जे.जे.तील माझे केंकरे सर
दिनांक ५ मे १९१८ रोजी गोव्यातील मडगांव येथे जन्मलेल्या दामू केंकरे यांच्याशी माझा संबंध आला तो, १९६२ साली. ड्रॉईंगची आवड असल्याने शालान्त परीक्षेनंतर मुंबईला सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टला जायची माझी इच्छा होती. बॅ. नाथ पै हे माझ्या ज्येष्ठ बंधूचे मित्र. त्यांचे मामा वि.ना. आडारकर हे जेजेचे डीन होते. त्यांना माझ्या प्रवेशविषयी नाथ पैनी सांगितलेच होते, शिवाय केंकरे याना त्यांनी यावर लक्ष ठेवायला सांगितले असल्याने नाथ पै ज्यांच्याविषयी सांगतो तो राजाध्यक्ष हा आहे तरी कोण? अशी केंकरेंना उत्सूकता होती. आणि मी प्रथम वर्षात प्रवेश घेतला अन सुदैवाने दामू केंकरे अर्थात आमचे केंकरे सरच आमचे वर्गप्रमूख म्हणून आले. गौर वर्णाचे, देखणे, आणि प्रसन्न व्यक्तीमत्व असलेले केंकरे गळ्याला रुंद असा टाय बांधीत. उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये मोठाली अशी जाड गनमेटलची अंगठी, जोडीला अनामिकेमध्ये नटराजाची चांदीची अंगठी असे. कपडयांच्या बाबतीत अत्यंत चोखन्दळ असे त्यांचे लाघवी व्यक्तीमत्व अधीकच खुलून दिसत असे.
केंकऱ्यांच्या आतील चित्रकलाही रंगभूमीइतकीच उफाळून येत होती. स्कुल ऑफ आर्ट मधील वातावरण त्यांना तेवढ्याच प्रकर्षाने स्वतःकडे आकर्षून घेत होते. ह्याचीच परीणीती केंकरे एलफीन्स्टन काॅलेज मधून सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधील पेंटींग विभागात दाखल होण्यात झाली. या काळात भारतीय विद्याभवन तर्फे आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा सुरु झाल्या होत्या. अनेक पदवी अभ्यासक्रम राबविणारी महाविद्यालये यात भाग घेऊ लागली. पण जेजे मध्ये पदवी अभ्यासक्रम नसल्याने जेजेला त्यात प्रवेश नव्हता. तेव्हां केंकरे यांनी त्यांना पटवून दिले, जेजेचा अभ्यासक्रम हा इतर कॉलेजशी समकक्ष असून त्यालाही शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन यावे लागते. याचवेळी साबुसिद्दिक पॉलिटेक्नीकचा एक तरुणही या नियमाने ग्रासला होता. त्यानेही केंकरेंना साथ दिली. आणि या दोन्ही संस्थांना भवन्सच्या स्पर्धामध्ये भाग घेण्यास परवानगी मिळाली. हा साबुसिद्दिकीचा नाट्यवेडा तरुण होता नंतर चित्रपटसृष्टीत नावारूपाला आलेला कादरखान. ह्यानंतर केंकरे पेंटींग मधून उपयोजीत कलेमध्ये आले. पुढे ते जेजे मध्ये प्राध्यापकही झाले. तेथे काम करतांना त्यांचे एक सूत्र होते ' शिक्षक हा मुलांना शिकविण्याऐवजी त्यांच्याकडून स्वतः शिकत असतो.' विद्यार्थी दशेत केंकरे चौकस स्वभावाचे असल्याने शिक्षक वर्गाशी, सोबतच्या विद्यार्थ्यांशी ते सतत चर्चा करीत असत. वैचारिक देवाणघेवाण होत असे. पुढे ते अध्यापक झाल्यावर विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. नंतर भवन्सच्या नाट्यस्पर्धांमध्ये जे.जे. या नावाचा एक दबदबा निर्माण झाला. दर वर्षी जे.जे.ला बक्षीस हे ठरलेले असायचेच ! आणि जे.जे.च्या कपाटात ट्राॅफींची रांग लागली.
उपयोजीत कला अभ्यासक्रम कसा राबवावा याचा अभ्यास केंकरे सरांनी खोलवर केला होता. सर्व कला एकमेकांना पूरक असतात व त्यासाठी त्या एका छत्राखाली असाव्या लागतात, ह्या उद्देशाने केंकरे ह्यांनी जे.जे.मध्ये एक चर्चासत्र आयोजीत केले. त्यामध्ये संगीतासाठी पं. जितेंद्र अभिषेकी, नृत्यासाठी पार्वतीकुमार, नाटकासाठी के. नारायण काळे अश्या व्यक्तींना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. नेमके ह्याच धर्तीवर मारुतराव कन्नमवार हे मुख्यमंत्री असतांना राज्याच्या सांस्कृतीक खात्यातर्फे ' राज्य कला अकादमी' ची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न केला होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या समितीमध्ये आचार्य अत्रे, ग.दि.माडगूळकर, पु.ल.देशपांडे, दुर्गाबाई खोटे, भाऊसाहेब नेवाळकर असे दिग्गज होते. केंकरे यांनी अकादमीचा आराखडा तयार केला. पण त्या काळच्या एका महीला मंत्र्याच्या अट्टाहासामुळे हा प्रकल्प शेवटी कागदावरच राहीला. पुढे तो केंकरेंनी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर ह्यांच्या नजरेला आणला. बांदोडकरांसारख्या कलासक्त व अनुभवी माणसाच्या नजरेने त्यांचं महत्व एका क्षणांत हेरलं. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची योजना आवाक्यातील नव्हती, त्यामुळे बांदोडकरांनी त्यांना ती गोव्याला योग्य ठरेल अशी बनवीण्यास सांगीतली. केंकऱ्यानी त्यात विशेष लक्ष घातले. त्यांचे मित्र वास्तूविशारद चार्ल्स कोरिया यांनी इमारतीचा संपूर्ण आराखडा तयार केला. आज पणजीमध्ये मिरामार येथे दिमाखात उभी असलेली कला अकादमीची वास्तू हे त्याचेच फलीत आहे. केंकरेंनी कांही वर्षे तेथे सचीव म्हणून काम केले,पण पुढे मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे केंकरेंनी तेथे रामराम ठोकला.
एक शिक्षक हवा. त्यासाठी बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असेल तर येथील विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी, त्यासाठी सोयी सुविधा पण पुरवाव्यात. केंद्र सरकारने ही योजना मान्य करून संस्थेला पाच मजली इमारत बांधून दिली व विद्यार्थी तसेच शिक्षकांची संख्या पण वाढली. त्यावेळी अभ्यासक्रम परीपूर्ण व्हावा या हेतूने संस्थेमध्ये इंटेरीअर डेकोरेशन, फोटोग्राफी असे जोड अभ्यासक्रम सुरु केले. अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. जे.जे. मधील अभ्यासक्रम हा केवळ जाहीरात विषयाचा माणूस तयार न करता तो जाहीरात संकल्पनाकार ( डिझाईनर ) व्हावा त्याला आवश्यक ते ज्ञान मिळावं म्हणून संस्थेच्या नवीन अभ्यासक्रमासाठी जाहीरात कलेवर डॉ. रेगे यांच्याकडून त्यांनी ' जाहीरात कला व कल्पना ' हे पुस्तक लिहून घेतले. तसेच उपयोजीत कलेचा विनियोग अन्य कारणासाठी कसा करायचा याचा सतत विचार केला. १९६२ च्या चिनी आक्रमणाच्या वेळी जे.जे.ने भव्य असे ' आमचा हिमालय ' हे प्रदर्शन भरवीले. पं. नेहरूंनी त्याचे उदघाट्न करून तारीफ केली होती. १९६५ साली ' आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा ' हे प्रदर्शनही जे.जे.नेच भरविले होते. या दोन्ही प्रदर्शनांत केंकरेंचे योगदान होते.
या केंकरे सरांना शासनाने सांस्कृतीक खात्याचे संचालक म्हणून नियुक्त केले, तेव्हां नाट्य-चित्रपट क्षेत्रांतील लोकांनी आनन्द व्यक्त केला. सर्वांशीच त्यांचे प्रेमाचे अन जवळीकेचे संबंध. केंकरे सरांच्या नाट्य-कला-साहित्य-चित्रपट अश्या क्षेत्रांतील प्रचंड जन संपर्कामुळे त्यांनी ते पद योग्य रित्या सांभाळले. त्यांच्याच कारकिर्दीत गोरेगांव येथे ' चित्र नगरी ' मोठ्या दिमाखात उभी राहीली. या चित्रनगरीच्या उदघाटन समारंभाच्या सजावटीचे काम सरानी माझ्यावर सोपवले होते. आता जेथे चित्रनगरी उभी आहे तेथे त्याकाळी सर्व जंगल होते. ट्याक्सीवालेही परतीचे भाडे घेऊनच यायला तयार होत. आजूबाजूला खाण्याचे तर सोडाच, पण चहाची टपरी पण नव्हती. या वेळी संध्याकाळ झाली की केंकरे सर आमच्यासाठी भरपूर खाणे घेऊन येत. मधून मधून त्यांच्या खिशातून तंबाखूची डबी बाहेर येत असे. मग हातावर तंबाखू घेऊन बोटाने चोळून एकदा का तोंडात गेला की थोडावेळ त्यांचे बोलणे थांबे. ही डबी मीच त्यांना गिरगांवातील श्रीधर भालचंद्रच्या दुकानातून घेऊन दिली होती. हळू हळू त्यांची तंबाखूची सवय मलाही लागली. नंतर मी बेळगांवहून तेथील खास अशी चंची घेऊन आलो. मग सकाळचा त्यांच्या दरबारांतील चहा आटोपला की चंची उघडली जायची व त्यानंतर तांबूल भक्षणाचा कार्यक्रम. त्यावेळी रोज सायंकाळी आम्ही संस्थेच्या ग्राऊंडवर व्हॉलीबॉल खेळत असू. कधी कधी सरांची गाडी निघाली की ते हात बाहेर काढून दाखवीत म्हणजे समजायचे की आज पार्टी आहे. मुंबईत स्वस्त बिअर कोठे मिळते ते सरांना माहीत असायचे. मग आम्ही सर्वजण तेथे जायचो. कधी कधी आमच्या सोबत अरुण जोगळेकर, मनोहर काटदरे हे देखील असायचे. मात्र केंकरे सरांची जीन ही आवडती होती. मग आम्हीही जीन घेत असू. नंतर सर्वजण निघून गेल्यावर मी व केंकरे सर कधी कधी खोताच्या वाडीतील ' अनंताश्रम ' मध्ये जेवून पुढे सर साहीत्य संघ मंदीरात व मी जिना चढून चर्नी रोड स्टेशनवरून घरी जात असे. आम्ही दोघांनी ' टायपोलॉग ' हा टाईप कॅटलॉगही काढला. अरुण नाईकने तो छापून दिला. पण पुढे केंकरे सर जे.जे.मधून गेल्यावर डॉ. रेगेनी तो हायजॅक केला. व स्वतः त्यावरून छापून विकू लागले. असे मजेदार दिवस जात होते जे.जे. मध्ये सरांच्या सहवासात!
त्या त्यांच्या कारकीर्दीत सांस्कृतीक खात्याच्या सर्वच समारंभ सोहोळ्याच्या सजावटीचे काम माझ्याकडे असे.बरेच कार्यक्रम हे रंगभवन मध्ये होत असत. या खात्याचे सर्वच मंत्री त्यांचे आधीपासूनचे मित्र होते. पण त्यांचे हात नियमाने बांधलेले असल्याने केंकरेंचे जे ध्येय होते, ते साध्य होईना. जे नियम महसूल खात्याला लागू आहेत, तेच कला व संस्कृतीला असू नयेत. विषयानुसार ते असावेत ही केंकरे सरांची मागणी होती. कामासाठी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. पुढे त्याची परिणीती केंकऱ्यानी त्या पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेण्यांत झाली. आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धामधून केंकरेंनी जे.जे. संस्थेचे नांव जसे कळसाला नेले, तसेच जे.जे.च्या सांस्कृतीक कार्यक्रमांना देखील एका उंचीवर नेवून ठेवले होते. दर वर्षाच्या वार्षीक स्नेह संमेलनामध्ये त्यांच्याच कल्पना आचरणात येत असत. विद्यार्थ्यांची अभिरूची वाढावी या हेतूने त्यांनी अभिजात संगीतकारांच्या गायकांच्या मैफली कायोजीत केल्या. यात
पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, शोभा गुर्टू, असे दिग्गज गायक होते. विद्यार्थ्यांनाही अश्या मैफिलींची गोडी लागली. स्टुडंट्स मजलीस मध्ये विद्यार्थी अश्या गोष्टींसाठी आग्रही राहू लागली. जोडीला भालचंद्र पेंढारकर, आशा खाडीलकर, रामदास कामत, रजनी जोशी अश्यांचे नाट्य संगीताचे कार्यक्रमही आयोजीत केले ते केवळ दामू केंकरे ह्यांचे जवळीकीचे संबंध असल्यामुळेच ! आणि यामुळे जे.जे. उपयोजीत कला संस्थेचे वार्षीक स्नेहसंमेलन हे विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक यांचे एक स्नेहसंमेलनच केंकरे सर त्या काळात जमवीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ! जाहीरात संस्थेमधील सर्वांशीच त्यांचे स्नेहाचे सम्बन्ध असल्याने त्याचाही फायदा जे.जे. ला सतत होत असे.
केंकरे सरानी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. माया दिली. आर्ट स्कुल मध्ये केंकरे असताना आम्हांला त्यांचा एक मोठा आधार वाटत असे. त्यांनी दिलेले कोणतेही काम करतांना आम्ही जर का कांही अडचणी सांगितल्या तर् ते पाठीवर थाप मारून म्हणत अरे ! मी तुमचा आजोबा येथे बसलो आहे ना ! कशाला काळजी करता ! साहीत्य संघ हे त्यांच्या बरोबरच आमचेही हक्काचे ठिकाण झाले होते. त्यांच्यासोबत जाऊन तेथे नाटक पहाणे हे ओघानेच येत असे. आमच्या सोबत षांताराम पवार सर असत, त्यांचे तर ते हक्काचे ठिकाण होते. सर्वच अभिनेत्यांशी त्यांचे जवळीकेचे संबंध असत. केंकरे सरांची नाटके असली तर मी हक्काचा प्रेक्षक होतो. जे.जे.मध्ये विद्यार्थी म्हणून येण्यापूर्वी मी त्यांची ' तुझे आहे तुजपाशी ' ' सुंदर मी होणार ' ही नाटके पाहिलीच होती. नंतर येथे आल्यावर ' घेतलं शिंगावर ' बिऱ्हाड बाजलं ' ' अखेरचा सवाल ' सूर्याची पिल्ले' ' तुघलक ' ही नाटके पाहीली, शिवाय मी निवृत्त झाल्यावर त्यांनी मला निरोप पाठवीला. त्यांचा मुलगा, विजयने ' मित्र ' हे नाटक बसविले होते. बोरीवलीच्या प्रबोधनकार नाट्यगृहात प्रयोग होता. तेव्हां केंकरे सरांनी सांगितले की तेथे गोपाळ अलगेरी असतील त्यांना तुझी दोन तिकिटे ठेवण्यास सांगीतली आहेत. आणि डॉ. श्रीराम लागूं व ज्योती चांदेकरांचे ते सुंदर नाटक मला पहायला मिळाले. केंकरे सर स्वभावाने एकदम साधे, भीडस्त दिलखुलास आणि पारदर्शक मनाचे होते. स्वभावाने मोकळे असलेले सर खिशानेही तसेच होते. कोणीही मागितले की तात्काळ काढून द्यायचा त्यांचा स्वभाव होता. आणि याच त्यांच्या भीडस्त स्वभावाचा अनेकांनी फायदा घेतला. अनेकांनी त्यांच्याकडून नाट्य व्यवसायातील कामे करून घेऊन पैशाच्या वेळी मात्र त्यांना फसवले. पण आपण होऊन आपल्या हक्काचेही मागायचे नाही, हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच अनेकांनी त्याचा फायदा उचलला.
मी अधीष्ठाता झाल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता. त्याबाजूला ते कधीही आले की माझ्याकडे आल्याशिवाय राहायचे नाहीत. त्यांचा वयाच्या साठीचा सोहळा निवडक मित्रांना बोलावून कलानगर मधील त्यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर साजरा केला होता, त्याला आवर्जून त्यांनी मला बोलावले होते. त्यावेळी श्रीराम लागू, जयवंत दळवी, मं. वि. राजाध्यक्ष, असे बरेच लोक त्या समारंभाला आले होते. अशीच त्यांची पंचाहत्तरीही त्यांच्या मित्रांनी ' दामू केंकरे मित्र मंडळ ' स्थापन करून बांद्र्याच्या शारदा संगीत विद्यालयांत मोट्या थाटामाटामध्ये साजरा केला. त्यांचा नेत्रदीपक असा सत्कार करण्यात आला. त्यावेळी नाट्य तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंतानी तेथे वर्णी लावली होती. या निमित्ताने केंकरे यांच्या कला जीवनाचा आढावा घेणारा एक ग्रंथ प्रकाशीत करण्यात आला. ' दामू केंकरे तीन अंकी गुरुकूल ' नांव असलेल्या या ग्रंथात अनेक मान्यवरांनी लेखन साहाय्य केले आहे.त्यांच्या कला प्रवासाचा विविधअंगी वेध घेण्यात आला आहे. पहीला अंक त्यांच्यातील ' नाटकवाला ' आहे. दुसऱ्या 'संस्था'नीक या अंकात त्यांचे जे.जे.उपयोजीत कला संस्थेमधील योगदान आहे, तर तिसऱ्या अंकात ' दामू केंकरे उवाच ' या त्यांच्या मुलाखती आहेत.
चित्रकार या बरोबरच एक नाट्यकर्मी असलेल्या दामू केंकरे यांनी रंगभूमीच्या दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा या सर्वच गोष्टी कलात्मक दृष्ट्या हाताळल्या. चित्रकलेच्या जाणकारीतेमुळे नाट्याशयाशी सुसंगत अशी रंगसंगती, वेशभूषा व कल्पकता त्यांनी दिग्दर्शीत केलेल्या नाटकांतून उठावदारपणे जाणवे. त्यांच्या ' स्पर्श ' या जयवंत दळवी यांच्या नाटकाचे नेपथ्य पाहून द.ग.गोडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ व बुजूर्ग चित्रकार व नेपथ्यकाराने केंकरेंना रंगमंचावर जावून साष्टांग नमस्कार घातला होता, व केंकरेंच्या कला साधनेला मनःपूर्वक दाद दिली होती. मी २००२ साली निवृत्त झालो, तेव्हां माझ्या निरोपसमारंभाला केंकरे सर आवर्जून उपस्थीत राहीले. माझ्याविषयी बोलतांना ते म्हणाले, ' अरे या राजाचे ( मला ते नेहमी राजा म्हणत ) मी काय कौतूक करू. माझा मुलगाच आहे तो ! मुलाचे कौतूक आपणच काय करायचे ? ' केंकरे सर बोलत होते आणि माझे डोळे भरून येत होते. एका पितृतुल्य माणसाचा आशीर्वाद होता तो!
केंकरे यांनी अनेक नाटके दिग्दर्शीत केली. अनेकांमध्ये भूमिका केल्या, अनेक नवोदीताना पुढे आणले. संगीत नाटक अकादमीने त्यांना पुरस्कार देऊन गौरवीले. तो पुरस्कार राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारला. शेवटच्या वेळी मी त्यांना भेटायला कला नगर मध्ये गेलो तेव्हां निघतांना ते म्हणाले, आता आम्हांला एवढ्या मोठ्या जागेची गरज नाही, त्यामुळे ही जागा विकून पुढच्या आठवड्यात पार्ल्याला जात आहोत. सध्या मला तो पत्ता नीटसा माहीत नसल्याने तेथे गेलो की मी कळवितो. मग तू तेथे ये. ललिता वहिनींनीही सांगीतले की असेच नेहमी येत जा. तुम्ही आला की त्यांनाही बरे वाटते. मी होकार देऊन आलो. वाटले नव्हते की ही शेवटचीच भेट असेल ! २८ सप्टेंबर २००८ रोजी नाट्यक्षेत्रातील या भीष्माचार्याने या जगाच्या रंगभूमीवरून एक्झीट घेतली. आम्हां सर्वाना पोरके करून. पॅलेटवरील रंग पुसले गेले. जे.जे. तील ज्या महान वटवृक्षाखाली आम्ही विसावलो होतो, तो अचानक उन्मळून पडल्यामुळे आम्ही उघड्यावर पडलो याची तीव्रतेने जाणीव झाली!
( लेखातील छायाचित्रे ' दामू केंकरे -तीन अंकी गुरुकूल मधून साभार. केंकरे सरांचे छायाचित्र, राजू आजगांवकर )
- मं.गो. राजाध्यक्ष







very interesting
ReplyDelete