मृत्यूलाही आलिंगन देणारा कोमल मनाचा कवी: अशोकजी परांजपे
माझ्या जे.जे. उपयोजीत कला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पुढे शिक्षक अश्या दोन्ही वास्तव्याचा एक प्रकारे मला लाभच झाला. एक म्हणजे आम्हांला लाभलेले निष्णात असे शिक्षक, आणि त्याच सोबत त्यांच्या योगदानामुळे निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांचे असलेले परिचीत, ज्यांचा राबता आमच्या संस्थेकडे सतत असे. त्यांचाही संपर्क म्हणा, सहवास म्हणा मला थोड्या फार प्रमाणात लाभला. विशेष करून आमच्या संस्थेतील प्राध्यापक दामू केंकरे, षांताराम पवार हे दोघेही नाट्य श्रुष्टीशी जडलेले होते. त्यांच्याकडे येणारेही तसेच मातब्बर असत. त्या काळात नांव गाजवलेले असत. त्यात असत ते कमलाकर सारंग, राघवेंद्र चव्हाण, सुलभा देशपांडे, कमलाकर सोनटक्के, शशीकांत निकते, माधव वाटवे, अरुण जोगळेकर, असे अभिनेते, वसंत सबनीस, मनोहर काटदरे, शं. ना नवरे, विनायक खेडेकर असे लेखक असत. मनोहर ओक, चिं.त्र्यं.खानोलकर उर्फ आरती प्रभू, अशोकजी परांजपे यासारखे कवी असत. व यात सामायीक सूत्रचालन करणारे आमचे गुरु डॉ. गजानन मंगेश अथवा बंडू रेगे असत. केंकरेंच्या प्रत्येक समारंभाला हजेरी लावणारे जयवंत दळवी व मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे देखील असत. ह्या सर्वांच्या गप्पातून जे विचारधन प्रकट होत असे त्यातील कांही कण कां असेनात, माझ्या वाट्याला आले हे माझे भाग्य समजतो. आणि प्रा. षांताराम पवार, तसेच प्रा. दामू केंकरे या दोघांशीही माझी जवळीक असल्याने या उत्तुंग अश्या साहित्यिक -कलावंतांशी थोडीफार जवळून वावरण्याची, त्यांचे निरीक्षण करण्याची संधी मला मिळाली. यामध्ये विशेष करून चिं. त्र्यं. खानोलकर व अशोक परांजपे यांची षांताराम पवारांशी देखील तितकीच जवळीक होती. विशेषतः आपल्या नव्या निर्मितीवर, मग ते काव्य असो वा नाटक, पवारांचे मत त्यांना हवे असे. कारण पवार सर तोंडदेखले स्तुती करणाऱ्यांपैकी नाहीत, त्यांचे मत परखड व स्पष्ट असते याची जाणीव त्या सर्वाना असे. खानोलकर उर्फ
आरती प्रभू थोडेसे मितभाषी वाटत पण अशोक परांजपे मात्र एकदम दिलखुलास माणूस. आत येताच त्यांची एक जबरदस्त थाप पाठीवर पडली की समजावे आज गडी काहीतरी नवीन ऐकविणार आहे. आणि त्यामध्ये आमचाही सहवास असणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे अशोक परांजपे कधी येतात अन त्यांच्याकडून त्यांच्या कवितांच्या नवीन पंक्ती आणि शब्द श्रीमंती कधी ऐकायला मिळेल याची मी वाट पहात असे.
अशोक गणेश परांजपे ह्या नावाचा हा कविमनाचा माणूस भेटत असे तेच मुळी हसतमुख चेहऱ्याने. एक प्रकारची प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावरून भरभरून ओसंडून असे. त्यांच्याशी गप्पा या साहीत्यीक मूल्याच्या असत. मनाने कोमल, मृदू असलेल्या परांजपेंचं काव्यही तितक्याच हळुवारपणे बाहेर पडत असे. अशोक गणेश परांजपे हे नेहमी आपले नाव अशोक जी. परांजपे असे लिहीत. पण पुढे त्याच्या नावातील त्यांच्या वडीलांचे आद्याक्षर जी. हे त्यांच्या नावापुढे आदरार्थी विशेषण असे लावून पुढे ते नावाजले तेच ' अशोकजी परांजपे' या नावाने! मूळचे सांगली जिल्ह्यातील हरिपूर गावच्या अशोकजींनी पुढे मुंबईला येऊन आपले नांव रसिकांपुढे आणले. मूलतःच त्यांना लोककलांचा अतीव आदर होता. त्याचा अभ्यास ते करत होते. त्यांचे व्यक्तिमत्वही थोडेसे रांगडेच जाणवत असे. त्यांच्या बोलीवरही सांगली-कोल्हापूरचा थोडा प्रभाव जाणवत असे. ' वाह ! क्या बात है!' अशी एखादी गोष्ट अथवा काव्यपंती आवडल्या तर त्यांची दिलखुलास अशी उस्फूर्त दाद असे. अशोकजींचे काव्य निरनिराळे अलंकार लेवून अवतीर्ण होत असे. त्यामध्ये धुंदफुंद अशी भावगीते असत, जशी मोगऱ्याची फुले उधळावीत तशी भक्तीरसाने ओथम्बलेली भक्तीगीते असत. गण -गौळण तसेच नाट्यगीतंही या पंक्तीत आपली वर्णी लावीत असत. आणि सगळी कशी चोखन्दळ अशी! रसीकांना माना डोलवायला लावणारी. यावेळी त्यांचे 'इंडियन नॅशनल थेटर्स' रिसर्च सेंटरचे काम सुरु होते. पण ते सर्व सांभाळून अशोकजींनी महाराष्ट्रातील खेडोखेडी जाऊन तेथील आदिवासींच्या, लोककलावंतांच्या लोककला अभ्यासल्या. त्यांच्या अनेक ध्वनीफिती तयार केल्या. १९८६ मध्ये आनंदवन येथील महाराष्ट्र ‘आदीवासी कला महोत्सव’ तसेच १९९२ मध्ये ‘पंढरपूर भक्ती संगीत महोत्सव’ असे दोन आदीवासी लोककला महोत्सव आयोजीत केले. या कामाची फोर्ड फाउंडेशनने खास नोंद घेऊन आस्ट्रिया मधील 'इन्स्टिट्यूट ऑफ व्हिडीओग्राफी' या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने परांजपे यांना सभासदत्व दिले. त्यानंतर त्यांनी अनेक कलाकारांशी संवाद साधला. त्यानंतर अशोकजींनी अनेक मराठी लोक कलावंतांना फ्रांस, आयर्लंड, जपान आदी देशात नेवून तिथं त्यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली. एक नवं चैतन्य त्यांनी लोककला या कला प्रकारात आणलं. अनेक झाकल्या कलाकारांना उजेडात आणले. विठ्ठल उमप हे त्यातलेच एक! त्यांना लोकांसमोर आणून, व्यासपीठ देऊन शिवाय परदेशात स्वतःची कला सादर करण्याची संधी देणारे अशोकजीच होते! याशिवाय परभणीचे गोंधळी राजाराम बापू कदम, शाहीर बापूराव विभूते, चित्रकथाकार गणपत म्हसे, दशावतारीचे राजा बाबी नालंग, वारली चित्रकार जिव्या सोमा असे अस्सल हिरे त्यांनी पैलू पाडून प्रकाशात आणले.
अश्या या दैवी गुण लाभलेल्या गीतकाराला त्यांच्या लोककलेच्या अभ्यासामुळे आणि व्यासंगामुळे महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे' संचालक म्हणून नियुक्त करून लोककलांना उर्जीतावस्था प्राप्त करून देण्याची संधी मिळवून दिली. कारण लोककला अशोकजींच्या नसानसात भरली होती. आणि एखादी नवी रचना त्यांच्या लेखणीतून उतरली की ती दुसऱ्यांना ऐकविल्याशिवाय त्यांना रहावत नसे. असेच कधीकधी त्यांची पाऊले जे.जे. मध्ये वळत ते सरळ षांताराम पवारांच्या केबिनमध्ये. ते आलेले समजताच मीही तेथे हजर रहात असे. जरी आपल्याला त्यांच्या चर्चेतील कांही विशेष कळत नसताही केवळ त्यांचे अभ्यासू बोलणेच खूप कांही शिकवून जात असे. मात्र त्यांची कवीता सुलभ, सरळ सोपी आणि मनाला भुरळ घालणारी असे. तेथे त्यांनी कधीच शब्दच्छल केला नाही. वा शब्दपांडित्य दाखविले नाही. तुकोबांच्या अभांगाची अथवा ज्ञानदेवांच्या ओवीसारखी सरळ असे. थेट आपल्या अंतःकरणाला जाऊन भिडेल अशी. एकदा ते असेच आले. ते येताच एक चैतन्य घेऊन येत असत. वातावरण प्रसन्न करून सोडीत. म्हणाले, नुकतेच आशाताईंबरोबर एक गाण्याचे रेकॉर्डींग संपवून आलो आहे. मस्त जमले आहे. क्या बात है! असे म्हणून त्यांनी आपल्या गीताविषयी सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या एका काव्यसंग्रहाला प्रकाशकांना त्यांच्याकडून प्रस्तावना लिहून हवी होती. रात्री बसून त्यांनी ती लिहीली व सकाळी आम्हांला ऐकविली. त्यामधील शांतता दर्शवणारे एक वाक्य त्यांनी लिहीले होते, ' पापणीवर पापणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता जाणवत होती' यापेक्षा आणीक कोणती उपमा निरव अश्या शांततेला कोणी देऊ शकेल? केवळ अशोकजींसारख्या महाकवीलाच ते शक्य होते. आणि हे झाल्यावर पवारांनी रमेशच्या कॅन्टिनमधून गरमागरम कांदाभजी आणि चहा मागविणे ओघानेच येत असे. जोडीला पवारांना अवगत असलेल्या त्रिकोण -चौकोनाच्या भाकीताचे प्रयोग देखील पवार सर मांडत असत. त्यातही अशोकजी रस घेत. मग ते आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाप्रमाणे निरनिराळ्या काव्यमय विषयावर बोलू लागत. यात अगदी कालिदासाच्या मेघदूतातील 'आषाढश्य प्रथम दिवसे' त्यातील यक्ष, त्याची व्याकुळता येथपासून ते साने गुरुजींपर्यंत सर्वच विषय येत असत.
अशोकजींनी अनेक गीते लिहीली. आपल्या या गीतांमधून रसीकांना ते भक्तिरसात चिंब भिजवून टाकत. कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकोर, नाविक रे वारा वाहे रे,
अवघे गरजे पंढरपूर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, पाखरा जा दूर देशी,
समाधी घेऊनी जाई ज्ञानदेव, कुणी निंदावें कुणी वंदावे, सहज तुला गुपीत एक,
एकदाच यावे सखया, अशी एक ना अनेक अवी अशी गीते त्यांच्याकडून निर्मिली गेली. 'कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकोर' या गाण्याच्या वेळची एक मधुर आठवण त्यांनी स्वतःच नमूद करून ठेवली आहे. ' त्यावेळी मी गोरा कुंभार नाटक लिहीत होतो. लोणावळ्यातील अभिषेकींच्या बंगल्यावर आमची गप्पांची बैठक जमली होती. त्यावेळी अभिषेकी म्हणाले, नाटकाचा शेवट अश्या अभंग गीताने व्हावा की श्रोतें शब्दांत आणि सुरात भारावून बाहेर पडले पाहीजेत. माझ्या डोक्यात त्यावेळी आलं की गोरा कुंभाराला सगळं ऐहीक प्राप्त झालं होतं आणि त्याच्यासारख्या मुळातच विरक्त असलेल्या माणसाला देवाकडे काय मागायचं असेल तर फक्त मोक्ष आणि कैवल्य. आणि हे कैवल्याचं चांदणं देणारा देणारा चंद्र हा प्रत्यक्ष पांडूरंग असला पाहीजे. मग मनात पक्के झाले की जीव म्हणजे चकोर जो चांदण्यासाठी भुकेला आहे. इथं तर कैवल्याचं चांदणं अपेक्षीत आहे. आणि मुखडा तयार झाला,
कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकोर
चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर...
पंडीत जितेंद्र अभिषेकींनी या गीताला अमर करून सोडले. आजही तितक्याच नवेपणाने हे गीत आपण ऐकत असतो.
नाविका रे वारा वाहे रे
डौलानं हाक जरा आज नाव रे
या गाण्यांत तर अशोकजींचे शब्द, अशोक पत्कींचे भावमधूर संगीत आणि सुमन कल्याणपूरचा गोड आवाज यांचा असा कांही मेळ जुळून आला आहे की हे गाणे अतीशय लोकप्रिय झाले. नाविका रे या गाण्याला पार्श्वभूमी मिळाली आहे ती देखील अशोकजींच्या मूळ गांव हरीपूरची. हरीपूरच्या संथ आणि शांत अश्या वातावरणातील नदीतून पैलतीरावर रोज जा ये करणारी नाव अशोकजींच्या हृदयात लहानपणापासून कोरली गेली होती. शिवाय हरीपूर हे नाटककार गोविन्द बल्लाळ देवल यांचेही जन्मगांव. त्यामुळे त्यांना आपल्या गावाचा सार्थ अभिमान वाटत असे. मुळातच या कवीला निसर्गाचे वेड बालपणापासूनच होते. त्याच्यातील नावीन्याची ओढ सतत त्यांना लागली होती. त्यामुळे की काय त्यांच्या गीतांमधून नेहमीच निसर्ग हा विविध रूपे घेऊन येत असे. आणि त्यांच्या मनातील शब्द त्यांच्या हातातील लेखणीतून उतरण्यासाठी व शब्द पंक्तीत हजेरी लावण्यासाठी नेहमीच आसुसलेले असत. त्यांची गीते पं. जितेंद्र अभिषेकी, सुधीर फडके, प्रकाश घांग्रेकर, सुमन कल्याणपूर, रामदास कामत, सुलोचना चव्हाण, अजीत कडकडे, अरुण दाते अश्या जेष्ठ व श्रेष्ठ गायकांनी गायली. सुमन कल्याणपूर यांनी त्यांची बहुतेक गीते गायली आहेत.
अभिजात वाङ्मय तसेच लोकवाङ्मय अशोकजींना प्रिय होते. शिवाय त्यांच्या जीवनातील वाटचालीला पं. जितेंद्र अभिषेकी, रवींद्र पिंगे, शोभा गुर्टू, प्रभा अत्रे, वसंतराव देशपांडे, कुसुमाग्रज अश्या दिगजांचा सहवास लाभला. संस्कृत भाषेवरील त्यांचा अभ्यास त्यांना शंकराचार्यांचे श्लोक मोहीत करवीत असे. पठ्ठे बापूरावांच्या लावण्या ते ओठावर बाळगीत असत. विशेषतः साहीत्य संघाच्या कट्ट्यावर या लोकांच्या गप्पा विशेष रंगत. अशोकजी लोकांच्या गराड्यात वावरणारे व गप्पांच्या फडात रंगणारे असल्याने अनेक लोकांचा सहवास त्यांना लाभला. अशोकजींनी ' दार उघड बया ' ' आतून किर्तन वरून तमाशा' 'अभग दुभग तिभक' ही लोकनाट्यं लिहिली. 'आतून कीर्तन वरून तमाशा' हे त्यांचे लोकनाट्य खूपच गाजले. शंकर घाणेकर व प्रकाश इनामदार या जोडीने ते लोकप्रिय केले. त्यांनी 'कळीदार कपूरी पान ' सारख्या लावण्याही लिहिल्या.
पुढे अशोकजी औरंगाबाद येथे स्थायीक झाले. त्यांच्या अफाट ज्ञानाने आणि संभाषण कौश्यल्याने तेथेही त्यांचा भक्तगण झाला. अशोकजी नेहमीच लोककलेतील सौंदर्यस्थळे व बलस्थाने शोधीत असत. तमाशा, गोंधळ, वाघ्या-मुरळी, अश्या अनेक प्रमुख लोककला त्यांनी शोधल्या व वर्तमानावर त्यांचे असलेले ठसे याचाही मागोवा घेतला. लोकपरंपरेतील आख्याने त्यांनी नाट्यरूपात आणली. 'जांभूळ आख्यान' 'खंडोबाचे लगीन' 'दशावतारी राजा' 'वासुदेव सांगाती' अश्या काही कलाकृती आजही त्यांची आठवण करून देतात. अशोकजींनी गीताप्रमाणेच नाटकेही लिहीली. ती देखील भक्ती संप्रदायावर.
संत कान्होपात्रा, संत गोरा कुंभार, संगीत संत गोरा कुंभार व बुद्ध इथे हरला आहे. त्यांच्या 'बुद्ध इथे हरला आहे' या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी, अचानक कोणातरी लोकांच्या भावना दुखावल्या. आमचा बुद्ध हरतोच कसा? म्हणून बुद्धावर हक्क सांगणाऱ्यांनी त्यांचे नाटक बंद पाडायचे ठरवले. येथे बुद्ध हा गौतम बुद्ध नसून ती एक बुद्धिवाद्यांची प्रतिमा होती. ते एक रूपक होते, पण ते कोणाला समजणार? शेवटी अशोकजींनी 'बुद्धिजीवी इथे हरला आहे' असे नामकरण करून त्यावर पडदा टाकला. शेवटी आपल्या या देशात बुद्धिजीवी जन सामुदायीक व जातीयतेच्या झुंडशाहीपुढे नेहमीच नमत आलेले आहेत. हरत आले आहेत!
अशोकजींच्या औरंगाबादला जाण्याने त्यांच्या भेटी कमी होत गेल्या. पवार सरही जे.जे.मधून सोडून गेले. पाठोपाठ दामू केंकरे सरही जे.जे.सोडून सांस्कृतीक संचालनालयाचे संचालक म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली. जे.जे.मधील या सर्व कलाकारांचा, साहित्यिकांच्या गप्पांचा अड्डा पुढे तेथे सरकला. मीही बऱ्याच वेळा त्या कार्यालयाची कलात्मक कामे केंकरे सर देत असत त्यासाठी जात असे. तेथे जुने मित्र भेटत. अधून मधून क्वचित परांजपे दिसत. एक दिवस मी जहांगीर आर्ट गॅलरीत एका प्रदर्शनाला गेलो होतो, तेथे अचानक ओळखीचा आवाज वाटला म्हणून पाहीले तर समोर अशोकजी उभे! खूप खूप आनंद झाला त्यावेळी. मी अधिष्ठाता झाल्यावर आमची ही पहीलीच भेट होती. मध्यन्तरी दामू केंकरे औरंगाबाद येथे चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून कांही दिवसांसाठी गेले होते, तेंव्हा रमेश वाबगावकर, केंकरे व अशोकजी यांच्या भेटी होत. आज मला भेटले तेंव्हा ते गडबडीतच होते. तरीही थोडा वेळ आम्ही समोवार मध्ये बसलो. त्यावेळी मला न कळलेल्या आचार्य अत्रे यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रातील एका प्रकरणाच्या शीर्षकाचा अर्थ समजत नव्हता. ते प्रकरण होते अत्रे -फडके वादावर आधारीत. त्याचा समारोप करताना आचार्य अत्रे यांनी असे म्हटले होते की ' शेवटी गच्छ सुकर भद्रम ते! अशी मी फडक्यानं शेवटची शिवी दिली व त्या प्रकरणावर पडदा पडला.' मला केवळ त्याचा अर्थच त्यांनी सांगीतला नाही, तर तो संपूर्ण श्लोक सांगून त्याचे विश्लेषण केले. ती त्यांची माझी झालेली शेवटची भेट!
आणि शेवटी ९ एप्रील २००९ ला ती काळीज चिरत जाणारी अभद्र बातमी आली . स्वप्नातही आपण कधी कल्पना करू शकणार नाही अशी. अशोकजींनी आपल्या रहात्या निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. एका मृदू आणि तरल स्वभावाच्या कवीने आपले जीवन आपल्या हाताने संपवीले. स्वतःच्याच हातातील नाजुकसे फुल स्वतःच कुस्करून टाकावे तसे. अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे हा टोकाचा निर्णय त्यांनी घेतला? तसे पाहीले तर त्यांच्या अभ्यासाच्या, कला विष्काराच्या तुलनेने पात्रता असूनही त्यांना काहीच मिळाले नव्हते. पण काहीतरी मिळावे म्हणून काव्यांत जगणाऱ्या या मृदू मनाच्या माणसाने कधीच कांही केले नाही. पण त्यांनी जे कांही कार्य केले ते लोककलांची उंची गाठणारे आहे. शहरी आणि ग्रामीण संस्कृती त्यांनी एकत्र येण्यास मदत केली. त्यामधील ते दुवा ठरले. आज जे लोककलांचे पुनरुज्जीवन झाले आहे त्यामागील प्रेरणा ही अशोकजींची आहे. एकामागून एक असे दीप ते लावत गेले. प्रकाश पाडत गेले. त्या प्रकाशात अनेक निनांवी लोककलाकारांना त्यांनी नांवे दिली, चेहरे दिले. जागतीक पातळीवर त्यांना लोककलाकार म्हणून ओळख दिली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मी ज्यांना त्यांची पोकळी जाणवेल अश्या षांताराम पवार सरांकडे गेलो. म्हटले निदान त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा. पवार सर शून्य नजरेने पहात बसलेले होते. थोड्यावेळाने मला म्हणाले. राजा, थोड्या वेळापूर्वीच नलेश पाटील याचा फोन आला होता.म्हणाला, सर तुम्ही कांही वर्षांपूर्वी माझ्यासमोर त्यांना तुमचे त्रिकोण चौकोन काढून त्यांचे भवीष्य वर्तवले होते कीं ते स्वतः आपले जीवन संपवणार आहेत.
असेलही कदाचीत, पण अजूनही अशोकजींची आठवण आली की कोठून तरी एक बारीकशी कळ उरात येते. वाटते की अजूनही त्यांची ती भक्कम थाप पाठीत बसेल व त्यांच्या खास आवाजातील उच्चारात ते म्हणतील ' वाह, क्या बात है! अशी दिलखुलास दाद देतील.
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर
जन्म मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार
चराचरा पार न्या हो जाहला उशीर
'पांडुरंग' पांडुरंग'... मन करा थोर
-प्रा. मं.गो.राजाध्यक्ष
( लेखन संदर्भ : मंजीरी तिक्का , संजीव वेलणकर. छ्यायाचित्र : प्रकाश भोंडे)

Comments
Post a Comment