निसर्गाचा मानवाला इषारा
निसर्ग तरी पहा कसा लबाड आहे,
हळूहळू माणसाच्या खोड्या उचलत आहे,
स्वतःचा निष्पापपणा विसरून
माणसाचे ढोंग साकारत आहे.
आजपावेतो ऋतूचक्र तोलून मापून चालवत होता,
पृथ्वीवर नंदनवन साकारत होता,
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा योग्य वेळी बरसत होता,
आपापल्या ऋतूंची लेणी भरभरून आकारत होता.
उन्हाळ्यात धरतीला भाजून शेकत होता,
त्याच तप्त जीवावर श्रावणधारा बरसात होता,
शेतकऱ्याला कधी आकाशाकडे नजर लावावी लागत नव्हती,
बी पेरलं की धान्याची कोठारं भरली जात होती,
उन्हाळ्यांत रोगराई पळून जात होती,
नेमेची येणाऱ्या पावसाने धरती हिरवी शाल पांघरत होती,
ऊन पाऊस थंडीने समतोल राखत होता,
त्याची ददात प्राणीमात्राला पडू देत नव्हता.
पण माणसाचा लोभ वाढत होता,
निसर्गालाच ओरबाडायला निघाला होता,
क्षुद्र मानवाची पोकळ धडपड निसर्ग गमतीने पहात होता,
अती झाले की सपाट्याने वार करणार होता.
जेव्हां निसर्गाला हे असह्य झाले,
आपलेच लोक आपल्याला ओरबडू लागले,
उतू लागले मातू लागले,
जगाला नष्ट करू लागले,
निसर्गालाच आव्हान देऊ लागले
पायाखाली त्यालाच नमवू लागले.
तेव्हां निसर्गाने वटारले आपले डोळे,
रजा घेऊन त्याने पलायन केले,
जाताना ढगांना सोबत नेले,
लोकांना पाण्यापासून वंचीत केले,
तोडलेल्या वृक्ष लतानी
सूर्याची तप्तता जाणवून दिली
सिमेंटची जंगले वाकूल्या दाखवू लागली
शेतकरी डोळे लावी आकाशाला,
निरखुनी पाही तेथील ढगाला
दिसतो का एखादा काळा ठिपका त्या ढगांवर,
करेल का एखादा थेम्ब ओला या धरतीवर
पेरलेल्या माझ्या बियाणाला फोडील का तो अंकूर
देईल का धनधान्य भरोनी माझे कोठार
निसर्ग तरी कसा लबाड आहे
माणसाला सतत तोलून पाहे
माणसाचे आडाखे तडाखे मिस्कीलपणे कुरतडून
नको तेव्हां ओतू पाहे
कुठे पाऊस नाही म्हणून हाहाकार
तर कोठे गावंच धुवून नेणारा धुवांधार
आता कोठे येऊ लागला मर्त्य माणसाला
निसर्गाच्या ताकदीचा अंदाज
प्रकोप पाहूनी भयभीत झाला उतरून जाई माज
अरे, माझ्यापुढे तू आहेस तरी कोण रे मर्त्य मानवा?
कशाला मारीशी फुक्या वल्गना, आणि मिरवीशी टेंभा
मीच तर तुला बनवीले, माझ्यासाठी तू तर एक क्षुद्र
माझ्या वाऱ्याच्या झुळूकीनेही मिटेल तुझे अस्तीत्व
जेव्हां बनेन मी रूद्र
मी जर का नाहीसा झालो, तर पुन्हां उभा राहीन मी स्वतःच्या ताकदीवर
पण तुझे काय रे ? तू तर नष्टच होशील माझ्या एकाच इशाऱ्यावर.
रहाशील एक आख्यायीका बनून, माझ्या पोटातील रहस्यामध्ये.
पुन्हां कोणी बुध्दीवान प्राणी जन्मला तर रमशील त्याच्या संशोधनामध्ये !
म्हणून माझा तुला सल्ला मर्त्य मानवा, ऐक गोष्ट ही साची
मला तुझी गरज नाही रे! तुलाच खरी गरज आहे निसर्गाची!
-मं.गो.राजाध्यक्ष

Comments
Post a Comment