अस्वस्थ कलावंत : बाळासाहेब ठाकरे.
कांही वर्षांपूर्वी आझाद मैदानांवर पत्रकार भवनाचे उदघाट्न होते. मा. मुख्यमंत्री मनोहर जोशी उदघाटक होते. तर जयंतराव टिळक मुख्य पाहुणे होते. समारंभाच्या वेळी जयंतराव म्हणाले, " मला बाळासाहेबांबद्दल खूप आदर आहे. ते जे परखड पणे बोलतात ते वास्तविक आमच्याही मनांत बोलायचे असते. पण आमची तोंडे बांधलेली असतात. आम्ही मनांत असूनही ते बोलू शकत नाही. " आणि हे अक्षरशः खरे होते. बाळासाहेबांचा परखडपणा, पारदर्शीकता, वेळ आली तर स्वपक्षीयांनाही चार खडे बोल सुनावण्याची क्षमता हे त्यांच्या नेतृत्वाला शोभणारे पैलू होते. आणि त्यांच्या वाक्यांची मोडतोड करून त्याचे भांडवल करून स्वतःचे पोट भरणे हे निरनिराळ्या टी व्ही वृत्त वाहिन्यांची वृत्ती होती. बाळासाहेब मुळातच राजकारणी नव्हेत. राजकारण्यांचा मुखवटा त्यांना कधीच धारण करता आला नाही. उलट राजकारणी लोकांचे खोटे मुखवटे आपल्या मार्मिक व्यंगचित्रातून टरा टरा फाडण्याचा त्यांचा धर्म होता. त्यामुळे जे सत्य ते स्पष्टपणे बोलणे त्यांच्या स्वभावातच होते. यामुळेच जयंतरावांनी स्वतःचे मनोगत बाळासाहेबांचे उदाहरण देऊन सांगितले होते यात नवल ते काय?
आजच्या या लेखाचे शीर्षक मी ' अस्वस्थ कलावंत ' असे दिले आहे, त्याचे कदाचित आश्चर्य वाटेल. पण काही वर्षांपूर्वी याच शीर्षकाचा लेख मी लिहिला होता, त्याला बाळासाहेबांनी दाद दिली होती. त्यातील सत्यतेची जाणीवच त्यांनी दाखवली होती. त्यामुळेच आजच्या या कलावंताचे वर्णन मी त्याच विशेषणाने करीत आहे. बाळ ठाकरे हे नाव अगदी शालेय वयातच आमच्या मनावर कोरले गेले होते, ती त्यांची व्यंगचित्रे पाहून. आवाज चा विनोदी अंक असो व अत्रे यांचे ' नवयुग ', त्यामधील बाळासाहेबांची व्यंगचित्रे मनाला भुरळ घालीत असत. विशेषतः त्यांची राजकीय चित्रे तर जबरदस्त असत. त्यामागील मल्लीनाथी बरेच काही सांगून जात असे. बाळासाहेब तेंव्हां केवळ बाळ ठाकरे होते. याच नावाने ते सर्वमान्य होते. फ्रीप्रेस मध्ये ते व्यंगचित्रे काढत असत. मावळा या टोपणनावाने इतरत्रही त्यांची व्यंगचित्रे प्रकाशीत होत. पण तेथील प्रांतीय राजकारणाला कंटाळून त्यांनी ते काम सोडले. त्यानंतर शरद पवार, जॉर्ज फर्नांडीस अश्या काही मित्रांनी एक साप्ताहिक सुरु केले, पण तेही पुढे बंद झाले.
त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली आणि त्यांना व्यंग चित्रांसाठी अनेक मॉडेल उपलब्ध होवू लागली. आचार्य अत्रे यांच्या नवयुगचे मुखपृष्ठ बाळासाहेबांच्या मार्मिक आणि बोचऱ्या कुंचल्याने नटू लागले. पुढे १३ ऑगस्ट १९६० साली त्यांनी 'मार्मिक ' हे स्वताचे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केले आणि त्यांच्या कलेला बहर आला. तो दिवस होता आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनाचा. पहील्याच अंकामध्ये त्यांनी आचार्य अत्रे हे मावळ्यांच्या वेषात घोडयावर स्वार झाले आहेत, व त्यांच्या हातात तलवारीच्या जागी लेखणी आहे असे व्यंगचित्र रेखाटले. वर शीर्षक होते, ' मराठी शिलेदाराला मानाचा मुजरा.' रविवारचा मार्मिकचा अंक गुरुवारीच हातात पडे, अन वाचकांच्या त्यावर उड्या पडू लागल्या. त्यातील 'रविवारची जत्रा' ही डबल स्प्रेड राजकीय व्यंगचित्रे राजकारण्यांना धाकात ठेवीत, तसेच वाचकांची मनमुराद करमणूक करीत. पुढे या मार्मिकच्या आधारानेच बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली, ते पुढे राजकारणात गेले ते काही इतर पुढाऱ्याप्रमाणे वारसा हक्काने आले नाहीत, तर त्यांच्या बोटातील अजोड कला, पत्रकारितेतील बुद्धी चातुर्य, ते सांगत त्या प्रमाणे दोन ओळीमधील वाचण्याची प्रगल्भ पत्रकारिता, कुशाग्र निरीक्षणशक्ती अन अफाट अशी कल्पनाशक्ती याच्या आधारे 'मार्मिक' साप्ताहिकाद्वारे त्यांनी ते साध्य केले. या मुंबईत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जेव्हा ते भगवा ध्वज खांद्यावर घेवून उभे राहिले. तेव्हा त्यांच्यासमोर होती ती विरोधकांची फौज ! तीही अतिबलाढ्य अशी. टाइम्स, एक्स्प्रेस, ब्लिट्झ, मराठा, लोकसत्ता अशी ताकदवान वृत्तपत्रे. पण शिवसेनेच्या जन्मा आधीच बाळासाहेबांनी आपल्या व्यंगचित्रांची जरब राज्य कर्त्यांवर अशी बसविली होती कीं ते चळाचळा कापत.बाळासाहेबांच्या व्यंगचित्रामध्ये एक मार्मिक अशी टिपणी असे. एका झटक्यात ते त्या व्यक्तीचा बुरखा टराटरा फाडून टाकीत. कित्येकदा त्याला नर्म विनोदाची झालर देखील असे. कृष्णमेनन- स. गो. बर्वे हे ठाण्याहून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे होते, तेव्हां त्यांच्या सोबत तेव्हांच्या जनसंघाचे प्रा. मुकुंद आगासकर उभे होते. जनसंघाची निशाणी होती पणती. आणि फारशी प्रसिद्धी नसलेले मुकुंदराव हातात पणती धरून तिच्या उजेडात सर्वाना विचारत फिरत आहेत, ' सांगा मुकुंद कुणी हा पाहीला ' हे व्यंगचित्र पाहील्यावर हसू आवरत नव्हते. राजगोपालाचारी यांनी एकदा व्हिएतनामचे हो ची मिन्ह यांच्यावर टीका केली तेव्हां राजाजींना एखाद्या बंदूकीच्या वेगाने सुटलेल्या गोळीप्रमाणे दाखवून त्यापुढे हो ची मिन्ह घाबरून धावत आहेत, असे चित्र त्यांनी काढले. त्याचे शीर्षक होते, आता हो ला व्हिएतनाम सोडावेच लागेल. भारतात प्रथमच इंदिरा गांधींच्या काळात नऊ राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आली, तेव्हां त्यांचे व्यंगचित्र एकदम मार्मिक होते. इंदिराजींचे नाक लांब दाखवून त्यांनी त्यावर नऊ लोक बसल्याचे दाखविले होते. व त्याचे शीर्षक होते, ' नाकी नऊ आले ' ! एवढी समय सूचकता असणे ही एक
पराकोटीची क्षमता त्यांच्या ठिकाणी होती. आचार्य अत्रे यांच्याशी त्यांचा जेव्हां वाद सुरु होता, त्यावेळी आचार्य अत्रे यांची भरपूर टवाळी करणारी व्यंगचित्रे त्यांनी रेखाटली होती. अत्र्यांचा ' प्रचंड' अश्या शब्दाचा सोस सर्वाना माहीतच होता. अत्रे जेव्हां लोकसभेच्या निवडणूकीत पराभूत झाले, त्यावेळचे बाळासाहेबांचे चित्र होते ते दोघेजण बोलत बसले आहेत. टेबलावर दैनिक मराठाचा अंक दिसतो आहे, त्यावर भकास चेहऱ्याचं अत्रे दाखवले होते, व त्याला शीर्षक होते, ' आमचा प्रचंड पराभव ! ' व हा माणूस दुसऱ्याला सांगतो आहे, नेहमीच्या सवयीप्रमाणे मी ' प्रचंड' शब्द टाकला आणि संपादकांनी मला नोटीस दिली. हसत खेळत केलेलं ही भयानक टीका केवढे नाट्यमय आहे ना ? इंग्लडचे पंतप्रधान चर्चिल यांचे चरित्र जेव्हां प्रसीद्ध होणार होते तेव्हां जगभरातून नामांकीत व्यंगचित्रकाराकडून त्यांची चर्चिल वरील व्यंगचित्रे मागवीली. भारतात हा मान बाळासाहेबांना मिळाला. जगाने घेतलेली त्यांच्या व्यंगचित्र कारकिर्दीची ती एक खास दखल होती.
व्यंगचित्रांविषयी बाळासाहेबांनी स्वतःच एकदा त्यातील मर्म विशद केले होते. ते म्हणाले, " व्यंगचित्रकला ही कोणत्या शाळेत शिकता येत नाही. म्हणतात की पाण्यात पडले की पोहता येतं. खोटे आहे हे. उलट तो गटांगळया खाईल. ते मूळात असावे लागते. कांही कला अश्या असतात ज्याची तुम्हांला मुळातच आवड असावी लागते. आणि तुम्हांला ती आत्मसात करावी लागते. यासाठी तपस्चर्या हवी.दुसरा शब्द नाही. आजची पिढी मला थोडीउथळ वाटते. मेहनत घ्यायला नको. तुमचा कुंचला हा जबरदस्त हवा. तुमच्या स्ट्रोक्स मध्ये जोर हवा. आत्मविश्वास अन सामर्थ्य हवे. चित्र नुसते सुंदर असून चालत नाही. त्याच्या आविष्कारासाठी कल्पकता हवी. आणि त्याचबरोबर राजकारणाचा अभ्यासही हवा." आणि बाळासाहेबांचा हा अभ्यास परीपूर्ण होता.
व्यक्तीची ओळख हा बाळासाहेबांच्या कुंचल्याचा एक अलौकीक गुण होता. त्याचसोबत भावाविष्कार देखील महत्वाचा भाग असायचा. अगदी मोजक्या रेषात रेखाटन करणे, तसेच प्रसंगानुरूप त्यातील व्यंग दाखविणे हे व्यंग चित्रातील महत्वाचे सूत्र ते योग्य तऱ्हेने वापरीत. तसेच कोणत्या व्यक्तीचा कोणता भाग कसा वापरायचा हेही ते अचूक निवडत. पंडित नेहरूंचा ओठ, इंदिरा गांधींचे लांब नाक, दाक्षिणात्य माणसाचे जाड ओठ, केरळीय माणसाचे कुरळे केस अश्या खास लकबी त्यांच्या रेषेतून दिसून येत. अगदी ब्याक पोर्ट्रेट करणे किती कठीण असते हे सर्वाना माहीत असते. बाळासाहेब मागाहून एखादी व्यक्ती दाखवीत तेव्हां ती चटकन ओळखता येत असे. व्यंगचित्रकला ही त्यांना ईश्वराकडून मिळालेलं एक अलौकीक लेणं होतं. व्यंगचित्र म्हणजे केवळ त्यातील व्यक्तीची ओळख पटून भागत नाही, तर तिचे आरपार अंतरंग आपल्याला जाणवायला हवे व त्यात बाळासाहेब वाकबगार होते. दोन रेषेमधील व्यंगचित्रकाराने कसे वाचले पाहीजे, त्याचे ते सखोल विश्लेषण करीत. एकदा त्यांनी आम्हांला एक प्रात्यक्षीक दिले होते. त्यांनी चर्चिलचे एक व्यंगचित्र समोरील बोर्डावर रेखाटले. एकदम हसऱ्या चेहऱ्याचा चर्चील. जणू सुहास्य मुद्रेने पहात आहे. नंतर बाळासाहेब म्हणाले, ' हा चर्चील पहा. एखाद्या सुखवस्तू माणसाप्रमाणे वरण भात खाणारा दिसतो आहे, पण त्यातून त्याची राजकीय कारकीर्द दिसत नाही. चर्चील हा अतीशय बेरका होता. तसा दिसला नाही, तर ते त्याचे व्यंगचित्र होत नाही. केवळ त्याची ओळख दाखवणारे ते एक चित्र होते. आता पहा. मी त्यात कसा बदल करतो ते ! असे म्हणून बाळासाहेबांनी त्या चर्चीलच्या भिवया थोड्या उंचावल्या. नजर थोडी बारीक केली. आणि बघतो तो काय ? चर्चील एकदम बेरकीपणे पहायला लागला. केवळ दोन रेषा बदलून त्यांनी चर्चीलचे खरे रूप दाखविले होते. मात्र कोणाच्याही शारीरीक व्यंगावरून चित्रे काढणे त्यांना मंजुर नव्हते.
माझी बाळासाहेबांची प्रथम भेट झाली ती १९६४ साली त्यांच्या दादरच्या घरात. एक पुस्तक अभिप्रायासाठी देण्यास मी गेलो होतो. नंतर एक दोन वेळा ते जेजे मध्ये श्रीकांतजींसोबत सोबत आडारकर यांच्याकडे आले होते. कलानगर ही चित्रकारांची वसाहत तेव्हा आकार घेत होती, त्यासाठी ते आले होते. नंतर स्टाफरूम मध्ये केंकरे वगैरे शिक्षकांशी गप्पा मारीत. १९६५ च्या भारत - पाक युद्धाच्या वेळी आमच्या सिव्हिल डिफेन्सच्या प्रसिद्धीसाठीही ते व्यंगचित्रे करून देत. शिवसेना स्थापन झाल्यावर अत्रे- ठाकरे वाद खूप वाढला. प्रत्येक मराठी माणसासाठी क्लेशदायक गोष्ट होती ती. पण त्याकाळातील बाळासाहेबांची व्यंगचित्रे ही सर्जनशीलतेचा कळस गाठणारी होती.पुढे उद्धव जेजे मध्ये माझा विध्यार्थी म्हणून आला, तेव्हा त्याच्यामुळे आमचे संबंध जवळीकीचे झाले. ते कोणालाही सांगताना ' माझ्या उद्धवचे सर ' अशी ओळख करून देत २००१ ते २०११ दरम्यान मी नवशक्ती मध्ये कलाविषयक सदर लिहित असे. त्याकाळात मी बाळासाहेबांच्या व्यंगचित्र कलेवर बरेच लेख लिहिले होते. ते नेहमी ते वाचत. अन कित्येकदा मला फोन करून त्यावर चर्चा करीत. काही वेळा हणमंते सरांना ते माझ्या लेखाविषयी सांगत.
बाळासाहेबांचा राजकारणाचा व्याप जसा वाढला, तसे त्यांना आपल्या आवडत्या कलेकडे दुर्लक्ष्य करावे लागले. याची खंत तर त्यांना नक्कीच वाटली असेल ! कारण राजकारणी लोकांपेक्षा कला क्षेत्रातील कलावंतांशी वावरताना ते किती आनंदी असत ते मी पाहीले आहे. कलावंतांच्या सान्नीध्यासाठी ते सतत आसूसलेले असत. जेव्हा टाइम्स ग्रुपने ' अशोक जैन अवार्ड ' या समाज शिक्षण जाहिरात पुरस्कार समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून त्यांना आमंत्रित केले होते, तो समारंभ जेजेच्या प्रांगणातील हिरवळीवर आयोजित केला होता. त्यादिवशी आम्हाला कलेवर खुसखुशीत मल्लीनाथी करणारे बाळासाहेब दिसले होते. संपूर्ण इंग्रजी मधून केलेल्या त्यांच्या त्या भाषणांमधून त्यांनी कलेवरील आपले मौलीक विचार प्रकट केले. नंतर ते उपस्थित कलाकारांसोबत हास्य विनोद करीत मनमुराद आनंद लुटत होते. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमूळे जणू ते लोकांपासून एकदम कडेला पडले होते. पण जेव्हां जेव्हां संधी मिळे, तेव्हां ते पूर्णपणे त्यात समरस होत असत. बाळासाहेबांनी आपल्या ताकदीचा कधीच बडेजाव मिळवला नाही. अगदी नवख्या व्यक्तीशी देखील त्यांचे बोलणे सौहार्दाचे असे. सभेमधून डरकाळी फोडणारे बाळासाहेब प्रत्यक्ष जेव्हां समोर भेटत, तेव्हां त्यांच्यातून जाणवे तो एक मिस्कील व हसरा असा व्यंगचित्रकार. एक कलाकार, ज्याच्या कलेला तोड नव्हती. एखाद्याला चिमटा घ्यायचा असेल तर, मिस्किलपणे हसत घेत. त्यामुळे ते स्पष्टवक्ते, निर्भीड असले तरी दुसऱ्याचा मान राखीत हे दिसून येत असे. एखाद्या समारंभ जरी ते भेटले, तरी अगत्याने विचारपूस करीत. इतरांशी ओळख करून देत. ' सामना ' वृत्तपत्र सुरु केले तेव्हां सामनाने सार्वजनीक गणेश स्पर्धा सुरु केल्या त्यासाठी त्यांनी मुद्दाम मोहन वाघ, कमल शेडगे व मी अश्या तिघांना त्याचे अंतीम निवड करण्यासाठी सांगितली. एका रविवारी प्रभादेवीच्या ' रवींद्र नाट्य मंदीर ' मध्ये पारितोषिक वितरण समारंभ होता. त्यावेळी आम्हा परीक्षकांचाही सत्कार करण्यात आला. प्रदीप भिडे हे समालोचन करीत होते. सर्वाप्रमाणे प्रदीप भिडेंनी माझे नाव पुकारले, मी स्टेजवर गेलो. तेथेच बाळासाहेबांनी मला थांबवून प्रदीप भिडेंना जवळ बोलावले व त्यांना म्हणाले, हे कोण आहेत माहीत आहे का ? जेजे स्कुल ऑफ आर्टचे डीन आहेत ते . त्याप्रमाणे त्यांचे नाव सांगा. व प्रदीप भिडेंनी पुन्हा माझ्या नावाची नवीन घोषणा केली.
मनाने कलावंत असलेल्या बाळासाहेबांनी स्वतः कधीच कोणत्या सन्मानाचा, पारितोषिकांचा विचार केला नाही. उलट त्यांनी ती इतर योग्य कलाकार, साहित्यिक मंडळींना ती मिळावीत यासाठी ते प्रयत्नशील असत. त्यांच्या सरकारच्या कारकीर्दीत महाराष्ट्र शासनाने ' महाराष्ट्र भूषण पुरस्कार' जाहीर केला, व पहील्याच पुरस्कारासाठी बाळासाहेबांचे नांव ठरविण्यांत आले. पण बाळासाहेबांनी त्याला स्पष्ट नकार दिला व सदर पुरस्कार जेष्ठ साहित्यिक व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांना त्यांनी द्यायला लावला. पुढे त्यावर थोडेसे रामायणही घडले. दुसरी गोष्ट होती ' दयावती मोदी फौंडेशन ‘ यांचा कलावंतासाठी देण्यांत येणाऱ्या दयावती मोदी पुरस्काराची. मोदीनगर मधील हा मानाचा पुरस्कार बाळासाहेब ठाकरे याना द्यायचे ठरले. पण त्याही वेळेला बाळासाहेबांनी त्याला नकार दिला व तो पुरस्कार थोर चित्रकार रवी परांजपे यांना त्यांनी देववीला. असे क्वचीतच कोणाच्या बाबतीत जाणवेल !
मी ज्यावेळी संस्थेत चित्रकार गोडसे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले, तेव्हा बाळासाहेब आवर्जून आले. गोडसे यांच्या चित्रातील बारकावे, शरीर सौष्ठव, रेषेतील प्रवाहीपणा या सर्व बाबी त्यांनी तपशीलवार सांगितल्या. गोडसेंच्या ॲनाटामीचा अभ्यास पाहून ते म्हणाले, एवढा जबरदस्त शरीर सौष्ठवाचा अभ्यास केलेल्या या कलाकाराची चित्रे अभ्यासली तर कोणाला व्हिक्टर पेर्र्ड च्या ॲनाटामीच्या पुस्तकाची गरजही पडणार नाही. मी शेजारीच डीन बंगल्यामध्ये रहात होतो. त्यावेळी मी त्यांना घरी येण्याविषयी सांगितले. पण अचानक प्रचंड पावूस सुरु झाल्यामुळे ते निघून गेले. पुढे दलालांच्या प्रदर्शनाच्या वेळी ही संधी मला मिळाली. त्यावेळी त्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने रविवारी संस्था बंद असल्याच्या वेळी मी बोलाविले. दलालांची चित्रे पाहून झाल्यावर ते घरी आले. त्यांच्यासोबत कारगिल मध्ये पराक्रम गाजविलेले ब्रिगेडीअर हून होते. बराच वेळ चित्रकलेवर बोलणे झाले. डीनचा बंगला त्यांनी संपूर्ण पाहीला. दोनच दिवसांनी त्यांचा वाढदिवस असल्याने मी पुष्पगुच्छ देवून त्यांना शुभेच्छा दिल्या. सुमारे दोन तास जुन्या चित्रांवर, त्यातील आशयावर त्यांनी संभाषण केले.
एकदा उद्धवच्या वाढ दिवसाला मी, नरेंद्र विचारे, डॉ. बारदेस्कर असे मातोश्रीवर गेलो. उद्धवने आम्हाला आतमध्ये एका खोलीमध्ये बसविले. थोड्याच वेळात बाळासाहेब आले, आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या, त्या अर्थातच त्यांच्या व्यंगचित्रांवर. मी त्यांना अगदी मार्मिकच्या पहिल्या अंकापासूनच्या चित्रांची आठवण करून देत होतो, ( कारण त्यांची सर्वच व्यंगचित्रे माझ्या स्मृती पटलावर कायमची कोरली गेली आहेत ) आणि बाळासाहेब आपण कोणत्या परिस्थितीत ती काढली हे सांगत होते. नंतर ते थोडे थांबले, आपला हाताचा तळवा न्याहाळत होते . म्हणाले, ' आता वाटते की माझीच आहे का ही रेषा ? आता सराव राहिला नाही. त्यामुळे हे आता जमेलसे वाटत नाही.' पण काही दिवसातच त्यांनीच या प्रश्नाचे उत्तर आपल्या कलाविश्कारामधून दिले. राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन नेहरू सेंटर मध्ये भरले होते. त्याचे उदघाटन चित्रकार हुसेन व बाळासाहेब यांच्या हस्ते ठेवले होते. इझलवर मोठे असे दोन क्यानव्हास ठेवले होते. हुसेन यांनी घोड्याचे चित्र काढले. नंतर बाळासाहेब उठले. त्यांना स्टेजवरील एका व्यक्तीचे व्यंगचित्र काढण्याची विनंती करण्यात आली. स्टेजवर लता मंगेशकर, माधुरी दीक्षित, मनोहर जोशी असे मान्यवर होते. बाळासाहेबांनी सर्वांकडे पाहीले, अन म्हणाले, ' हुसेन बरा आहे.' क्षणभरच त्यांनी हुसेनला पाहीले. हातामध्ये मोठे स्केच पेन घेतले अन केवळ पाच मिनिटात हुसेन क्यानव्हासवर साकारला. आपले हात अजूनही तेवढेच समर्थ आहेत हेच बाळासाहेबांनी त्यावेळी दाखवून दिले.
भारत सरकारच्या पद्म पुरस्काराच्या वेळी ' पिंपळ पानाचे वितरण ' नावाचा लेख लिहून स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांची नावें ते केवळ कॉंग्रेस विरोधी असल्याने भारत रत्नासाठी विचारात घेतली नसल्याचे लिहिले होते. अन्यथा सुमार लोकांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अगदी वाजपेयींच्या काळात देखील जयललितांची मर्जी राखण्यासाठी एम. जी. रामचंद्रन याना भारत रत्न देण्यांत आले. त्यादिवशी तो लेख वाचून साहेबांचा सकाळीच फोन आला. म्हणाले, राजाध्यक्ष, मला असले पुरस्कार नको आहेत.असल्या राज्य कर्त्यांकडून कशाला हवेत हे ! त्यावर मी म्हटले, साहेब तुम्हाला याची जरुरी नाही. पण आमच्या सारख्या तुमच्या भक्तांना वाटते की अश्या सन्मानाने तुम्ही नव्हे, तर या पुरस्काराचा मान मोठा होईल. त्यादिवशी त्यांनी मला म्हटले, मला तुमच्याशी कलेवर बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. एके रात्री आपण मी, तुम्ही व उद्धव असे तिघेच भेटू. बाकी तेथे कोणीच नसेल. मी उद्धवला सांगतो. मला जेवणांत काय आवडते याचीही त्यांनी विचारणा केली. पुन्हा पुढे दोन वेळा त्यांचा याच संदर्भात फोन आला. पुढे अश्या काही घटना घडत गेल्या की, तो योगच आला नाही. एका महान व्यक्तीशी घडणाऱ्या संवादाला मी मुकलो होतो !
बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने जे लोकांचे प्रेम मिळवले, त्यांच्या एका शब्दांवर तुटून पडणारे सहाध्यायी त्यांनी मिळवले, बाळासाहेब ठाकरे हे दोन शब्द लोकांना गुंगवून टाकण्याची ताकद ठरले होते, हे भाग्य अजूनतरी या देश्यात कोणालाही मिळू शकले नाही, हे त्रिवार सत्य आहे. बाळासाहेब आज माझेच नाहीत तर लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवून 'हृदयस्थ' झाले आहेत. अश्या या सर्जनशील, चतुरस्त्र, कलावंताचे, महामानवाच्या आयुष्यातील काही क्षण माझ्या वाट्याला आले हे मी माझे भाग्य समजतो !
- मं. गो. राजाध्यक्ष




खुप खुप धन्यवाद सर माहीत नसलेले अनेक पैलु उलगडुन दाखवलेत
ReplyDelete