जे.जे.ची टूर आणि बेर्डेची 'टुरटूर'




सहलीला जाणे हा प्रत्येकाच्या जीवनांतील एक उत्साहाचा आणि मनोरंजनाचा प्रसंग असतो. मग ती सहल शालेय जीवनातील असो वा महाविद्यालयीन ! त्या त्या वयातील ते आनंदाचे क्षण असतात. सर्वच शाळा कॉलेजीस यात कार्यरत असतात. सर जे.जे. उपयोजीत कला महाविद्यालयातही सहलीला तसे प्राधान्य असते. मात्र येथे जी वार्षीक सहल जाते ती केवळ मजा लुटण्यासाठी अथवा फिरण्यासाठी नव्हे, तर अभ्यासाचाच एक भाग म्हणून जाणारी ती ' स्टडी टूर ' असते. अर्थातच ही स्टडी टूर विद्यार्थ्यांचे प्रमूख आकर्षण असते. शासनातर्फे खर्चाचा काही वाटा उचलला जात असल्याने सर्व साधारण विद्यार्थ्यांनाही भारतभर निरनिराळी ठिकाणे पाहण्यास, अभ्यासण्यास, व चित्रीत करण्यास संधी मिळते. यामध्ये ल्यांडस्केप, स्केचिंग, छायाचित्रण अश्या सर्वच माध्यमातून अभ्यास करायचा असतो. आणि टूर संपवून आले की सर्व विद्यार्थी आपापल्या कामाचे प्रदर्शन संस्थेत मांडत असतात.  ही सहल जेव्हां जाते, तेव्हां विद्यार्थ्यांसोबत प्रमूख म्हणून एक प्राध्यापक, त्याच्या मदतीला विद्यार्थी संख्येनूसार इतर अध्यापक वर्ग, शिपाई असा लवाजमा असायचा. आणि या सहलीतून काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते अरुणाचल प्रदेश असा सर्व भारत या विद्यार्थ्यांनी पाहीला, अनुभवला आणि चित्रितही केला.

जे.जे.ला कलेसोबतच साहीत्य-नाट्य -संगीत -काव्य नृत्य अश्या कलांची संघटीत परंपरा आहे. येथूनच अमोल पालेकर, श्रीकांत मोघे, नाना पाटेकर, मुस्ताक मर्चंट, रमेश तिवारी, अशोक ताटे असे कलाकार बाहेर पडले. सुचेता भिडे सारखी नृत्यांगना येथीलच व मीना नाईक सारखी अभिनेत्री देखील याच संस्थेतील ! लेखन, अभिनय, दिग्दर्शन, गायन याची आवड असलेल्याना येथे भरपूर वाव मिळतो. उपयोजीत कला आणि रंगभूमी यांचे नातेही अत्यन्त जवळचे ! येथे आपण ज्याला व्हिज्युलायझेशन म्हणतो, तीच गोष्ट रंगभूमीवर दिग्दर्शन म्हणून पाहीली जाते. यामुळेच दामू केंकरे यांच्यासारखे कलावंत दोन्ही ठिकाणी यशस्वी झाले. दोन्ही कलांचा फॉर्म फक्त वेगळा असतो. पण उद्देश एकच असतो. आणि यामुळेच येथील विद्यार्थ्यांकडून जाहीराती लिहीताना नाटकाचे स्क्रिप्ट पण लिहीले जाते, कॉपी लिहीताना काव्य पण लिहीले जाते. व्हिज्युलायझेशन करतांना अभिनय देखील केला जातो, आणि आर्ट डायरेक्शन करतांना दिग्दर्शन पण केले जाते ! अश्या एकमेकांच्या हातात हात घालून ह्या कला वाटचाल करीत असतात.


दरवर्षी जे.जे. मध्ये दरवर्षी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अश्या प्रकारे कलानी यूक्त असलेले विद्यार्थी असतातच ! अशीच एक विद्यार्थ्यांची तुकडी १९७५ साली या संस्थेत सामील झाली. थोडेसे बंडखोर, थोडे  टवाळ, थोडे व्रात्य तर बरेचसे कामसू , सर्जनशील  मानावेत असे हे विद्यार्थी होते. यातील कांही म्हणजे रघुवीर कुलकर्णी, नलेश पाटील, पुरुषोत्तम बेर्डे, अशोक वंजारी, राकेश शर्मा, हेमंत शिंदे, अशोक साळगांवकर, विजय रायकर, विजय ताडफ़ळ इत्यादी, प्रत्येकाची काहींना काही खासीयत होती. कोण उत्तम लिहायचं, कोण गायचा, कोणाला काव्य स्फुरत असे तर कोणी वाद्य वाजविण्यात वाकबगार असे. आणि त्यात त्यांना संगत लाभली ती पवार सरांची, जे अशा विद्यार्थ्यांची आतूरतेने वाट पहात असत. आणि ही बनली जे.जे.ची एक क्रिएटीव्ह टीम, सर्व विषयांत हिरीरिने भाग घेणारी, मग ते पहीले गेट टू गॅदर असो, कॉलेज निवडणूका असोत किंवा वार्षीक प्रदर्शन असो. सर्वच प्रकार गाजवणारे. आणि त्या वर्षीची कॉलेजची स्टडी टूर जाण्याचे ठरले. १९७६ साली निघालेल्या या स्टडी टूरचे ठिकाण होते विजापूर-हळेबीट-बदामी ही ठिकाणे. त्या सहलीचे प्रमूख होते प्रा. वसंत टिकेकर. एक  जेष्ठ अध्यापक. टिकेकर हे सर्वच विद्यार्थ्यांशी वय विसरून मिळून मिसळून वागत असत. अर्थात थोडेसे हेकेखोरही होते. शिस्तीचे भोक्ते. स्वतःला हवे तेच करून घेणारे. पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना हवे नको ते पाहणारे, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणारे असे होते. आणि विद्यार्थीही त्यांच्याशी सलगीने वागत. त्यांना मदतीला होती त्या वेळची काही तरुण अध्यापक मंडळी, जी जवळपास विद्यार्थ्यांच्या मागेपुढे असलेली. यात होते दत्ता पाडेकर, अनंत कुलकर्णी, आणि फोटोग्राफीचे जतकर सर. जतकारांच्या मोठाल्या आकडेबाज मिशा आणि गळ्यातील कॅमेरे यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व उठून दिसत असे. पाडेकर दिसायला अगदी साळसूद पण तितकेच व्रात्यपणा करणारे होते. एकदम मिश्कील स्वभावाचे ! स्वतः गंभीर चेहरा करून साळसूदपणे दुसऱ्याची फजिती व्हावी अश्या तऱ्हेने बोलून इतराना त्याची गंमत घ्यायला लावीत असत.

सहलीच्या दरम्यान सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर बाहेर कामासाठी जायचे असे, त्यावेळी प्रा. टिकेकर कामाची अगदी व्यवस्थीत आखणी करीत. पण कित्येकदा त्यांची शिस्त विद्यार्थ्यांना जाचक होत असे. त्यात हा टूरचा मूड. त्यातही पाडेकर हे स्टाफवर असले तरी अश्या गोष्टी करण्यात विद्यार्थ्यांच्या पुढे एक पाऊल असत. अर्थात टिकेकरांच्या फिरक्या घेण्यात त्यांचा मोठा सहभाग असे. पण त्यामुळे जे जे काय होईल ते सर्वच पाडेकरांवर शेकले जात असे. टिकेकर सरांनी सर्व विध्यार्थ्यांच्या नावांची यादी करून एका पुठ्ठयाच्या फाईलला क्लिप लावून ठेवली होती. प्रवासात असताना ही फाईल ते बसच्या वरच्या रॅक वर ठेवीत असत. एकदा ती फाईल बसच्या हादऱ्याने सरकत सरकत खाली पडली. उतरतांना टिकेकरांना ती फाईल दिसली नाही, त्यावर अर्थातच त्यांनी पाडेकरांना जबाबदार धरून ताणायला सुरुवात केली. वाटेत एका नदीकडे बस थांबली. सर्वजण बसमधून खाली उतरले.  विद्यार्थ्यांची मोजणी करण्यास त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर उभे करून पाडेकरांना सांगितले, पाडेकर, मोजा पाहू ! ' आणि टिकेकर आपल्या कामाला लागले. एवढ्यात मागून हास्याचा एक मोठा दणका उडाला. टिकेकर वळून पाहतात तो पाडेकर आपल्या पायातील मोजा काढून दाखवीत होते.  याचा परीणाम झाला तो असा की, टिकेकरांनी सर्व विद्यार्थ्यांना बसमध्ये चढवले. व पाडेकर आत शिरण्याआधीच बस सुरु झाली. पण इकडे पाडेकर शांत होते. कारण त्यांना माहीत होते की, सर्व जबाबदारी टिकेकरांचीच असल्याने ते नक्की परत येणार. आणि थोड्याच वेळांत बस परत आली अन पाडेकरांना घेऊन गेली.


शाब्दीक कोट्या, नेहमीच्या सरावातील शिव्या, द्व्यर्थी बोलणे, एकमेकांवरून केलेले विनोद हे टूरमध्ये नित्याचे असे. अर्थात कामही तितक्याच जोमाने चालू असे. रोज सायंकाळी परत आल्यावर प्रत्येकजण इतरांपेक्षा आपण काय वेगळे केले आहे, याची पहाणी करीत असे. कारण परत आल्यावर संस्थे मध्ये सर्व कामाचे खास असे प्रदर्शन भरवले जाई व त्यातील कामांना बक्षिसेही दिली जात असत. टूरला निघताना टूरमध्ये जर का कोणाला बरे वाटले नाही, अथवा कोणी आजारी पडले तर त्यासाठी प्रथमोपचाराची पेटी बरोबर असे. टिकेकरांनी त्याकाळात प्रसीद्ध असलेल्या ए.पी.सी. या गोळ्या सोबत घेतल्या होत्या. कोणाचे डोके दुखले, झोप लागली नाही, पोटदुखी असेल तर प्रत्येक बाबीवर ते ए.पी.सी. गोळया घ्यायला लावीत. पुढे पुढे टूरमध्ये ही बाब एवढी प्रसिद्धीस आली की, तो एक टिंगलीचा विषय झाला. जर का एखाद्याचे ल्यांडस्केप बिघडले तर सर्व विद्यार्थी एका सुरात ओरडत ' घे ए.पी.सी. ' ! आणि हास्याचा महापूर लोटत असे. सर्वच विद्यार्थी रात्री झोपत नसतंच ! एखाद्याला जर झोप आली आणि तो एका कोपऱ्यात झोपला तर इतर सर्वजण त्याला ' झोपा रे ' चा गजर करून भंडावून सोडत. या टूरमध्ये शिक्षक फक्त टिकेकरच राहीले अन बाकीचे सर्व अध्यापक इतरांबरोबर विद्यार्थीच बनले. दुरावा गळून पडला. मैत्रीचे धागे गुंतले गेले.

ह्या टूरमध्ये विद्यार्थ्यांना एकदम स्वातंत्र्य मिळाले ते यामध्ये केवळ मुलेच होती. मुली अजीबात नव्हत्या. सर्वच जण मोकळेपणाने वावरत होते. एक दिवस तोंडातून सतत बोली भाषेतील आवडत्या शिव्यांनी सुरुवात करणाऱ्या या सर्वच विद्यार्थ्यांनी ' सौजन्य दिवस ' पाळायचा ठरवीला. त्या दिवशी कोणीही तोंडातून शिवी उच्चारायची नाही हा त्या दिवसाचा संकेत ठरला. संपूर्ण दिवसभर उपवास केल्याप्रमाणे सर्वांचे चेहरे निस्तेज झाले होते. कामामध्ये नेहमीचा उत्साह वाटत नव्हता. अखेर एकदाचा दिवस सरला. रात्री सर्वानी एकत्र जमून एका सूरात ' आयचा घो ' म्हणून सौजन्य दिनाचे पारणे फेडले. व सर्वजण परत पूर्व स्थितीत  एकदाचे  आले. दिवस जात होते. पाडेकरांचे भाबडेपणाने दुसऱ्यांना गंडवणे नेहमीप्रमाणे सुरूच होते. टिकेकरांचा पारा वाढवीत होता. जतकर आणि त्यांचे कॅमेरे आपली कामे पार पाडत होते. मधून मधून खिशातील तंबाखूची डबी काढून तो हातावर मळून त्याची गोळी दाढेत धरली की त्यांचीही रसवंती वाहू लागे. टिकेकरांच्या ते जेव्हां फिरक्या घेत तेव्हां त्यांनाही कळत नसे की आपली फिरकी घेतं आहेत जतकर. सर्वच खेळीमेळीत चालले होते.

टूर आता शेवटच्या टप्प्यात आली होती. एका लहानश्या गावांत मुक्काम होता. सर्वजण ल्यांडस्केपला जायच्या तयारीत होते. त्या दिवशी सर्वांनीच टिकेकर सरांशी जेवणानंतर ' स्वीट डीश ' चा हट्ट धरला. पण गांव छोटेशे. त्यामुळे तेथे कांही मिळण्यासारखे नव्हते. पण आपण या सहलीत या मुलांचा हट्ट पुरवला नाही तर ती रुखरुख कायमची मनांत राहील म्हणून टिकेकर त्या दिवशी स्वतः मुलांसोबत  बाहेर गेले नाहीत. सर्व विद्यार्थी बाहेर पडल्यावर टूरची बस घेऊन, सोबत शिपायाला घेऊन टिकेकर सर शेजारच्या गांवी गेले. तेथे उपलब्ध असलेली बरीचशी फळे त्यांनी विकत घेतली. मुक्कामावर येऊन ती सर्व फळे स्वतः सोलली. भरपूर दूध घेऊन त्यामध्ये ती घालून सरांनी त्याचे ' फ्रुट स्यालेड ' बनविले. विद्यार्थी काम करून परतले. सर्वांनी मुकाट्याने जेवण केले. तोंपर्यंत टिकेकरांनी कोणालाही थांगपत्ता लागू दिला नव्हता. जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांना बोलाविले. आणि फ्रुट स्यालेड त्यांच्या समोर ठेवले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. मात्र सर्वच विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. वडीलधारे माणूस कश्या मायेने आपल्याला सांभाळते, याची जाणीव त्यांना झाली होती. आणि टिकेकर एका तृप्त समाधानाने भारावले होते. आपण आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांचा हट्ट वडीलकीने पुरवू शकलो याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होते.


अशी एकंदरीत मजेत चालली होती ही जे.जे.ची टूर. सर्वत्र मजा होती. खाणे,पिणे, जेवण सर्वच चांगले होते. हॉटेलच्या मालकांपासून ते बसच्या ड्रॉयव्हर पर्यंत सर्वच विध्यार्थ्यांच्या मनाशी एकरूप झाले होते. येतांना मुलांनी एक ढोलकी आणली होती. तिच्या नादावर गाण्यांचा जल्लोष सुरु असे. ही टूर कधी संपूच नये हीच एक जाणीव सर्वांच्या मनांत उमलली होती. एवढ्यात सर्वाना जाणीव झाली की, टूरचा कालावधी संपुष्टात आला. आता परतीची वाट सुरु झाली. आणि इतके दिवस आनंदात नाचत बागडत असलेल्या विद्यार्थ्यांचा धीर सुटला. केवळ आठवणी राहील्या प्रेमळ धाकाच्या, टिकेकरांच्या शिस्तीच्या, एकमेकांशी केलेल्या थट्टामस्करीच्या, केलेल्या कामाच्या ! आणि ज्या धडाक्याने ही टूर निघाली होती, ती परततांना मात्र प्रत्येकाचे मन भावनांच्या कल्लोळांनी भारले होते. शेवटी बस परतीच्या वाटेने निघाली. नेहमीप्रमाणे जतकर ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. तेथूनही त्यांच्या कॅमेऱ्याने ते बाहेरील दृश्य टिपीत होते. काळे शिपाई बसच्या मध्यभागी दांड्याला धरून उभा होता. अचानक ड्रॉयव्हरने ब्रेक लावला, अन काळे वेगाने जो पुढे आला तो थेट जतकारांच्या अंगावर येऊन कोसळला. आणि जतकरानी काळेकडे तंबाखूची डबी मागीतली. डबी देता देताच काळे पुटपुटला, 'तंबाखूचं पाहीजे होता तर इथून वराडला असता तरी आणून दिला असता. त्यासाठी ब्रेक लावून येथवर आणायची काय गरज होती ?'

शेवटी सर्वजण मुंबईला आले. रीतसर वर्ग सुरु झाले. यावेळी संस्थेच्या सोशलसाठी एकांकीका स्पर्धा होत्या. पुरुषोत्तम बेर्डेने या टूर वर स्क्रिप्ट लिहिले. त्याची सुरुवातच होती,  टूर निघाली, टूर निघाली, क्षणांत इकडे क्षणांत तिकडे ! या टूरचा सर्व प्रवास अगदी खुमासदार रीतीने पुरुषोत्तमने यात मांडला होता. यातील पात्रेही मूळ पात्रांशी साधर्म्य राखणारी होती. यामध्ये टिकेकरांचे झाले प्रा. सुटेकर, पाडेकरांचे झाले वाडेकर, जतकारांचे मटकर, कुलकर्णी झाले नाडकर्णी आणि या नाटकाचे नावं होते, ' स्टडी टूरसे -बडी दुरसे !' पुढे नामांतर झाले " टूर टूर " ! आंतर महाविद्यालयीन स्पर्धांत ह्या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. पुढे ते रंगभूमीवर आले. सुरुवातीला एकही स्त्री पार्ट नसलेल्या या नाटकांत मग स्त्री पार्ट आला. आरंभाला यात नेपथ्यही नव्हते. पण केवळ हावभावावरून सर्वजण उत्कृष्ट परीणाम साधत असत. आता तर ते नाटक जोमाने सुरु आहे.

या नाटकामूळे सुधीर जोशी, विजय कदम, लक्षुमीकांत बेर्डे, पुरुषोत्तम बेर्डे, या सर्वांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. पुढे या सर्व नाट्यवेड्या कलाकारांनी ' या मंडळी सादर करू या ! ' ही नाट्यसंस्था षांताराम पवार ह्या त्यांच्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली. यांच्या नाटकांच्या तालमी आर्ट स्कुल मध्ये चालत. व आर्ट स्कुल बंद असल्यावर त्या कधी कॅम्पस मधील हणमंते सरांच्या डीन बंगल्यावर तर कधी दादरच्या कीर्तिकर मार्केट जवळ होत. अशी ही जे.जे. उपयोजीत कला संस्थेची सुमारे ४३ वर्षांपूर्वी निघालेली टूर जीवाला चटका लावून परतली आणि बेर्डेच्या लेखन स्पर्शाने बऱ्याच गुणी कलाकारांना पुढे आणण्यास कारणीभूत ठरली.

( टूरटूरचे बोधचित्र :  श्री अनंत कुलकर्णी )

- मं. गो. राजाध्यक्ष


Comments

  1. झक्कास वाचनीय टुर.

    ReplyDelete
  2. व्वा!! मजा आली लेख वाचून...नाटक बघताना आली होती तशीच!! 👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

माझे वडील कलाकार होते :

अक्षरांची प्राचीन सौंदर्यदृष्टी जपलेला कला प्राध्यापक : प्रा. रमेश खापरे.