एक सोज्वळ अभिनय सम्राज्ञी : सुमती गुप्ते - जोगळेकर


प्रभात ' चे चित्रपट गाजत असलेला तो चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ. शांता आपटे यांच्या अभिनयाने बडोद्यातील एका महाविद्यालयीन तरुणीला स्वतःमधील अभिनयाच्या सुप्त गुणांना जागृत करावे, अशी तीव्र इच्छा होत असे. जोडीला ईश्वराने दिलेले सौंदर्य होतेच ! अन एक दिवस धाडस करून घरीच काढलेला स्वतःचा एक लहानसा फोटो व त्यासोबत स्वतःची माहीती लिहून थेट व्ही. शांताराम यांना प्रभात फिल्म कंपनीच्या पत्त्यावर तिने पाठविले. थोड्याच दिवसांत ही घटना ती तरुणी विसरूनही गेली. अन एके दिवशी  प्रभात फिल्म कंपनीचा शिक्का असलेले पत्र तिला आले. चक्क ' प्रभात ' मधून तिला बोलावणे आले होते. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. ती मुलगी होती आपणा सर्वांच्या परिचयाच्या मराठी चित्रपटाच्या इतिहासात सोज्वळ ते सोशीक तशीच करारी व्यक्तीमत्व असलेली आणि सुंदर खानदानी वळणाची तसेच मराठी- हिंदी चित्रपटातील गाजलेल्या व घराघरात आदराला पात्र झालेल्या अभिनेत्री सुमती गुप्ते- जोगळेकर.

तसा सुमतीबाईंचा जन्म हा वाईचा. ११ मे १९१९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते. वाईसारख्या कर्मठ गावात त्या जरी जन्मल्या, तरी  त्यांचे बालपण बडोद्यासारख्या कला संस्कृतीच्या माहेरघरी व्यतीथ  झाले. साहजीकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषतः चित्रपटाकडे ओढा होता. दुर्गाबाई खोटे अन शांताबाई आपटे या त्यांच्या आदर्श होत्या.  पदवी शिक्षण प्राप्त केल्यावरची ही घटना होती. त्या काळात चित्रपटात काम करण्यास स्त्रियांना विरोधच असायचा. पण सॉलिसीटर लाड यांची व सुमतीबाई यांच्या वडिलांची खास मैत्री होती. लाडांची कन्या दुर्गाबाई खोटे ' प्रभात'मध्ये काम करतात, हे वडीलांना माहीती होते, त्यामुळेच सुमतीबाईंना परवानगी मिळाली. प्रभात मध्ये जाताच व्ही. शांताराम यांनी - अण्णांनी त्यांची चाचणी घेतली. केशवराव भोळ्यांनी गाण्याच्या बाबतीत पसंती दिली अन सुमतीबाईंना ' संत ज्ञानेश्वर ' चित्रपटात पहीली संधी मिळाली. ज्ञानेश्वरांवर मूक प्रेम करणारी नर्मदा त्यात त्यांनी साकारली. खरं तर व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची त्यांची इच्छा होती. पण अण्णांनी दिग्दर्शित केलेल्या एकाही चित्रपटात काम करण्याची त्यांना संधी मिळाली नाही. मात्र ' ज्ञानेश्वर ' प्रदर्शीत होण्यापूर्वी अचानक अण्णांकडून स्टुडीओत बोलावणे आले. सोबत ज्ञानेश्वरांची अजरामर भूमिका करणारे शाहू मोडकही होते. अण्णांनी सर्व चित्रपट पाहून एक प्रसंग त्या दिवशी पुन्हां चित्रीत केला. ज्ञानेश्वर पहाटे स्नान करून मग मंदिराकडे जात. त्यांच्यावर मूक प्रेम करणारी नर्मदा वडीलांना दिलेल्या वचनाप्रमाणे ज्ञानेश्वरांकडे येत नाही. मात्र आडोशाला राहून ती त्यांना पहात असे, व ज्ञानेश्वर निघून गेल्यावर त्यांच्या उमटलेल्या पाऊलखूणावर ती हातांतील फुलांची ओंजळ वहाते. एकही संवाद नसलेला हा प्रसंग सुमतीबाईंनी मूक अभिनयावर अप्रतीम वठविला. अण्णांनी योजलेला व सुमतीबाईंनी रंगवीलेला हा प्रसंग सर्व चित्रपटांत संस्मरणीय ठरला.

पुढे प्रभातचा करार संपला. दादासाहेब तोरणे हे त्या काळातील मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठे नांव. त्यांनी आपल्या ' नवरदेव ' या चित्रपटासाठी सुमतीबाईंची निवड केली. पुढे सुमतीबाई भालजी पेंढारकर यांच्याकडे आल्या. भालजींचा तेव्हां 'थोरातांची कमळा ' हा चित्रपट सुरु होणार होता. या चित्रपटांत त्यांनी शंभूराजांची प्रेयसी कमळा हिची भूमिका सुमतीबाईंना दिली. संवादावर जोर असणाऱ्या भालजींच्या चित्रपटांत सुमतीबाईंनी आपल्या अभिनयाच्या जोरावर तो चित्रपट अविस्मरणीय केला. सुमतीबाईंचे केस अतीशय लांब होते. त्यामूळे त्यांनी त्याचा अंबाडा बांधला होता. चित्रीकरण संपल्यावर भालजी त्यांना म्हणाले, ' आता तुम्ही केसांना जी दोन तीन गंगावने लावली आहेत ती काढा'. हे ऐकून सुमतीबाईंना राग आला, व भराभर अंबाडा सोडून त्यांनी आपले केस मोकळे केले. त्यांचे ते लांबसडक केस पाहून भालजी अवाकच झाले. हा त्यांचा चित्रपट खूप चालला. पाठोपाठचा त्यांचाच ' सुनबाई ' हा चित्रपटही सुमती गुप्ते या नावांवरच अविस्मरणीय ठरला.


भालजींकडचा दोन वर्षांचा करार संपल्यावर सुमतीबाईंनी मास्टर विनायक यांच्या ' गजाभाऊ ' या चित्रपटात नायिकेची भूमिका केली. वास्तविक त्यावेळी  विनायक- मीनाक्षी यांची जोडी जमली होती. पण सुमतीबाईंच्या अभिनयाचा अन व्यक्तिमत्वाचा विचार करून त्यांनी आपल्या ' अर्धांगी ' साठी पाचारण केले होते. पण त्यावेळी ' प्रभात 'च्या करारात त्या बांधल्या गेल्या होत्या. व शिस्तीचे कट्टर भोक्ते असलेल्या अण्णांनी त्यांना विनायकांकडे काम करण्यास मनाई केली.त्यामुळे अर्धांगीतील त्या भूमिकेला त्या मुकल्या. याच दरम्यान ' प्रफुल्ल 'च्या  ' चिमुकला संसार'चे दिग्दर्शन करीत असलेल्या वसंत जोगळेकर या तरुण, देखण्या व कल्पक दिग्दर्शकाने त्यांचे मन हिरावून घेतले. याची परीणीती प्रेमात झाली अन पुढे विवाहात ! आप्पा पेंडसे यांनी मध्यरात्री या या दोघांचे लग्न लावून दिले. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी आली ' सुनबाईचा चिमुकला संसार !' चित्रपट क्षेत्र गाजवत असतांनाच सुमतीबाईंना नाट्यक्षेत्राकडे वाळविण्यास आचार्य अत्रे कारणीभूत ठरले. चित्रपट क्षेत्रात तळपणाऱ्या या नायिकेला अत्र्यांनी त्यांच्या ' लग्नाची बेडी या नाटकांत घेतले अन सुमतीबाईंनी त्या भूमिकेचे अक्षरशः सोने केले. तसेच संशय कल्लोळ मधील कृतीकाही त्यांनी ठसक्याने रंगविली.त्यांचे स्वतःचे आवडते नाटक मात्र पु.ल. देशपांडे यांनी दिग्दर्शीत केलेले ' अखेरचे राजे ' होते.

अनेक हिंदी -मराठी-चित्रपटांमधून त्यांनी कामे केली. विवाहानंतर त्यांची स्वतःची चित्रनिर्मिती ' पचंदीप पिक्चर्स ', ' मीरा चित्र, मधू मूव्हीज '  अश्या ब्यानरखाली सुरु झाली. या काळातील ' आंचल,  कारीगर, आज और कल, प्रार्थना, एक कली मुस्काई, हा खेळ सावल्यांचा, जानकी हे त्यांचे सर्वच चित्रपट गाजले. या चित्रपट वाटचालीत ' क्षण आला भाग्याचा, ' कीचक वध,' शेवटचा मालुसरा,' ' पवनाकाठचा धोंडी,' ऊनपाऊस,' 'वक्त ' ' हरे कांच की चुडीया, ' हमारा संसार' ( हिंदी ) हे महत्वाचे चित्रपट. ऊन पाऊस मधे तर राजा परांजपें आणि सुमतीबाई यांची वृद्ध जोडप्याची भूमिका प्रचंड गाजली. पस्तिशीच्या आत वय असलेल्या सुमतीबाईंनी साठीला आलेल्या काशीबाई तंतोतंत उभ्या केल्या. पुढें याच कथेवर आधारित ' बागबान ' हा हिंदी चित्रपट आला. चित्रपटात त्यांनी ज्या भूमिका केल्या, त्या प्रेमळ, सोज्वळ, वात्सल्यपूर्ण, सोशीक अश्या. अगदी तशाच प्रकारचे गृहजीवन त्या जगल्या. त्यांच्या वरळी सीफेस वरील बंगल्यात गेल्यावर सर्वप्रथम जाणवे ते वसंतराव आणि सुमतीबाईंनी केलेले सुहास्य मुद्रेने स्वागत. आल्या गेल्याचे आदरातीथ्य त्यांच्या कडून नेहमीच घडत असे. माझ्या त्या चुलत सासूबाई. या नात्याने मी, माझी पत्नी तेथे गेलो तर त्यांचे पहीले सांगणे असे, आज येथून जेवूनच जायचे. कधी जास्त दिवस जाणे झाले नाही तर अप्पाकाकांचे ( वसंतरावांचे ) त्यांच्या सुंदर अश्या अक्षरातील पत्र यायचे व ते लिहीत, फार दिवस भेट झाली नाही, मुलांना घेऊन एकदा ये. त्याकाळात माझ्याकडे फोन नव्हता. त्यामुळे माझ्याशी संपर्क म्हणजे पत्रच असायचे. अशी अनेक सुंदर हस्ताक्षरांतील पत्रे आजही मी जपून ठेवली आहेत.

 निरनिराळे मांसाहारी, विशेषतः मासळीचे पदार्थ करून दुसऱ्यांना खाऊ घालण्यात त्यांना एक आनंद होत असे. लता मंगेशकर कुटुंबीय, अशोक कुमार ह्यांच्याशी तर त्यांचे घरगूती संबंध होते. अशोककुमार त्यांच्या प्रत्येक चित्रपटात असेच! मराठीत पण त्याने कामे केली आहेत. अशोक कुमार याना वरण भात खूप आवडत असे. मग ते खास सुमतीबाईंच्या हातचा वरण भात खाण्यास येत असत. त्यांच्याकडे कधीही जा, तेथे कोणीना कोणी प्रसिद्ध व्यक्ती बसलेलीच असे. एक पाय खुर्चीवर घेऊन शुभ्र सदरा - पायजाम्यातील हसतमुख वसंतराव व तितक्याच स्नेहाळ वृत्तीच्या सुमतीबाई यांच्या त्यांच्याशी गप्पा चालू असत. प्रांजळ स्वभाव,  हसतमुख चेहरा , दुसऱ्याचे कौतुक करण्यातली तत्परता या त्यांच्यातील गुणांनी त्यांनी अनेक माणसे जोडली.  आपल्या हातच्या उत्तम स्वंयपाकाने सर्वाना तृप्त केले. त्यांच्याकडे सतत राबता असे तो कधी काशीनाथ घाणेकर, कधी राजन जावळे, सीमा - रमेश देव असे तोलामोलाचे अभिनेते- अभिनेत्या असत. जानकी या त्यांच्याच ' आंचल ' चित्रपटावर बेतलेला चित्रपट त्यांनी सुरु केला तेव्हां निरुपा रॉय आणि नंदा सोबत सिमा यांनीही  त्यात एक छोटी भूमिका केली होती. जानकीमध्ये निरुपा रॉय यांची ती भूमिका सुमतीबाईंनी सीमा यांनाच दिली. मोहन वाघ तर घरातल्याच प्रमाणे होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोठेही गेले तरी मोहन वाघ सोबत असतंच ! अभिनेत्री म्हणून सुमतीबाई महान होत्याच ! त्याच बरोबर एक माणूस म्हणूनही त्या महान होत्या. त्यांचे शालीन सौंदर्य, खानदानी देखणेपण, आतिथ्यशील स्वभाव हे त्यांचे खास अश्या लोभस व्यक्तिमत्वाचे पैलू होते. त्यांच्या रुपसंपन्न व्यक्तिमत्त्वाकडे पहाताच आदराने मन भारून जात असे. त्यातच त्यांचे जीवन उजळून टाकणारा वसंतरावांसारखा दिलदार व प्रेमळ स्वभावाचा उमदा जोडीदार, जणू ईश्वराने एकमेकांसाठीच जन्माला घातलेले लक्ष्मी - नारायणाचे जोडपे. स्टुडीओत हे जोडपे एकत्र दिसले की लता मंगेशकर त्यांना हसून वाकून नमस्कार करीत. एक दिवस त्यांनीच सांगीतले की, या दोघांना पाहील्यावर लक्ष्मी - नारायण पाहिल्याचा आनंद होतो. पण अचानकपणे वसंतराव त्यांचे धरलेले बोट सोडून गेले. भरल्या संसाराला लागलेली दृष्टच होती ती !

सुमतीबाईंनी आयुष्यभर अभिनय पूजला. जोपासला. पण त्यांनी आपल्या संसाराला, कुटूंबालाच प्रथम प्राधान्य दिले. घरापासून फार दूर जावे लागेल अशी नाटके वा चित्रपट स्विकारले नाहीत. त्यामुळे त्यांचा जसा अभिनय फुलला, तसाच संसारही बहराला ! त्यांच्या तीनही कन्या मीरा, चंदा, मधुश्री या आपल्या मातेवर प्रेमाचा वर्षाव करीत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार मिळविले. शासनाचा  ' व्ही. शांताराम जीवन गौरव  पुरस्कार ' ही त्यांना मिळाला. शिवाय रसरंगचा दादासाहेब फाळके पुरस्कार, ' गदिमा ' प्रतिष्ठानचा ' गृहिणी सखी पुरस्कार ' अ.भा. मराठी महामंडळाचा ' चित्रभूषण  जीवन गौराव पुरस्कार' आदी पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आले होते. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना त्या पूर्वीच्या काळात पोचत. त्यांना आठवे ते पूर्वीचे चित्रपट सृष्टीचे सुवर्णयुग ! त्यांना आठवे ते व्ही. शांताराम, विनायक यासारखे मातब्बर दिग्दर्शक. वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, वि.वि.बोकील, य. गो. जोशी यासारखे कसदार लेखक, गीतकार संगीतकार, सर्वच भव्य दीव्य असे ! आजचा मराठी चित्रपट पाहून त्या व्यथीत होत. आज नेमकी हीच कमतरता त्यांना जाणवे. आज बंगाली, दाक्षिणात्य चित्रपट देखील कथानक, अभिनय, संगीत, दिग्दर्शन या सर्वच आघाड्यावर दर्जेदार ठरतात. मग मराठी चित्रपट अद्याप तमाशात का गुरफटला आहे ? अर्थात यालाही कांही चांगल्या चित्रपटांचा अपवाद असल्याचेही त्या सांगत.  हे त्यांचे मनोगत होते ते चौदा-पंधरा वर्षापूर्वीचे. त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी अन ते ध्वनिमुद्रित करण्यासाठी मी टेप रेकॉर्डर घेऊन गेलो अन त्यांना त्यांच्या त्या सुवर्णकाळावर बोलते केले.

आपल्या मंगल प्रकाशाने सर्व आसमंत उजळून टाकणाऱ्या व सतत तेवत असणाऱ्या या सुमती गुप्ते- जोगळेकररुपी निरंजनाची ज्योत ३१ आक्टोबर २००९ रोजी पहाटे निमाली. तृप्ततेने अन समाधानाने त्यांनी जगाचा वयाच्या नव्वदाव्या वर्षी निरोप घेतला. अन तोही काळजाला हात घालणाऱ्या अनेक आठवणी मागे ठेवून !

- मं. गो. राजाध्यक्ष

Comments

  1. Met her a few times, once she cooked the best chutney fried fish ... Chanda wes my classmate in the first year and we visited her house at Worli. She was a beauty even then☺

    ReplyDelete
    Replies
    1. Yes, all of us in the family had the delight of enjoying food prepared by her. She and her husband Vasant Joglekar (Kaki and Appa Kaka for us) were the most gracious of hosts.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…