असतात. पियूषजींचे हे जाहीरात क्षेत्राला फार मोठे योगदान आहे.
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष














संपूर्ण माहिती असून देखील लेख वाचनीय झालाय
ReplyDelete