उद्योजक चित्रकार : शं.वा. किर्लोस्कर तथा शं.वा.कि.

 


साहीत्यप्रेमी महाराष्ट्रात अनेक चित्रकारांनी मासीके चालवीली. त्यांची ही मासीके मुख्यत्वे चित्रकलेला वाहीलेली असत. व जोडीला ती ललित वाङ्मयालाही उत्तेजन देत. पण एका चित्रकाराने केवळ जाहीरातीपोटी एखादे नियतकालिक सुरु करणे व पुढे त्याला वाङ्मयीन दर्जा देऊन त्याचे एक अभिरुचीपूर्ण नियतकालिक होण्यात रुपांतर होणे हा मराठी साहीत्यसृष्टीतील एका चमत्कारच मानला पाहीजे हे मासीक होते ' किर्लोस्कर' व त्यांचे संपादक होते, शंकरराव वासुदेव किर्लोस्कर तथा सर्व महाराष्ट्र जसा त्यांना त्यांच्या आद्याक्षरावरून ओळखत होता ते महाराष्ट्राचे लाडके चित्रकार संपादक 'शं.वा.कि.'!  यासाठी आपणाला किर्लोस्कर घराण्याची थोडी पूर्व पिठीका पहाणे जरुरीचे आहे.

'किर्लोस्कर'चे आद्य प्रवर्तक श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर हे बेळगांव जिल्ह्यातील गुर्लहोसूर येथील. लहानपणापासून त्यांना दोन गोष्टींची आवड होती. त्या म्हणजे पेंटींग करणे व निरनिराळ्या वस्तू निर्माण करणे. त्यांना दोन वडील बंधू होते. वासुदेवराव व रामूअण्णा. रामूअण्णांच्या पाठींब्याने लक्ष्मणरावांनी पेंटींग शिकण्यासाठी मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये १८८५ साली  प्रवेश घेतला. पण त्यांच्यामध्ये रंग अंधत्व जाणवल्यामुळे त्यांना पेंटींग सोडावे लागले. पण त्यांनी तेथूनच मेकॅनीकल ड्रॉईंगचा अभ्यासक्रम पुरा केला. व ते व्ही.जे.टी.आय. या संस्थेत मेकॅनिकल ड्रॉईंगचे असिस्टंट टीचर म्हणून कामाला लागले. नोकरी करीत असले तरी त्यांचा पिंड स्वतःचा उद्योग स्थापन करण्याचा होता. त्यामुळे जोडीला ते डॉक्टरांना उपयोगी पडणाऱ्या डब्या बनवीत. हे काम करत असतानाच लक्ष्मणरावांनी आपले वडील बंधू रामूअण्णा यांच्यासोबत सायकलची डिलरशीप सुरु केली. मुंबईहून सायकली विकत घेऊन त्या बेळगावी विक्रीसाठी ते पाठवीत असत. आणि या सायकली 'किर्लोस्कर ब्रदर्स' या नांवाखाली विकल्या जाऊ लागल्या. आणि 'किर्लोस्कर ब्रदर्स' या उद्योगाची ही मुहूर्तमेढ ठरली.  आजच्या विशाल अश्या किर्लोस्कर समूहाचा तो एक प्रकारे उगमच होता. आज बेळगावात जेथे श्रीकृष्ण टॉकीज आहे, तेथे हे त्यांचे सायकलचे दुकान होते. आता तो रस्ता त्यांच्या नांवाने किर्लोस्कर रोड म्हणून ओळखला जातो. पुढे व्ही.जे.टी.आय.चे वरीष्ठ प्राध्यापक सेवानिवृत्त होऊन इंग्लडला परत गेले व ती जागा लक्ष्मणरावांना मिळाली. व बेळगांवला किर्लोस्कर ब्रदर्सची शेतीची आधुनीक उपकरणे बनू लागली.

 


लक्ष्मणरावांचे दुसरे वडील बंधू वासुदेवराव हे सोलापुरातील पहीले पदवीधर डॉक्टर होते. सोलापुरात त्यांचं वैद्यकीय व्यवसाय होता. पण ते केवळ डॉक्टरी करीत नसत. ते समाजसेवक होते. ते लेखकही होते. अनेक मासिकांतून व वृत्तपत्रातून त्यांचे खास विषयावरील लेख प्रसीद्ध होत असत. शिवाय त्याना मशीन व यंत्रकलेची अफाट आवड होती. त्यांनी सोलापूर येथे ' मेसर्स शिवाजी वर्क्स' हा स्वतःचा कारखानाही सुरु केलं होता. अश्या या वासुदेवरावांच्या पोटी शंकररावांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ साली झाला. पुढे मुंबईच्या प्लेगमुळे लक्ष्मणरावांनी मुंबई सोडून ते बेळगावी आले. शंकरही येथे माध्यमीक शाळेत जाऊ लागला. लहानपणापासूनच शंकरचा ओढा चित्रकलेकडे होता. त्यांनी सरकारी ग्रेडच्या परीक्षाही दिल्या. त्याच सुमारास १९१० साली बेळगावच्या म्युनिसिपालटीने किर्लोस्करांना सहा महिन्याच्या आत ठळकवाडीतील कारखान्याची जागा  खाली करण्याची नोटीस दिली. आणि लक्ष्मणरावांच्या पुढे एक मोठीं समस्या उभी राहीली. पण यावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले ते औंधचे महाराज.  त्यांनी औंधबाहेरील कुंडल येथे सुमारे ३२ एकरांची जागा त्याना कारखान्यासाठी दिलीच, शिवाय दहा हजार रुपये कर्जाऊ देऊन तेथे किर्लोस्कर कारखाना उभारण्यास मदत केली. त्यावेळी किर्लोस्करांची लोखंडी नांगर, कडबा कापण्याचे यंत्र अशी शेती उपयुक्त उत्पादने सुरु होती. पुढे याच कुंडल गावचे नावं किर्लोस्करांच्या कारखान्यामुळे किर्लोस्कर वाडी असे झाले. तेथील कुंडल रोड रेल्वे स्टेशनही त्याच नावाने ओळखले जावू लागले

 


किर्लोस्कर कंपनीच्या कडबा कापण्याच्या यंत्राची जाहीरात बनविण्याचे काम शंकररावांना देण्यात आले. दोन बैलांचे संभाषण,त्यामध्ये एक बैल आपणास या यंत्राने कापलेला कडबा किती स्वच्छ असतो हे दुसऱ्या बैलाला सांगताना त्या जाहीरातीत दर्शविलें होते. त्या जाहिरातीचे बक्षीस म्हणून शंकररावांना एक बॉक्स कॅमेरा मिळाला. व येथून शंकररावांनी छायाचित्रणाचे धडेही गिरवण्यास आरंभ केला. १९०९ साली शंकररावांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. पण अभ्यासापेक्षा त्यांना चित्रांचीच आवड जास्त होती. स्मरणशक्तीही इतकी तल्लख होती की एखादा देखावा पाहीला की त्यांच्या मेंदूवर तो कायमचा ठसून बसे. वर्गामध्ये व्याख्यान असले की त्यातील वर्णनाप्रमाणे ते नायक-नायिकांची चित्रे आपल्या वहीत उतरवीत असत. पुढे हैद्राबाद येथे गेल्यावर त्यांची चित्रकार पंडीत सोनबा( श्रीपाद दामोदर) सातवळेकर यांचे समकालीन चित्रकार रामकृष्ण वामन देऊसकर यांच्याशी गाठ पडली. देऊसकर हे इटली, फ्रांस येथून चित्रकलेचे शिक्षण घेऊन आले होते.  देऊसकर हे जातीवंत चित्रकार होते. ऑइलपेंट मध्ये पेंटींग्स करण्यात त्यांचा हातखंडा होता. फ्रान्समधील नामांकीत चित्रकारांच्या कृती पाहून, तिथल्या अकॅडमीमध्ये अभ्यास करून त्यांनी स्वतःच्या कलेचे तेज खूप वाढविले होते. डाव्या हातात रंगांची पॅलेट व उजव्या हातात ब्रश घेऊन ते जेव्हां काम करण्यास बसत, तेव्हां शंकरराव हरखून जात व तल्लीनतेने त्यांचे काम पहात बसत.  त्यांनीही शंकररावांची चित्रकलेची आवड जाणून त्यांना इटलीला जाऊन चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. आणि शंकररावांनी आपल्या वडीलांना पत्ररूपाने आपली इच्छा कळवली. त्या शांत वृत्तीच्या विचारी पित्याने मुलाला सल्ला दिला की, तूझी चित्रकला मी जाणतोच! चित्रकला आवडत असेल तर तिचा अभ्यास जरूर करावा. पण तो धंदा म्हणून पत्करू नये. कलेपासून जो खराखुरा आनंद मिळवायचा तो कलेची सेवा करणाऱ्यालाच मिळतो. मात्र सुरुवातीलाच इटलीचा विचार करू नकोस. आधी हिंदुस्तानात शिक्षण घे मग पुढे इटलीचे पहाता येईल. त्यावेळी पंडीत सातवळेकरांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. किर्लोस्कर साठी ते चित्रे काढीत असत. ती घेऊन ते आले की मग शंकरराव त्यांच्याबरोबर असत. मग निरनिराळ्या ठिकाणी सातवळेकरांचे निसर्गदृश्ये काढणे सुरु असे. एकदा त्यांनी मुंबईला नेवून त्यांना आपले जे.जे.स्कुलही दाखवले होते. त्यावेळी त्यांचे काका लक्ष्मणराव हे व्ही.जे.टी.आय. मध्ये शिकवायला होत

 


पुढें शंकररावांना वासूदेवरावांनी लाहोर येथे पंडीत सातवळेकरांकडे शिक्षण घेण्यास पाठवले. तेथे त्याचे रीतसर कला शिक्षण सुरु झाले. जोडीला इतरही तीन चार विद्यार्थी येतं असत. त्यांच्या शिक्षणात सोनबा एका गोष्टीवर विशेष भर देत. ती म्हणजे पेन्सील स्केचिंगची सवय. त्यांचे म्हणणे होते की ज्याला उत्कृष्ट चित्रकार व्हायचे आहे त्याने डोळ्याला दिसेल त्या वस्तूचे अगर व्यक्तिमात्राचे पेन्सीलने झटपट चित्र काढायला शिकले पाहीजे. याचा वस्तुपाठ म्हणजे रस्त्यावरून जाणारा एखादा ओझेवाला किँवा कुत्रा अथवा झाडाची फांदी यांचे सोनबा एकदोन मिनीटात चित्र काढून दाखवीत असत. सोनबा सातवळेकरांकडे शंकररावांना केवळ चित्रकलाच नव्हे, तर वैदीक धर्मातील तत्वांचीही ओळख होऊ लागली. कारण पंडीत सातवळेकर नुसते चित्रकार नव्हते, तर वैदीक वाङ्मयाचे गाढे अभ्यासू आणि अभिमानी होते. रोज रात्री जेवण झाल्यानंतर ते शंकररावांना कठोपनिषद व ईशावास्योपनिषद  यातील सूत्रे समजावून सांगत. त्यांचे विचार मोठे तेजस्वी व स्फूर्तीदायक असत. याच्या जोडीला शंकररावांच्या छायाचित्रणाचा अभ्यासही सुरूच होता. त्या कलेतही पंडीत सातवळेकर वाकबगार होते. पुढें मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑ आर्ट मध्ये शंकररावांना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला. चित्रकलेत चांगलं हात असणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या बरोब्बर होते. पण तेथे शंकररावांच्या ध्यानात आले की, जे दिसते ते काढणे म्हनजे उत्तम चित्रकार नव्हे. तर त्यामध्ये कल्पनाशक्तीची भर टाकणे हे महत्वाचे आहे. ती नसेल तर उत्तम चित्रं काढता येऊनही ते कशाचे काढायचे याचे ज्ञान येणार नाही. या भावनेतून शंकररावांनी संस्कृत, इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. वाचन वाढवले. जागतीक घडामोडीवर लक्ष्य ठेवले. व आपल्यातील कलावंत परीपूर्ण बनविला. यानंतर शंकरराव किर्लोस्कर वाडी येथें आले. दर मंगळवारी 'केसरी' मध्ये किर्लोस्कर नांगराची जाहीरात येत असे. शंकररावांनी जाहिरातीची सूत्रे हातात घेतली. हळूहळू कंपनीचा बोलबाला वाढला. उत्पादनेही वाढली. व किर्लोस्करला आता आपल्या उत्पादनांच्या ओळखीसाठी चिन्हाची गरज भासू लागली. आणि आज सर्वपरीचित झालेले विशिष्ट वळणाचे असे 'किर्लोस्कर' हे नांव हाताने लिहून ते रजिस्टर करण्यात आले. कारखान्याची प्रगती व प्रसिद्धीसाठी जहिरातीद्वारे जोरदार प्रयत्न सुरूच होते. जोडीला ‘ मासीक मनोरंजन' 'केसरी' मधून माहीतीपुर्ण लेखही प्रसीद्ध केले जात. 

 


लक्ष्मणराव सतत जगात औद्योगीक क्षेत्रांत काय चालले आहे याच्या घडामोडीकडे लक्ष ठेवून असत. अन अश्याच वेळी त्यांच्या हातात फोर्ड कंपनीचा एक कॅटलॉग आला. त्यामध्ये कंपनीचे कामगार व त्यांच्या कामाबद्दल माहीती होती. आपणही असेच एक माहीतीपत्रक किंवा समाचार पत्रीका का काढू नये ज्यामध्ये आपल्या कारखान्यातील कामगारांची कामे, तसेच आपल्या उत्पादनाविषयी उपयुक्त माहीती असेल?  आणि त्याप्रमाणे लक्ष्मणरावांनी एक छोटा हॅंडप्रेस घेऊन त्यावर आपले पहीले समाचार पत्रक छापले आणि त्याचे नांव होते 'किर्लोस्कर खबर' आणि ती तारीख होती १ जानेवारी १९२०. 'किर्लोस्कर खबर'चा हा अंक प्रकाशीत झाला अन मराठी साहीत्य जगतात एक लहानशी खळबळ उठली. या 'किर्लोस्कर खबर' मध्ये उत्पादनाच्या जाहीराती, कारखान्यातील घडामोडी, गावांतील लोकांच्या कथा-कविता असे एकंदरीत स्वरूप होते. १९२९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किर्लोस्कर कारखान्याला भेट दिली. त्यांच्या पहाण्यात 'किर्लोस्कर खबर' आला. व त्यातील 'खबर' हा फारसी  शब्द त्यांना खटकला. सावरकरांनी शंकररावांना तसे सुचवताच त्यातून खबर हा शब्द त्यांनी गाळला व केवळ 'किर्लोस्कर' हे नांव मासिकाला ठेवले. पुढे शंकररावांनी त्यात ललित, वैचारीक लेख समाविष्ट केले. या मासिकाला स्वा. वि.दा. सावरकर, वि.स.खांडेकर, ना.सी. फडके, डॉ.पु. ग. सहस्त्रबुद्धे, श्री.व्यं. केतकर, अनंत काणेकर, अ.वा.वर्टी, चिं.वि.जोशी, ना.धों. ताम्हणकर, बाळूताई खरे (मालतीबाई बेडेकर), मालतीबाई दांडेकर अश्या चतुरस्त्र व नामवंत लेखकांचे लेखन सहाय्य मिळाले. व किर्लोस्करचा दर्जा वाढत्या क्रमाचा राहीला. पुढे स्त्रियांनी सामाजीक बदलाला सामोरे जावे यासाठी स्त्रियांची प्रगती दाखवणारे 'स्त्री' हे मासीक १०३० मध्ये सुरु करण्यात आले. तसेच तरुण युवकांना उत्तेजन देण्यासाठी १९३४ मध्ये 'मनोहर' या लहान आकाराच्या  मासिकाची स्थापना करण्यात आली. व मराठी वाङ्मयाच्या क्षितिजावर 'किर्लोस्कर' 'स्त्री' 'मनोहर' हे तीन तारे चमकू लागले.

 


या नियतकालिकांचा वाङ्मयीन दर्जा तर शंकररावांनी ठेवलाच, पण स्वतः चित्रकार असल्यामुळे मासिकाची सजावट, आकर्षकता, विनोदी व्यंगचित्रे यांनीही किर्लोस्कर,स्त्री,मनोहरच्या पूर्णतेत भर घातली.ग.ना.जाधव, बसवन्त महामुनी असे खंदे चित्रकार त्यांच्या दिमतीला ठेवले. कित्येक मुखपृष्ठे स्वतः शंकरराव काढीत असत. शंकररावांची व्यंगचित्रे हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. एक वास्तववादी चित्रकार म्हणून ते यशस्वी होतेच. पण व्यंगचित्रकाराला लागणारी शोधक वृत्ती, निरीक्षण शक्ती, तीक्ष्ण नजर, निर्भेळ विनोदक्षमता या गोष्टीही त्यांच्याकडे होत्या. जोडीला त्यांचे रेखाटन कौशल्य देखील तोडीस तोड होते. साधे साधे विषय घेऊन समाजाला प्रगतशील विचारसरणी दाखवणारी त्यांची व्यंगात्मक रेखाचित्रे हे किर्लोस्करचे खास वैशिष्ट्य होते. यामध्ये आधुनिकतेकडे जाणारा तरुण वर्ग, लग्नातील हुंड्याच्या अनिष्ट प्रथा, अश्या विषयावर त्यांनी व्यंगचित्राद्वारे समाज जागृती केली. 'लग्न मंडपातील विनोद' ही त्यांची चित्रमालिका 'स्त्री' मासिकातून प्रकाशीत होत असे. पुढे त्याचे पुस्तकही प्रकाशीत झाले. तसेच त्यांच्या निवडक व्यंगचित्रावर प्रा. ना.सी. फडके यांनी स्फुट लिहून 'टाकांच्या फेकी' हे त्यांचे स्वतंत्र पुस्तक प्रकाशीत केले. शंकररावांनी किर्लोस्करसाठी विनोदी, कौटुंबीक, गंभीर अश्या सर्वच विषयासाठी कथाचित्रे काढली. विशेषतः त्यांनी ना.धों. ताम्हणकर यांच्या दाजी या व्यक्तिरेखेसाठी काढलेली चित्रे ही खूपच गाजली. शं.वा.कि.नी आपल्या व्यंगचित्रातून कधीही कोणाची टिंगल टवाळी केली नाही, किंवा कुणाला झोंबेल अशी टीका केली नाही. त्यांच्या व्यंगचित्राचा हेतू हा समाजाला अधोगतीला नेणाऱ्या अनिष्ट प्रथा, वृत्ती याकडे अंगुली निर्देश करून समाजाची उन्नती व बौध्दिक दृष्टीकोण व समाज प्रबोधन करण्याकडे होता. कोल्हापूरचे चित्रकार श्री. ना. कुलकर्णी यांची 'रेखाचित्रे' ही चित्रकला कशी शिकावी याचे सुबोध धडे देणारी चित्रमालिका किर्लोस्कर मधून प्रसीद्ध करून त्यांनी अनेक चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपकृत केले होते. डॉ. अ.वा. वर्टी यांच्या स्वतःला अभिप्रेत करून लिहीलेल्या अंत्या आणि सुलू या पती पत्नीच्या विनोदी कथा 'सुलूचा सर्व्हंट' 'टालडुप्पो वांगीमाडू' अश्या कथा वाचकांना रिझवीत असत. व त्यांना ग.ना.जाधव आपल्या बोधचित्रांनी सजवीत असत.

 


पुढे किर्लोस्कर मासिक व  छापखान्याचा विस्तार वाढला. किर्लोस्करवाडीचे क्षेत्र त्याला अपुरे पडू लागले. तेव्हां किर्लोस्करचे स्थलांतर पुणे येथे १९५९ च्या जून महिन्यांत झाले.  शंकररावांच्या निवृत्तीनंतर त्यांचे पुत्र मुकुंदराव यांनी किर्लोस्करांची धुरा सांभाळली. पुढे त्या तीनही मासीकांचे एकत्रीकरण करून त्याचे ‘किस्त्रीम’  असे नामकरण करण्यांत आले. किर्लोस्कर मासिकाने जसे नवे लेखक निर्माण केले, तसेच आपल्या समाजात ज्या अनिष्ट कल्पना व रूढी बोकाळल्या होत्या, त्यांचे स्वरूप उघडे करून त्याला आळा घालण्याचे प्रयत्नही या मासिकाने केले. कित्येक ढोंगी बुवांचे बुरखे फाडले. वाचकांच्या मनात स्वावलंबन, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा,साहस आदी गुणांचे बीजारोपण करण्याचे कार्य त्यांनी पद्धतशीरपणे पार पाडले. तेही साहीत्य आणि चित्रकलेच्या संगमातून.

 


लक्ष्मणरावांनी 'किर्लोस्कर खबर'चे लावलेले रोपटे शंकररावांनी जोपासले, त्याची निगा केली ते वाढीला लावले आणि ते फोफावले.  शं.वा.कि.यांच्या रक्तातील चित्रकार अखेरपर्यंत सक्रीय राहीला. किर्लोस्कर, स्त्री, मनोहर या त्यांच्या नियतकालीकांसाठी ते निवृत्त होईपर्यंत चित्रे आणि व्यंगचित्रे यांचे योगदान देत राहीले. किर्लोस्कर या नावाला केवळ उद्योग जगतापुरते मर्यादीत न ठेवता त्याला साहित्याच्या प्रांगणात मिरवण्याचे कार्य शं.वा.कि.नी केले. किर्लोस्करांच्या औद्योगीक साम्राज्यास सांस्कृतीक व साहित्यीक साज चढवण्याचे कार्य शंकररावांनी आपल्या कुंचल्याच्या जोरावर केले हे मात्र नक्कीच!  
१ जानेवारी १९७५ साली शंकररावांचे निधन झाले.  

आज १ जानेवारी!  एक अभीजात कलाकार, आद्य व्यंगचित्रकार, चतूरस्र लेखक, मार्मिक भाष्यकार, दृष्टा संपादक, थोर समाजकारणी अशा या महाराष्ट्राच्या समाजपुरूषाला, शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा महाराष्ट्राचे लाडके ‘शं.वा.कि. यांना त्यांच्या ४५ व्या स्मृतीदिनानिमीत्त भावपूर्ण आदरांजली!

- प्रा. मं.गो. राजाध्यक्ष.








 


Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’