शाळा सुटली ...पाटी फुटली.


प्रा. वि.द. घाटे यांचे ' कांही म्हातारे व एक म्हातारी' हे पुस्तक मला खूप आवडते. विशेषतः त्यातील प्रो. देसाई यांचावरील 'एक म्हातारा ' हा लेख तर माझ्या मनांत घर करून बसला आहे. स्वतःच्या ज्ञानात आणि संशोधनात मग्न असलेल्या देसाईसरांच्या विद्ववत्तेसमोर सर्वजण दिपून जात असत. त्यांच्या दैवत असलेल्या शंकराचार्यांच्या अद्वैत मताचे ते जेव्हां समर्थन करीत तेव्हां त्यांच्या वाणीतून जणू त्यांच्याविषयीच्या भक्तीचे उमाळे फुटत असत. आणि आपल्यालाही जाणीव होत असे ' गुरु ' या व्याख्येची ! त्यांच्यातील तपश्चर्येची! त्यांच्या दीर्घ अश्या ज्ञान लालसेची ! प्रा. घाट्यानी त्यांचे जे शब्दचित्र आपल्या भाषेत असे कांही रेखाटले आहे, की ते वाचतानाच आपला उर अश्या गुरूंनी अभिमानाने भरून येतो व त्यामध्ये आपण आपले गुरु पाहू लागतो. असेच कांही गुरुजन शालेय शिक्षणात आमच्या वाट्याला आले होते. शिक्षण हा व्यवसाय नसून ते एक ज्ञानदानाचे पवित्र कार्य आहे, असे समजून त्यात स्वतःला झोकून देणारे ! एक निरोगी अशी विदवत्त पिढी तयार करण्यासाठी अविरत झटणारे, जे आजच्या काळात पाहणे दुर्लभ झाले आहे.

लहानपणापासून प्रत्येकाच्या मागे लागलेली एक गोष्ट असते, ती म्हणजे शाळा. मात्र आतासारखे त्या शाळेत जायला नाकही साफ न करता येण्याच्या वयात नसून, चांगली समज आल्यावर वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत पदार्पण होत असे. त्याकाळातील आमच्या शाळाही मुनिसिपाल्टीच्या नंबर ३, नंबर २ अश्या असूनही त्या ओळखल्या जात त्या तेथील हेडमास्तरांच्या नांवावर. जशी पोटे मास्तरांची शाळा, पाटील मास्तरांची शाळा अश्या. त्या हेडमास्तरांचा धाक असे त्याकाळात इतर शिक्षकांवर आणि अर्थात विद्यार्थ्यांवर. टेबलावर डस्टर सोबत एक छडी असायचीच, जिचा प्रसाद बहुदा सर्वच विद्यार्थ्यांना मिळाला असेल. या प्राथमिक शाळेत बसणेही जमिनीवरच असायचे. मांडी घालून, हातात पाटी धरून मास्तरांनी सांगितलेले गिरवायचे. आपल्याला काहीतरी नवीन येत आहे, या आनंदातच आम्ही घरी परतत असू. शाळा सुटण्यापूर्वी सर्वानी उठून उभे राहून एकत्र परवचा म्हणणे हे नित्याचे काम असे. मग शनीवारी त्या दगडी पाटीला कोळशाने घासून कुळकुळीत काळी करणे हा पण उद्योग असे. त्यावर लिहीण्यासाठी पेन्सील देखील दगडीच असायची. दगडावर घासून तिला बारीक टोक काढता यायचे. शाळेत तपासणी असेल त्या दिवशी दिपोटी येणार म्हणून त्या दिवशी स्वच्छ कपडे घालून शाळेत येणे हे शिक्षकांचे सर्वांना सांगणे असे. असा त्या प्राथमीक शाळेतील प्रवास आटोपून जेव्हां मी हायस्कुलला गेलो, तेव्हां मात्र सगळेच चित्र पालटले होते. तेव्हां सर्वच माध्यमीक शाळांना खेळाची मोठी मैदाने असत. आमच्या बेनन -स्मीथ हायस्कुलला देखील तसलेच मोठे मैदान होते. प्रत्येक वर्गाच्या तीन ते चार तुकड्या असायच्याच! बसायला दोघा दोघांचे डेस्क, ड्रॉईंग स्टुडीओत सर्वांना मिळणारे चित्रकलेचे साहीत्य, लायब्ररीच्या तासाला मॉनिटरने आणलेली पुस्तके वाचणे, या सर्वच गोष्टी मनोरंजक होत्या. थोड्याच दिवसांत सर्व मुलांच्या ओळखी होत, आणि मग शाळेतील असलेल्या अनेक शिक्षकांच्या ओळखी त्यांच्याकडूनच व्हायच्या. आणि हळूहळू आम्हालाही सर्व शिक्षक समजू लागत, जरी ते आम्हांला शिकवत नसत.
मात्र प्रत्येक शिक्षकाचे काहीनाकाही खास वैशिष्ट्य होते. कोणाचे व्यक्तीमत्व आकर्षक असे, तर कोणाची विद्वत्ता ! कोणी खेळांत प्रवीण तर कोणी विद्यार्थीप्रिय. एखाद्याची शिकवण्याची हातोटी जशी मुलांना गोष्टच सांगत आहेत. जून महिन्यांत आम्ही शाळा सुरु व्हायची वाट पहात असू ते मुख्यत्वे करून नवीन वर्षांची नवी पुस्तके घेण्यासाठी. त्यातील नवीन धडे वाचण्यासाठी. अगदी वि.स. खांडेकरांपासून वि.द. घाटे, पं. महादेवशास्त्री जोशी, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मामा वरेरकर अश्या दिग्गजांचे लेख, बालकवी, केशवकुमार,केशवसूत, ते कुसूमाग्रज, बा.भ. बोरकर, अश्यांच्या कविता हे सर्व मनाला उत्तेजीत करीत असे. पुस्तकांच्या दुकानांतही दोन प्रकारची पुस्तके असत. एकतर नवी कोरी करकरीत आणि दुसरी म्हणजे अर्ध्या किमतीला मिळणारी जुनी पुस्तके. पास झालेले विध्यार्थी आपली पुस्तके अश्या दुकानांत विकत असत. आमच्या शेजारच्या सुध्याने एकदा परीक्षा झाल्याबरोबर आपली पुस्तके विकून टाकली व ते पैसे उडवले. पण परीक्षेच्या निकालात या सुध्याचाही निकाल लागून तो नापास झाला व आता त्याला पुन्हां त्याच वर्गाची नवीन पुस्तके घ्यावी लागणार म्हणून त्याच्या आईने सुध्याला धू धू धुतले होते. मुलांनी विकलेली जुनी पुस्तके घेऊन मग दुकानदार त्यांना नीट बाईंडींग करून नीटनेटकी करीत व ती कमी किमतीला विकत. एकदा पुस्तकांचा गठ्ठा मिळाला की सोबत ब्राऊन पेपर घेऊन येत असू. मग माझे वडील ते सर्व साहीत्य घेऊन सर्व पुस्तकांना नीट अशी सुबक कव्हर्स घालीत. शाळेत जाताना आताप्रमाणे मुलांच्या पाठीवर पुस्तकांचे ओझे बिलकूल नसे. गाईडचे तर कोणी नांवच काढत नसे. प्राथमीक शाळेत दप्तर नावाची पाठीवर टाकायची पिशवी असे, आणि हायस्कुलमध्ये मोजकी पुस्तके हातात धरून, शर्टला पेन अडकवून मुले शाळेत पोचत. कित्येकदा जर पेन गळके असेल तर खिश्याला शाईचा डाग पडत असे. एक मोठी २०० पानांची वही घेऊन त्यामध्ये एका पानाला घडी घालून प्रत्येक विषयाचे त्यावर नांव लिहिले जाई, व त्या भागात त्या विषयाच्या नोट्स घेत असू.


या वर्षीं आपल्याला कोणते वर्गशिक्षक येणार याचीही उत्सूकता असेच ! त्यातही आपल्या आवडीचे शिक्षक यावेत ही इच्छा तर असेच. काही तुसडे शिक्षक पण असतंच. त्यांच्याशी सूर कधी जुळलेच नाहीत. पण सतत हसतमुख आणि चेहऱ्यावर मार्दव ओसंडून वाहणारे असे मिरजकर सर, करारी पण हाडाचे शिक्षक असलेले काथवटे सर, इतिहासाचा तास कसा गेला हे जाणवूनही न देणारे, आवाजात नेहमीच मार्दव राखणारे उंचेपुरे, धोतर नेसणारे सिद्धान्ती सर, भूगोल हा विषय एखादा खेळ खेळल्याप्रमाणे शिकवणारे हेडमास्तर वि.बा. मराठे सर, गणित व शास्त्र ह्या विषयांत त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही असे आदराला प्राप्त असलेले जी.के. कुलकर्णी सर, आम्हांला गणितात गती नसल्यामुळे सकाळी घरी बोलावून गणीत शिकवणारे व्ही. के. धनवडे सर, कांही काळच आमच्या सोबत घालविलेले पण मैत्रीच्या अविर्भावात वागणारे त्रिभुवन सर, हॉकीच्या मैदानांवर आमच्या सोबत सेंटर फॉर्वर्डवर हॉकी खेळणारे व म्याच संपल्यावर कोपऱ्यावरील माधवाश्रमात मसाला डोसा व चहा देणारे जोशी सर, साहित्याची उत्तम जाण असणारे आणि मराठी भाषा यमक,अनुप्रास, अतिशयोक्ती अश्या अलंकारासहीत शिकविणारे, तसेच संध्याकाळी वाङ्मय चर्चा मंडळात हमखास भेटणारे सोलापूरकर सर, दिवसभर शाळेत ज्ञानार्जन करून सायंकाळी स्वतःच्या पुस्तकाच्या दुकानांत दिसणारे कालकुंद्री सर, पी. टी. शिकवणारे बुदनूर व जॉन सर, ड्रॉईंगचे देशपांडे अन चव्हाण सर, आणि अधून मधून दिसणारे बुटकेसे अन तितकेच विद्यार्थी प्रिय असे रा. स्वा. नाईक सर, वडीलकीच्या मायेने विद्यार्थ्यांशी वागणारे हिंदीचे शेख सर अशी एकापेक्षां एक अशी दैवते आम्ही शिक्षक रूपाने बाळगून होतो. त्यांनी कधी तरी छड्याही मारल्या आहेत, बऱ्याच वेळा पाठ थोपटली आहे. आपले विद्यार्थी कोठेही कमी पडू नयेत हीच त्यामागची पवित्र भावना आमचे सर बाळगून असत याची आम्हां सर्वांनाच खात्री असे. मात्र याला अपवाद एक सर होते ते म्हणजे इंग्रजी शिकवणारे गुंडमी नावाचे सर. डोक्याला संपूर्ण टक्कल असलेले गुंडमी सर वर्गात येतच ते सुटात आणि टाय लावलेले. एखाद्या चित्रपटातील खलनायकाप्रमाणे. खाकेत एक मोठाले पुस्तक व हातात वेताची छडी घेऊन. आदल्या दिवशी सांगितलेला गृहपाठ कोणी केला नसल्यास त्यांना त्या छडीचा प्रसाद मिळत असे. त्यांच्या चेहऱ्यावर एक तुच्छतेचा भाव सदैव असे. या गृहस्थानी कधी ना कोणा विद्यार्थ्यांची नावे माहीती करून घेतली, ना तसा कधी प्रयत्न केला. मात्र इतर सर्वच शिक्षकवर्ग आमच्या आवडत्या शिक्षकांच्या पंक्तीत सदैव राहिला. नुसते शाळेपुरतेच नाही तर शाळेबाहेरही आम्हांला त्यांचा आदर वाटे. नंतरही मुंबईकर झाल्यावर जेव्हां जेव्हां बेळगांवी जाण्याचा योग्य येई तेव्हां सर्वप्रथम मी माझ्या शाळेत जाऊन सर्व शिक्षकांशी गप्पा मारीत असे. आमचे शिक्षक कधी आमचे मित्र झाले ते कळूनही आले नाही.


आमच्या या बेनन - स्मीथ हायस्कुल मध्ये सेकंडरी ट्रेनिंग व फिजिकल ट्रेनींग असे शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी शिक्षकाच्या जागेसाठी लागणारे दोन अभ्यासक्रम होते. एरवी आमची शाळा ही मुलांची, पण या एस. टी . सी. व डीप.एड. च्या अभ्यासक्रमामध्ये मुलीही असत. त्यांना निरनिराळ्या वर्गांवर लेसन घ्यावे लागत असत. विशेष करून आमच्या वर्गावर अश्या कांही मुली आल्या तर सर्वच विद्यार्थी त्यांना भंडावून सोडत. एकेकदा तर त्या रडकूंडीला येत असत. मग जर का आमच्या शिक्षकांना हे कळले तर मात्र सर्व वर्गाला फैलावर घेण्यात येई. वर्षाअखेरीस त्यांची परीक्षा असे. त्यावेळीही हे भावी शिक्षक विध्यार्थ्यांना कसे शिकवतात याची पहाणी करणे हा त्यांच्या परीक्षेतील एक पेपर असे. तेव्हां आधीच या मुली आमच्या वर्गावर येऊन सर्वाना विनंती करीत की कृपया कोणीही त्यांच्या शिकविण्यात व्यत्यय आणू नये, कारण त्यांच्या भवितव्याचा तो भाग असे. त्यावेळी त्यांचे दस्तूरखुद्द प्रिन्सिपाल यावेळी मागे बसून त्यांचे मूल्यमापन करीत असत. त्याचेही दडपण त्यांच्यावर असे. आणि आम्ही विद्यार्थीही त्यांना पूर्ण सहकार्य देऊन त्यांचा लेसन सुखकारक करीत असू. जाताना त्या सर्वजणी आमचे न विसरता आभार मानीत असत.


आजच्या प्रमाणे विध्यार्थ्यांना हात काय पण बोटही लावता येत नाही असा आमचा काळ नव्हता. आज विद्यार्थ्याला जरा कांही केले की बालक- पालक सभा भरून सर्वप्रथम त्या शिक्षकाला काढा हीच मागणी पुढे येते. चॅनल तर अश्या घटनांना तेल घालून पेटवीत असतात. मग संस्थाही कित्येकदा या हटवादाला बळी पडते. जरी त्या शिक्षकाची चूक आहे की नाही याची शहानिशा न करता . पण आमच्या वेळी विद्यार्थ्यांची तक्रार जर शिक्षकाकडून घरी आली तर घरातच त्याच्या पाठीचे धिरडे होत असे. आमचे कान म्हणजे समस्त शिक्षक वर्गाची मालमत्ताच असे. एखाद्याला उत्तर आले नाही अथवा कविता पाठ नसली की त्या विद्यार्थ्याला जवळ बोलावून त्याचा कान हळूहळू पिळणे हा कांही शिक्षकांचा आवडता उद्योग असे. सुदैवाने आमच्यावर ती वेळ कधीच आली नाही, उलट घरच्यांना जर कधी कोणी शिक्षक भेटले तर ते आमचे गुणच त्यांना सांगत. वर्ग बुडवणे हे कधी घडतच नसे. शाळा ही नेहमी हवी हवीशीच वाटत असे. म्हणूनच आम्ही मे ची सुटी संपून जून महीना कधीं येतो याची आतुरतेने वाट पाहत असू. नवीन पुस्तकांच्या आशेने, नवीन शिक्षकांच्या आशेने, आयुष्यातील एक नवीन पर्व सुरु होणार या आशेने!


अश्या या शाळेला, सुदैवाने त्याकाळच्या आमच्या काही शिक्षकांना त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी व वर्गबंधू सोबत गतस्मृती जागविण्याची संधी आम्हांला मिळाली. आणि आम्ही ती घेतली. पून्हा एकदा आमच्या शाळेत गेलो, तब्बल पन्नास वर्षांचा काळ लोटल्यानंतर गेलो. त्याकाळातील अर्धचड्डीतील अशी आम्ही मुले आता चक्क म्हातारे होऊन गेलो, आणि वयोवृद्ध अश्या आमच्या गुरुजनांच्या पायावर मस्तक ठेवून पावन झालो. आणि त्या आठवणींच्या सहाणेवर स्मृतींच्या चंदनाने गतस्मृती उगाळत बसलो. त्याचा दरवळ जपून, तो पदरी बांधून ठेवून दिला आहे. कधीतरी हळुवारपणे गुपचूप त्याचा दरवळ घेतो आणि पोचतो त्या बालपणाच्या गुरुशिष्य परंपरेच्या कारकिर्दीत. जेथे ते आमचे मास्तर नव्हते ना आम्ही त्यांचे विदयार्थी , तर ते होते आमचे गुरुकुलातील गुरु अन आम्ही त्यांचे शिष्य!


- मं. गो. राजाध्यक्ष

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’

आमचा सुभाष गेला…