जाहीरात कलेतील एक कलंदर : अरुण कोलटकर
कांही कलाकारांची नावेच अशी असतात, की ती उच्चारताच त्या प्रतिभाशाली कलावंताबद्दल आपल्याला आपूलकी वाटू लागते. अरुण कोलटकर हे नांवही त्यातलेच !
अवघ्या मराठी काव्य रसिकांना अरुणने आपल्या नावाची मोहीनी घातली होती. शिवाय त्या नावाशी अनेक गोष्टी जुळल्या होत्या. आज कवी म्हणून अरुण यांनी आपल्या देश्याच्या सीमा पार करून पलीकडे झेप घेतली. एक सर्जनशील विचारवंत, कवी, कलाकार म्हणून अरुण कोलटकरांनी कांही दशके घालवीली अन तीही जाहीरातीसारख्या विचार प्रसारणाच्या व दृक कला माध्यमाच्या सर्जनशील क्षेत्रांत, हे आजच्या पिढीला कदाचीत माहीत नसेल !
अरुण कोलटकरांचा पिंडच मुळी कवीचा. त्यातही त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरील अफाट वाचन. त्यामुळे त्यांच्या प्रतीभेला बहर न आला तर नवलच ! १ नोव्हेंबर १९३२ साली त्यांचा जन्म झाला तो कोल्हापूरात. या कलापुरातील मातीचे गूण त्यांनाही लागले अन कलापुरातील वंशपरंपरा असलेली चित्रकला त्यांच्या मधेही आली. तसे अरुण यांचे मूळ घराणे कोकणातील. पण पुढे वाडवडील कोल्हापुरात स्थायीक झाले. त्यामुळे कलेचा वारसा त्यांना दोन्ही बाजूनी मिळाला म्हणायला हरकत नाही. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. चित्रकलेच्या परीक्षा झाल्या. पुढे कोलटकर मुंबईला सर जे जे स्कुल ऑफ आर्ट मध्ये दाखल झाले. पेंटिंग विभागात त्यांचे चिंतनशील काम सुरु असे. वाचनाची आवड तर मुळातलीच होती. खरतर मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हा त्यांचा तसा खास आवडीचा विषय नव्हता. पण ज्ञान लालसेपोटी कोलटकरानी या विषयाचा चांगलाच अभ्यास केला, प्रचंड वाचन केले आणि पुढील आयूष्यात त्यांना त्याचा उपयोगही झाला. पेंटिंगसोबत त्यांना काव्याचीही ओढ लागली. वास्तवीक अरुण यांचे वडील शिक्षणखात्यात निरीक्षक होते. त्यांची इच्छा होती की मुलाने भवितव्य म्हणून या पेंटिंगच्या भानगडीत पडू नये. पण काव्य - कलेच्या उर्मी या अरुणच्या रोमारोमात रुजल्या होत्या. पेंटींग अन काव्य हेच जीवनाचे ध्येय ठरविलेल्या कोलटकरानी पुढच्या आयूष्याच्या स्थैर्याचा विचारही मनांत कधी आणला नाही, त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण जीवनच त्यामध्ये झोकून दिले.
अश्या या कोलटकरांनी कलेची सेवा स्वच्छन्दपणे करण्यास सुरुवात केली. पण कित्येकदा मानव निर्मित नियमावली त्यांच्या ध्यानांत येत नसत. बाबुराव सडवेलकर हे त्यांचे सहाध्यायी. तेही त्यांना अनेकदा काही गोष्टी सुचवीत. पण त्यांचे वागणेच जेथे स्वाभाविक होते, तेथे त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यावेळी जे जे चे ग्रंथपाल म्हणून प्रा. विश्वास यंदे काम पाहत असत. अरुण वाचनालयांतील निरनिराळ्या विषयांवरील पुस्तके आत्मीयतेने वाचत असत. यंदेही आवडीने त्यांना निवडक पुस्तके पुरवीत असत. जेजेच्या आवारात त्यावेळी अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, बंडू वझे, अविनाश गुप्ते, मनोहर ओक यांच्या वैचारीक चर्चा रंगत असत. अधून मधून गायतोंडेही त्यात हजेरी लावीत असत. शेवटच्या वर्षी कोलटकर नेमक्या परीक्षेच्या दिवशी दोन तास उशिरा आले, परिणामी त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करायला एक वर्ष वाया जाण्यात झाला.
साठच्या दशकांत कोलटकरांनी त्या वेळच्या बोमास ( आताची ओगील्वी ) या आंतरराष्ट्रीय जाहीरात संस्थेमध्ये प्रवेश केला. वास्तवीक त्या आधीच्या काळात जाहीरात क्षेत्रामध्ये अनेक पेंटींग पदवीधरांनी काम करण्यास आरंभ केला होता. आंबेरकर, वाघूळकर, मनोहर जोशी, द. ग. गोडसे हे सर्व पेंटिंग विभागातील. अर्थात त्याकाळी उपयोजीत अथवा विचार प्रसारण कलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरु झाला नव्हता. सर्व भीस्त होती ती या कलाकारांवरच ! आणि त्याकाळातील बहुतेक जाहीराती या बोधचित्रांचा पगडा असणाऱ्या होत्या. एखाद्या उत्पादनासाठी केलेली जाहीरात असो, भित्तीचित्र असो, वा कॅलेंडर असो, त्यामध्ये सदर उत्पादन वापरणारी एखादी सुंदर महीला दाखविणे वा तत्सम प्रकारचे दृश्य विलोभनीय रित्या आविष्कृत करून त्यासोबत उत्पादन दाखवणे अश्या प्रकारची असत. मात्र उपयोजीत कला विभाग सुरु झाल्यावर जाहीरात हे एक शास्त्र असते याचा अभ्यास होऊ लागला. प्रशिक्षित असे उपयोजीत कलाकार जाहीरात संस्थेतील उच्च पदे भूषवू लागले. त्याच काळात अरुण कोलटकरानी पेंटींग विभागातून उच्च श्रेणीतून उत्तीर्ण होऊन जाहीरात क्षेत्रात पाय टाकला आणि ते सर्वोच्च पदावर पोहोचले. कलाक्षेत्राला पेंटिंग, उपयोजीत कला अश्या प्रकारच्या भिंतींची गरज नसते हेच त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. बोमसमध्ये कोलटकरांची चित्रे अन शब्द दोन्ही फुलू लागले. ते लिहीत त्या शब्दांना व कागदावर उतरवलेल्या प्रतिमांना एक प्रकारचा डौल होता. शब्द कागदावर उतरायचे ते जणू मोगऱ्याची फुलेच टपकावी असे. ते स्वभावाने अत्यंत मितभाषी. मोजके शब्द बोलणारे. एखाद्या विषयावर त्यांची प्रतिक्रिया देखील अत्यन्त अल्प शब्दांची असायची. सहाय्यकाने केलेले जाहिरातींचे संकल्पन त्यांना दाखविले की कांही काळ त्याकडे पाहत ते स्तब्ध असत. नंतर ओ के, बरंय अश्या नेमक्या शब्दामध्ये आपले मत मांडत. मात्र इतरांना त्यांचे ते शब्द महत्वपूर्ण वाटत.
फोर्ट मधील रिदम हौस शेजारील ' वे साईड इन ' रेस्टारंट हे या सर्जनशील कलावंत मंडळींची पंढरी मानली जायची. तेथे कोलटकरांचे एक टेबल ठेवलेलेच होते. तेथे दिलीप चित्रे, अशोक शहाणे, बंडू वझे, अविनाश गुप्ते, मनोहर ओक, असे त्यांचे समविचारी मित्रमंडळ जमले की भट्टी एकदम जमत असे. सर्वांची वैचारिक चर्चा होत. कविता वाचन होत असे. काही वर्षांपुर्वी ते हॉटेल बंद झाले, तेंव्हां या सर्व मित्रमंडळींनी आपली बैठक फाऊंटन जवळील ' कॅफे मिलीटरी ' मध्ये हालविली . दर गुरुवारी दुपारी त्यांचा दरबार तेथे भरत असे. मध्यन्तरी सलमान रश्दी हे मुंबईला आले, तेव्हां त्यांनी अरुण कोलटकरना भेटायची इच्छा व्यक्त केली तेव्हां ही भेट याच ' कॅफे मिलिटरी ' मध्ये झाली. चांगल्या दोन तास त्यांच्या गप्पा तेथे रंगल्या.
बोमास मध्ये कोलटकरांचे सर्जनशील मन नेहमीच कल्पनाविहारात मग्न असे. पण तेथे त्यांना मनाजोगते काम मिळेना. तेथील अनेक कलाकार स्वतःला त्यांचे शिष्य म्हणवून घेत. तशापैकी तेथील कॉपी रायटर केरसी कात्रक हेही एक होते. १९६५ साली केरसी बाहेर पडले, व त्यानी ' मास कम्यूनिकेशन ॲन्ड मार्केटींग ‘ ( एम सी एम ) ही जाहीरात संस्था काढली. आणि अरुण कोलटकर हे तिचे प्रमुख बनले. कुलाबा येथील ' भक्तावार ' इमारतीत तिचे कार्यालय थाटले. त्या काळात त्या जागेचे भाडेही भरणे सर्वसाधारणपणे कठीण होते. पण एम सी एम ने आपली कर्तबगारी सिद्ध केली, अन सर्जनशील कामाच्या आधारावर ही संस्था जाहीरात क्षेत्रांतील मानदंड ठरली. येथे कोलटकरांनी मनसोक्त काम केले. सी एम सी या संगणकी कंपनीच्या लोगोपासून सर्व जाहीरात मोहिमा त्यांनी स्वतः संकल्पीत केल्या, व त्या कंपनीला उच्च दर्जावर नेवून ठेवले. ते संपूर्ण दशक अरुण कोलटकर या नावाने जाहिरातीच्या क्षेत्रात तळपत राहिलें. त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळावी म्हणून अनेक होतकरु कलाकार तळमळत असत !
कवीतेची आत्यंतीक ओढ असलेल्या कोलटकरांनी १९५५ च्या आसपास काव्याच्या निर्मितीला आरंभ केला. १९७४ साली त्यांनी लिहिलेल्या ' जेजुरी ' या इंग्रजी काव्य संग्रहाला राष्ट्रकूल पारितोषीक मिळाले , आणि अरुण कोलटकर हे नांव थेट जागतीक पातळीवर पोहोचले. अन पुढे ते भारतीय इंग्रजी कवी म्हणून प्रसिद्ध पावले. पाठोपाठच त्यांचा ' अरुण कोलटकरांची कवीता ' हा काव्यसंग्रह अशोक शहाणे यांनी प्रकाशित केला. शहाणे हे मराठीतील अनियतकालीक चळवळीचे पहीले वारकरी, आणि त्या मुशीतूनच अरुण कोलटकर या नावाची निर्मिती झाली. जेजूरीच्या यशामुळे मान्यता पावलेल्या कोलटकरांनी पुढे अनेक वर्षे आपला दबदबा राखला होता ! कोलटकरांचे इंग्रजी तसेच मराठी या दोन्ही भाषांचे ज्ञान अमर्याद होते. या भाषांवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व होते. या असामान्य प्रभुत्वामुळे ते उत्तम कॉपी रायटींगही करीत. शब्दांच्या व चित्रांच्या बाबतीत ते कमालीचे दक्ष असत. जाहीरात करतांना आवश्यक असणारी कल्पनाशक्ती व सर्जनशीलता याची त्यांना निसर्गदत्त देणगीच असल्याने त्यांच्या कल्पनेच्या भरारीला मर्यादाच नव्हती. आणि येथेच त्यांचे काम इतरांपेक्षा वेगळ्या धाटणीचे ठरे. त्यांचे व्हीज्युलायझेशन वैचारीक व प्रभावी असे. तसेच त्याला काव्याची जोड असल्याने त्यातील गोडवा हा वेगळाच असे.
कोलटकरांनी आपल्या जाहीरात कारकीर्दीत खूप काम केले. बोमास, युनीट -६१, एम सी एम, पुढे लिंटास, कांही वेळ स्वतःचे डिझाईन हाऊस, अजंठा अश्या विविध भूमिका बजावत त्यांनी असंख्य अश्या जाहीरात मोहीमेची निर्मिती केली. त्यांच्या विमान तळाजवळील सेंटॉर हॉटेलच्या जाहिरातींचे घोषवाक्य होते, ' The only hotel with attached airport ! ‘
त्यांनी सी एम सी, वामा, एच एम टी, लिबर्टी शर्ट्स, आदी उत्पादकांच्या जाहीरात मोहिमही समर्थपणे व सृजनशीलपणे हाताळल्या. आपल्या कविता संग्रहाची मुखपृष्ठेही ते स्वतःच करीत. ' चिरीमिरी' या त्यांच्या काव्यसंग्रहावर त्यांनी मोठी, मधोमध कापलेली सिमला मिरची दाखवून त्यात कांही ब्रिटिश कालीन नाणी कोंबलेली दाखविली होती. त्यांना बळवंतराव हे व्यक्तीमत्व जेव्हां भेटलं तेव्हां त्यांच्या भाजीच्या दुकानांतील नोकर पैसे चोरताना ही युक्ती योजायचा. कांही नाणी मोठ्या आकाराच्या मिरचीत खुपसून जातांना भाजीच्या रूपाने ती लांबवायचा.
एखाद्या गोष्टीबद्दल ध्यास घेतला की कोलटकर ती आत्मसात केल्याशिवाय रहात नसत. शेजवळांकडे शिकवणी लावून ते पखवाज शिकले. संगीतामध्येही त्यांना उत्तम जाण होती. कांही इंग्रजी गाणी स्वतः लिहून संगीतबद्ध केली व स्वतःच गायली. त्याचे रेकॉर्डिंग शशांक लालचंद यांनी केले होते. ते बांसरी वाजवायला शिकले. मध्ये त्यांनी पानांपासून बनविलेल्या द्रोणांविषयी माहीती मिळविण्यास सुरुवात केली. आपल्या देशांत अनेक भागात वेगवेगळ्या प्रकारचे द्रोण व त्यासाठी वेगवेगळ्या पानांचा वापर केला जातो. काही पळसाची वा फणसाची वा अन्य झाडांची पाने वापरून द्रोण बनविले जातात. त्यांच्या टाचण्याही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. हे द्रोण जेवणासाठी, प्रसादासाठी, तसेच गंगेत सोडण्यात येणारे द्रोण अशी बरीच माहीती कोलटकरांनी मिळविली, आणि त्यानंतर त्यांचा ' द्रोण ' हा काव्यसंग्रह प्रकाशीत झाला. लौकिकार्थाने कोलटकरांचे आयूष्य दोन कलाकारांमध्ये विभागले गेले होते. एक होता त्यांच्यामधील चित्रकार, आणि दुसरा होता एक सर्जनशील असा कवी.कोलटकरांनी त्या दोघांनाही तितक्याच आपुलकीने व अगत्याने सांभाळले. दोघांचेही पावित्र्य तितक्याच महत्वाने जपले. प्रत्येक गोष्टीमधें त्यांची कल्पकता दिसून येत असे. आपल्या ' भिजकी वही ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना त्यांनी एका पाण्याच्या बादलीत वही भिजत ठेवली होती. या ' भिजकी वही ' काव्यसंग्रहाला त्यांना साहीत्य अकादमी अवार्ड मिळाले. तसेच महाराष्ट्र साहीत्य परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
कोलटकरांचा पिंड कलाकाराचा होता. मन कवीचे होते.त्यांचे संपूर्ण अंतरंग भावीक होते. संतांच्या दैवी काव्याचे ते भोक्ते होते. जगाची त्यांना फिकीर नव्हती. ते विठोबाचे भक्त होते. दर मंगळवारी सायंकाळी हा चित्र- काव्य - पंढरीचा वारकरी घरी भजनाचा कार्यक्रम करीत असे. यात अनेकदा ते स्वतःही भजन अगदी खुलवून म्हणत. यामध्ये त्यांचे बरेच सवंगडी असत. अनेक कलानी विभुषीत असलेले कोलटकर काव्यासोबतच पेंटींग, ग्राफीक्स, तितक्याच प्रभावीपणे करीत. या सर्वच कलांवर त्यांनी प्रेम केले. अजातशत्रू म्हणून वावरलेल्या कोलटकरांना मोजके मित्र होते. पण ते सर्व जिवाभावाचे होते. त्यांनी आपली चित्रकला काव्यातूनही व्यक्त केली. " चित्रकला मी पोटापुरती राबवतो, पण माझे खरे काम कवीतेबरोबर आहे " असे जरी त्यांनी म्हटले, तरी खऱ्या अर्थाने त्यांनी कधी पोटाचीही फिकीर केली नाही. स्वतःचे असे खास मानदंड निर्माण करणाऱ्या कोलटकरांनी जाहीरात क्षेत्रांतील कलाकारांचा दर्जा वाढवला. स्वतःच्या कामाबद्दल त्यांना जबर आत्मविश्वास होता. आपल्या चित्र व कवितेवर ते अनेक दिवस मेहनत घेऊन काम करायचे. त्यामुळे आपल्या चित्रांतील एखादा घटक अथवा लिखाणातील स्वल्पविरामही कोणाला ते बदलू देत नसत. एवढी प्रचंड क्षमता त्यांच्या ठिकाणी होती. पण एवढे असूनही ते कधी व्यावहारीक नव्हते. सतत एखाद्या सार्वभौम राजाप्रमाणे जाहिरातींच्या व काव्याच्या क्षेत्रावर अधिराज्य गाजवीत जगले. त्यांच्या मित्रमंडळींना क्वचितच त्यांच्या जाहीरात क्षेत्रातील त्यांचे योगदान, त्यांनी मिळवलेली असंख्य पारितोषिके, सन्मान याची माहिती असे. कारण ते स्वतः कोणाशीच याचा उल्लेख करीत नसत. इंग्रजी आणि मराठी अश्या दोन्ही भाषा समर्थपणे हाताळणाऱ्या कोलटकरांनी स्वतःच त्यांच्या एका काव्यांत उदगृत केले आहे ;
"I have a pen in my possession
which writes in 2 languages
and draws in one
My pencil is sharpened at both ends
I use one end to write in Marathi
the other in english
what I write with one end
comes out as English
what I write with the other
comes out as Marathi"
कोलटकरांची तब्येत जेव्हां बिघडली तेव्हां त्यांना पुण्यातील त्यांच्या डॉक्टर भावाच्या घरी हलवीले. तेथेही त्यांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी हजेरी लावीत. त्यांचा आजार बळावला तेव्हां त्यांचे जवळचे सर्व मित्र जसे ' कॅफे मिलिटरी' मध्ये जमत, तसे पुण्यातील त्यांच्या घरी जमले. त्यामध्ये अशोक शहाणे होते, बंडू वझे होते. दिलीप चित्रे, रतन सोहनी अश्या सर्वच मित्रांचा समावेश होता. त्यांच्या कवितांची उजळणी होत होती. आपल्या सुरुवातीच्या कष्टाच्या काळातील मुंबई मधील दिवसांवर त्यांनी लिहिलेल्या ' Bombay made me a beggar ‘ या कवितेचीही आठवण झाली. जुन्या आठवणी जागवत होत्या.
अश्या या कलावंताने २५ सप्टेंबर २००४ रोजी या जगाचा निरोप घेतला. एक कलंदर जीवन जगलेल्या या अवलियाने जी निर्मिती केली आहे, ती पुढील कित्येक पिढयांना संशोधनात्मक कार्य करण्यास प्रवृत्त करेल यात शंकाच नाही. आज कवी या नात्याने 'अरुण'कोलटकर ' हे नांव जगाच्या नकाशावर पोचले आहे. पण ज्या व्यक्तीने एक कलाकार या नात्याने जाहिरातींचे संपूर्ण क्षेत्र आपल्या हुकूमतीखाली ठेवले, त्याला अमूल्य योगदान दिले त्याची माहीती आजच्या पिढीला कितीशी आहे याची कल्पना नाही. आज जे जे स्कूल ऑफ आर्ट, जे जे इन्स्टिट्यूट ऑफ ॲप्लाईड आर्ट, या दोन्ही ठिकाणी 'एम एफ ए' व पी एच डी अश्या दोन्ही पदव्यांची सोय आहे. तेथील एखाद्या तरी अभ्यासू शिक्षकांनी कोलटकरांचा जाहीरात प्रवास संशोधन करून विद्यार्थ्यांच्या पुढील पिढ्यांसमोर एक आदर्श उदाहरण म्हणून ठेवू शकेल काय ? तसे झाल्यास अनेक सृजनशील कला विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शक ठरेल. अनेक कला दालने उघडली जातील. अन्यथा...
ते जाहीरात क्षेत्राचे दुर्दैव मानावे लागेल !
- मं. गो. राजाध्यक्ष



" एखाद्या तरी अभ्यासू शिक्षकांनी कोलटकरांचा जाहीरात प्रवास संशोधन करून विद्यार्थ्यांच्या पुढील पिढ्यांसमोर एक आदर्श उदाहरण म्हणून ठेवू शकेल काय ?"
ReplyDeleteखरोखर अंतर्मुख करणारा प्रश्न! अरुण कोल्हटकर ह्यांच्या काही केस स्टडीज वर काम करावे म्हणून ९३ साली मी प्रयत्न केला होता पण त्यावेळी व्यावसायिक कमिटमेंट मुळे ते राहून गेलं. आता खन्त वाटते! अपराधी पणाची जाणीवही होते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाची निर्मिती प्रक्रिया, तिच्या सर्वांगांनी विद्यार्थ्यांसमोर यायला हवीच सर, तुमच्या ह्या लेखातून कुणी नव्या दमाच्या संवेदनशील विद्यार्थ्यांनी खरंच प्रेरीत व्हावे, अस वाचल्याबरोबर वाटतं. पुष्कळदा अशा कलावंतांच्या जगण्याच्या चर्चा होतात पण त्याच्या निर्मिती प्रक्रियेबाबत शोध घेतल्या जात नाहीत पण ह्या लेखानी दिशा आणि दर्शन दोन्हीची झलक आपण रसिकांसमोर दिलीयत हे खरोखर प्रेरणा दायी !
खरे आहे. प्रतेक शिक्षकाने आत्मपरीक्षण करावे असे आहे हे. केवळ स्वताच्या पदव्या वाढवायच्या की ज्ञान हेही कळले पाहीजे.
ReplyDeleteफक्त नाव ऐकलेले आणि पाहीलेले अरुण कोलटकर एखाद्या चित्रपटासारखे उलगडुन पहायला व अवलोकीत करावयास मिळाले. शतशः आभार
ReplyDeleteराजाध्यक्ष सर