प्रभातचा ' संत तुकाराम '
कांही वर्षांपूर्वी 'श्वास' या मराठी चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले, आणि प्रत्येक मराठी माणसाचे मन अभिमानाने फुलून निघाले. पाठोपाठच 'श्वास'ला ऑस्करच्या परदेशी चित्रपटाच्या विभागातील पारितोषिकासाठी भारत सरकारकडून शिफारस केली गेल्यानंतर साऱ्या भारतीयांचे लक्ष 'श्वास' कडे लागून राहीले. अन मग सुरु झाला 'श्वास' साठी आर्थीक मदतीचा लोंढा. यामध्ये शासनासहीत विविध संस्था, व्यक्ती अश्या साऱ्यांचाच समावेश होता. या वेळी पदयात्राही सुरु होत्या. अनेकजण यात पैसे जमवू लागले. त्यामध्ये कांही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी निर्मात्यांनी अश्या पदयात्रा काढून पैसे जमवू नयेत अशी विनंती केली. पण ऑस्करला जाऊनही पुढे या चित्रपटाला नामांकन यादीतही संधी मिळाली नाही. भारताच्या वाट्याला ऑस्कर येण्याचे भाग्य लाभले नाही. वास्तविक आजच्या काळात चित्रपट हे प्रभावी माध्यम तंत्रज्ञानामध्ये एवढे पुढे गेले आहे की, दिग्दर्शनासोबतच छायाचित्रण, संकलन, स्पेशल इफेक्ट्स, प्रकाश योजना या सर्वच बाबीवर आघाडीवर पोचलेले आहे. तेथे स्पर्धात्मक परिस्थितील तंत्रज्ञानात आपल्याला त्या तोडीचेच चित्रपट काढले तरच ऑस्करची अपेक्षा ठेवणे रास्त होईल. या बाबतीत इराणी चित्रपट नेहमीच आघाडीवर असतात.
अश्या वेळी आठवणीत येतो तो भारतीय चित्रपटसृष्टीतील उच्चांक गाठणारा सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी प्रदर्शीत झालेला प्रभात फिल्म कंपनीचा 'संत तुकाराम' हा मराठी चित्रपट! बाबूराव पेंटर यांच्या 'महाराष्ट्र'फिल्म कंपनी'तून बाहेर पडून व्ही.शांताराम, व्ही.जी.दामले, के.आर. धायबर, एस.फत्तेलाल, आणि एस.बी. कुलकर्णी यांनी 'प्रभात फिल्म कंपनी' कोल्हापुरात स्थापन केली. व १९३३ साली तिचे पुण्यात स्थलांतर झाले. १९३२ मध्ये 'अयोध्येचा राजा' हा पहीला चित्रपट प्रभातने काढला होता. बोलपटांच्या आरंभीच्या काळात पौराणिक चित्रपटावर जास्ती भर होता. पण इतर चाकोरीतील पौराणीक चित्रपटाऐवजी एक वेगळी कथा घेण्याचे प्रभातने ठरवले. त्यात चमत्कार असले तरी ते वास्तवाशी एकरूप होणारे असतील. आणि अश्यासाठी एकच विषय शांतारामबापूंच्या नजरेसमोर आला, आणि तो होता 'संत तुकाराम!' स्वबळावर मानवरूप धारण करून अवतरलेल्या या चैतन्यावर आधारीत पटकथा लिहिण्याची जबाबदारी स्वीकारली शिवरामपंत वाशीकर यांनी. दिग्दर्शन करण्याचे ठरले विष्णूपंत गोविंद दामले आणि शेख फत्तेलाल या जोडीने. केशवराव भोळे यांचे यांचे सुमधूर संगीत आणि शांताराम आठवले यांची गीते. आजच्या काळातही टवटवीत वाटावे असे व्ही.अवधूत यांचे छायाचित्रण. एकूण हा सर्वच माणिकांचन योग्य जुळून आला होता. आता मुख्य भूमिकेसाठी कोण असावे याचा विचार सुरु झाला. तेव्हां त्या काळातले किर्तनकार श्री विष्णूपंत पागनीस यांचे नांव पुढे आले. मात्र याबद्दल दामले-फत्तेलाल थोडे साशंकच होते. कारण विष्णूपंत ह्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका निभावल्या होत्या. कोल्हापूर येथे महाराष्ट्र फिल्म कंपनीत त्यांनी कामेही केली होती. स्त्री पार्टी नट असल्याने स्वाभाविकच त्यांच्या हालचाली बायकी थाटाच्या होत असत. पण पुढे त्यांची निवड ही योग्यच होती हे त्या दोघांनाही मान्य करावे लागले.
चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी विष्णूपंत देहू येथे गेले व त्यांनी तुकाराम महाराजांच्या समाधीवर मस्तक टेकून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या जोडीला त्यांची पत्नी जिजाई उर्फ आवलीची भूमिका करणाऱ्या होत्या गौरी. गौरी या मुळच्या अभिनेत्री नव्हत्या. कंपनीतील एक कामगार. अधूनमधून त्यांना एक्सट्राचे काम मिळत असे. सालोमालोच्या या खलपुरुषाच्या भूमिकेसाठी निवडले गेले काका भागवत. तुकारामाच्या भावुक आणि सोशिक स्वभावाचे व्यक्तीमत्व पागनिसांनी अत्यंत योग्यरीत्या निभावले. संत तुकारामांच्या अभांगामध्ये चपखल बसतील असे अभंग शांताराम आठवले यांनी लिहीले होते.
'आणीक दुसरे मज नाही आता' या अभंगाने संत तुकाराम बोलपट सुरु होतो, व विष्णूपंत पागनीस हे संत तुकाराम म्हणून प्रत्यक्ष पडद्यावर अवतीर्ण होतात. संत तुकाराम कसे होते याचे प्रत्यक्ष दर्शनच त्यांच्या रूपाने प्रेक्षकांना होते. हा अभिनय आहे याची पुसटशी शंकाही कोणाला येत नाही. आणि संपूर्ण थेटर हे भक्तीरसाने भारून निघते. एकेक भजनागणिक प्रेक्षक तल्लीन होऊन भक्तीरसात न्हावून निघतात. विष्णुपंतांनी तुकाराम महाराज साकारले ते त्या व्यक्तीरेखेशी पूर्णतः समरस होऊन. त्यांच्या चेहऱ्यावरील सात्वीक भाव, त्यांचा धीरगंभीर असे अंतःकरणापासून उमटणारे त्यांचे संवाद, त्यातून उमटणारे त्यांचे पडसाद या सर्वच गोष्टी चित्रपटाला पोषक ठरल्या आहेत. आणि त्यांचा हा भावगंभीर आवाज हा वातावरण निर्मितीला अतीशय पोषक ठरला आहे. शेत राखणी करतांना मचाणावर बसून हातामध्ये चिपळ्या घेऊन 'सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती' हा अभंग साध्या सरळ बोलीत तुकाराम महाराज म्हणू लागतात, तेव्हां सर्व शेतकरी त्यांच्या सोबत भजनात रमून जातात. केशवराव भोळ्यांच्या संगीताची ही कमाल आहे. तुकारामांना साथ देणाऱ्या 'जिजाई उर्फ आवली'ची भूमिका करणाऱ्या गौरी या प्रभात फिल्म कंपनीत एक दुय्य्म काम करणाऱ्या कर्मचारी आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण होते, इतका सहज सुलभ अभिनय त्यांनी केला आहे. तिच्या माहेरची मंगळाई ही म्हैस तिच्या कौतुकाची असते. तिला आंघोळ घालून, खायला प्यायला देऊन तिची सरबराई त्या उत्तम रीतीने साकारतात. पांडूरंगाने आपल्या नवऱ्याला आपल्या भजनी लावल्यामुळे ती सतत त्याला काळ्या म्हणून त्याची संभावना करत असते. पण आपल्या साध्याभोळ्या सरळ स्वभावी नवऱ्याला कोणी बोलले तर चवताळून जाणारी, मुलांची काळजी घेणारी आवली पिकलेल्या फणसाप्रमाणे होती. बाहेरून काटेरी आणि आतून रसाळ अशी गोड. नवऱ्याच्या पोटांत भाकरी गेल्याशिवाय तिच्या पोटात घासही जात नसे.
तुकारामाच्या भूमिकेत पागनीस जेव्हां संवाद बोलू लागतात तेव्हां ते संवाद रहात नाहीत, तर त्यांच्या आंतरीक आत्म्यातून उमटलेले ते भावनीक बोल असतात. जेव्हां त्यांचे कीर्तन चालू असते, तेव्हां शिवाजी महाराज त्यांच्या भेटीला येतात. व मोगलांना हे समजल्यावर ते त्यांना पकडण्यासाठी हल्ला करतात. त्यावेळी तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष पांडुरंगाला विचारलेल्या जाबातून त्यांची विठ्ठलावरची भक्ती दिसून येते. ' काय? शिवबाला पकडण्यासाठी यवन इकडे येताहेत? पांडुरंगा, तुझे कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तांवर हा प्रसंग यावा ना! ते कांही नाही. देवा, तू जरी आम्हांला दूर लोटलस तरी आम्ही भक्त कांही तुला सोडणार नाही' असे म्हणून 'फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये' अशी आळवणी करीत ते विठ्ठल नामाचा गजर करू लागतात. पुढे शिवबा सुरक्षीत आहे हे कळल्यावर पांडुरंगाने आपले ब्रीद राखलं म्हणून ते ' वानू किती रे सदया विठुराया, दीनवत्सला' असे म्हणून त्याची स्तुतीही करतात. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील भक्तीभाव देखील बरेच कांही बोलून जातात. हे सर्वच प्रकार अगदी वास्तव वाटतात. शांताराम आठवल्यानी लिहीलेली गीते तर संत तुकारामांच्या अभंगात इतकी चपखल बसली आहेत की, भक्तिभावाने तल्लीन होऊन तुकाराम जेव्हां 'आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले' हा अभंग गाऊ लागतात तेव्हां प्रेक्षकांचीही मने त्यासोबत डोलू लागतात. त्याकाळी कित्येक लोक हा अभंग तुकारामाच्या गाथेत कोठे आहे याचा शोध घेत असत. शांताराम आठवले यांच्या काव्याचा अन लेखन कौशल्याचा हा कळस होता.जेव्हां शिवाजी महाराज त्यांना नजराणा पाठवितात त्यावेळी तुकाराम तो सर्व नम्रपणे परत पाठवून आपला निरोप कळवितात; 'आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी | तुमचे येरवित्त धन, ते मज मृत्तीके समान | कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी | म्हणता हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस |
आणि हे ऐकल्यावर शिवाजी महाराजांचेही मन अध्यात्माकडे वळू पहाते. पण त्यांना तुकाराम महाराज क्षात्र धर्माची आठवण करून देऊन राजधर्म पाळण्याची विनंती करतात.
प्रत्येक माध्यमाला एक स्वतःचे कार्य असते.चित्रपट माध्यमालाही ते आहे. प्रभातने ते उत्तमरीत्या हाताळले आहे. वास्तवीक पहाता चित्रपट हा दिग्दर्शकाच्या नांवाने ओळखला जातो. पण 'संत तुकाराम' हा चित्रपट दिग्दर्शक दामले-फत्तेलाल यांचा आहे. पटकथाकार शिवरामपंत वाशीकरांचा आहे. संगीतकार केशवराव भोळ्यांचा आहे. कॅमेरामन व्ही. अवधूत, कला दिग्दर्शक एस. फत्तेलाल, गीतकार शांताराम आठवले, संकलक ए.शेख, ध्वनी-शंकरराव दामले, या सर्वा-सर्वांचा आहे. तसेच तो विष्णूपंत पागनीस यांचाही आहे. त्यांनी मुखांतून केवळ 'पांडूरंग - पांडुरंग' असे शब्द जरी काढले तरी त्यातील गोडव्याने वातावरण मंगल आणि भावुक होऊन जाते, आणि भक्तिभावाने ओथम्बलेले ते शब्द थेट आपल्या अंतकरणात जाऊन भिडतात. टाळ मृदंगाच्या गजरावर त्यांनी भक्तिभावाने गायीलेले अभंग त्यांच्या मुखावर उमटलेले असतात. १२ डिसेम्बर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमामध्ये प्रदर्शीत झालेला 'प्रभात'चा हा चित्रपट प्रारंभीच्या तुतारीच्या मंजूळ स्वरापासून ते शेवटच्या वैकुंठगमनाच्या दृष्यापर्यंत प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. अनेकदा या तुकारामाला थेटरमध्ये प्रेक्षक दंडवतही घालीत असत. तंत्रज्ञानाचा विचार करता कैक वर्षे पुढे असणाऱ्या, कमीतकमी खर्चात व वेळेत तयार केलेल्या या बोलपटास जागतीक मान्यता मिळाली ती १९३७ साली! व्हेनीस येथील 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' मध्ये पहीली भारतीय एंट्री म्हणून हा चित्रपट दाखविण्यांत आला. जगातील तीन उत्कृष्ठ चित्रपटांपैकी एक म्हणून 'संत'तुकाराम'ची निवड करण्यांत आली. कीर्ती आणि पैसा तर अमाप मिळाला. या चित्रपटांच्या निर्मीतीला हातभार लागला होता तो कलासक्त मनांचा, हातांचा आणि डोळ्यांचा! आणि त्यातूनच ही अजरामर कलाकृती जन्माला आली. शांताराम बापूसारख्या तपस्वी, मेहनती आणि कल्पक अश्या दिग्दर्शकाचा परीसस्पर्श होता या महान कलाकृतीला.
पुढे शांतारामबापू 'प्रभात' मधून बाहेर पडले. आणि त्यांनी स्वत:ची ‘राजकमल कलामंदीर’ ही संस्था सुरू केली. हळूहळू 'प्रभात'ची निर्मिती थांबून 'तुतारी'चा नादही थांबला. प्रभातच्या ठिकाणी 'फिल्म आणि टेलिव्हीजन संस्था' सुरू झाली. प्रभातच्या वैभवशाली परंपरेच्या स्मृती मात्र त्यांच्या अमर कलाकृतींच्या रूपाने सतत जागृत राहील्या. अशातच पूर्वी फिल्म इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी असलेल्या व पुढे नामांकीत छायाचित्रणकर झालेल्या तिरुअनंतपूरमच्या सनी जोसेफ यांना १९७९ साली पुण्याच्या लॉ कॉलेज रोडवरून जात असता रस्त्यावरील कचरा कुंडीत कांही कागद दिसले. त्यात त्यांना ओळखीचे कागदपत्र वाटले म्हणून त्यांनी ते उचलले. त्यात एक हिरवट रंगाचा कागद होता. तो म्हणजे ४ ऑगस्ट १९३७ रोजी 'व्हेनीस फिल्म फेस्टीव्हल' मध्ये 'संत तुकाराम' हा चित्रपट महोत्सवात स्वीकारला गेल्याचे मूळ प्रमाणपत्र होते ते! या ऐतिहासीक ठेव्याचे, प्रमाणपत्राचे महत्व, दुर्मिळता, व मूल्य याची जाणीव असलेल्या सनी जोसेफ यांना हे प्रमाणपत्र जेव्हां कचऱ्याच्या कुंडीत मिळाले, तेव्हां त्यांना धक्काच बसला. त्यांनी हे अत्यंत प्रेमादराने स्वतःजवळ एक मौल्यवान ठेवा या हेतूने ठेवले. २००२ च्या डिसेम्बर मध्ये केरळ येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळी राष्ट्रीय फिल्म अर्काइव्हचे संचालक सशीधरन याना चहापानाच्या वेळी ही हकिकत सनी जोसेफ यांनी सांगीतली. २३ मार्च २००४ रोजी स्वतः जोसेफ यांनी हा दुर्मीळ दस्तावेज आणून संचालकांच्या स्वाधीन केला. संचालकांनी मोठ्या सन्मानाने त्या प्रमाणपत्राची स्थापना फिल्म अर्काइव्हमध्ये केली. असा झाला त्या महान चित्रपटाच्या प्रमाणपत्राचा व्हेनीसपासून ते पुण्यापर्यंतचा प्रवास!
त्यानंतर संत तुकाराम यांच्यावर अनेक मराठी चित्रपट निर्माण झाले. काहीनी त्यांना न्याय दिला तर काही तुकारामाच्या वेशात स्वतःच म्हणून वावरले. कांही परीटघडीचे कपडे घालणारे वास्तवापासून दूर असलेले तुकाराम होते, तर कांही खरोखरीच अभिनय संपन्न होते. पण विष्णूपंत पागनिसांच्या तुकारामाची सर पुढे कोणालाही आली नाही. एक साधासुधा विषय, जेव्हां त्यातील कलाकारांकडून उच्च प्रतीच्या अभिनयातून अगदी भावनात्मक रित्या मांडला जातो, तेव्हां ते एक मानवी आविष्काराचे अती मौल्यवान असे दस्तावेज होते याचे हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे. दामले-फत्तेलाल यांनी दिग्दर्शीत केलेल्या 'प्रभात'च्या 'संत तुकाराम'ने मागील कांही पिढ्या व पुढील पुढ्यांच्याही मनात आदराचे स्थान मिळवून चित्रपट क्षेत्रांत एक मानदंड निर्माण केला आहे. कारण तो अभिनयासोबतच तांत्रीकदृष्ट्या काळाच्या कैक वर्षे पुढे होता!
-मं.गो.राजाध्यक्ष



Khup chhan shabdankan.
ReplyDeleteThanks for your appriciation.
ReplyDelete