ऐ मेरे वतन के लोगो' मागील कहाणी.
१.
नुकत्याच दिवंगत झालेल्या स्वर्गीय आवाजाच्या शालीन अश्या गायिका सुमन कल्याणपूर यांच्या श्रीमती मंगला खाडिलकर यांनी घेतलेल्या मुलाखातीचा उच्चार त्यांनी विलेपार्ले येथील वसंत व्याख्यान मालेत केला. त्यामध्ये आम्हांला एक नवीन गोष्ट समजली, ती म्हणजे १९६२ च्या चिनी आक्रमणानंतर १९६३ सालच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जो भारतीय जवानांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम ठरला, त्यातील 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गाणे वास्तविक सुमन ताईंना म्हणायचे होते. त्यात त्यांचेच शब्द खाडिलकरांनी दाखवले आहेत की सदर कार्यक्रम हा तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्यासमोर होणार होता. पण कार्यक्रम सुरु होण्याच्या आधी पाचच मिनिट आधी संगीतकार महंमद शफी सुमनताईंकडे आले व म्हणाले, 'बेटा, ऐ मेरे वतन के लोगो अभी आप नही गा रही है. उसके लिये लता मंगेशकर याने दीदी आ चुकी है, तो वो गायेगी. तो अभी ऐसा करना, आपके गाये दो गाने सोचके रखना. इसके बाद आपको जाना है. एखादी वीज अंगावर पडावी असे त्यांना झाले. थोडं अपमानीत वाटलं, ते अश्या कारणाकरता ते गाणं त्यांच्या हातून गेलं ही खंत नव्हती. पण त्यांना वेळेवर सांगितलं गेलं नाही, त्यांना अज्ञानात ठेवलं हा सल त्यांच्या मनात होता.आणि हे त्यांनी स्पष्टपणे तेथे सांगितले.आणि पुढे २५ मे २०२६ च्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी सांगितले की, सुमन कल्याणपूरनी लता मंगेशकर यांना दोषमुक्त केले. त्यांना गायिकेबद्दल राग नव्हता. पण संगीतकाराने त्यांना अंधारात ठेवले, हे त्यांना अप्रस्तुत वाटले. चूक त्यांची होती. त्यांच्या 'सुमन सुगंध' या चरित्राचे लेखन श्रीमती मंगला खाडीलकर यांनी केलें आहे.
आणि ही नवीन माहिती मला मिळाल्यावर मी माझा आठवणींचा कप्पा उघडला.व थेट मागे गेलो ते १९६३ सालाकडे. तेव्हां मी श्री सी. रामचंद्र यांचे 'माझ्या जीवनाची सरगम' हे आत्मचरित्र वाचले होते. आणि माझ्या आठवणी बऱ्यापैकी असल्यामुळे. अजुनही मला त्यातील गोष्टी चांगल्याच आठवतात. आणि एवढेच कशाला, त्यामध्ये सदर गाण्यासाठी मुख्यत्वे आशा भोसले यांना सी. रामचंद्र यानी घेतले होते. पुढे लतादीदीनेही आपण म्हणणार असल्याचे सांगितल्यावर ते गाणे दोघीनीही म्हणण्याचे ठरवले. पण पुढे काय झाले, आशाताई या यातून कां बाहेर पडल्या या गोष्टी खुद्द सी. रामचंद्र यांनीच यात लिहून ठेवल्या आहेत. मुख्य म्हणजे जेव्हां हे पुस्तक प्रकाशीत झाले, तेव्हा सर्व संदर्भित लोक हयात होते. मग मंगलाताई म्हणतात त्याप्रमाणे सुमन ताईविषयी संपूर्ण आदर राखून विचारावेसे वाटते की यात सुमन ताईंचा संबंध काय? तसेच त्यावेळी हजर असलेल्या कवी प्रदीप यांच्या कन्या मितुल प्रदीप यांनी देखील आशाजी व लता दोघीही सी. रामचंद्र यांच्याकडे रीहल्सलला आल्या व पाचच मिनिटात आशाजी रडत रडत बाहेर पडल्या. आत काय झालें ते आम्हांला माहीत झालेच नाही असा उल्लेख त्यांनी एका चॅनलला मुलाखत देताना केला आहे.
या करिता मी सी. रामचंद्र यांच्या चरित्रातील संपूर्ण प्रकरण मी खाली देत आहे. त्यामध्ये सी. रामचंद्र यांनी आपण प्रदीपजींना गाणं कसे लिहायला लावले, आशाताईंसोबत रिहल्सल कश्या झाल्या येथपासून ते दिल्लीला पंडितजींच्या समोर कार्यक्रम सादर करेपर्यंत सर्व लिहिले आहे. तरी कुणी यावर प्रकाश टाकू शकेल काय?
२.
सन १९६२. बिर्ला मातोश्री सभागृहात माझा चॅरीटी कार्यक्रम सुरु होता. तेथे कार्यक्रम चालु असताना महेंद्र कपूर माझ्याकडे आला व म्हणाला, 'इमरजेंसी डिक्लेर हो गयी है' भारताच्या स्वातंत्र्यानंतरचे पहिलेच युद्ध! त्यानंतर २७ जानेवारी ६३ ला दिल्लीला कार्यक्रम, त्यावेळी मदन मोहन होता. माझें आदरणीय अनिल बिश्वास होते. एकही चित्र माझ्याकडे नाही. दिल्लीत कार्यक्रम. माझी अँबिशन २७ जानेवारीला आवडत्या नेत्यांपुढे दिल्लीला कार्यक्रम देण्याची. देवाने ऐकली पण काय देणार, काय म्हणणार? मनात तडफडत होतो. काही सुचत नव्हतं. एकाएकी आठवलं- प्रदीप. प्रदीपकडे गेलो. म्हटलं २७ जानेवारीकरीता मला गाणं दे; मला म्हणतो, ‘फुकटका काम होता है तो आते हो' बोंबला. मी त्याच्याकरीता जे केलं होतं ते तो विसरला. मला जसं गाणं पाहीजे तसं देणारा हिंदीत एकच कवी-प्रदीप. मी गाणं त्याच्याच कडून घेणार. दिलीपकुमार हा आमच्या कमिटीचा चीफ होता. त्यानें सांगितले की पंडितजींना फक्त सिनेमातीलच गाणी ऐकायची आहेत. दुसरी नाही. मेलो. माझ्याकडे पिक्चर्स नाहीत, तर गाणं कुठे? म्हणून प्रदीप. प्रदीपकडे परत परत जायचो, सांगायचो, ‘माडगूळकरांनी बघ कशी गाणी लिहीलेत' 'फ़ार दिवस झाले आता पाहू पाहू वाटते', जिंकू किंवा मरू' ‘सैनिक माझे नांव’ असली गाणी प्रदीपला सारखं ऐकवायचो, त्याला चिडवायचो; शेवटी एकदाचा कबूल झाला. प्रदीप म्हणजे कामात भूत आहे. त्यानें जवळ जवळ १०० कडवी लिहिली.
लताने ह्या कार्यक्रमाला येणार नाही म्हणुन सांगितलं होतं. दिलीप मला सारखं म्हणायचा 'तू कहे -लता मस्ट कम.' मी म्हणालो, ती नाही म्हणजे नाहीच येणार. मी आशा भोसलेकडून माझं गाणं घेणार आहे. नाही तरी माझ्याबरोबर लता गातच नाही . ती नेहमी दुसऱ्यांच्याकडे गाते. शी शुड सिंग देअर सॉंग्जस, नॉट माईन. दिलीप अस्वस्थ होता.
एके दिवशी सकाळी प्रदीपचा फोन आला की लता तुझं गाणं म्हणायला तयार आहे. मी म्हणाल, नाही..आशा म्हणणार आहे. आशा तयार आहे. आता मीं तिला नाही म्हणणार नाही. तरी प्रदीप म्हणाला, लताला सुद्धा घ्या! मी म्हणालो, मग दोघी म्हणतील. आशा व लता. प्रदीप म्हणाला, मी थोड्या वेळाने सांगतो. नंतर म्हणाला त्याने लताला फोन केला होता -चालेल- लता व आशा दोघीही म्हणतील. ही बहुदा २१ जानेवारी असावी.
मी कोणती गाणी म्हणणार म्हणून आमच्या कमिटीकडून चौकशी व्हायची. मी म्हणायचो, प्रदीप अजून गाणे लिहितोय. इकडे राज कपूर म्हणायचा, 'आण्णाजी आप वही गाना गायीये' वारे चौ एन लॉय, तुझको शरम न आयी | आता तुम्हीच सांगा, पंडितजींच्या समोर गाणं म्हणायचं ते हे म्हणू? शक्यच नाही. प्रदीपने गाण लिहिलं-' ऐ मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा' गाण लिहायला त्याला साधारण १५ दिवस लागले. रोज रात्री ७ ते १ वाजेपर्यंत आम्ही घरी बसत असू. १०० कडवी लिहिली. त्यातून ५-६ निवडायची, हेही एक दिव्यच होते. सगळीच कडवी चांगली होती. असं करत करत शेवटी एकदाच गाणं फायनल झालं. साधारण गाणं व चाल ता. १८-१९ पर्यंत कम्प्लिट झालं.
मी काय गाणं देणार म्हणून सगळ्यांच्या चौकश्या सुरु झाल्या. कोणालाच काही माहीत नव्हतं. सगळ्या म्युझिक डायरेकटर्सनी रिहल्सलज पण सुरु केल्या होत्या. फक्त माझीच रिहल्सल होत नव्हती. कोरस मुलं मुली म्युझिशिअन्स ह्यांना माझ्या गाण्याची काहीच कल्पना नव्हती. त्यातून ता. २४ ला मी व शर्मा रेकॉर्डिस्ट दिल्लीला जाणार होतो. तिथली साऊंड सिस्टीम बघायला. तारीख २१ ला माझा असिस्टंट जॉनी याला बोलावून मी गाण्याच्या शेवटच्या फक्त ३ ओळी लिहून दिल्या. हेच फक्त म्युझिशिअन्सनी वाजवायचे. तारीख २२ ला कोरसला बोलावून फक्त पहिल्या ओळीची चाल सांगितली. शब्द नाहीत. तारीख २३ ला आशा व लताला रिहल्सलला बोलावलं. लता आधी आली, मग आशा. गाण लिहून दिलं. व रिहल्सल सुरु करणार तो लता आशाला म्हणते, 'तू सांगत का नाहीस रामला की तुझी तब्येत चांगली नाही, तू येऊ शकत नाहीस म्हणून! आशा मला हॉलच्या बाहेर घेऊन गेली व म्हणाली, आण्णा, लताची इच्छा नाही मी हे गाणं म्हणावं म्हणून. मी दिल्लीला येत नाही. मी म्हणालो, अग तुझं तिकीट पण काढलंय. तूच आधी म्हणणार होतीस, प्लिज ये. ती म्हणाली मी नाही येत. व ती निघून गेली. फार वाईट वाटलं. आशा फार छान मुलगी आहे. व चांगली गाणारी पण. असो. आता राहिली लता एकटी. आशान का ऐकलं कुणास ठाऊक! मोठ्या बहिणीचा मान ठेवला असावा स्वतःचा बळी देऊन.
गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी आहेत 'ऐ मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा- यह शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा-' हे गाणं नंतर सॅड होतं. पण सुरुवात हॅपी आहे. शब्दावरून सुरुवातीला हॅपी म्युझिक पाहिजे, म्हणून जायच्या आदल्या दिवशी जॉनीला ते हॅपी म्युझिक लिहून दिले. रिहल्सल घ्यायला सांगितली. लताची सुद्धा खास रिहल्सल झाली नव्हती. तिला मी गाणं म्हणुन टेप करून दिलं. व एक दिवस आधी दिल्लीला ये म्हणून सांगितलं. व तारीख २४ ला मी व शर्मा दिल्लीला गेलो. प्लेनमध्ये शर्मा मला विचारतो, -ये XX क्यों आ रही है ? मी म्हणालो- उसकोही पूछ.
हे सर्व सिक्रेट ठेवायचं कारण म्हणजे, गाण्यामध्ये, गाण्याची कल्पना हा फार मोठा भाग आहे. त्या शब्दांचा व चालीचा. माझ्या मताप्रमाणे आतापर्यंत देशभक्तीचे गाणे म्हणजे नुसतं लढा, मारा, मरून जाऊ अश्या टाइपचं आहे. हेच गाणं असं आहे की जवानांनी किती त्रास सोसला, बर्फात काय हाल झाले, कशा परिस्थितीत लढले, व त्यांची तारीफ आहे. आत ही कल्पनाच जर चोरीला गेली असती तर गंमतच संपली, हे कुणालाच पटणार नाही म्हणून हे सिक्रेट.
तारीख २६ ला लता आली. मी अशोक हॉटेलमध्ये होतो, तिथंच उतरली. तिथं तिनं त्या दिवशी भरपूर रिहल्सल केली. उद्या ता.२७ ला दुपारी २.३० वाजता कार्यक्रम. ता.२७ ला सकाळी बाकी सगळे आले. म्युझिशिअन्स, आर्टिस्ट, कोरसचे सगळे -दोन प्लेन भरून आले. हॅपी म्युझिकची सुरुवात फ्लूटपासून होती. मनोहारी फिल्म सिनेचा सर्वात चांगला फ्लूटिस्ट सुरुवात करणार होता. सगळे आम्ही दुपारी १ पासूनच स्टेडियमवर होतो. बरोबर २.३० वाजता पंडितजी आले. प्रोग्राम सुरु झाला. आम्ही ४ म्युझिक डायरेक्टर्सनी एकएक गाणं पंडितजींच्यासमोर पेश करायचं ठरल होतं. नंबरवारी कशी हे मुंबईतच ठरलं होतं. त्यात माझा चौथा म्हणजे लास्ट नंबर होता.
लताने आधी 'आपकी नजरो ने समझा' व 'अल्ला तेरो नाम' ही दोन गाणी म्हटली. माझा नंबर आला. अनाऊन्स झालं. म्युझिशिअन्स, लता व मी स्टेजवर आलो. मी उभा राहून वन, टू, म्हणालो पण म्युझिक स्टार्ट होईना. मनोहारी विसरला त्याचा पहिला पीस आहे म्हणून. असा घाम फुटला, विचारू नका. मग परत मनोहारीला सांगितलं, यू ह्याव टु स्टार्ट. परत वन, टु, सगळं बरोबर सुरु झालं. भरपूर रिहल्सल नसल्यामुळं असं झालं.
म्युझिक संपलं. नंतर
ऐ मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा |
यह शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा |
पर मत भुलों सीमापर, वीरोने है प्राण गावाये |
इथपर्यंत समजलं की गाणं जमत चाललंय. ऑडियन्स मन लावून ऐकतात. एवढ्यात एक प्लेन वरून जायला लागलं. मला आठवल , तिथं बसलेल्या ४० हजार माणसांच्या माना रागानं त्या प्लेनकडे फिरल्या. विमान निघून पण गेलं. मी अगदी खुष झालो. गाणं जमलं हे समजलं, नाहीतर ४० हजार माणसांच्या ८० हजार डोळ्यांनी रागाने वर कां पाहावे?
दहा मिनिटांचं गाणं, इतक्या सगळ्या लोकांनी अगदी पिनड्रॉप सायलेन्समध्ये ऐकलं. माझं सारं लक्ष पंडितजींच्याकडे. ते आधी थोडेसे टेकून बसले व ३-४ ओळींनंतर पुढे होऊन बसले; व वर्ड बाय वर्ड ऐकत होते. शेवटी तर -
'जय हिंद -जय हिंद की सेंना' कोरस म्हणत असताना त्यांनी इकडे तिकडे पहिले. कुठून आवाज येत होता? मी काय केलं होतं, कोरसला पडद्यामागे ठेवलं होतं. व शर्माला कोरसच्या वेळेला एको द्यायला सांगितलं होतं. जनरली कोरसला स्टेजवर ठेवतात. मी पडद्यामागे ठेवलं होतं. म्हणून जणू कांही सर्व भारतीय सर्व हिंदुस्थानी म्हणत आहेत जय हिंद-जय हिंद की सेना. न दिसता आवाज येत होता. व इफेक्त्ट अप्रतिम आला..जय हिंद- जय हिंद की सेना , गाणं संपलं- प्रचंड टाळ्या.
विचारूच नका. सगळ्यांना गाणं आवडलं. त्यातल्या त्यात माझ्या सर्वात आवडत्या पंडितजींना. नौशाद, राज कपूर, दिलीप कुमार सर्वानी अभिनंदन केलं. मेहबूबसाहेब तर म्हणाले, आपने फिल्म लाइनकी नाक ऊंची रखी. आयुष्यातला सगळ्यात सुखाचा दिवस. ह्यापेक्षा माझ्यातल्या कलावंताची तारीफ कधीच होणार नाही. 'सारेगम पधनीसा' कसे छान लागले होते. देवा तुझे अनंत उपकार.
नंतर इंटरव्हल. पंडितजी गेले. प्रोग्रामनंतर पंडितजींच्या घरीं टी पार्टी होती. मी तिथं उशिरा पोचलो तर जिन्यात पंडितजी व इंदिराजी उभे होते. दोघांनी माझें हात धरले व म्हणाले, 'आज आपने हमको रुलाया' मी काहीही बोलू शकलो नाही. रडत दूर जाऊन बसलो. फोटो काढणं चालु होतं. त्या थोर माणसाबरोबर आपला फोटो असावा असं प्रत्येकाला वाटत होत. मलाही बोलावलं. मी पंडितजींना विनंती केली की, मला फक्त तुमच्याबरोबर एक फोटो पाहीजे. त्यांनी लगेच हो म्हटलं. व एक फोटो काढला गेला. थोड्या वेळाने आमचे माननीय यशवंतरावं चव्हाण आले. त्यानी कडकडून मिठी मारली. ह्यात सगळं आलं. परत त्यांच्याबरोबर फोटो. जिथं पार्टी होती, त्याच्या शेजारी पंडितजींची स्टडी रूम, सिटिंग रूम होती. खालपासून वरच्या आढ्यापर्यंत सगळी पुस्तकंच पुस्तकं. एक भलं मोठं टेबल व एक खुर्ची. मी पुस्तकाकडे पाहू लागलो तर पंडितजी एकदम म्हणाले, डोन्ट थिन्क आय ह्याव रेड देम ऑल आणि हसले.
पार्टी आटोपून अशोक हॉटेलमध्ये सर्व परत आलो. मला आता एकट्यालाच खोलीत बसायचे होते. सगळे प्रसंग डोळ्यापुढे आले. आधी प्रदीप. काय सुंदर गाणं लिहिलंय त्याने. तोच दिल्लीला नाही आला. दुसरी आशा. बिचारी हा एकच शब्द.
सी. रामचंद्र. ( माझ्या जीवनाची सरगम )
प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
rajapost@gmail.com
——————————————



Comments
Post a Comment