पंचाहत्तरीतला प्रवेश


अखेर ' म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान ' म्हणत पंचाहत्तरीत प्रवेश केला. त्यावेळच्या बेळगांव जिल्ह्यातील (आताच्या कोल्हापूर ) कारवे या छोट्याश्या गावांत जन्माला आलेला मी अनेक टप्पे टोणपे खात सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या ओढीने मुंबईला पोचलो, आणि शेवटी येथेच स्थायीक झालो. माझे ध्येय तसे मी बालपणापासूनच ठरवले होते. सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टला जायचे आणि तेथूनच कला शिक्षण घ्यायचे हे माझे नक्की ठरले होते. आणि ते ध्येय अखेर साध्य झाले. एवढेच नव्हे तर माझ्या सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या संस्थेशी संबंध जुळले तेही कायमचे. न तुटणारे. अनेक नाती जुळली. अनेक शिक्षक दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले.  या संस्थेनें मला नांव दिले, एक चेहरा दिला, स्वतंत्र ओळख दिली. येथे शिकलो, तसेच पुढे शिकवू पण लागलो. खरं तर मीच माझ्या विद्यार्थ्यांकडून शिकू लागलो. कारण त्यांच्या समस्यांवर उपाय शोधताना बऱ्याच गोष्टी स्वतःला अभ्यासाव्या लागत.  त्यांच्याच कल्पना पुढे नेताना माझ्याही मनांत कल्पनेचे अंकूर फुटू लागत. त्यांच्याशी चर्चा ह्या विचार प्रसारणाची देवाण घेवाण बनू लागली. व खऱ्या अर्थाने तेथेच माझ्या  व्यावसायिक कला शिक्षणाचा श्रीगणेशा गिरविण्यास सुरुवात झाली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थामध्ये वावरत असतांना आपल्यालाही तरुण असल्याचं जाणवतं. जगण्याकरता लागणारं हे एक समृद्ध असं साधन आहे. त्यांचं प्रेम, जिव्हाळा, आदर या सर्वच गोष्टी मन टवटवीत ठेवतात. प्रफुल्लीत ठेवतात, प्रसन्न ठेवतात. आणि या सर्व गोष्टी केवळ शिक्षकी पेशातच प्राप्त होतात. माझ्या शालेय जीवनांत असताना प्रत्येक क्षेत्रात हिमालयाची उत्तुंग शिखरे भासतील अशी व्यक्तिमत्वे जन्माला आली होती. त्यात साहीत्यामध्ये आचार्य अत्रे, क्रांतिकारकात स्वातंत्र्यवीर सावरकर, राजकारणात ब्या. नाथ पै, चित्रकलेत मुळगांवकर, दलाल, एस. एम. पंडीत, अश्या लोकांना मी दैवते मानीत असे. त्यातही ब्या. नाथ पै व आचार्य अत्रे यांचा विद्यार्थी दशेत मला सहवास लाभला. अत्र्यांच्या ' नवयुग ' ते ' मराठा ' व ' मी कसा झालो' ते ' कऱ्हेचे पाणी ' या लिखाणाचे मी सतत पारायण करीत असे. जीवनातील या साहित्यीक अभ्यासाचाही उपयोग माझ्या कला जीवनांत मला झाला. आणि या सर्व गोष्टींची अभ्यासपूर्ण शिदोरी सोबत घेऊनच माझी जेजेची वाटचाल सुरु झाली. आणि विद्यार्थी शिक्षक हे नाते एका कुटुंबाप्रमाणे घट्ट होत गेले. शिक्षक ते गुरु व विद्यार्थी ते शिष्य हे स्थीत्यंतर मी येथे पाहीले. तसेच अनुभवले देखील!

अश्या या विदयार्थ्यांसोबत आणि शिक्षकांसोबत मिळून अनेक समाजप्रयोगी प्रकल्प पूर्णत्वास नेले. दिसायला सोपे पण उचलायला कठीण असे. कारण ते एक शिव धनुष्य असते. सांघीक ताकदीनेच ते उचलावे लागते, तसेच पेलावं लागते. नशीबाचा भाग असा की ही वाटचाल चालू असता वाटेच्या प्रत्येक वळणावर अनेक व्यक्तिमत्वे भेटली. उत्तुंग अशी. ज्यांनी वेळोवेळी बोट पकडून आधार दिला. त्यापैकी कांही मदत करून दूर झाले, तर कांही अखेरपर्यंत सोबतीला राहीले. यात बाळासाहेब ठाकरे, गजानन किर्तीकर, प्रमोद नवलकर, संजय राऊत, मनोहर जोशींसारखे शिवसेना नेते होते. अशोक जैन, माधव गडकरी, प्रकाश कुलकर्णी, कुमार केतकर, कुमार कदम यांच्यासारखे पत्रकार होते. रवी परांजपे, रमेश कुलकर्णी, शि. द. फडणीस, शिवाजी तुपे, कमल शेडगे, मुरली लाहोटी, प्रफुल्ला डहाणूकर, शरयू दोशी, जहांगीर साबावाला, असे उत्तुंग चित्रकार होते, भाई पत्की, रमेश कुलकर्णी, यशवंत चौधरी, र.कृ.जोशी, डाॅ. रेगे, असे जाहीरात कलेतील दिग्गज होते.     तसेच सुभाष दांडेकर, रजनी दांडेकर, दिलीप दांडेकर सारखे दिग्ग्ज उद्योगपती हेही  होते. संस्थेच्या कामासाठी या सर्व आदरणीय लोकांची मला खूप मदत झाली. आणि जे.जे. उपयोजीत कला संस्थेतील माझे वर्गमित्र अरुण काळे, रतन सोहोनी, समीर खानझोडे, सुनील महाडीक, गोपी कुकडे अश्यानी संस्थेच्या कामकाजात नेहमीच मदतीचा हात पुढे केला. प्रोसेसींग मधील अशोक नेरकर, रवी जसरा या दोघांनीही मला आपल्या 'शिल्पांजली 'या  संस्थेच्या वार्षिकाचा स्रोत अखंड सुरु ठेवण्यास शेवटपर्यंत मदत केली.

तसे पाहीले तर विद्यार्थी दशेतून शिक्षकाच्या भूमिकेत शिरतांना फारसे कांही वेगळे असे वाटले नाही. कारण तिसऱ्या चौथ्या वर्षांतील विद्यार्थी हे मी असतानाच माझ्या मागे एक दोन वर्षे होते आणि चांगलीच ओळख असलेले होते. त्यामुळे परकेपण कोठेच जाणवले नाही. उलट परत आपल्या कुटुंबात आल्याची गोड भावना मनात उमटली. मधलं एक वर्ष जणू भुर्रकन उडून गेलं होतं. आणि त्यानंतर जे. जे. जणू हक्काचं घर झालं. हीच खरी गंमत आहे जे.जे. व इतर कॉलेजमधील! त्या वास्तूचा, पुराण पुरुषाचा गुणच आहे तो. तेथील भंडारा लावूनच प्रत्येक विद्यार्थी ' जेजेच्या नावानं चांगभलं ' चा गजर करीत उठतो. आणि या मातीशी एकरूप होऊन जातो. कामाच्या निमीत्ताने या संस्थेत  षांताराम पवार, चिंतामण तिरोडकर या प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली  खांबेकर, नावेलकर, पावसकर या सहकाऱ्यांसोबत मी अनेक दिवस व रात्रीही काढल्या. काम झाल्यावर कधी डीन रूमसमोरील कोच्यावर आडवे होवून, तर कधी रमेशच्या कॅंटीन मध्ये झोपून!  नाही म्हटले तर कांही विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी थोडासा अप्रियच होतो. विध्यार्थ्यांच्या बाबतीत ' खडूस'च म्हणा ना ! याला कारणही तसेच होते. कांही शिक्षक वर्गांत कांही खास विध्यार्थ्यांना सांभाळीत असत. त्यांच्या कांही गोष्टींकडे दुर्लक्ष करीत. मला त्यांच्या प्रमाणे कॉलेज सुटल्यावर खूप कोणाशी जवळीक करता येत नसे. थोडीशी शिस्तही लावण्याचा प्रयत्न मी करीत असे.  पण बरेचशे विद्यार्थी जवळीक साधून होते. माझ्याशी मैत्री करून होते. काहीजण घरी येऊन आपली कामे पण दाखवीत असत. आम्ही बरेच जण कॉलेज सुटल्यानंतर बराच वेळ खेळ्तही असू. आजही त्याकाळातील माझे हे विद्यार्थी, व आताचे मित्र, मला अजूनही मान देतात. प्रत्येकजण  आपापल्या क्षेत्रांत मोठे आहेत तरीही आमची नाळ तुटली नाही. आज असंख्य माजी विद्यार्थी संपर्क साधून असतात, सन्मान देतात हेच जगण्याचे एक महत्वाचे साधन आहे.

पहाता पहाता वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्तीची वेळ कधी आली ते समजलेच नाही. शेवटी निरवानिरव करायची वेळ आली. निघण्यापूर्वी मी सर्व अध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सर्वाना डीन बंगल्यावर मी जेवण दिले. मात्र यामध्ये काहींनी बहीष्कार टाकला होता. यामध्ये होते ते, शेपाळ, सुभाष पवार, अरुण काळे व शुभानंद जोग यांनी. अर्थात जोग हा विस्मरणाने आला नाही व दुसऱ्या दिवशी त्याने मला येऊन सांगितलेही होते. पण माझ्याविरुद्ध एक षडयंत्र रचल्याची माहीती विचारे व नांदोस्कर यांनी आधीच मला दिली होती. विचारे जेव्हां माझा निरोप समारंभाचा कागद घेऊन काळे यांच्याकडे गेले तेव्हां काळे यांनी तो न बघताच बाजूला सारून दिला. मात्र ते भाषणाला हजर राहीले, माझी तोंडभरून स्तुती केली आणि नंतर निघून गेले.  दुसऱ्या दिवशी मी निघालो तेव्हां केवळ श्री नांदोस्कर मला भेटायला घरी आले. बऱ्याच अध्यापकांनी सुटकेचा उश्वास आणि कटकट गेल्याचे समाधान तेव्हां भोगले असेल. नंतर मी संजय पांडे तेथे येईपर्यंत त्या संस्थे मध्ये पाऊल टाकले नव्हते. अपवाद फक्त शासनाने तेथील काही शिक्षकांच्या मनमानी बद्दल विद्यार्थ्यांच्या  ज्या तक्रारी होत्या त्याच्या चौकशी समितीचा प्रमूख मला नेमण्यात आले होते. त्यावेळी सुभाष पवारांनी सकाळ मध्ये लेख लिहून माझ्या स्मरणशक्तीची टिंगल उडवली होती. संजय पांडेनी मात्र मला सन्मानाने जेजे मध्ये बोलावून माझ्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन केले व माझा सत्कार करून उचीत सन्मान केला. संस्था बदलत असल्याची शुभ चिन्हे दिसत होती. नंतर आले संतोष क्षीरसागर. त्यांच्या ' ' टायपोड डे ' ने जेजे ला पुन्हां सर्जनशीलता आणि वैचारीक पातळीच्या उंचीवर नेवून ठेवले. एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेमिनार - वर्कशॉप करून जेजे च्या शिरपेचात आणखी एक तुरा नक्कीच खोवला असेल.

त्यानंतर माझ्या शांत अश्या जीवनात पुन्हां एक हलचल झाली. आधी मला वांद्र्याच्या डी. वाय. पाटील यांच्या संस्थेकडून त्यांच्या नवीन सुरु होणाऱ्या शिक्षण संस्थेसाठी मी त्यांना हवा होतो. पण जेजे सारख्या एका उच्च पातळीवरील अधिष्ठात्याच्या पदावरून उतरल्यानंतर मी असल्या ठिकाणी जाणे शक्यच नव्हते. आणि मी नकार दिला. तीच गोष्ट होती मोदी फाउंडेशनची. त्यांनाही माझा नकार कळविला. मात्र आर्ट स्कुल हे केवळ नियमानुसार चालू असू नये तर त्याला एक डिझाईनची जोड देणे आवश्यक आहे. उपयोजीत कला हिच्याशी अनेक गोष्टी निगडीत आहेत. त्याच्याशी या कलेची सांगड घालून नवीन विश्व उभारावे. केवळ शाळेच्या चार भिंतीत कला शिक्षण न घेता त्याला गुरुकुलाची जोड द्यावी. उपयोजीत कला ही केवळ जाहीरात कलेपुरती मर्यादीत न रहाता सर्वच कलांशी तिची बांधीलकी आहे हे ध्यानांत घेऊन अभ्यासक्रम आखण्यात यावा. आपला विद्यार्थी हा सर्व बाजूनी युक्त असावा.  आणि मुख्य म्हणजे एकदा सरकारी नोकर नेमल्याप्रमाणे कला शिक्षक न नेमता तेथे विशेष नैपुण्य असलेले शिक्षक व यशस्वी अश्या व्यावसायीक लोकांकडून ज्ञानार्जन करावे. चर्चसत्रे-कार्यशाळा यावर आधारीत अशी ही शिक्षण पद्धती असावी ज्यामुळे विद्यार्थ्यांना जगात काय चालले आहे याचे ज्ञान होईल. विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास हा झालाच पाहीजे, त्यायोगे टेबलच्या समोर बसलेल्या व्यक्तीशी या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्वक बोलता येईल. त्यासाठी या विषयाचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. अशी माझी दृष्टी होती. थोडक्यात ते माझे एक स्वप्न होते म्हणाना!

आणि माझ्या स्वप्नाला पूर्तता येईल अशी संधी एकदा मला मिळाली. आणि ती होती विवा नावाच्या कला महाविद्यालयात. त्यांच्याकडूनच मला बोलावणे आले. 'मी जे कांही करेन त्याला संस्थेचा पूर्ण पाठींबा असेल. पैशाचा प्रश्नच नाही. तुमचीच संस्था आहे. सर्व अधीकार तुम्हांला.' हे बिनधास्त वचन संस्थेच्या अध्यक्षाकडून मला  मिळाल्यावर माझे वारू तुफान सुटले. मी माझ्या सर्व एजन्सीमधील मित्रांशी संपर्क साधला. सर्वाना कल्पना दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असा अभ्यासक्रम करण्याचे योजले. इतरांच्याही कल्पनांनी त्याला सोनेरी किनार लावली..आणि मी रात्रंदिवस एक करून माझ्याच पैशांनी प्रोजेक्ट रीपोर्ट तयार केला. काहीजण माझ्यामागे शिक्षकाच्या पदासाठी मागे लागले. मला केवळ शिक्षणातच रस आहे. मी कसे काम करतो. वरिष्ठांच्या आज्ञेत राहतो. तुमच्याकडून बरेच शिकायचे आहे, हे सांगून नोकरीत आले. पण एकदा आत शिरल्यावर त्यांनी आपले रंग बदलले. संस्थेच्या नाड्या मालकांच्या हातात असतात हे ते पक्के जाणून होते. मी सांगितलेले एकही काम करायचे नाही याचा जणू विडाच सर्वानी उचलला होता. संस्थेचे अध्यक्ष मला खूप सन्मान देत होते, पण प्रत्यक्ष संस्था चालवणाऱ्याना आता माझी गरज उरली नसल्याचे मला जाणवू लागले. त्यामुळे माझ्या सांगण्याकडे ते नेहमीच दुर्लक्ष करू लागले. त्यांनाही  मी कदाचीत जड होऊ लागलो होतो. जणू काही माझी गरजच नव्हती त्यांना.  मात्र तेथे एक व्यक्ती माझे महत्व जाणून होती. मी जो अभ्यास करीत होतो, नवीन कल्पना लढवीत होतो, त्याची जाणीव केवळ त्यालाच होती. उस्फूर्तपणे तो माझ्यासोबत काम करीत असायचा. मी बैठक बोलावून स्टाफला काही सूचना करून कामे सांगितली तर ही व्यक्ती त्याच्या नोंदी आपल्या फोनमध्ये ठेवून पुढच्या वेळी त्याबद्दल स्टाफकडे विचारणा करीत असे. माझ्यासोबत त्यानेही हे आर्ट स्कुल एक आदर्शवत व्हावे या कल्पनेने तोही झपाटलेला होता. माझ्यासारखे वेडेपण त्यानेही जोपासले होते. आणि ती व्यक्ती म्हणजे जे. जे. उपयोजीत कला संस्थेच्या संस्कारावर वाढलेला अनील ठाकूर होता. संस्थेच्या विश्वस्तांपैकी एक. आणि संस्था चालकांना अत्यंत जवळचा असलेला. पण त्यानेही माझ्यासोबतच हात टेकले. आणि अखेर एका बैठकीत मी सर्व विश्वस्तांना सांगून टाकले, की कदाचीत आपला समज असेल की मी पैशासाठी येथे काम करतो, तर कृपया तसा समज करू नका. जेथे माझ्या शब्दाला किंमत नाही तेथे मी माझा अपमान करून घेवून काम करू शकत नाही. आणि दुसऱ्या क्षणाला मी तेथून बाहेर पडलो.  एक नवीन असा माझा हितचिंतक, अनील ठाकूर नावाचा एक सुहृद सोबत घेऊन. ज्याच्याशी मैत्रीची वीण घट्ट विणली गेली. मात्र त्या संस्थेने, तेथील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनीही मला एक आजन्म ध्यानात राहील अशी शिकवण दिली. या बाबतीत मात्र ते माझे गुरु ठरले.  ' कधीही कोणावर भरवसा ठेवू नये ! ' हीच ती शिकवण होती. आणि तेव्हांपासून मी एक धडा घेतला की आता यापुढे कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये जायचे नाही.कोणाच्याही आमीषाना बळी पडायचे नाही. आणि ते मी पाळत आलो. आता माझे मन एकदम शांत असते.  ना डोक्यावर कसले ओझे, ना मनावर कोणते दडपण. एक स्वच्छंदी आकाशात भराऱ्या मारणारा पक्षी. यावेळी मला आठवले ते माझे गोवा कॉलेजचे, केरळमधील आर्ट कॉलेजचे, भारती विद्यापीठाचे, सावन्तवाडीच्या कला महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी, त्यांनी दिलेला मान-सन्मान, यापुढे येथील गोष्टी मला गौण वाटतात व विवा प्रकरण मी माझ्या मेंदूच्या पटलावरून पुसून टाकले. तेथून निघताना एकटाच निघालो.

मात्र आयुष्यात काही असे सुखाचे क्षणही येतात, की ज्यामुळे आपण केवळ सूखावूनच जातो असे नव्हे, तर त्यांच्या रुणातही राहतो. कधीही न फ़िटणाऱ्या अश्या. आणि हे क्षण आणले माझ्या जेजेच्या विद्यार्थी मित्रांनी.  आजवर जेजेमध्ये घडले नव्हते, ते तेथील ८० - ८५ सालच्या ब्याचने माझा व नरेंद्र विचारे यांचा सत्कार करण्याचे आयोजन केले. अगदी मनापासून घडलेली ही गोष्ट होती ती. यामध्ये अजीबात औपचारीकता नव्हती. सर्व उमलून आले होते ते विद्यार्थ्यांच्या मनातील जिव्हाळ्याने. याचे आयोजन केले होते ते माजी विद्यार्थी व आताचे एक आघाडीचे उपयोजीत कलाकार सुनील चव्हाण यांनी. सोबत होते तितकेच प्रभावी आणि सर्जनशील असे कांही वंदनीय हात ज्यांना अनेक वर्षे जाहिरातीच्या मोहमयी जगात दृक फुलांचा सुगंध दरवळत ठेवला होता. आणि ते म्हणजे अजीत जयकर, गुरुनाथ भडेकर, महेंद्र परब, सतीश सोनवणे, सुनील सरदळ इत्यादी. सतीश सोनावणे याने तर आमंत्रण पत्रिकेंची एक सर्जनशील अशी मालिकाच उभी केली.  ती होती  ११ मार्च २०१८ रोजी अमृतबिंदूंनी चिंब झालेली  एक अवीस्मरणीय अशी संध्याकाळ! त्या दिवशी मला चक्क चाळीस एक वर्षांनी त्या माझ्या विद्यार्थ्यांनी तरुण केले. एक नवीन उमेद निर्माण केली.आणि मीही माझे वय विसरून गतकाळातील त्यांचा शिक्षक बनून पुन्हां जेजेच्या वर्गात बसलो. पुन्हां लेक्चर देण्यासाठी, हजेरी घेण्यासाठी. या माजी विद्यार्थ्यांनी आयोजलेल्या सत्कार सोहळ्याचा एक राजेशाही प्रवास होता तो. आणि माझ्या हातात चक्क संस्थेचे प्रतीक देवून!

आजवरच्या या प्रवासांत मला अनेक गोष्टी मिळत गेल्या. अगदी हक्काच्या होत्या त्या! काही सहजपणे, तर काहींसाठी झगडावे लागले. पण अनेक सुहृद भेटले. त्यांनी प्रत्येक वळणावर बोट धरून चालवले. कला क्षेत्रासह इतरही अनेक नामवंतांशी संबंध आले. केवळ संबंधच नव्हे, तर त्यांच्याशी सूर जुळले, एकरूप झालो, आणि या मैत्रीच्या उटीचा सुगंध भाळावर मिरवत राहीलो. आज मागे वळून पाहतो ते, अनेक गुरुवर्य, जेष्ठ कलाकार, कांही जवळचे मित्र, हितचिंतक मधेच हात सोडून निघून गेले. त्यांची निर्माण झालेली पोकळी कधीच भरून काढता येणार नाही. मात्र त्यांच्या सोबत घालवलेले एकेक क्षण आठवले की, मनांत भडभडून येते. कारण प्रत्येकाने मला कांहीतरी शिकवले आहे, दिले आहे. मी विसरू शकणार नाही असे माझे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी मित्र यांनाही मी विसरू शकत नाही. त्यांच्या माझ्यातील नाते हे केवळ शासकीय नव्हते, तर ते बंधूप्रेमाचे होते. मी विद्यार्थी असल्यापासून माझ्यावर प्रेम करणारे एकनाथ पराडकर, दत्ताराम, वासू, रवींद्र पटवर्धन, कदम, गायकवाड असे शिपाई माझी काळजी घेत. मला कसली तसदी पडू नये हे जातीने पहात. हे भाग्य किती शिक्षकांच्या वाट्याला आले असेल?

आणि माझ्या जेजे मधील विद्यार्थ्यांविषयी काय बोलू? अगदी माझ्या नेमणुकीच्या वर्षांपासूनचे विद्यार्थी मला आज आठवतात. त्यात विचारे होते, साळवी होते, अनंत कुलकर्णी, अनील गांधी, संजय सुरे, भूपाल रामनाथकर, उद्धव ठाकरे, विनय नेवाळकर, विजय कुल्लरवार, सुभाष गोरेगांवकर, अजीत जयकर, भास्कर हंडे, दीपक गावडे, सुनील महाडीक, कुणाल विजयकर, राज हळणकर, शेखर पितळे असे एक ना अनेक विद्यार्थी आजही माझ्याशी संपर्क साधून असतात. हे मी माझे भाग्यच समजतो. आज माझ्यावर प्रेम करणारे, माझी आठवण ठेवणारे, मान देणारे असंख्य विध्यार्थी हे आजच्या काळातील सर्जनशील असे आपल्या क्षेत्रांत नांव कमावून असलेले कर्तबगार असे उपयोजीत कलाकार म्हणून कार्यरत असले, तरी त्यांच्याशी संवाद साधतांना मला चक्क अद्याप जेजे मधेच असल्याचा भास होतो. याला कारण जमशेटजी जीजीभाई यांनी निर्माण केलेली, जेजे उपयोजीत कला संस्थेची ती वास्तू, जिने असंख्य विद्यार्थ्यांना आपल्या कुशीत सामावून घेतले. त्यांच्यावर संस्कार केले.आपली ओळख दिली, आपले नांव दिले, की जे घेऊन आम्ही कोठेही गेलो तरी मान मिळतो, सन्मान मिळतो. आणि तिच्या दर्शनाने अद्यापही नतमस्तक व्हायला होते. आणि तेथील माती कस्तूरीप्रमाणे आमच्या कपाळाला लावून भरून पावतो.

आज मागे वळून माझ्या वाटचालीकडे पाहतो तेव्हां लक्षात येते की काय कमावले अन काय गमावले. कमावले तर खूपच. दृष्ट लागेल अशी मित्र संपदा. जो ठेवा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. याच संस्थेने मला माझी सहचारिणी भारती ही पत्नीच्या रूपात दिली. जिने अनेक बऱ्या वाईट प्रसंगात मला नुसतीच साथ दिली नाही, तर मला कसलाही त्रास पडू न देता माझा सुखी संसार गुण्या गोविंदाने निभावले. मात्र त्याचबरोबर गमावल्याची आठवणही तेवढीच त्रस्त करून सोडते. ते माझे ऋषीतूल्य असे गुरु आडारकर सर, हणमंते सर, दामू केंकरे सर, धैर्यवान सर, साठे सर, पवार सर, माझे सहाध्यायी शेखर साळवी, भरत चव्हाण, डॉ. परदेशी, रमेश पावसकर, मुकूंद गोखले,माधव रानडे, राजा शेटगे, भास्कर जतकर, नंदा देशपांडे, अरविंद नागवेकर, व्यावसायीक क्षेत्रांतील नामवंत भाई पत्की, रमेश कुलकर्णी, र. कृ. जोशी, यशवंत चौधरी, मनू देसाई, डॉ. गजानन रेगे, हे सर्व सोडून गेले. अश्या सर्वानी निर्माण केलेली माझ्या आयुष्यातील पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. पण वेळोवेळी त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालतांना त्यांचा आशीर्वादाचा हात नेहमीच माझ्या मस्तकावर राहीला आहे. त्यांच्या या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकणार नाही, किंबहूना मला व्हायचेही नाही. त्याची प्रेमाची उब मला तशीच ठेवायची आहे.


असा हा त्यावेळच्या बेळगांव व आताच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कारवे या खेडेगावांतून सुरु झालेला माझा प्रवास मुंबईला येऊन स्थिरावला. अनेक चढउतार येत गेले. जेजे मध्ये आपण कधी नोकरी करतो आहोत अशी जाणीवच कोणी कधी जाणवू दिली नाही. कारण हे आमचे घरच होते. व शिक्षक आणि विद्यार्थी आम्ही सर्व या घरातील कुटूंबीय होतो. आजही ते नाते तसेच टिकून आहे. कारण नात्याची वीण घट्ट आहे. कधीही सैल न होणारी अथवा न तुटणारी.
या सर्व विद्यार्थ्यांच्या, हितचिंतकांच्या, मित्रवर्यांच्या, घडवलेल्या गुरुवर्यांच्या शुभचिंतक आशीर्वादाने अशीच पुढची वाटचाल मंगलमय होईल, सुलभ होईल, सुखकारक होईल हीच आशा बाळगून माझे हे चऱ्हाट आता येथेच थांबवतो!

- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

Comments

  1. ७५ वर्षात जमवलेला हा अनमोल ठेवा मिळण्यास देखी भाग्य लागते, परमेश्वर तुला सुधृड आरोग्य देवो. तुझ्या
    सर्व आशा आकांक्षा पूर्ण करो. शतायु भव.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अरूण तुझ्या मौलीक अभीप्रायाबदल.

      Delete
    2. राजाध्यक्ष सर तुम्ही जन्मतःच राजा आहात नाही विसरु शकत तुमच्या अध्यापनाची ५ वर्ष या पुढे लिहीण्याची शब्दसंपदा मी अत्रे असुन माझ्याकडे नाही.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आनंदचा आधुनीक अवतार : शेखर साळवी

माझे वडील कलाकार होते :