वृत्तपत्रीय झंजावात : रुसी करंजीया




आज वृत्तपत्रांची परिस्थिती फारशी आशादायक वाटत नाही. अनेक वृत्त वाहिन्यांचे आक्रमण हेही त्याला जबाबदार आहे. मग ती वृत्तपत्रे आपल्या अस्तित्व राखण्याकरीता इतरही अनेक उपक्रम सुरु करतात. आणि शेवटी त्यांची नाडी हातात असते ती त्यांच्या भांडवलदारी मालकांच्या हातात. त्यांच्या मतप्रणालीवरच संपादक वागत असतात. मग ते वृत्तपत्रातील असोत वा वृत्तवाहिन्यांतील. एखादा उत्पादक भरमसाठ जाहीराती देत असेल तर त्याच्या विरुद्ध कोणतीही बातमी छापायची नाही हा एक अलिखित संकेत असतो अश्या पत्रकारीतेचा.  मात्र आज आठवण येते ती पन्नास-साठच्या दशकांतील काही वृत्तपत्रांची. ज्यांनी वृत्तपत्रे एक धर्म म्हणून चालवली. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राबवली. कारण त्यामागील संपादक तसेच होते. प्रचंड ताकदीचे. अभ्यासाचे आणि मुख्य म्हणजे कोणाच्या खुशामतीवर न चालणारे. त्यावेळी नवशक्ती, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, मराठा, नवाकाळ, ही सारीच वृत्तपत्रे विविध मतप्रणालीच्या वाचकांमध्ये विभागली गेली होती. त्यातही या प्रभावी वृत्तपत्रामागे कणखर असा संपादक -मालक दिसत असे. यामध्ये लोकसत्ताचे रामनाथ गोएंका होते. लोकमान्यचे पां.वा. गाडगीळ होते, मराठाचे आचार्य अत्रे होते, लोकमित्रचे एस.एम.जोशी होते, नवशक्तीचे प्रभाकर पाध्ये व   नवाकाळचे निळकंठराव खाडीलकर होते. तसेच ब्लिट्झचे रुसी करंजीया होते. एकेक नावंच जणू हिमालयाप्रमाणे उत्तुंग अशी उंची गाठणारं. तेव्हां त्या वृत्तपत्र अथवा साप्ताहिकातील विचार हे त्यांचेच असत  याचीही जाणीव होत असे. आणि अशी दोन वृत्तपत्रे त्या काळात आम्ही पाहीली ती म्हणजे इंग्रजीतील आर.के. करंजीयांचा 'ब्लिट्झ' व मराठीतील आचार्य अत्रे यांचा 'मराठा' ही होत! तो काळ आमचा महाविद्यालयीन काळ होता. अन प्रत्येकजण वृत्तपत्र वाचन करीत असे. अश्या वेळी सर्व सामान्य जनता, विद्यार्थी वर्ग, कामगार वारंग हा 'मराठा'च्या प्रेमात पडलेला दिसे, तर इंग्रजी वृत्तपत्रे वाचणारा, सनसनाटी बातम्यांची आवड असलेल्या वाचक वर्गाच्या हातात 'ब्लिट्झ' दिसत असे.

कॉलेज जीवनापासूनच करंजीयाना लिखाणाची आवड होती. १९३० साली करंजीयाना टाइम्स ऑफ इंडियाचे सह संपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. १५ सप्टेंबर १९१२ रोजी जन्मलेल्या करंजीयांचे नांव होते रुस्तम खरशेटजी करंजीया व त्यांचे प्रचलीत नांव हे आर. के. उर्फ रुसी करंजीया होते. बहुतेक त्यांना रुसी करंजीया या नांवानेच संबोधीत. त्याकाळात त्यांना उच्च दर्जाच्या मुत्सद्दी व राजकारण्यांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली. ज्या मध्ये फिड्ल कॅस्ट्रो, झोऊ इनिएल या कम्युनीस्ट चीनच्या तिसऱ्या चेअरमन यांचा समावेश होता. 'ब्लिट्झ' या साप्ताहिकाची कल्पना ते व त्यांचे मित्र सुधींद्र कुलकर्णी एकदा चहाचे घोट घेत बसले असताना  त्यांना सुचली. आय आय टी मधून शिक्षण घेतलेले कुलकर्णी त्या काळात कम्युनीस्ट पक्षाचे सभासद होते. ब्लिट्झ सुरु झाल्यानंतर सुधींद्र कुलकर्णी त्याचे कार्यकारी संपादक म्हणून काम पहात होते. आणि करंजीया हे भारतातील कम्युनिस्ट चळवळीला साथ देणारे होते. १ फेब्रुवारी १९४१ साली 'ब्लिट्झ' हे करंजियांचे साप्ताहीक रीतसर सुरु झाले, आणि आरंभालाच त्याने विक्रीचा उच्चांक गाठला. मूलतः ब्लिट्झ या शब्दाचा अर्थच होता तो, लष्कराने केलेला भीषण असा बॉम्ब वर्षावाचा हल्ला. आणि 'ब्लिट्झ' तो शब्दरूपाने करून सार्थ करू लागला. भल्या भल्यांची  कुलंगडी काढणारे ते एक वृत्तपत्र बनले. करंजीया हे कम्यूनिस्ट विचारसरणीचे असल्याने त्यांचे ब्लिट्झ हे नेहमीच सोव्हिएत रशीयाच्या बाजूला झुकलेले असे. त्यामुळे मोरारजी देसाई व स.का. पाटील या अमेरिका धार्जीण्या काँग्रेस नेत्यांना त्यांनी नेहमींच लक्ष्य केले. काँग्रेस पक्षावर ते सतत कठोर टीका करीत असत. तरीही त्यांचे पंडीत नेहरू, इंदीरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी स्नेहाचे संबंध होते. वृत्त देतांना ते केवळ बातमी या स्वरूपात देत नसत, तर त्यामागे असत त्या सामान्य लोकांच्या वेदना, न्यायाच्या अपेक्षेत असलेले अन्यायग्रस्त लोक. करंजीयांची लेखणी नेहमीच अन्यायाविरुद्ध लढली. मग ते भारत-चीनच्या सीमेवर लढणारा जवान असो, वा मुंबईतील गिरणी कामगार. १९४५ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या 'आझाद हिंद सेने'ची छायाचित्रे त्यांनी छापली व ते प्रसिद्धीच्या झोतात आले. ऐतिहासीक 'चले जाव' चळवळीच्या वेळी करंजीयांनी पं. नेहरूंना जेलमधून सोडण्याविषयी वृत्तपत्रांतून मोहीम उभारली, तेव्हां ब्रिटिश सरकारने त्यांना तीन हजार रुपयांचा दंडही केला. याच करंजीयांनी पुण्याच्या ब्रिटिश हॉस्पिटलमधील भारतीय सैनिकांना मदत करणे, औषधोपचार करणे व त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी निधी उभारून एक लाख पंचवीस हजार रुपयांची मदतही केली.


मुंबईत त्यावेळी सर्वच कामगार पुढाऱ्यावर डाव्यांचे वर्चस्व होते. सर्व कामगार वर्ग जॉर्ज फर्नांडिस व भाई डांगे यांच्या नेतृत्वाखाली लढत होता. मुंबईच्या जडण घडणीत याच कामगार-मजूर वर्गाचा फार मोठा सक्रीय सहभाग होता. करंजीयाही डाव्या विचारसरणीचे असल्याने त्यांचे व कामगार नेत्यांचे संबंधही चांगले होते. पंडीत नेहरूंच्या कारकीर्दीत त्यांचे जावई  व इंदीरा गांधींचे पती फिरोज गांधी यांनी जेव्हां 'मुंदडा प्रकरण' हे मोठे स्कॅंडल बाहेर काढले, तेव्हां करंजीयांची त्यांना मोठी मदत होती.  मात्र त्यांच्या वृत्तपत्रीय कारकिर्दीतील एक महत्वाची घटना म्हणून ' नानावटी खून खटल्या'कडे पहावे लागेल. ब्लिट्झ ने ज्या अनेक घटना वाचकांना दिल्या, त्यापैकी २७ एप्रील १९५९ रोजी घडलेली ही एक महत्वाची घटना होती. आपली पत्नी सिल्व्हीया हीचे प्रेमसंबंध प्रेम आहूजा या सिंधी युवकाशी असल्याचे पत्नीने कबूल करतांच तिचे पती कमांडर कावस माणेकशा नानावटी या पारशी नौदल अधिकाऱ्याने कफ परेड मधील आपल्या निवासस्थानामध्ये दुपारचे जेवण घेतल्यानंतर पत्नी, दोन मुले, व शेजाऱ्यांचा मुलगा असे सर्वांना त्यांनी 'मेट्रो' चित्रपटगृहांत 'टॉम थम्ब' हा चित्रपट पहाण्यास सोडले. व तेथून 'म्हैसूर' या नौदल जहाजांवर जाऊन त्यानी आपले रिव्हॉल्व्हर घेतले. तेथून तडक नानावटींनी पेडर रोडवरील 'युनिव्हर्सल मोटर' येथे जावून प्रेम आहूजा या मोटर डिलरची चौकशी केली. पण जेवणाला घरी गेलेले आहूजा अद्याप परतले नाहीत असे कळतांच नानावटीनी मलबारहील वरील 'जीवन ज्योती' इमारतीमधील प्रेम आहूजाच्या फ्ल्याट मध्ये प्रवेश केला. तेथे दोघांची वादावादी झाली, अन गोळ्यांचे तीन राऊंड झाडले गेले. प्रेम आहूजा रक्ताच्या थारोळ्यात आडवे झाले.


नानावटी स्वतःच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे हजर झाले. आपले रिव्हॉल्वर त्यांनी टेबलवर ठेवले. स्वतःचा गुन्हा कबूल केला. पुढे त्यांना शिक्षाही झाली. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यात आला. त्यात त्यांची सुटका झाली व पुढे ते कॅनडाला स्थलांतरीत झाले. मात्र या खटल्यात करंजीयांनी नानावटींची बाजू उचलून धरली. त्यांनी केलेली देशसेवा ही विचारात घ्यावी असे प्रतिपादन ब्लिट्झने केले.  ‘थ्री शॉट्स दॅट शुक द नेशन' या मथळ्याखाली त्यांनी हे वृत्त दिले व जगाचे लक्ष या खटल्याकडे वेधले. मध्यंतरीच्या काळात ब्लिट्झला शह देण्यासाठी काँग्रेस धार्जीणे डी. एफ. कराका यांनी 'करंट' नांवाचे साप्ताहीक सुरु केले. पण ब्लिट्झ पुढे ते निष्प्रभ ठरले. ब्लिट्झची सर त्याला आली नाही. अश्या या ब्लिट्झला १९६६ साली मोठा झटका बसला तो शिवसेनेकडून.

मुंबईतील दक्षीणभारतीयाविरोधात  मराठी माणसांचे जे आंदोलन शिवसेनेने सुरू केले,  त्यावेळी ब्लिट्झने व अत्र्यांच्या मराठाने शिवसेना विरोधी भूमिका घेतली. ब्लिट्झच्या प्रत्येक अंकातून शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, आणि शिवसैनिकांवर तोंडसुख घेतले जाऊ लागले. सेनेच्या बातम्या देताना ब्लिट्झकडून  ' एस एस गुन्स ' असे संबोधण्यात येऊ लागले. यावर बाळासाहेब ठाकरे यांनी ब्लिट्झवर एक प्रचंड मोर्चा नेला व येथेच ब्लिट्झ नमला. कम्युनिस्टांना नामशेष करणाऱ्यांचे काय झाले ते ते हिटलर-मुसोलिनीच्या थडग्यांना विचारा, असे जेव्हां त्यांनी बाळासाहेबांना सांगितले, तेव्हां बाळासाहेबांनी त्यावर एक मोठे मार्मिक व्यंगचित्र काढले. त्यामध्ये थडग्यातून हिटलर व मुसोलिनी दोघेही बाहेर आलेत व बाळासाहेबांना म्हणताहेत 'अरे वा! जे आम्हांला जमले नाही ते तू करून दाखवलेस.' आणि त्याचे शीर्षक होते, तुम्हीच उकरा ती थडगी म्हणजे कळेल. पण पुढे जेव्हां त्यांच्या 'द डेली' या साप्ताहीकावर शासनाची वक्रदृष्टी होऊन त्यांना दंड थोटावला तेव्हां याच
बाळासाहेबांनी त्यांची बाजू उचलून धरली व त्यावरही व्यंगचित्र काढले.

करंजीया हे धाडशी, स्पष्टवक्ते, आणि निर्भयी असे पत्रकार होते. ब्लिट्झ मध्ये लिहिण्याची त्यांची स्वतंत्र अशी शैली होती. ते उत्कृष्ठ लेखक होतेच, शिवाय त्यांना विनोदाचेही अंग होते. त्यांचे बोलणे तर त्याहून सुंदर असायचे.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी आर.के.लक्ष्मण, के. अब्बास, तिस्ता सेटलवाड यांना पत्रकारीतेत प्रथम संधी दिली. के. अब्बास तर सुमारे चाळीस वर्षे ब्लिट्झच्या शेवटच्या पानावर त्यांचे सदर लिहीत असत. पुढे त्यांनी ब्लिट्झच्या हिंदी, मराठी, व ऊर्दू आवृत्या सुरु केल्या. जोडीला त्यांची कन्या रिटा हिने 'सिने ब्लिट्झ' हे चित्रपटाला वाहीलेले साप्ताहिकं सुरु केले, तेंही खूप प्रसीद्ध झाले. असे हे करंजीया एप्रील फुलच्या विलक्षण बातम्या देण्यातही तितकेच प्रसीद्ध होते. व एकच खळबळ माजवून देत. १९७८ च्या सुमारास अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. व रामनाथ गोएंका व त्यांची वृत्तपत्रे इंडीयन एक्सप्रेस, लोकसत्ता यासहीत त्यांनी अंतुलेंच्या सिमेंट प्रकरणाचा पिच्छा पुरवला होता. अश्या वेळी करंजीयांनी १ एप्रिलला एक सनसनाटी वृत्त देऊन एकच खळबळ माजवली. आणि ते वृत्त होते, इंडीयन एक्सप्रेस वृत्तपत्र अंतुले खरेदी करणार! आणि विशेष म्हणजे अंतुले हे गोएंकाचे शत्रू होते. त्या वृत्तावरून रामनाथजी इतके खवळले की त्यांनी करंजियांना कोर्टात खेचण्याची धमकी दिली. पण पुढे हे प्रकरण मावळले.

पुढे ब्लिट्झनंतर त्यांनी डेली नावाचे साप्ताहीक सुरु केले. त्याची टॅगलाईनच होती 'बुलडॉग ऑफ दी न्यूजपेपर' व सोबत त्यावर लोगोसोबत बुलडॉग दाखवण्यात येत असे. मात्र तो कालावधी म्हणजे रुसी करंजीया व आचार्य अत्रे यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर गाजविला.  अन्यायावर सतत घाव घातले. भ्रष्ट लोकांची बिंगे बाहेर काढली. श्रमीक, कामगार, मजूरांच्या साहाय्यास ते सतत उभे होते. त्याकाळात एकच घटना वारंवार घोटणारे ना मिडीया चॅनल होते, ना इंटरनेटची चेन होती. पण तरीही या पत्रयोध्याने लेखणीचे घणाघाती घाव घालून भ्रष्टाचाराची लक्तरे बाहेर काढली. पण अश्या देदीपयमान कामगिरी बजावणाऱ्या या सव्यसाची पत्रकाराची त्यांच्या हयातीनंतर कोणीही दखल घेतली नाही. त्यांच्या हयातीतच ते विस्मृतीत गेले. अश्या या पत्रकारीतेतील योध्याचे निधन २००८ साली मरीन ड्राइव्ह वरील त्यांच्या रहात्या निवासस्थानी वयाच्या ९५ व्या वर्षी झाले. आणि काय योगायोग असावा? त्यांनी आपले 'ब्लिट्झ' सुरु केले ते १ फेब्रुवारी रोजी आणि त्यांनी या जगाचा निरोपही घेतला तो १ फेब्रुवारीलाच. पण त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे अंत्यविधी पारशी पद्धतीने न करता चंदनवाडीत करण्यात आले. त्यावेळी मुंबई देखील कांही काळ स्तब्ध झाली असेल!

-मं.गो.राजाध्यक्ष

Comments

  1. राजा,
    अलीकडच्या नवीन पिढीस 'अशा हि बेडर व्यक्तीं' झाल्या' ह्याचा उत्तम मनोरंजक माहिती
    लेख देऊन सज्ञान करण्याचा तुझा उपक्रम कौतुकास्पद,

    ReplyDelete
    Replies
    1. अरुण, खरोखरीच त्या आपल्या काळात असे अनेक बलदंड लोक वावरत होते. सामान्य माणसापर्यंत ते पोचत होते. मग ते जॉर्ज फर्नांडिस असोत, डांगे असोत, अत्रे, बाळासाहेब ठाकरे, किंवा ग वा बेहरे असोत, हे सर्व एका ध्येयाने झपाटलेली माणसं होती. त्यांच्या आठवणी मनातून कधीच पुसल्या जाणार नाहीत. आमचे भाग्य, त्या काळात आम्ही जन्माला अली. आजच्या पिढीला या केवळ दंतकथा वाटतील.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :