एक मनस्वी कलावंत : मुरलीधर आचरेकर.
कांही मराठी माणसं आपल्या कर्तबगारीने साऱ्या भारताला भूषणावह ठरली आहेत. विशेष करून यामध्ये कलावंतांचा मोठा सहभाग आहे.मग ते चित्रपट कलाकार असोत, नाट्य कलाकार असोत, संगीतकार, गायक असोत वा चित्रकार! हे सर्वच जण आपल्या कला आविष्कारामुळे आपणा सर्वांच्या आदराला प्राप्त ठरतात. अश्या थोर व्यक्तीमध्ये एक नांव आवर्जून येते ते एका महान चित्रकाराचे, मुरलीधर रामचंद्र आचरेकरांचे! एम.आर.आचरेकर म्हणूनच ते सदैव ओळखले गेले. तसेच जवळच्या व्यक्तींचे आदरणीय भाऊसाहेब होते.
मुरलीधर तथा भाऊसाहेब आचरेकरांचा जन्मदिवस म्हणजे पंडीत नेहरूंचा जन्मदिवस, १४ नोव्हेंबर. मात्र साल होते १९०७. मुंबईत त्यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्ष्यापासूनच आचरेकरांनी त्या काळच्या नामवंत केतकर इन्स्टीट्यूटमध्ये कला शिक्षणास आरंभ पाहून पुढे त्यांची चित्रकलेतील प्रगती पाहून त्यांना थेट वरच्या वर्गात प्रवेश मिळाला पण प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना परीक्षा देता आली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे जलरंगातील पहीले चित्र त्यावेळच्या 'चित्रमय जगत’ या मासीकात प्रसीद्ध झाले. आचरेकरांना छायाचित्रण आणि लिथोग्राफी या विषयातही गोडी होती. त्यामुळे त्यांनी लिथोग्राफीचा अभ्यास सुरु केला. आणि स्वतःचे मुद्रणालय सुरू केले. आणि त्यावर स्वतःची चित्रे छापण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन (एकाग्रता) या व्यक्तीचित्राला १९२९ मध्ये भावनगर महाराजांचे पारितोषिक मिळाले. याच चित्राला नंतर बंगळूर येथे बक्षीस मिळाले, तसेच नागपूर येथे सुवर्णपदक प्राप्त झाले. आणि नंतर लंडन येथील इंपीरिअल इन्स्टीट्यूटच्या प्रदर्शनांत ते चित्र विशेष गौरवीले गेले. पण पुढे चित्रकलेतील अंतीम पदवीका मिळवण्यासाठी त्यांनी सदर प्रेस बंद केला. पदवीका मिळवल्यानंतर भाऊसाहेबांनी आपले सारे लक्ष पेंटींग, लॅंडस्केप, याकडेच केंद्रीत केले, अन येथून पुढे सुरु झाले ती मुरलीधर उर्फ भाऊसाहेब आचरेकरांच्या अफाट कर्तृत्वाची यशोगाथा
आचरेकरांच्या चित्रांनी आपली पारितोषिकांची मालीका चढत्या क्रमांकावर सतत ठेवली. त्यांच्या 'प्रेयर' आणि 'रिपोझ' या चित्रांना बॉंबे आर्ट सोसायटीची लागोपाठ दोन वर्षे रौप्य आणि सुवर्ण पदके मिळाली. बाॅंबे आर्ट सोसायटीची प्रदर्शने आचरेकरांच्या चित्रांनी गाजू लागली. आपल्या कामामध्ये, विशेषतः व्यक्तिचित्रण या विषयांत त्यानी विशेष प्राविण्य मिळवले. याशिवाय 'शृंगार' ‘डिव्हाईन म्युझीक’ या त्यांच्या कलाकृतींनीही दाद मिळवली. भाऊसाहेबांचे 'टॉयलेट' हे तैलचित्र' खूपच गाजले. आरशातील प्रतिबिंबाची अचूकता, चेहऱ्यावरील भावदर्शन, नेसलेल्या नऊवारी साडीच्या निऱ्या व चुण्या, त्यातून जाणवणारे शरीर सौष्ठव ह्या गोष्टी भाऊसाहेबांनी अप्रतिम रित्या साधल्या होत्या. आज हे चित्र सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टच्या संग्रही आहे. पण पेंटींग मध्ये सर्वांगीण प्रावीण्य मिळवूनही भाऊसाहेबांना अजूनही उच्च कला शिक्षण घेण्याची ओढ लागली होती. परदेशातील नावाजलेल्या संस्थेत शिकायचे त्यांच्या मनाने घेतलें होते. त्यामुळे १९३२ साली त्यांनी लंडनला प्रयाण केले व तेथील सुप्रसीध्द 'रॉयल कॉलेज ऑफ आर्ट' मध्ये ते दाखल झाले. १९३२ ते १९३४ या दरम्यान भाऊसाहेबांनी रॉयल कॉलेजमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेतले. याच काळात त्यांनी गोलमेज परिषदेचे चित्रांकन केले. हे चित्रं पुढे सर सी.पी.रामस्वामी यांनी खरेदी करून त्यावेळच्या विधानसभेस देणगी दाखल दिले. पुढे भाऊसाहेब भारतात परतल्यानंतर भारताचे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांच्या खास शिफारशीवरून त्यांना पंचम जॉर्ज यांच्या राज्यारोहणाची चित्रे काढण्यासाठी लंडनला पाठवण्यात आले. हा भाऊसाहेब आचरेकरांना मिळालेला एक फारच मोठा सन्मान होता.
याच काळात भाऊसाहेबांना सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे डेप्युटी डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले. सोबतच त्यांची सहधर्मचारीणी म्हणून बडोद्याच्या नलीनी खोत त्यांच्या जीवनात आल्या, आणि भाऊसाहेबांचे जीवन खऱ्या अर्थाने बहरले. मात्र कलानिर्मितीकडे कल आणि ओढा असलेल्या आचरेकरांना जे.जे.चे संचालकपद, तेथील प्रशासकीय कामकाज मानवणारे नव्हते. म्हणून दोनच वर्षांनी त्यांनी जे.जे.ला रामराम ठोकला, आणि ते स्वतंत्रपणे काम करू लागले. त्यांनी स्वतःचा स्टूडीओ सुरु करून आपल्या कलाकृतींचे पहिलेच प्रदर्शन दिल्ली येथे भरवून त्याचे उदघाट्न मंडीच्या महाराजांच्या हस्ते करवीले. येथेच चित्रपट दिग्दर्शक अब्दुल रशीद करदार यांच्याशी त्यांची भेट झाली. करदार त्याकाळात त्यांच्या 'शाहजहान' या चित्रपटावर काम करीत होते. आणि त्यासाठी त्यांना हिंदू-इस्लामी स्थापत्यकलेत निपुण असलेला कला दिग्दर्शक हवा होता. आणि आचरकरांचे काम पाहून त्यांना जाणवले की हीच ती व्यक्ती जिच्या आपण शोधात आपण आहोत, आणि त्यांनी आपल्या चित्रपटाचे कला दिग्दर्शन करण्याची आचरेकरांना गळ घातली. व येथून पुढे भाऊसाहेबांच्या कला जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. आणि त्यांची चित्रपटकारकिर्द सुरु झाली. पुढे प्रसीद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्याशी त्यांचा परीचय झाला. आणि आर.के. समूहाशी ते जोडले गेले. श्री ४२० या राजकपूरच्या सुप्रसीध्द चित्रपटातील एका गाण्यातील रस्त्याचे चित्रीकरण आचरेकरांच्या कल्पक नेपथ्यावर झाले आहे. यातील दिव्याचे खांब, आणि प्रकाश योजनेच्या साहाय्याने दूरवर जाणारा आभासी रस्ता दाखवला आहे. याचबरोबर मीनाबाजार, नौजवान, आन, आवारा, दिल ए नादान इत्यादी अनेक चित्रपटांचे कल्पक कला दिग्दर्शन करून त्यातील स्वप्नवत देखावे त्यांनी दाखवले. विशेषतः आवारा मधील स्वप्नदृश्य खूपच लक्षणीय ठरले. त्यांना १९५७, १९५९ आणि १९६१ सालचे कला दिग्दर्शनाचे पुरस्कार मिळाले. आर.के. बॅनरखाली निघालेल्या अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन आचरेकरांनी केलें आहे. आर.के. सोबत त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट होता ‘मेरा नाम जोकर’. हा चित्रपट धंदा करू शकला नाही. आणि आचरेकर तेथून बाहेर पडण्यास ते कारण झाले. पुन्हां म्हणून ते तेथे वळले नाहीत
मधल्या काळात त्यांचे काम सुरूच होते. याशिवाय त्यांनी कलाविषयक पुस्तकेही लिहीण्यास व चित्रांकीत करण्यास प्रारंभ केला. त्यांनी स्वतःची 'रेखा पब्लीकेशन' ही प्रकाशनसंस्था सुरु केली. त्यातील एक महत्वाचे पुस्तक म्हणजे 'रूप दर्शीनी' हे होय. या मध्ये त्यांनी भारतीय कलेतील शास्त्रोक्त आणि पारंपारिक आकृतीबंध आणि त्याच्याशी केलेला मानवी शरीरबंधाचा तौलनीक अभ्यास व तुलना केली आहे. हे पुस्तक लिहितांना त्यांच्या डोळ्यासमोर आपली वैभवशाली भारतीय परंपरा होती. असा एक प्रवाद होता की, ‘आधुनीक कलेला प्राचीन कला आकर्षीत करू शकली नाही. तिचा आकार हा बोजड, निर्जीव वाटतो’. या आरोपात भाऊसाहेबांना तथ्य वाटले नाही. त्यासाठीच, खास करून विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक त्यांनी प्रकाशीत केले. ज्यामुळे उघड्या डोळ्यांनी त्यांनी या कलाशैलीतील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा. पुढचे त्यांचे पुस्तक होते 'स्काय स्क्रेपर ॲंड फ्लाईंग गंधर्वाज'. या पुस्तकाला राष्ट्रपतींकडून त्यांना ' ताम्रपट' मिळाला. नंतर पंडीत नेहरू यांच्या जीवनावरील 'शांतीदूत' हे चित्रमय पुस्तक त्यांनी प्रकाशीत केले. त्यानंतर कला विद्यार्थ्यांना शरीर सौष्ठवाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी 'फिमेल न्यूड' हे पुस्तक प्रसीद्ध केले. या चित्रमय प्रवासात आचरेकरांना अनेक पारितोषिके मिळाली. भारत व सोव्हिएट रशियाच्या सहकार्याने बनलेल्या 'परदेशी' या चित्रपटासाठी १९५७ साली त्यांना 'फिल्मफेअर' अवार्ड मिळाले. गुरुदत्तच्या 'कागज के फुल' या चित्रपटासाठीही त्यांनी फिल्म फेअर अवार्ड मिळवले. फिल्म जर्नॅलीस्ट अवार्डही त्यांच्या वाट्याला आले.
स्वभावाने अतीशय नम्र व गोड असलेले भाऊसाहेब आचरेकर आपल्या कपड्यांच्या बाबतीत एकदम चोखन्दळ अन टापटीप असत. नेहमी ते सूट,बूट टाय मध्ये वावरत असत. अधूनमधून ते बो देखील लावायचे. सावळा रंग, उंच व सडसडीत बांधा, हे त्यांच्या व्यक्तीमत्वात भर घालीत असे. चित्रकलेतील त्यांचे स्थान तर असामान्य होते. एक यशस्वी कलाकार, शैलीदार लेखक, सर्जनशील कला दिग्दर्शक म्हणून त्यांचे व्यक्तीमत्व अनेकांगाने बहरत होते. पेंटर म्हणून कोणत्याही माध्यमाचे बंधन त्यांना जाणवले नाही. जेवढ्या सहजगत्या ते तैलरंग कॅनव्हासवर हाताळीत, तेवढेच सहजपणे कागदावर जलरंगाचे फटकारे ओढत असत. पेन्सील अथवा क्रेयॉन तर त्यांच्या बोटात सहजगत्या खेळत असे. आणि ती जेव्हां कागदावर चाले तेव्हां जणू जादूगाराची किमयाच आपण पहात आहोत असा भास होत असे. आणि पेन्सिलची रेषाही इतकी प्रवाही असे की तिला पकडणे कधीच जमायचे नाही. आणि विशेष म्हणजे त्यांच्या साध्या स्केचिसमधूनही व्यक्तींची पटणारी ओळख हे त्यांच्या चित्रकाराचे वैशिष्ट्य होते. आणि जलरंग ते ज्या पद्धतीने वापरत असत, तें इतके ताजे अन टवटवीत भासत की चित्रामध्ये त्यामुळे एक जिवंतपणा जाणवत असे.
भाऊसाहेबांनी असंख्य चित्रसंपदा निर्माण केली. त्यामध्ये भव्य अशी तैलचित्रे काढली, तशीच त्यांची जलरंगातील व्यक्तिचित्रणे अमाप गाजली. नर्गीस, लता मंगेशकर, वहीदा रहमान, मीना कुमारी, गुरुदत्त यांची जिवंत व्यक्तिचित्रणे त्यांच्या अद्भूत कुंचल्यातून उतरली. त्यांचा कुंचला ज्या जोमात चाले, तेवढीच त्यांच्या बोटातील पेन्सीलही चालत असे. शिवराज्याभिषेकाचा त्रिशतसंवत्सरिक सोहळ्यासाठी त्यांना चित्रे काढण्यास सांगण्यात आले होते. त्यांच्यात जिवंतपणा यावा म्हणून ते बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्र कथन ऐकत व त्या वर्णनाप्रमाणे रेखाटन करीत असत. असाच बडोदा संस्थांच्या गायकवाड महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा भाऊसाहेबांनी प्रत्यक्ष हजर राहून कॅनव्हासवर तैलरंगात चित्रीत केला. यावेळी समारंभातील व्यक्ती, त्यांचे पेहराव, वस्त्रभूषणे अलंकार आदी गोष्टी पहाता भाऊसाहेबांचा त्या विषयावरील विशेष अभ्यास दिसून येतो. एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सोबतच्या बैठकीत बसले असता त्यांनी सावरकरांची जी रेखाटने केली, ती पाहून स्वातंत्र्यवीरांना अत्यानंद झाला. त्या रेखाटनावर त्यांनी आपली सही करून ती भाऊसाहेबांना दिली. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापनेचा जो चार दिवसांचा सोहळा झाला, त्यांची प्रत्यक्षदर्शी रेखाटने करण्यासाठी मा. यशवंतराव चव्हाण यांनी भाऊसाहेबांना आमंत्रित केले होते. ते सर्व दिवस सोहळ्यात हजर राहून भाऊसाहेबांनी जी स्केचिस केली त्यावर आधारीत राज्याच्या प्रसीद्धी खात्यातर्फे 'महाराष्ट्र स्टेट इज लाॅंच्ड' हे पुस्तक प्रसीध्द करण्यात आले त्यामधील चित्रे पहाताच त्यातील गर्दीमधील प्रत्येक माणसाची आपणास ओळख पटते. असे अलौकीक सामर्थ्य आचरेकरांच्या बोटांत होते. त्यातील पं. नेहरू, यशवंतराव चव्हाण, महंमद रफी, पद्मिनी अश्यांची रेखाटने त्यांच्या कलेला दाद देऊन जातात. एवढेच नव्हे, तर समोर प्रेक्षकांत बसलेल्यांचे चेहरेही आपण ओळखू शकतो. १९५२ साली त्यांना भारतातर्फे प्रतिनीधी म्हणून चित्रपट श्रुष्टीतील इतर मान्यवरांसोबत अमेरिकेच्या मोशन पिक्चर असोशिअनच्या आमंत्रणावरून चित्रपट क्षेत्रांतील आदान प्रदानासाठी पाठविण्यात आले. भाऊसाहेब हातात नेहमी आपले स्केचबूक जवळ ठेवीत असत. आणि अशा स्केचीस मधून त्यांनी आपले ‘फ्लाईंग गंधर्वाज’ हे पुस्तक केले. आचरेकरांच्या पेन्सील या माध्यमांवरील प्रभुत्वाचा आणि त्यांच्या निरीक्षण शक्तीचा अनुभव येथे आपणास येतो.
अश्या या अलौकीक कलाकाराचा, भाऊसाहेब आचरेकरसरांचा अल्प का होईना, सहवास आमच्या वाट्याला आला होता. १९६४ साली आमच्या जे.जे.उपयोजीत कला संस्थेत मायकल अँजेलो ह्या जगविख्यात कलाकाराची ४०० वी पुण्यतिथी आमचे डीन प्रा. दादासाहेब आडारकर यांनी साजरी करण्याचे ठरवीले. त्यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होईल असे कांही महान चित्रकार आठवड्यातून एक दिवस संस्थेत येऊन विद्यार्थ्यांना शिकवीत असत. त्यामध्ये भाऊसाहेब आचरेकर देखील होते. आयुष्यातील कांही धडे आम्ही त्यांच्या हाताखाली गिरवले हे आमच्या नशिबी भाग्याचे दिवस होते. आमच्याकडील प्राद्यापक चिंतामण तिरोडकर, शांताराम पवार तसेच त्यावेळचा आमचा वर्गमित्र व नंतर उपयोजीत कला क्षेत्रांत खूप मोठा झालेला आमचा वर्गमित्र दत्ता सावंत अश्याना त्यांचा सहवास प्राप्त झाला होता. आचरेकर केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे भूषण होते. त्यांनी केलेल्या कला क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९६८ मध्ये ‘पदमश्री’ किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.
दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात प्रत्येक राष्ट्रपतींचे पूर्णाकृती पेंटींग नामवंत चित्रकारांकडून करवून ते भवनात लावण्याची प्रथा आहे. त्यासाठी खास चित्रकारांना आमंत्रीत करण्यात येते. १९७९ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. नीलम संजीव रेड्डी यांचे पेंटींग करण्यासाठी भाऊसाहेब आचरेकरांना आमंत्रीत करण्यात आले होते. तेथील महान चित्रकारांच्या परंपरेत भाऊसाहेबांचेही एक चित्र मानाचे स्थान मिळवणार होते. एक उत्कृष्ट व्यक्तिचित्रणाचा आविष्कार पहाण्याची संधी जनतेला उपलब्ध होणार होती. सर्व तयारीनिशी आचरेकरांनी दिल्लीची गाडी पकडली. पण नियतीच्या मनांत त्या दिवशी कांही वेगळेच होते.
१८ डिसेंबर १९७९ रोजी सकाळी दिल्ली स्थानकावर उतरताच फलाटावरच भाऊसाहेबांना हृदयविकाराचा झटका आला. आणी फलाटावरच एकाकी अवस्थेत त्यांचे निधन झाले,
वय वाढले तरी शरीर निरोगी होते,मन तरुण होते, कुंचला तत्पर होता, रंगही ताजेतवाने होते. पण...
त्यांचा कॅनव्हास कोराच राहीला...
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष







अत्यंत बारकाव्यांनी युक्त,माहितीपूर्ण,अभ्यास तर असतोच आणि शब्दसाज तर खानदानी कोल्हापूरी साजापेक्षा कुठेही कमी नाही....इतका शृंगारीक...सर...फर सांग्राह्य लेख आहे
ReplyDelete