एक होती राजकन्या



पुण्यापासून साधारण २६ किलोमीटर अंतरावर आनंदग्राम नावाची एक कुष्ठ रोग्यांची वसाहत आहे. येथील शुभ्र आणि नीटनेटक्या इमारतींमध्ये अनेक कुष्ठ रोगापासून मुक्त झालेले रुग्ण निरनिराळ्या हस्तकलेच्या वस्तू बनविण्यात मग्न असतात. आरंभी कुष्ठरोगाचे बळी ठरलेले हे लोक आता त्यांच्या या छोट्याश्या टुमदार गावात स्वावलंबी बनून स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत. कुष्ठ रोग्यांचे पुनर्वसन करणारी एक यशस्वी गाथा म्हणून आनंदग्राम एक उत्तम उदाहरण आहे. येथे भेट देणारी प्रत्येक व्यक्ती एका उदात्त विचाराने भारून निघते, आणि तिचे पाय येथून बाहेर पडायला तयार होत नाहीत. या आनंदग्रामच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन सत्यात आणण्याची पूर्तता करण्यात एका महिलेची, महिलेची कसली, एका राजघराण्यातील राजकन्येची कल्पनाशक्ती आणि जबरदस्त लालसा कारणीभूत आहे. आणि ती राजकन्या होती जमखंडी संस्थांच्या राजघराण्यात १४ मे १९२६ रोजी जन्माला आलेली राजे परशुराम पटवर्धन यांच्या भगिनी आणि आमच्या ताईआत्या - इंदुताई पटवर्धन ! याच राजे पटवर्धनांनी मिरज, सांगली, कुरुंदवाड या जहागिरीवर राज्य केले.

अगदी बालवयातच इंदुताईंना स्वातंत्र्याच्या चळवळीने भारले होते. गांधीजींची छोडो भारत चळवळ त्यांना देशभक्तीकडे ओढत होती आणि वयाच्या १७ व्या वर्षी राजघराण्यातील सर्व सुखे, ऐषाराम, तेथील राजघराण्याचे शिष्टाचार या सुखसोयींना त्यागून इंदुताईनी सरळ अहमदाबाद गाठले व तेथील गांधीजींच्या साबरमती आश्रमात जाऊन देशसेवा आणि जनसेवेचे व्रत अंगिकारले. गांधीजींच्या विचारांनी त्या प्रभावित झाल्या. त्यांच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर महायुद्धात इंदुताईनी ब्रम्हदेशात रेड क्रॉस संघटनेत सामील होऊन अनेक जखमी आजारी सैनिकांची सेवा केली. दक्षिण पूर्व आशिया  मध्ये अश्या प्रकारचे काम करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.  स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातून बेघर होऊन भारतात आलेल्या महिला निर्वासितांच्या पुनर्वसनाचे काम फिरोजपूर येथे केले. पुढे इंदुताईंना पुण्याच्या मिलिटरी इस्पितळात पाठविण्यात आले. तेथे त्यांनी आपला होमिओपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण करून स्वतःचे क्लिनिक सुरु केले.


अश्याच एका क्षणी त्यांच्या नजरेस पदपथावर पडलेले काही कुष्ठ रोगी पडले. कुष्ठ रोग हा महाभयंकर मानला जाणारा तो काळ होता. तसे पहिले तर आताही हीच कल्पना कोणीही मनाशी बांधतात. आणि त्यांचे मन द्रवले. अश्या रुग्णाच्या घरी जाऊन त्यांची सेवा करण्याचे कार्य त्यांनी अंगिकारले. पण बरेच कुष्ठरोगी हे कुटुंबांनी घराबाहेर काढलेच असतात. त्यातील बहुतेक भीक मागतात. अश्यांसाठी एका केंद्राची गरज होती. त्यावेळी एका ब्रिटिश संस्थेकरवी त्यांना जागा घेण्यासाठी १७००० रुपयांची मदत मिळाली. पण येथे कुष्ठ रोग्यांचे केंद्र होणार या जाणिवेने तेथील कोणीही इंदुताईंना जागा विकत देण्यास तयार होईना. अश्यातच काही काळ गेल्यानंतर कामाचे स्वरूपाचं दिसेना त्यामुळे त्या संस्थेने आपले पैसे परत मागितले. तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी इंदुताईनी आपली अडचण सांगताच त्या ब्रिटिश कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वतः तेथील आळंदी जवळील  दुधाळगाव येथे एक वैराण अशी  अठरा एकराची जागा मिळवून दिली. आजूबाजूला अस्वच्छता, हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय, गलिच्छ वस्ती असा एकंदर सर्व कारभार होता. बुलडोझरने जागा सपाट करण्यात आली. यातच सर्व पैसे खर्च झाले. आता खरा प्रश्न होता तो या लोकांसाठी घरे उभारण्याचा. तेव्हा पोलिसांनी उध्वस्त केलेल्या हातभट्टीच्या दारूचे पत्र्यांचे अनेक डबे जप्त केलेल्या अवस्थेत इंदुताईंच्या नजरेस पडले. त्यांनी तडक पोलीस आयुक्तांची भेट घेतली, आणि ते सर्व डबे मिळविले. त्यांना कापून त्यांच्यावर रस्ता बनविण्याचा रूळ फिरवून त्यांना सपाट केले. व ते सर्व रुग्णांना देऊन त्याची घरे उभारण्यास सांगितले. अश्या रीतीने १९६१ साली ' आनंदग्राम ' या कुष्ठरोग्यांचा आश्रम उदयाला आला. जगाने, आप्तस्वकीयांनी, मित्रमैत्रिणींनी लाथाडलेल्या त्या दुर्दैवी जीवांच्या नशिबात एक आशेचा, उमेदीचा किरण आला.


एवढ्यावरच हे दुर्दैव संपले नव्हते. हा आश्रम येथे स्थीर होऊ नये यासाठी तेथील गावकऱ्यांनी आजूबाजूच्या दुकानदारावर याना कोणीही माल देऊ नये यासाठी दडपण आणू लागले. सर्व बाजूनी कोंडी करण्याचे प्रयत्न होत होते. आनंदग्राम निस्तब्ध होऊन हे पाहत होते. पण यावरही इंदुताईनी मात केली. आनंदग्राम मधेच या सर्व गोष्टींची निर्मिती करण्यास त्यांनी आरंभ केला. भाजीपाला, धान्य, स्वयंपाकासाठीच्या लागणाऱ्या इतर गोष्टी यांची लागवड आनंदग्राम मध्येच होऊ लागली. गोबर ग्यास तयार करण्यात आला. जोडीला अय्यंगार नावाच्या योग अभ्यासकांकडून पिठाची गिरणी दान म्हणून मिळाली. त्यामुळे सर्वच काम सुलभ झाले. केवळ तेलासाठी बाहेरच्या जगावर विसंबून राहावे लागत असे. पण तेलाचा घाणाही सूरू करण्याचे  त्यांनी ठरविले.



हळूहळू पक्क्या इमारती उभ्या राहिल्या. तेथे येणारे जसे भीक मागून पोट भरण्याचा उद्योग करणारे होते, तसेच नोकरी करून कमावते असलेलेही होते. ह्या रोगाची लागण झाल्यावरही घरच्यांकडून बदललेला दृष्टीकोण पाहून आलेले रुग्णही होते. अश्या पुढे बऱ्या झालेल्या लोकांना पुन्हा कोठे हात पसरवू लागू नयेत, यासाठी त्यांना स्वावलंबी बनविणे आवश्यक होते. यासाठी आनंदग्राम मध्ये निरनिराळ्या व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा सूरू करण्यात आल्या. यामध्ये सुतारकाम, चर्मकला, विणकाम असे उपक्रम होते. तेथील रहिवासी स्वतः धोतरे विणून परिधान करू लागले. जोडीला तंत्रज्ञानही शिकविण्यात येऊ लागले. यामुळे बरे झालेले रुग्ण अन्य रुग्णांची सेवा करू लागले. कोणी  तंत्रद्न्य म्हणून तर कोणी फिजिओ थेरॅपिस्ट म्हणून. अश्या दृष्टीने आनंदग्राम नेहमीच प्रयत्नशील राहिले.


आमची इंदुताईंशी भेट झाली ती माझ्या विवाहानंतर १९७३ साली. माझे सासरे छायाचित्रकार बाळ जोगळेकर यांची ती मानलेली बहीण. पण सख्ख्या बहिणीप्रमाणेच त्यांचा अधिकार चालत असे. मुंबईला त्या आल्या की  जोगळेकरांकडेच त्यांचा मुक्काम असे. ताई आत्या असे त्यांना सर्वांकडून संबोधण्यात येत असे. स्थूल अश्या देहाच्या, गौरवर्णी कोकणस्थी रंग, सततच्या धावपळीमुळे थकलेल्या जाणवल्या तरी चेहऱ्यावर असलेले राजघराण्याचे खानदानी सौंदर्य त्यांना खुलून  दिसे.  असे. त्यांना प्राण्यांबद्दलही प्रेम वाटत असे. पुण्याच्या बोटक्लब रोडवर त्यांच्या घरी विविध पेडीग्रीचे दहा बारा कुत्रे होते. तेही कुटुंबीयांप्रमाणेच वागवत.  इंदुताईनी विवाह केला नाही. पण लहानपणी त्यांना मदत केलेल्या त्यांच्या घराण्यातील एका कडपट्टी नावाच्या सेवकाला त्याच्या सर्व कुटुंबासहित त्यांनी सांभाळले. व त्याच्याच एका मुलाला विजय याला दत्तक घेतले. तोही पुढे आनंदग्राम मध्ये मदत करू लागला. सध्या विजयचे  बंधू जय काडपट्टी  हेच आनंदग्रामचा सर्व व्याप सांभाळतात. विजय व जय यांनी या परिसरात असंख्य बाभूळ वृक्षांची लागवड केली. ज्यामुळे जळावू सर्पणाचीही सोय झाली.


राजघराण्यात जन्माला येऊन, भव्य अश्या प्रासादात खेळून बागडून, पुढे ते सर्व लाथाडून केवळ कुष्ठ रोग्याची सेवा करण्यात धन्यता मानलेल्या या राजकन्येने स्वतः प्रसिद्धी मिळविण्याची कधीच हाव बाळगली नाही अथवा सरकार दरबारी हजेरी लावण्यात धन्यता मानली नाही. "  मी काहीच केले नाही. हे छोटेसे जग या लोकांनीच निर्माण केले आहे " असे इंदुताई म्हणत. अश्या या दुःखितांचे अश्रू पुसणाऱ्या, त्यांची सेवा करणाऱ्या इंदुताईनी तृप्त   मनाने आपले आनंदग्राम कुटुंब मागे ठेवून ८ फेब्रुवारी १९९९ साली जगाचा निरोप घेतला. आज सुदैवाने कुष्ठ रोगालाही बऱ्यापैकी आला घातला गेल्यामुळे तोही आटोक्यात आला आहे, व त्यामुळे रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.
आपण या प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या राजकन्येचा, इंदुताई पटवर्धन यांच्या स्मृती चाळवुन त्यांना आदरांजली वाहणे उचित ठरेल.   



- मं. गो. राजाध्यक्ष

Comments

  1. इंदुताईना मनापासून नमन !!

    ReplyDelete
    Replies
    1. खरोखर एक असामान्य व्यक्तिमत्व होते.

      Delete
  2. आईसाहेब यांना माझा कोटी कोटी प्रणाम.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…