रंगरेषेच्या समृद्ध दुनीयेतील सुरेल कलावंत : रवी परांजपे
साधारणपणे १९५८ ते १९६७ चा काळ. भारतीय जाहीरात क्षेत्रात आपल्या मनमोहक कलाविष्काराने, अवर्णनीय रेखाटनाने एका तरुणाने आमूलाग्र क्रांती केली. तो काळ आजचा संगणकाचा नव्हता, फोटोशॉप - इलस्ट्रेटर अश्या सॉफ्टवेअरचा नव्हता. कलाकार म्हटले की त्याच्या हातून होणारी कलानिर्मिती हीच एकमेव खास बाब ठरत असे. जाहीरातींमधील बोधचित्रे, कॅलेंडर्स, पोस्टर्स, कॅटलॉग, शुभेच्छा कार्ड्स या सर्वच गोष्टी त्या तरुणाच्या हातून नखशीकांत देखणी होऊन बाहेर पडत. त्याची खास अशी शैलीही सर्वांनाच मोहात पाडत असे. विशेषतः अनेक कलाकार व कला विद्यार्थी त्याला काम करतांना पाहण्यास आसुसलेले असत. तो तरुण म्हणजेच आजचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री रवी परांजपे होत.
रवी परांजपे यांचे नाव घेतले की माझे मन सुमारे साठ वर्षे मागे जाते. अन झर्रकन तो संपूर्ण कालखंड माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. तेव्हां मी बेळगांवच्या सेंट पॉल्स हायस्कुल मध्ये शिकत होतो. तेथे आमचे ड्राइंग शिक्षक होते बेळगांवचे सुप्रसिद्ध कला महर्षी के.बी.कुलकर्णी. त्यांची शिकविण्याची हातोटी कांही वेगळीच होती. एक दिवस ते आपल्या सोबत एका तरुणाला घेऊन आले व त्याच्याशी आमची ओळख करून दिली, हे रवी परांजपे. हे आता तुम्हांला ड्रॉईंग शिकवतील. आमची ती परांजपे सरांशी पहीली भेट. देखणे रूप, गोरा वर्ण, डोक्यावरील केसांचा एका बाजूला वळवून भांग पडण्याची पद्धत अन मिठास बोलणे यामुळे त्या लहान वयातही त्यांचे व्यक्तीमत्व खुलून दिसत असे. पहील्याच दिवशी त्यांनी आम्हां चित्रकलेकडे ओढा असलेल्या विद्यार्थ्यांचे मन आकर्षीत केले. अतीशय मृदू, नम्र स्वभावाचे परांजपे त्याकाळात आम्हां विद्यार्थ्यांकडून खूप कामे करवून घेत. आणि सायंकाळी ते कुलकर्णी सरांच्या ' चित्र मंदीर ' यासंस्थेत शिकत, इतर विध्यार्थ्यांना शिकवीतही असत. पुढे त्याच ' चित्रमंदीर ' मध्ये मीही शिकण्यास जाऊ लागलो. अन तेव्हापासून परांजपे सरांशी जे ऋणानूबंध जुळले ते आजतागायत तसेच आहेत.
परांजपे चित्रकला शिकत असतानाच लिंगराज कॉलेज मध्ये शिकत देखील होते. त्यांचे वडील कृ. रा. परांजपे हे थोर अभ्यासक, संशोधनकार व विविध कलानी युक्त असे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या आईकडेही कलागुण होते. त्यांचाच वारसा परांजपें यांना लाभला होता. चित्रकले इतकीच परांजपेंना संगीतातही रुची होती. अगदी लहान वयातही परांजपेंचे काम पाहणाऱ्याला थक्क करून सोडणारे होते. मात्र त्यांना लाभलेल्या या दैवी देणगी बरोबरच त्यांचे परिश्रम व तपश्चर्या तेवढीच महत्वपूर्ण होती. त्यांचा रोजचा सराव, अभ्यास सतत सुरु असे. स्केचिंग - अनोटॅमी यांच्या सरावाचे कागदाचे ढीग ते रचत असत. आणि यातूनच त्यांची अदभूत अशी कला बहरत गेली, तिला कोंदण मिळाले. अर्थात बेळगावसारख्या ठिकाणी त्यांच्या कलागुणांचे चीज होणे कठीणच होते. त्यामुळे १९५८ साली परांजप्यानी बेळगांवला रामराम ठोकला आणि त्यांचे पाऊल मुंबईला पडले. अर्थात मुंबईत ताबडतोब पाय रोवणे त्यांना इतके सहजसुलभ नव्हते. एकतर राहण्याची तशी सोय नव्हती, आणि शहरही तसे नवखे होते. दोन व्यक्तींना त्यांना भेटायचे होते. त्यापैकी एक होते चित्रकार श्री प्र.ग. शिरूर व दुसरे होते हिंदूस्थान थॉम्पसनचे वाघूळकर. शिरूर त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियाच्या कला विभागात एक वरीष्ठ कलाकार म्हणून काम करीत होते. थोड्याच दिवसांत तेथील आर्ट डायरेक्टर लॅंगहॅमर निवृत्त होणार होते, व त्या जागेवर शिरूरांची नियूक्ती होण्याचे जवळ जवळ नक्की झाले होते. त्यांनी परांजपेंचे काम पाहीले. अर्थातच कामाच्या बाबतीत प्रश्नच नव्हता. त्यांना टाइम्स मध्ये घेण्याचे आश्वासन शिरुरानी दिले, व परांजपेंनी टाइम्सचे एक स्वप्न पाहीले होते, ते सत्यात यायची वेळ झाली होती. पण अचानक काही वेगळेच घडले. शिरूरांच्या ऐवजी जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मधून निवृत्त झालेल्या गोंधळेकरांना तेथे घेण्यात आले व शिरूर टाइम्स मधून बाहेर पडले. आणि परांजपेंचे स्वप्न भंग पावले. तीच गत वाघूळकरांची झाली. आणि परांजपे बेळगांवी परतले.
१९५८ साली टाइम्स मध्ये एक इलस्ट्रेटर हवा असल्याची ' रतन बात्रा ' या जाहीरात संस्थेची जाहीरात आल्याची परांजपेंना दिसली. त्यांना परत मुंबईला जाण्याची इच्छा नव्हतीच. पण त्यांच्या वडीलानी आग्रह करून त्यांना पाठवले. इंटरव्ह्यू झाला. व ते निवडले गेले. पण सहा महीने गेल्यावरही नेमणूकीचे पत्र मिळेना तेव्हां कळले की एजन्सीकडे तश्या प्रकारचे कामच बंद झाले आहे, त्या मुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी काम पहायला सांगण्यात आले. तेथीलच एकाने परांजपेंना समोरील इमारतीत रॅशनल ॲडव्हर्टायझींग मध्ये इलस्ट्रेटरची गरज आहे, तेथे पहाण्यास सांगितले. तेथे जाताच साहेबानी सांगीतले की, आमच्याकडे कॅलेंडरचे एक काम आले आहे. ते तुम्ही करा. क्लायंटला पसंत पडले तर एकंदरीत सहा कॅलेंडर करायची आहेत. यावरच तुमची नोकरी पक्की होईल. परांजपेंनी आव्हान स्वीकारले. काम होते ग्लॅक्सो या कंपनीच्या बेबी फूडचे . लहान तान्ह्या मुलांची चित्रे काढायची होती. स्पर्धेसाठी होते टाइम्स सह इतर दोन एजन्सीज. लॅंगहॅमर सहीत अनेकांनी चित्रे पाठवीली होती. रॅशनलमधील सर्वजण हा नवीन तरुण काय करतो ते पाहण्यासाठी फेऱ्या मारत होते, पण जेव्हां चित्र पूर्ण झाले तेव्हां सर्वांचे चेहरे बघण्यालायक झाले होते. क्लायंटला सर्व कामे आवडली व परांजपेंच्या आयुष्याला कलाटणी देणारे हे ग्लॅक्सोचे कॅलेंडर ठरले. याचा परीणाम झाला तो म्हणजे टाइम्सचे आर्ट डायरेक्टर रमेश संझगिरी यांनी स्वतः परांजपेंना टाइम्समध्ये आमंत्रीत केले व परांजपेंची एक स्वप्न सत्यात उतरले. त्यादिवशी टाइम्स मध्ये शिरतांना सर्वप्रथम त्यांनी टाइम्सच्या पायऱ्यांना स्पर्श करून वंदन केले व ते आत शिरले !टाइम्स ऑफ इंडीयाचा चवथ्या मजल्यावर एक प्रचंड असा कला विभाग होता. लॅंगहॅमर सारख्या युरोपीयन कलाकाराने तो वाढवीला होता. त्या विभागाने बाहेरीलही कामे घेण्यास सुरुवात केली होती. ग्लॅक्सो देखील त्यांचेच क्लायंट होते. टाइम्स वृत्त समूहाची अनेक प्रकाशने होती. प्रामुख्याने त्यांचीच कामे परांजपेंना मिळू लागली. टाइम्स मध्ये परांजपेंमधील कलाकाराला एक मोठेच आव्हान मिळाले. त्यांचे प्रत्येक काम हे त्यांच्या कला कारकीर्दीवर यशाचा एकेक तुरा खोवीत असे. त्यांची रेखाटनाची पद्धत, चित्रांतील गोडवा, छाया प्रकाशाचा खेळ मांडून त्यातून दाखवलेली चित्रांतील खोली, ॲनाॅटमीचा जबरदस्त अभ्यासआणि विशेष म्हणजे त्यांच्या चित्रातील शरीर सौष्ठवा प्रमाणे दाखविलेल्या वस्त्र प्रावरणेच्या घड्या या गोष्टी रसीकांच्या मनांत ठाव धरून बसत. प्रत्येक चित्रात ते नवीन प्रयोग करीत असत. कधी स्क्रीन वापरून, कधी छपाईची शाई वापरून, कधी ब्लेड वापरून तर कधी अंगठ्यांचे ठसे वापरून अश्या विविध तऱ्हेने ते चित्रात नावीन्य आणीत असत. स्क्रॅपर बोर्ड हा प्रकार त्या काळात अगदी बारकाईची कामे करण्यासाठी वापरीत असत. पृष्ठभागावर काळ्या शाईने भरून घेऊन मग त्यांतील हवा तो भाग स्क्रॅपरने खरवडून काढायचा हे नैपुण्य काम कलाकाराला करावे लागत असे. आणि सर्वात त्यांची नेत्रदीपक अशी रंगसंगती. यामूळे त्यांची चित्रे उठावदार होत असत. टाइम्स मध्ये अजूनही त्यांची चित्रे आठवतात ती म्हणजे, पिकासो, जगदीशचंद्र बोस, विनोबा भावे अश्यांची पोर्ट्रेट्स, विकलीसाठी केलेली अनेक बोधचित्रे, विशेष करून एका कथेत मुलगी पहाण्याचा समारंभ दाखवताना त्यांनी रेखाटलेली प्रत्येक व्यक्तीरेखा बोलकी होती. ॲन्यूअल साठी केलेली कव्हर्स, त्यांचे एक डबल स्प्रेड मध्ये केलेले गांधीजी, सरहद गांधी आणि पंडीत नेहरूंच्या बैठकीचे इलस्ट्रेशन तर इतके प्रभावी होते, की त्यातील प्रत्येक व्यक्तीरेखा जिवंत वाटत होती. विक्रेते त्यांच्या चित्रांची पाने उघडून ठेवीत असत. आणि परांजपेंच्या अश्या चित्रांसाठी अनेक अंक संग्राह्य होत असत. टाईम्समधील चित्रांमुळे परांजपेंचे नांव देशभर झाले. त्यांच्या नांवाचा दबदबा निर्माण झाला. व ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले. त्यांच्या कला शैलीचे अनुकरण करणारे अनेक कलाकार तयार होऊ लागले. त्यांच्या चित्रांवरून नकलाही केल्या जावू लागल्या. पण पुढे टाईम्समध्येही काही अप्रीय घटना तेथे घडल्या त्यामुळे टाइम्स मधून परांजपे बाहेर पडले. त्याचवेळी त्यांना त्यांच्या नशिबाने दुसरे एक दालन उघडून ठेवले होते.
परांजपे माहीम येथे रहात असत. ट्रेनने जाताना त्यांना नेहमी एक व्यक्ती भेटत असे. ते होते भाई पत्की. त्यावेळचे बेन्सनचे (आताची ओगील्वी ) एक वरीष्ठ असे कलाकार. परांजपेंची कामे ते नेहमीच पहात असत. हा माणूस आपल्या एजन्सीत हवा ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांची जवळ जवळ स्टॅंडींग ऑफरचं होती म्हणाना ! टाइम्स सोडून परांजपे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या बेन्सनला आले आणि तेथे त्यांचे जाहिरातीच्या जगातील खरे काम सुरु झाले. येथे त्यांच्या कला कारकिर्दीने एक वेगळेच वळण घेतले. जाहिरातींसाठी चित्रे काढणं म्हणजे ती केवळ चित्रं नसून त्यामध्ये विचार प्रसारण हे महत्वाचे असते. ही चित्रे तुमच्याशी संवाद साधत असतात. तुमची चित्रं वाचकांशी वा ग्राहकांशी उत्पादनाबद्दल हितगूज करीत असतात. बेन्सनमध्ये केलेले पहिलेच चित्र क्लायंटला इतके आवडले की बोधचित्रे आणि परांजपे हे एक समीकरणच ठरले. बेन्सनच्या काळातील परांजपे सरांची बोधचित्रे ही जाहीरात कला क्षेत्रांतील एक मानदंड ठरला होता. त्यावेळी बहूतेक सर्वच जाहीरातींना बोधचित्रे वापरत असत. येथेही सरांची कामे ही नैपूण्यदायक असतंच, शिवाय त्यांच्या ब्रशवरील हुकमी पकड दाखवणारी असत. त्यांनी केप्लर मार्ट साठी केलेले ड्राय ब्रशचे चित्र, वालचंदनगर साखरेसाठी केलेली ग्रामीण चित्रे, युद्धाच्या वेळी केलेली तंबूमधील मिलिटरी हॉस्पिटलची चित्रे, वाटरबरीज साठी केलेली हॉकी - फुटबॉल अश्या खेळाडूंची चित्रे, ज्युवेलर्स साठी केलेली अशी असंख्य चित्रे होती. शिवाय कॅलेंडर, कॅटलॉग, शुभेच्छा पत्रे, पोस्टर्स साठी केलेली खास परांजपे टच ची चित्रे घरोघरी लोक सांभाळून ठेवीत असत. तशीच त्यांची कॅलेंडर लोक वर्षभर भिंतीवर व नंतर संभाळून ठेवीत असत.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रे काढतांना परांजपेना कधीच संदर्भ लागत नसे. कधी जर तांत्रीक मशिनरी अथवा तत्सम काम असेल तरच संदर्भ. नाहीतर तुम्ही प्रसंग सांगत जा व सर त्याप्रमाणे रेखाटत जात. इतकी त्यांची चित्र - स्मरणशक्ती तीव्र आहे. शिवाय जोडीला ॲनाटमी असल्याने आकृत्या कश्याही असोत, त्या निर्दोष असत. आणि कॉम्पोझिशन करताना सोपा पडेल असा ॲंगल न घेता ते बघणाऱ्याला भावेल अश्या तऱ्हेनेच ते काढीत. त्यांचे अलंकारीक सुलभ आकार अतीशय मोहमयी असतात. पूर्वी कला अभ्यासामध्ये डेकोरेटीव्ह रेंडरींग हा एक प्रकार होता. फुला पानांचे आकार त्यांना अलंकारीक वळण देवून काढावे लागत असत. परांजपेनी बाकीच्या विषयांप्रमाणेच या विषयाचाही सखोल अभ्यास केला आणि त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यांत नक्कीच झाला. त्यांची रंगलेपनाची पद्धतही अशी असे की प्रथम ते ब्याक ग्राउंड मारून घेऊन त्यातून चित्राला वर काढीत. त्यावर हाय लाईट आले की तात्काळ त्यातील खोली जाणवे. त्यावर त्यांच्या आकृतीच्या शरीरं सौष्ठवाप्रमाणे मारलेले फटकारे, सर्वांचेच मन भारून टाकीत असत. परांजपे सरांचे रंगही खास असे असायचे. केवळ बाटलीतून काढून वापरलेले नसत, तर त्यांच्या रंगांच्या शेड ह्या खास स्वतःच्या असतात. त्यांचा लाल रंग त्यांनी तयार केलेला असतो. ग्रे रंगाच्या तर ते मालिकाच उभी करतात. एवढी रंगावर त्यांची हुकूमत आहे. त्यांची केलेली रफ डिझाइन्स सुद्धा इतकी फिनिश असत, की कित्येकदा तीच छपाईसाठी वापरली जात असत. एवढी क्षमता त्यांच्या चित्रांत असे. याच दरम्यान त्यांचा विवाह स्मिता वहिनींशी झाला. त्यांच्या कला कारकीर्दीत त्यांचाही सहभाग तितकाच महत्वपूर्ण ठरला. प्रोत्साहन देणारा ठरला. जणू एकमेकांसाठीच निर्माण झालेले जोडपे होते ते !
१९६४ साली भारतीय जाहीरात संस्थेवर एक फार मोठे संकट आले. केंद्रसरकारने जाहीरातींसाठी केलेल्या खर्चावर प्रचंड कर बसवला. त्यामुळे उत्पादकांना जाहीराती करणे अश्यक्य झाले होते. त्याचा परीणाम असा झाला की सर्वच उत्पादकांनी जाहीराती देणे बंद केले. अनेक जाहीरात एजन्सीचे धाबे दणाणले. अनेक एजन्सीमधून लोकांना कमी केले. याचा परीणाम फोटोग्राफर, टाईपसेटर यांच्या सेवेवरही झाला. बेन्सनमध्येही हा प्रकार घडला. पण जे कांही चार पाच जण अतीशय चांगली कामे करीत होती त्यांना ठेवण्यांत आले, पण कामाशिवाय बसून राहावे लागत असे. वर्षभर हे चालू होते. पुढे लोकसभेमध्ये यावर चर्चा करून हे बील मागे घेण्यांत आले. ह्याच वेळी बेन्सन इंटरनॅशनलचे सर्वात वरीष्ठ अधिकारी जगभरातील शाखांचा आढावा घेत होते. भारतात येण्यापूर्वी त्यांनी नैरोबीच्या बेन्सनच्या ऑफीसला भेट दिली होती. तेथे काम भरपूर होते, पण माणसे कमी होती. आणि येथे भारतात त्याच्या नेमके उलट होते. माणसे होती पण काम नव्हते. आणि परांजपेंचे काम त्यांनी पाहीले व नैरोबीसाठी त्यांचे मन वळविले. तेथे गेल्यावर त्यांनी भरपूर काम केले. मुंबईला ते जेव्हां आले, त्यावेळी जे. जे. उपयोजीत कला संस्थेत ती कामे विद्यार्थ्यांना दाखविण्यास आले. त्यांचा उद्देश होता, हे जाहिरातीचे क्षेत्र किती क्षणभंगूर आहे याची जाणीव देणे. त्यासाठी आपण कामात किती निष्णात हवे याची कल्पना देणे. त्यांच्या तेथील कामामध्ये आफ्रीकन लोकांचा रंग, तेथील निसर्ग, एक मनूष्य सायकल सोबत दाखविला होता, ती सायकलही फोटाग्राफीच्या पलीकडील बारकावे दाखवणारी होती. म्हणूनच त्यांच्या कामाला फोटो रियालीझम असेही म्हणत. फोटोग्राफीच्या पलीकडे त्यांचे काम असे. शिवाय जे. जे. मध्ये ते शिकवायलाही येत असत. तेथे ड्रॉईंगचे महत्व समजावून सांगत. त्यासाठी लागणारे श्रम विशद करीत. प्रात्यक्षिके देत. परांजपे सरांचा डिझाईन सेन्स हा अद्वीतीय आहे. त्यांच्या चित्रांतील रचनेमधून तो सर्वांगाने दिसून येतो. त्यांच्या चित्रातील कोणताही एक छोटासा भाग जरी पाहीला तरी तो स्वतंत्र चित्र भासतो.
पुढे १९७३ साली परांजपे सरानी बेन्सन सोडून स्वतःचा स्टूडीओ दादर येथील मनाली सोसायटी मध्ये सुरु केला. तेथे त्यांच्याकडे बेन्सनमधून कामे येऊ लागलीच, शिवाय औषध कंपनी, टाइम्स ऑफ इंडियाची कामे येऊ लागली. शिवाय टाइम्समध्ये असताना त्यांचे नांव देशभर झाले होते. त्यामुळे दक्षिणेतील सर्व उत्पादक कॅलेंडरची कामे घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामुळे एकटे काम करणाऱ्या परांजप्यानी मदतीला इतर कलाकार ठेवले. मफतलालची जाहीरात मोहीम याच काळातील. आणि याचवेळी त्यांच्या मनातील पेंटींग करण्याची सुप्त भावना जागृत झाली. कामाबरोबरच त्यांचा कलेवरील अभ्यास, जगभरातील कलाकारांची शैली अभ्यासणे, त्यावर संशोधन करणे ही कामे सुरूच होती. त्यात त्यांनी आधूनिक कलेचा अभ्यास केला. निरनिराळे ईझम अभ्यासले. जे बघतो ते सुंदर करून मांडणे ही त्यांची धारणा होती. आणि १९८० साली त्यांचे पहीले चित्र प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट ग्यालरी मध्ये त्यांनी भरवीले. अनेक कलारसिकांसहितच दिग्गज कलाकारांनी त्यांच्या या पहील्याच प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये जे.जे. स्कुलचे पहीले भारतीय संचालक श्री अडूरकर होते, आंबेरकर होते, तसेच थोर चित्रकार श्री बेंद्रे हेही आले होते. विशेषतः बेंद्रेंनी परांजपेंना पेंटींग करतांना काय गोष्टी पाहायच्या असतात, त्याचे मार्गदर्शनही केले, ज्याबद्दल परांजपे सर नेहमीच त्यांना मान देतात. बाळासाहेब ठाकरे यांनी आल्यावर चित्रे पाहीली व तेथूनच फोन करून ओबेराय हॉटेलच्या जनरल मॅनेजरना तेथे बोलावले व त्यांनी बरीच चित्रे खरेदी केली. वकील ॲन्ड सन्सचे वकील हे तर सर्वच शो आपणास विकत देण्याविषयी आग्रह करीत होते. छाया प्रकाशाच्या अद्भुत खेळ मांडलेल्या त्या प्रदर्शनांत एक मोराचे चित्र होते त्यातून प्रकाशाचा स्रोत बाहेर येत होता. अनेक लोक त्याच्या मागे एखादा लाईट लावला आहे का पाहण्यास जात. यानंतर पाठोपाठ त्यांची प्रदर्शने झाली. भारतात तशीच लंडन, न्यू जर्शी, अश्या ठिकाणीही त्यांच्या चित्रांना भरघोस प्रतीसाद मिळाला. प्रत्येक प्रदर्शनामधे त्यानी आपल्या चित्रात विविधता आणली होती. पेंटींगमध्ये व्यस्त झाल्याने त्यांची जाहिरातीची कामे थोडी मागे पडली. आणि दुसरा एक विषय त्यांची वाट पहात उभा ठाकला होता. तो होता भव्य अश्या इमारतींची पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग्स !
फिरोज कुडियनवाला हे इमारतींच्या वास्तुविशारदीतील एक अग्रगण्य नांव. त्यांना इमारतींचा आराखडा झाल्यावर त्याच्या संभाव्य इमारतीचे चित्र पर्स्पेक्टिव्ह प्लॅन व एलिव्हेशनच्या आधारे करणारा आर्टीस्ट त्यांना हवा होता. आणि शेवटी नांव आले ते रवी परांजपे. केवळ वास्तू विशारदाच्या आराखड्यावरून पूर्ण इमारतीची रचना दाखवणारे ' पर्स्पेक्टीव्ह रेंडरींग ' हे स्वतंत्र क्षेत्र परांजपेंनी विकसीत केले. त्यातील लॅंडस्केपींग, खालील लाद्यांवर पडलेले प्रतीबींब, रंगसंगती अशानी युक्त असलेल्या संभाव्य इमारतीचे मनमोहक असे चित्र पाहीले की एखाद्याला वाटलेच पाहीजे की या इमारतीत रहायला हवे. अनेक वर्षे ही कामे सरांनी केली. पण त्यांच्यातील चित्रकार त्यांना अभिजात कला निर्मिती करण्यास अस्वस्थ करून सोडत होता. शेवटी उपयोजीत कलेची कामे बंद करून त्यांनी केवळ पेंटिंग करणे सुरु केले. आपल्या खास शैलीमधील त्यांनी केलेली पेंटींग्सही त्यांतील आधुनिकता, सुलभीकरण, अलंकारीक आकार, विशिष्ट अशी खास रंगसंगती, व पोत या सर्वच दृष्टींनी सरस ठरतात. चित्रकलेसोबतच संगीतातही त्यांना तितकीच गती असल्याने त्यांची चित्रे, चित्र अन संगीत याचा सुंदर मिलाफ घडवून आणतात. त्यातूनही वेळ काढून चित्रकलेवर त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन चालूच असते. त्यांची कला विषयावर विविध पुस्तकेही प्रकाशीत झाली आहेत. त्यांच्या ' ब्रश माईलेज ‘ या आत्मचरीत्राला पारितोषिक तर मिळालेच, शिवाय त्याच्या अनेक आवृत्या प्रकाशीत झाल्या.
परांजप्याना माध्यमाचे बंधन कधीच जाणवले नाही. किंवा जाचक ठरले नाही. विविध माध्यमे त्यांनी अगदी सुलभतेने हाताळली. मग ते तैलरंग असो, जलरंग असो, पेन्सील अथवा पेस्टल असो, सर्वच माध्यमं त्यांच्या समोर लीन होत असत. तसेच विषयांचेही बंधन नाही. अगदी साध्यातला साधा विषयही त्यांना नव्या दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करतो. मग ती कांही इंचांची वृत्तपत्रीय जाहीरात असो किंवा त्यांचा भव्य कॅनव्हास असो, त्यातील प्रत्येक रेषेत वा रंगाच्या फटकाऱ्यात परांजपे आपलं सर्वस्व ओततात. त्यामुळेच त्यांची प्रत्येक कलाकृती संस्मरणीय होते. १९६४ मध्ये मुंबईला जेव्हां ‘ युकॅरीस्टीक काॅंग्रेस‘
भरली होती, त्यावेळी इंग्लंडहून आलेल्या त्यांच्या एजन्सीतील वरीष्ठांनी त्यासाठी परांजपेनी केलेले काम पाहीले, तेव्हां त्यांनी आपण लंडनच्या कोणत्या आर्ट स्कूल मध्ये शिक्षण घेतले आहे ? अशी विचारणा केली. व त्यांना जेव्हां कळले की, बेळगांव नावाच्या एका छोट्याशा गांवातून कला शिक्षण घेवून आलेले हे गृहस्थ इतके अलौकीक काम करतात, तेव्हां त्यांच्या आश्चर्याला पारावर राहीला नाही.
रवी परांजपे यांनी भारतात तशी परदेशातही प्रदर्शने भरवून तेथील लोकांकडून प्रशंसा मिळविली. १९९५ मध्ये त्यांना ' कॅग ' या जाहीरात क्षेत्रीय संघटनेकडून ' हॉल ऑफ फेम ' हा बहूमान मिळाला. भारतातील दयावती मोदी पुरस्काराचे अमिताभ बच्चन, मदर टेरेसा नंतरचे ते तिसरे मानकरी ठरले. या पुरस्काराच्या रकमेचा ट्रस्ट करून त्यातून दरवर्षी त्यांनी दरवर्षी एका सकारात्मक काम करणाऱ्या कलाकाराला रोख रक्कम व मानपत्र असा पुरस्कार आपले वडील कै. कृ. रा. परांजपे यांच्या नावाने सुरु केला होता. महाराष्ट्र शासनानेही त्यांचा सन्मान करून मानपत्र देवून विशेष गौरव केला. याशिवाय अमेरिकेमधील ' अमेरिकन आर्टीस्ट सोसायटी' तर्फे एका विशिष्ट देशातील कलाकाराचा सन्मान करण्याची प्रथा आहे. १९९८ हे वर्ष भारताचे होते. त्यामधूनही पुरस्कारासाठी रवी परांजपे त्यांचीच निवड झाली. आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या देशांत पदमश्री, पदमभूषण हे कित्येकांना योग्यता नसताही, विशेष करून फिल्मी नट नट्याना वाटले जातात, तेथे
रवी परांजपे यांच्यासारख्या जगभरातून मान्यता आणि पारितोषिके मिळालेल्या दैवी कलाकाराचे नावही या करंट्या लोकांना माहीती नसावे ? पण परांजपे सरांना याची पर्वा नाही. लोकांच्या हृदयांत ज्याने स्थान मिळवले आहे, अश्या कलाकाराला अश्या सन्मानाची फिकीर नसते. असते ती आमच्या सारख्या त्यांच्या रसिकाना, त्यांना देवाप्रमाणे पुजणाऱ्या भक्तांना ! आणि हे अखंड चालू राहील.
सतत कला साधनेमध्ये मग्न असलेला हा मनस्वी कलावंत आता पुण्यात स्थायीक झाला आहे. मुंबईने पैसा दिला पण पुण्याने संस्कृती दिली व त्याच संस्कृतीशी त्याने आपले नाते जोडले आहे. पुण्यातील कलावंताना, विशेषत: तरूण कलाकारांना सोबत घेवून त्यांचे अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरू असतात. आज दूर्मीळ होत चाललेल्या वास्तववादी कलेला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी व वास्तववादी व सकारात्मक काम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देवून त्यांना सतत मार्गदर्शन करणे हे परांजपे आत्मीयतेने करीत असतात. त्यासाठी त्यांच्या निवासस्थानी त्यांनी नवोदीत कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी, विचारवंतांना एक व्यासपीठ देण्यासाठी व भारतीय कलेचे सौंदर्य जपण्यासाठी ' रवी परांजपे आर्ट ग्यालरी सुरु केली आहे. आज ते केवळ एक कलाकार नसून एक कलेचे विद्यापीठ बनले आहेत. त्यांची प्रचंड अशी कलासंपदा पुढच्या कित्येक पीढ्यांना मार्गदर्शनाचा एक तेवता दीपस्तंभ आहे. ज्यामुळे अनेक कलाकार त्यांची वाट चोखाळत मार्गक्रमण करीत असतात. महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेल्या व जगाने गौरविलेल्या या महान कलाकाराला महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्काराने गौरवून हे राज्य कला - संस्कृतीचा मान राखते, तिचा आदर करते याचे प्रत्यंतर द्यावे, हीच शासनापोटी कला रसीकांतर्फे विनंती !
असा हा बेळगांवच्या १५९३, महादेव गल्लीतून एका रंगभान कलाकाराचा, संगीताचा बाज आणि कलेचा डौल घेऊन देश विदेशातील अनेक मान सन्मान घेत सूरू झालेला सुरेल असा कलाप्रवास व्हाया मुंबई पुण्यात येऊन स्थिरावला. एक स्वतंत्र असे कला साम्राज्य साकारण्यासाठी. त्याला संस्कृतीची जोड देण्यासाठी ! सुंदर ते वेचून, अधीक सुंदर करून मांडण्यासाठी!
- मं. गो. राजाध्यक्ष









ReplyDeleteरवी परांजपे
नेहमी प्रमाणेच तुमचा व्यक्तीचा वेध घेणे अप्रतिम झाले आहे . तुमचा त्या वक्ती विषयीचा अभ्यास व आदर इतका प्रामाणिक असतो कीं शब्दांचे अवडंबर न माजवता त्या व्यक्तीविषयी वाचणाऱ्याच्या मनांत आपसुक तितकाच आदर निर्माण होतो .
केवळ तुमच्या सारख्या गुणग्राहक गुरुजनांमुळे परांजपेसरांसारख्या अनेक मनोज्ञ कलाकरांची ओळख झाली हे आमचे भाग्य !
परांजपेसरांच्या चित्रात मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी साकारलेली रंगसंगती . अत्यंत मनोवेधक असुनही त्यात एखादा अनवट राग छेडल्याचा भास होतो कारण त्यातील रंगसंगतीची उधळण
( combinations ) खूप परंपरेला सोडून असली तरी त्याची एकसंघता तितकीच प्रभाव साधणारी असते . म्हणूनच प्रत्येक चित्राचा वेगळेपणा मनाला मोहवतो .
तुमच्या हा उपक्रम आम्हाला गुणी कलाकारांची ओळख करुन देणारा असल्यामुळे अखंड चालू ठेवावा ही विनंती , खूपखूप शुभेच्छा .
अनिल ठाकूर
दु भ्र ध्व क्र : ९८६०९०३२९३