ऋषीतूल्य कला तपस्वी : एस. एम. पंडीत
पंडीतांची कला साधना सुरु झाली. पण तिला जी आर्थीक जोड लागते तिची मात्र वानवा हाती. उंची कागद,महागडे रंग घेऊन कला साकारण्याची त्यांची आर्थीक क्षमता नव्हती. मग त्यांनी वर्गात टाकून दिलेल्या सुकलेल्या रंगाच्या ट्युबा घेऊन त्यात घरातील दिव्याचे तेल घालून ते चांगले घोटून चित्रे रंगवायला सुरुवात केली. तेथील एक ब्यानर पेंटर श्री शंकरराव आळंदकर यांचे त्यांच्या ह्या धडपडीकडे लक्ष होते. त्यांनी आपल्या स्टुडिओचा हवा तसा वापर करण्याची परवानगी पंडीतांना देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. व पुढे स्वतः जिथे कला शिक्षण घेतले त्या कलेच्या मंदीरात - सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये आणले. ते वर्ष होते १९३५. त्यावेळी स्कुल ऑफ आर्टचे संचालक होते, कला व्यासंगी कॅ. ग्लॅडस्टन साॅलोमन. एक श्रेष्ठ दर्जाचा चित्रकार, आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये कलेची उपजतच जाण आहे, त्यांना मनोमन मदत करणारा मनस्वी कलावंत. पंडीतांचे काम पाहील्यावर सॉलोमननी मोठ्या प्रेमाने त्यांना आपल्या कार्यालयातील स्टुडीओमधील स्वतःचे काम दाखविले. अन पंडीतांना त्यांच्या चित्रांतील वास्तववाद अनुभवायला मिळाला, जो त्यांनी पुढे आपल्या आयुष्यभर जोपासला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर १९३८ पासून पंडीतजींची चित्रकलेची व्यावसायीक वाटचाल सुरु झाली. त्याकाळात चित्रपटाची पोस्टर्स मोठी नयनमनोहर केली जात. हॉलीवूडची ' मेट्रो गोल्डविन मेयर ' या कंपनीची पोस्टर्स व शोकार्ड्स बाहेरून येत असत. पण मुंबईतील चित्रपट गृहासाठी हे नेहमीच खर्चीक होते. तेव्हां मुंबईसाठी त्याच्या तोडीच्या चित्रकाराचा शोध सुरु झाला. व तो पंडीत या नावाशी येऊन थांबला. त्यानंतर मेट्रो सिनेमा गृहाची शोकेस ही पंडीतजींच्या चित्रांनी झळकू लागली. हॉलीवूडहून या चित्रपटांची स्टील्स येत असत. त्या परकीय कातडीचा गौरवर्ण नेमका पकडणे, याचा त्यांनी पुरा अभ्यास केला.आणि परदेशी चित्रकाराच्या तोडीचे काम त्यांना भारतात मिळू लागले. आणि पोस्टर या माध्यमाला उपयोजित कलेत एक महत्वाचा दर्जा देण्याचे योगदान पंडीतजींनी दिले ! याचा परीणाम हिंदी चित्रपटसृष्टीवरही झाला. तेव्हां ही सर्व पोस्टर्स कापडावर ऑइल पेंटने रंगवीली जात. पण पंडीतजींनी त्यांना एक वेगळा दर्जा दिला. ती पोस्टर रंगाच्या माध्यमातून रंगविण्यास प्रारंभ केला. त्यामुळे चित्रातील बारकावे उठावदार होऊ लागले. रंगामध्ये गोडवा जाणवू लागला. त्यात सफाई येवू लागली. छपाईही उत्कृष्ट होऊ लागली. बॉंबे टॉकीजचे हिमांशू रॉय व देविकाराणी यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीची सर्व जबाबदारी पंडीतजींवर सोपवली. त्याचसोबत करदार, प्रभात, राज कपूर, व्ही. शांताराम, के. असीफ, मेहबूब खान, अश्या दिग्गज चित्रपट निर्माते - दिग्दर्शक यासाठी अनेक वर्षे पंडीतजींनी आपल्या कुंचल्याची सोबत त्यांना दिली.
ज्या काळात रंगीत फोटोग्राफीचा आपण विचारही करू शकत नव्हतो, त्या काळात पंडितजींची चित्रे ती कसर भरून काढू लागली. त्यावेळी बाबूराव पटेल यांचे ' फिल्म इंडिया ' हे सिने साप्ताहीक एक दर्जेदार चित्रपट परीक्षणाचे माध्यम म्हणून पाहीले जात असे. या फिल्म इंडिया साठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. यामध्ये रसिकांच्या दिलाची धडकन असलेल्या सुरय्या, मधुबाला, नर्गिस, निम्मी, कामींनी कौशल अश्या अनेक नायीका पंडितजींनी आपल्या कुंचल्याने नटविल्या आहेत.
पण पुढे अश्या कामातील तोच तो पणाचा त्यांना रुचेनासा झाला व हे चित्रपटाचे काम बंद करून पंडीतजींनी ' रतन बात्रा ' या जाहीरात स्टुडीओत काम करण्यास आरंभ केला. तेथे त्यांनी अनेक कापड गिरण्यांची पोस्टर्स बनविली. पण दिवसभर कष्ट करूनही जेव्हां कामाचे चीज होत नाही असे त्यांना जाणवले, तेव्हां पंडीतजीं तेथून बाहेर पडले तेच आता यापुढे कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही प्रतीज्ञा करूनच ! स्वतंत्रपणे काम करेन या जिद्दीने त्यांनी स्वतःचा स्टूडीओ सुरु केला. १९४६ मध्ये त्यांचा स्टूडीओ ' स्टूडीओ एस. एम. पंडीत 'या नावाने सुरु झाला. आणि सुरु झाली एक वैभवशाली अशी देदीपयमान चित्रपरंपरा जिने कैक वर्षे भारतीय लोकजीवनावर अधिराज्य गाजविलें. बऱ्याच फिल्म कंपनीची कामे त्यांच्याकडे आपण होऊन चालत आली. चित्रपट सृष्टीच्या वैभवाच्या काळात पंडीतजींनी आपल्या कलेद्वारा तिला कळसाला पोचविले. पण हळूहळू हा कालखंडही संपूष्टात आला.
या वेळी पंडीतजींच्या आयूष्यात दोन व्यक्ती आल्या. त्या होत्या नागपूरच्या शिवराज फाईन आर्टचे धनवटे व बॉंबे फाईन आर्टचे धोटे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर कॅलेंडर्स छापली जात असत. आणि पंडीतजींच्या चित्रांनी मोहीत झालेल्या त्या दोघांनी कॅलेंडरसाठी पंडीतजींकडून अनेक चित्रे करवून घेतली. व ती घरोघरी पोचवली. त्यामुळे पंडीतजीही प्रसिद्धीच्या कळसाला पोचले. पंडीतजींनी निसर्गदृश्ये आविष्कृत केली, व्यक्तिचित्रणं केली पण त्यांना खरा मोह होता तो पौराणीक काळाचा. त्यातील कथानायकांचा. ऐतिहासीक कालखंडाचा, ज्यावर त्यांनी असंख्य चित्रे काढली. त्यांच्या पौराणिक चित्रांमधील व्यक्तिरेखामध्ये त्यांचे शकुंतला पत्रलेखन हे चित्र पाहीले तर शकुंतला व तिच्या मैत्रिणी, त्यांच्या रेलून बसण्याच्या पद्धती, चेहऱ्यावरील भावाविष्कार, किंचित लज्जेने आरक्त झालेले तिचे मुख, शिवाय सभोवतालचं मनमोहक निसर्ग वातावरण, या सर्वच गोष्टी त्यांची चित्रकार म्हणून क्षमता दर्शविण्यास समर्थ आहेत. ज्या कवींनी आपल्या कल्पना विहारातून ही काव्ये निर्माण केली, तितक्याच समर्थपणे पंडितजींनी त्यांना रंगरेषेच्या माध्यमातून साकारली. शकुंतला दुष्यन्त हे असेच त्यांचे आणखी एक चित्र. दोघांचा प्रणय शृंगारिकरीत्या साकारणाऱ्या पंडीतजींच्या कुंचल्याने अश्या एकेक विषयाला अनेक चित्रे केली आहेत. शकुंतला दुष्यन्त कधी वनात झोपलेले आढळतात तर कधी बसलेल्या रूपात दिसतात. राजा रवीवर्मानंतर पौराणीक विषयांवर सिद्धहस्ताने चित्रे काढणारे वास्तववादी चित्रकार म्हणजे एस. एम. पंडीतांचेच नांव घ्यावे लागेल. विश्वामित्र-मेनका हा तर त्यांचा आवडता विषय. अनेक अंगानी चित्रीत केलेला. विश्वामित्र मेनकेचीही चित्रे वेगवेगळ्या अवस्थेतील त्यांनी आविष्कृत केली आहेत. कधी एकटी मेनका स्वर्गातून अवतरते आहे, तर कधी ती विश्वामित्राचे तपोभंग करण्यास नर्तन करते आहे. तर कधी त्याच्या पुढे अस्तव्यस्त अशी कामातुर होऊन पहुडली आहे. त्या दोघांचा प्रणयही तितक्याच उत्कटतेनं पंडीतजींनी दाखविला आहे. शिवावरील अनेक अवस्थेतील चित्रे, सरस्वती, नळ- दमयंती या विषयावरील चित्रे अशी एकाच विषयावरील विविध चित्रे पहाताना चित्रकाराच्या कौशल्याला दाद द्यावीशी वाटते. आणि त्यातील प्रणय - शृंगार आपणाला मोहवून टाकतो. भगवान बुद्धाच्या चित्रांत जेव्हां बुद्ध विविध रूपात पहायला मिळतो, तेव्हां त्याचे भावही तितकेच लोभस दिसतात. चेहऱ्यावरील ज्ञानाचे तेज, डोक्यावर बांधलेल्या जटा त्यात भर घालत असतात. आम्रपाली फुलांची ओंजळ घेऊन करत असलेली विनवणी आपल्याला त्या काळात पोचवतात. नळ -दमयंतीच्या चित्रातूनही हाच प्रणयी आविष्कार आपण दिसतो. असेच चित्र त्यांनी महाभारतातील युद्धावर काढले तेव्हां त्यांना परत परत रेखाटने करावी लागली. हे चित्र साकारण्याचे त्यांनी ठरवले होते तेव्हापासूनच त्याच्या इतिहासाची नोंद त्यांच्या मनाच्या पटलावर ते करीत असत. जो इतिहास मी कधीच पाहीला नव्हता, तो माझ्या मनात उमटत होता व मला मार्गदर्शन करत होता असे त्यांनी सांगितले होते. अर्जुनाच्या रथाचे घोडे, भगवान श्रीकृष्ण सारथी, संपूर्ण कुरुक्षेत्र सैनिकांनी गजबजलेले, त्यातून नेमके लक्ष दाखवणारा श्रीकृष्ण व बाण सोडणारा अर्जुन हे सर्व रेखाटने सोपी गोष्ट नव्हती. पण ते चित्र पाहताच वातावरण निर्मिती करणारे आणि आपल्याला त्या ऐतिहासिक काळात पोचवणारे नक्कीच ठरते.
भारतीय संस्कृतीचा सर्वांगीण अभ्यास केलेल्या पंडीतजींना पुराणकाळाचा खूप ओढा होता. त्यांची शेकडो चित्रे ही धार्मीक, अध्यात्मिक, पुराण, सामाजीक, आणि मानवी जीवनावर आधारित आहेत. त्याचसोबत प्रणय आणि शृंगार हे त्यांनी आपल्या चित्रांचे मर्म ठेवले. एक आदरणीय असे शृंगारप्रधान भारतीय चित्रकला आविष्कृत करणारे ते एक थोर कलाकार होते. पण त्यांच्या चित्रातील शृंगाररसात बीभत्स पणाला थारा नव्हता. त्यांच्या चित्रातील पुरुष मॉडेल ही नेहमीच बलदंड अश्या शरीर सौष्ठवाची असत. तसेच सौंदर्याने मुसमुसलेल्या स्त्रिया, सभोवारचा निसर्ग, धो धो कोसळणारे धबधबे हे सर्व त्यांचा कुंचला अचूकपणे रेखाटत असे. चेहऱ्यावरील प्रणयी भाव आणि त्याची अवर्णनीय रंगसंगती हे त्यांच्या चित्रकलेचे वैशिष्ट्य होते. ॲनाटमीवर जबरदस्त हुकूमत, तेवढीच रंगसंगतीवर अश्या सर्व बाजूनी पंडीतजींची चित्रे साकारीत. त्यांच्या चित्रातील कॉम्पोझिशन, अवकाश विभागणी, पर्स्पेक्टीव्ह आणि निर्दोष असे रेखाटन ही त्यांची चित्रावरची हुकूमत होती. त्यांचे रंग व ब्रशिंग त्यातील सौंदर्य वृधींगत करीत असतात. त्यांच्या चित्रांतील मानवी आकृत्यासोबतच निसर्ग आणि वस्तूचित्रे यांचाही तितकाच प्रभावी भाग असे. तरीही त्या सर्व घटकांना त्यांची चित्रे, त्यांची हुकुमी रेषा, त्यांना जोडणारी सुंदर मिलाफाची रंगसंगती, केंद्रबिंदू साधणारी त्यांची विभागणी या सर्व गोष्टी चित्रांना एक दर्जा प्राप्त करून देत. त्यांच्या रंगलेपनाचे एक तंत्र होते. ' टेम्परा 'या पद्धतीचे रंगलेपन ते करीत असत. हे तंत्र चित्र दीर्घकाळ टिकण्यासाठी केले जाते. टेम्परा ही पद्धत चित्र लवकर सुकण्यासाठी तसेच दीर्घकाल राहण्यासाठी वापरली जाते. यासाठी रंग वावरतात ते पावडरचे असतात. रंगाला धरून ठेवण्यासाठी एका बाइंडरची गरज असते. त्यासाठी अंड्याच्या पिवळ्या बलकाचा वापर केला जाई. व या रंगाचे एकेक पापुद्रे होत असत. पेंटिंगचे मुख्य घटक हे रंग- बाईंडर - माध्यम असतात. आणि विसाव्या शतकाच्या आरंभी भारतात याचा वापर होत असे. विशेष करून बंगाल स्कुल मधील जेमिनी रॉय आदी लोक हा प्रकार वापरीत असत. मॉडेल हे पंडीतजींनी केवळ लाईफ बसवून अथवा त्याच्या संदर्भासाठीच उपयोग केला, अन्यथा त्यांनी स्मरणशक्तीच्याच भरावर आपली चित्रे रेखाटली. त्यासाठी ते अनेक स्केचेस करीत असत.तेही विविध अंगानी. आज देशातील अनेक नामवंतांची व्यक्तीचित्रणे पंडीतजीनी केली आहेत.
हळूहळू पंडितजींचे मन अध्यात्माकडे झुकू लागले. वडीलांच्या ठायी असलेली कालीमातेची भक्ती त्यांच्या ठायी जागृत झाली. जीवनाविषयीचा त्यांचा दृष्टिकोनच बदलून गेला. त्यांना दृष्टांत होऊ लागले. गुलबर्गा येथे कालीमंदीरात त्यांनी कालीमातेची व शंकराची प्रतिष्ठापना केली. तेथेच स्वतःचे घर बांधून तेथे आर्ट ग्यालरी सुरु केली. १९६६ मध्ये त्यांचे मित्र श्री रामभाऊ धोटे, जे त्यांची चित्रे छापीत असत, यांनी पंडितजींची ओळख स्वामी विवेकानंद समितीचे एकनाथजी रानडे यांच्याशी करून दिली. त्यावेळी कन्याकुमारी येथे विवेकानंद खडकावर स्वामीजींचा एक पुर्णाकृती पुतळा व भव्य असे मंदिर उभारण्याचा प्रकल्प सुरु होता. एकनाथजींनी स्वामीजींचे पूर्ण आकाराचे पेंटिंग करण्याचे काम पंडीतजीना दिले. हे स्वामीजींचे पेंटिंग आपल्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा ठरणार असल्याची जाणीव पंडितजींना होती. स्वामीजींचे हे पेंटिंग अतीशय पवीत्र आणि शांत अश्या जागी झाले पाहीजे या उद्देशाने पंडीतजींनी आपला स्टूडीओ दादरसारख्या गजबजल्या भागातून वांद्र्याला समुद्राजवळ हलवला. यासाठी त्यांना स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांचे आशीर्वाद हवे होते, म्हणून त्यांनी प्रथम या दोघांची पोर्ट्रेट्स तयार केली. कालीमातेचे उपासक म्हणून म्हणून सर्वप्रथम ते चित्र सुरु करण्यापूर्वी तिची आराधना करीत असत. आणि एका रात्री त्यांना स्वामी विवेकानंदानी एकेकाळी ज्या खडकावर ध्यान समाधी लावली होती, त्या खडकावर एका विशिष्ट पद्धतीने उभे असल्याचा दृष्टांत झाला. व तीच त्यांची अवस्था पंडितजींनी कॅनव्हासवर साकारली व एक अमर पेंटींग आविष्कृत झाले. या त्यांच्या स्वामीजींच्या चित्राने आजवर जे त्यांचे हाताची घडी घातलेले चित्र होते त्याला छेद दिला. आज हे चित्र कन्याकुमारी येथे आहे. हे चित्र काढण्यापूर्वी पंडीतजीं स्वतः त्या काळात साधना करीत होते. आज हे चित्र अमर झाले आहे.
यावेळी एकनाथजी हे एका निष्णात शिल्पकाराच्या शोधात होते. त्या खडकावर या पेंटींगच्या आधारे एक शिल्प उभारण्याचे ठरले होते. अनेक नामांकीत शिल्पकारांकडून मॉडेल्स मागविण्यात आली. पण त्यामध्ये हवे ते भाव मिळेनात. तेव्हां पंडीतजींकडेच ही जबाबदारी देण्यात आली. येथे पंडीतजींचे वर्गमित्र व त्यांच्याच गावचे सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टच्या कला व हस्तव्यवसाय विभागाचे प्रमूख प्रा. नागेश साबण्णावर त्यांच्या मदतीला आले. व त्यांनी स्कुल ऑफ आर्ट मधील शिल्पकला विभागाचे प्रा. नारायण सोनावडेकर यांची शिफारस केली. अर्थात साबण्णवारांची शिफारस म्हणजे ती योग्यच असणार याची जाणीव पंडीतजींना होतीच ! आणि सोनावडेकरांनी ती सार्थ ठरविली. त्या महान अश्या स्वामीजींच्या शिल्पाने शिल्पकार सोनावडेकरानाही प्रसीध्दी मिळवून दिली.
१९७८ साली पंडीतजींनी आपल्या चित्रांचे पहीले प्रदर्शन लंडन येथे भरविले. त्याचे उदघाटक होते तेथील भारतीय ॲम्ब्यासॅडर श्री नारायणराव गोरे. त्यांची चित्रे पाहून सर्वच थक्क होत असत. तेथील एफ. आर. एस. ए. हा सन्मान त्यांना देण्यांत आला. त्यांचे भारतातील स्वतंत्र असे सिंहावलोकनी एकल प्रदर्शन १९९१ मध्ये जहांगीर आर्ट ग्यालरी मध्ये भरले. ते पाहण्यास रसिकांची तुफान गर्दी होत होती. देश परदेशातून अनेक पारितोषिके, सन्मान त्यांना मिळाले. त्यांची पेंटिंग्स न्यूयॉर्क, यू. एस.ए., यू. ए. इ., लंडन, इराण, इराक, सिंगापूर, मलेशीया, फ्रांस, कॅनडा आणि भारतात अनेक ठिकाणी संग्रहात आहेत. १९८४ साली त्यांना ललित कलेचा व ८६ साली कर्नाटकाचा बहुमान मिळाला. तसेच गुलबर्गा विद्यापीठाची डॉक्टरेट हा मानही त्यांना देण्यात आला. महाराष्ट्र राज्यानेही त्यांचा राज्यस्तरीय पातळीवर सन्मान केला. पंडीतजीं दिवसांतील अठरा - वीस तास कला संपदेत व्यग्र असत. आपल्या चित्रांनी दुसऱ्यांना आनंद मिळावा हा एकमेव हेतू ते मनाशी बाळगून असत. मात्र जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या या पुण्यशील कलावंताला येथील आधुनीक व नवचित्रकलाकारांनी व समीक्षकांनी ' अभिजात कलाकार ' मानले नाही. कारण ते व्यावसायीक कामे करीत होते. पण पंडितजींना त्याची अजीबात खंत नव्हती. त्यांच्या कामाचा त्यांना प्रचंड अभीमान होता. त्यांची क्षमता त्यांना माहीत होती. त्यामुळेच ते नवचित्रकलेच्या लाटेबरोबर वहावत गेले नाहीत. चित्रकलेशी कोणी प्रतारणा केली तर त्यांना ती सहन होत नसे. मध्यन्तरी चित्रकार हुसेन यांनी केलेल्या ' श्वेतांबरी ' च्या प्रयोगाने त्यांना खेद झाला होता. आज मॉडर्न आर्टच्या संदर्भातून शुद्ध कलेतील निष्ठा कमी होऊन कलेची दुर्बोधता वाढल्याची खन्त ते व्यक्त करीत असत.
पंडीतजींनी आपल्या कुंचल्याद्वारे हजारो कलारसिकांना कित्येक दशके मोहवीले, त्यांना कलेच्या प्रांगणात मनमुरादपणे आस्वाद घ्यायला लावला, त्यांच्या समोर रामायण, महाभारतातील अनेक नायक- नायीका उभ्या केल्या. आपल्या अलौकीक कलेमध्ये भक्तीरस, विरह, शृंगाररस, प्रणय, शौर्य, वीरता आदी रस आपल्या कुंचल्याद्वारे भावूकतेने चित्रीत करणाऱ्या या वास्तववादी कलावंताचा अखेर अस्त झाला तोही मार्च महीन्यातच, ज्या महीन्यात त्यांचा जन्म झाला होता. ३० मार्च १९९३ रोजी ते आपणातून निघून गेले. आज देह रूपाने जरी ते आपणात नसले, तरीदेखील आपल्या कला संपदे द्वारे ते अजरामर झाले आहेत.
अजूनही पंडीतजींचे नांव मनांत येताच डोळ्यांसमोर येते ती त्यांची ऋषीतूल्य मूर्ती. छातीवर रुळणारी शुभ्र दाढी, डोक्यावरील शुभ्र लांब केसाची बांधलेली गाठ आणि नजरेतील धार.त्यांच्यातील अध्यात्मीक ताकदीमुळे जाणवणारी चैतन्यशील मुद्रा या गोष्टी आपणाला मनोमनी हात जोडायला लावतात. असा प्रतिभावान कलायोगी पुन्हां होणे नाही !
( एस. एम. पंडीतजींचे छायाचित्र मुकुंद सावंत यांच्या सौजन्याने )
- मं. गो. राजाध्यक्ष






माझे मामा सोनावडेकर यांचे गुरुस्थान पंडितजी यांच्या गुल बर्गौ कर्नाटक येथे पंडित जी च्या गावी 2 वेळा जाण्याचा योग आला होता मामाबरोबर..... पंडितजींच्या घरी
ReplyDelete