•|| षांतारामायण ||• एका धगधगते स्थंडील शांत झाले !
काय विचीत्र खेळ असतो नियतीने मांडलेला आपल्या या नश्वर जीवनांत ? दर वर्षी १७ ऑगस्ट रोजी आमच्या षांताराम पवार सरांच्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांचे अभीष्ट चिंतन करून त्यांच्यावर एक लेख फेसबुकवर लिहीत आलो आहे. यावर्षीही मी त्यांच्या येणाऱ्या ८२ व्या वाढदिवसानिमीत्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझा लेख लिहीत होतो. एवढ्यात गीतालीचा, पवार सरांच्या मुलीचा फोन आला. म्हणाली, राजाकाका, पप्पांशी बोला. आणि फोनवर माझ्या सरांशी गप्पा सुरु झाल्या. एवढ्यात मी त्यांच्यावर लेख लिहितो आहे हे समजल्यावर त्यांनी वाचून दाखवायला सांगितले. मी एक परीच्छेद वाचला. एवढ्यात गीताली म्हणाली, ' काका, ते झोपले.' हेच त्यांच्याशी झालेले माझे शेवटचे बोलणे. आज सकाळी गंगाचा फोन आला आणि त्याने ती कानात तप्त तेल ओतणारी बातमी सांगीतली, ' पवार सर गेले ' आणि मी स्तब्ध झालो. आजवर त्यांच्यावर त्यांची कर्तबगारी, त्यांची कला कारकीर्द, त्यांचे सृजनशील काव्य अश्यासाठी शब्द फुलांची उधळण करणारे आम्ही, आता त्यांच्यावर श्रद्धांजली अर्पण करायचे अप्रीय काम करण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करायला लागलो आहे. गेली अनेक वर्षे धगधगत असलेले एक यद्न्यकुंड आज शांत झाले होते. जेजेच्या आम्हांला शिकवलेल्या गुरु परंपरेचा अस्त झाला होता. गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय असते याची जिवंत जाणीव करून देणारा द्रोणाचार्य आज अचेतन झाला होता.
षांताराम पवार ! पवार सर ! अनेक लोकांशी विविध प्रकारची नाती जोडलेले एक नांव. माझे त्यांच्याशी नाते जोडले गेले ते १९६२ पासून. जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट मध्ये उच्च कला शिक्षण घेण्यासाठी मी प्रवेश घेतला, अन कांही दिवसांतच पवार सरांशी माझा संबंध आला. आमची पन्नास विद्यार्थ्यांची ती ब्याच. पवार सरांसोबत, त्यांच्या रागलोभासहीत हळू सरकत अंतीम वर्षापर्यंत पोचली. मीही त्यासोबत होतो. आणि पुढे त्याच संस्थेमध्ये अध्यापक म्हणून काम करू लागलो, तेंव्हा त्याला मैत्रीची किनार लाभली. मात्र काही अंतर राखूनच आम्ही ती निभावली. कारण गुरु-शिष्य नाते हे अधीक घट्ट होते. विद्यार्थी दशेपर्यंत पवार सरांना मी पहात होतो ते एक सर्जनशील शिक्षक म्हणून, अन त्याच ताकदीचा व्यावसायीक कलाकार म्हणूनही ! एखादे चित्र वा संकल्पना ठरावीक दर्जा दाखवणारी नसेल तर ती वारंवार घासून घेणे, तरीही जमली नाही तर स्वतः हाती ब्रश घेऊन करून दाखविणे, याउप्परही क्षमता दिसली नाही तर ते फाडून टाकणे, मग ते कोणत्याही आकारात असो. ही पवार सरांची शिकविण्याची लक्षणे. त्यामुळे आपल्या कामाचा दर्जा वाढविण्यासाठी विद्यार्थी आपोआप झटत. मग मी जेव्हां त्यांचा सहाय्यक म्हणून काम करू लागलो, तेव्हां कळले, की हा नियम त्यांनी स्वतःसाठीही लावून घेतला होता. स्वतःचे चित्र मनाजोगते झाले नाही तर तेही पवार सर टरकावून टाकीत असत. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर ना खेद असे, ना खंत !
जे.जे.च्या त्याकाळात मला जाणवली ती पवारांची विविध रूपे. उपयोजीत कला ही अन्य कलांशी निगडीत आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पवार सरांची इतर क्षेत्रांतील मुशाफीरी. काय नव्हते त्यांच्यात ? ते उत्तम दिग्दर्शक होते. नेपथ्यकार होते, साहित्यीक होते, कवी व बोधचित्रकार होते. तसेच लेखाचित्रकारही ( लेखाचित्रकार हा कॅलिग्राफी साठी पवारांचा शब्द ) होते. आणि या सर्वांना बांधणारे एक समान असे सूत्र होते, ते त्यांचे जोरदार असे प्रभावी व्हिज्युलायझेशन. कल्पना शक्ती. प्रतीकात्मक गोष्टींची विचारधारा याच गोष्टी सर्व कलांना पूरकच आहेत. प्रत्येकाचा आकार कदाचीत वेगळा असेल. आणि यातूनच पवार सरांची अनेक व्हिज्युअल्स जन्माला आली. कल्पनाही त्यांना तत्क्षणी सुचत. त्यासाठी त्यांची निरीक्षण शक्ती त्यांच्या कामी येत असे. एकदा आम्ही काही कामासाठी शासकीय मुद्रणालयात गेलो होतो. तेथे संचालक श्री सप्रे यांनी पवारांना त्यांच्या सोव्हिनिरच्या कव्हर साठी एक मुखपृष्ठ करून देण्याची विनंती केली. पवारांनी क्षणभर आजूबाजूला पाहीले, अन ते थेट शिरले ते मुद्रण विभागात. अनेक यंत्रांची धडधड चालू होती. मशीनवर रंगीत छपाई सुरु होती. प्रिंटर मध्ये मध्ये प्लेटवरील रंग कापडी बोळ्याने साफ करून बाजूला फेकत होता. पवारांनी तेथीलच एका टेबलावर ठाण मांडले, एक आर्ट कार्ड मागवले. प्रिंटिंगची जाड शाई बोटानेच घेऊन त्यावर डोळ्याचा आकार ठळकपणे रेखाटला. व मध्यभागी प्रिंटरनी टाकलेल्या रंगीत कॉटनच्या बोळ्यापैकी एक छानसा लाल रंगाचं बोळा घेऊन डोळ्याच्या मध्यभागी चिकटविला. क्षणार्धात तेथे दृक कला व मुद्रणकला यांचा सुरेख मिलाफ घडविणारे एक बोधचिन्ह तयार झाले. ते मुखपृष्ठ संचालक सप्रे यांना इतके भावले की, हा किस्सा कौतूकाने ते अनेकांना ऐकवीत.
पवार सरांची व्यावसायिक कामे सुरु असत, त्याचसोबत खास अशी शासकीय कामे जी गुणवत्ता दर्शक असत, ती जे.जे.मध्ये येत. व ही कामे संस्था प्रमुखांकडून पवारांकडे येत. कारण हणमंते अन केंकरे सरांचा आपल्या आवडत्या षांतारामवर असलेला त्यांचा गाढा विश्वास. पुढे ही कामे पवारांकडे थेट येऊ लागली. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र पर्यटन खात्याच्या संचालीका मालतीबाई तांबे यांचे नांव घ्यावे लागेल. पर्यटन विभागासाठी त्यांनी अगणीत काम केले. आणि त्या विभागाला प्रसिद्धीच्या झोतात आणले. पवारांनी चित्रे काढली, बोधचित्रे काढली लेखनांत त्यांनी विहार केला. काव्यांत मनसोक्त डुंबून तो आनंद स्वतः घेतला, इतरांना दिला. त्यांच्यातील सृजनशीलता जशी चित्रांतून प्रगट होत असे, तशीच शब्दांमधून बहरत असे. चित्रकाराच्या भूमिकेत असतांना कुंचला शब्द बोलू लागे, तर लेखणी हातात घेतली की त्याच शब्दांचे रंगीबेरंगी फुलपाखरूं होऊन स्वच्छंदपणे विहरत असे. यावेळी आम्हांला पवार सरांमधील चित्रकारासोबत जाणवत असे तो त्यांच्यातील तत्वज्ञ, विचारवंत, समीक्षक, रसीक, कवी असा सर्वगुणसंपन्न अवलीया. जिथे चित्र अन प्रेक्षक हे दोघे संभाषण करत असतात.
तिथे आपण नसतोच. आणि हे चित्रदर्षक संभाषण एखाद्या मोरपिसाप्रमाणे अलगद स्पर्शून हितगूज करते व आपण मोहरून उठतो. ही किमया घडत असते पवारांच्या शिकविण्यातून ! त्यांच्या घडणावळीतून ! आणि त्यांच्या आविष्कारांतून !
पवार सर सांगतात त्याप्रमाणे आपल्या महाविद्यालयीन जीवनात त्यांनी शिक्षकांचं मार्गदर्शन कदाचीत घेतल नसेलही. पण पुस्तकांचं मार्गदर्शन त्यांनी जरूर घेतलं. तीही महागडी पुस्तकं विकत घेण्याची ऐपत नसताना. त्यासाठी ते मोठमोठ्या बुकस्टॉल मधून फेऱ्या मारत. विकत घेण्याचा बहाणा करून ती चाळत असत. त्यानंतर ज्ञानाचं भांडार त्यांना खुलं झालं ते फुटपाथवरील पुस्तक विक्रेत्याकडून. त्यांच्याशी ते चक्क मैत्री करू लागले. याच वेळी पं. नेहरूंच्या कल्पनेतून उदयाला आलेली ' पंचवार्षीक योजना' सुरु झाली. जनतेपर्यंत या योजना पोचवण्यास दृक माध्यमांची गरज होती. व याची म्युरल्स करण्याचे कामे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडे आली. याचा फायदा पवारांना विद्यार्थी दशेत खूप झाला. यामुळे वाचन वाढले, निरीक्षण वाढले, बुद्धीला खाद्य मिळाले, आणि म्हणूनच पुढील आयुष्यात जेव्हां पवार सर विद्यार्थ्यांच्या कामावर जे विवेचन करीत, त्यामुळे तो विद्यार्थी केवळ चित्रच सुधारत नसे तर त्याचे चित्र संदेशवाहक असे. शेकडो शब्दांना सहजरीत्या बोलकं करणारं ! आणि जोडीला आवश्यक असे इंग्रजीचे शिक्षण. जे आपल्या उपयोजीत कलेला अत्यावश्यक आहे. त्याचे महत्वही ते जाणून होते. आपल्या विद्यार्थ्यानाही जाणवून देत होते.
काम कोणतेही असो, एखादं लहान आकाराचे मुखपृष्ठ वा आतील बोधचित्रे, पोस्टर अथवा भव्य असे प्रदर्शन, पवार सर त्यांत स्वतःला झोकून देत असत. आम्ही बरेच जण त्यांच्या टीम मध्ये सहभागी होतो. त्यावर प्रा. दामू केंकरे यांचे सुपरव्हीजन आणि प्रा. धैर्यवान सरांची उपस्थीती या सर्वच गोष्टी मोठ्या आनंददायक असत. आणि यातूनच १९६९ साली म. गांधीजींच्या जन्म शताब्दी निमित्त उभारले गेलेले एक भव्य असे ' म. गांधी जन्म शताब्दी प्रदर्शन '! याच्या उभारणीमध्ये पवारांचा मौलीक हातभार होता. अगदी त्याच्या आराखड्यापासून ते अंतीम उभारणीपर्यंत. ' चित्रे डोक्याने काढा ' हा पवारांचा परवलीचा शब्द होता. अर्थात याचा अर्थ नुसते चित्र काढू नका. तर त्यामागे तुमची कल्पनाशक्ती वापरा. म्हणजे तुमचे चित्र संवाद साधू शकेल. उपयोजीत कलेचा तो मूलभूत गाभा आहे. अशी अनेक प्रदर्शने व चित्ररथ रातोरात जागून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बनवले. निर्णय घेण्यातही ते तितकेच तत्पर असत. त्यामुळे कधीही कांही समस्या उद्भवली तर त्यावर उपाय हा त्यांच्याकडे ठरलेला असायचाच. अश्यावेळी त्यांना साथ असे ती प्रा.तिरोडकरांची. या दोघांची मैत्री जे.जे.मध्ये अबाधीत होती. अशी या तिरोडकर -पवारांची जोडी आम्ही जेजेत पाहीली. कारण त्यांच्या कामाची थोरवी पवार सर जाणून असायचे. या तिरोडकर नांवाच्या लक्ष्मणाशिवाय पवार सरांचे ‘ षांतारामायण ‘ पूर्ण होवूच शकणार नाही.
पवारांच्या कामातून एक काव्य उमटत असे. त्यांच्या चित्रांवर एक खास असा पवार टच नेहमी जाणवे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कामातूनही ती झलक दिसून येत असे. एकाद्या विद्यार्थ्यांची कल्पना त्यांना आवडली तर ते केवळ छोट्याश्या बदलाने तिला संपूर्ण बदलून टाकीत. अर्थपूर्ण करीत. अशाच एकेवेळी एका विद्यार्थीनीने पर्यटन विभागाच्या पोस्टरसाठी दिवाळीची पणती दाखवली होती. पवारांनी आपली नजर त्यावरून फिरविली. त्यातील नेमकं वर्म त्यांनी ओळखलं. पेन्सील हातात घेतली, आणि ज्योतीची जागा हात जोडलेल्या दोन विनम्र हातानी घेतली. जे अनेक शब्दांत वर्णन करून सांगावं लागलं असतं तेच केवळ त्या पणती मधल्या नमस्कार करणाऱ्या आवेशातील ज्योतीने क्षणार्धांत सर्व कांही सांगून टाकलं !' सुस्वागतम ' महाराष्ट्राची स्वागत करण्याची परंपरा. चित्र, मग ते आपले असो वा विद्यार्थ्यांचे, त्याला सुवर्णाचे कोंदण देऊन अर्थपूर्ण करण्याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असे. या वेळी एका विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेली घटना सांगितल्याशिवाय रहावत नाही. गोपी कुकडे हे ते विद्यार्थी. आज जाहीरात क्षेत्रांत आघाडीवर असलेले एक नांव. शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट्ला गोपीने ' मीरा ' हा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा विषय घेतला होता.पोस्टर हे त्यांतील एक महत्वाचे माध्यम. गोपीने डोक्यावर केशरी पदर घेऊन हातात एकतारी घेऊन उभी असलेली मीरा त्यामध्ये दाखवली होती. चित्र अर्थातच सुंदर होतं. एखाद्या क्यालेंडरप्रमाणे दिसणारं. पवारांनी त्यावर एक ट्रेसिंग पेपर ठेवला. व पेन्सिलीने केवळ हातातील एकतारीला मोरपीस बनविलें. जणू ती पिसरूपी वीणाच छेडते आहे. पिसाचा भाग हा एकतारीच्या भोपळ्याप्रमाणे दाखविला. अन त्या चित्रांचं संपूर्ण स्वरूपच बदलून गेलं. आता ती केवळ गाणारी मीरा राहीली नाही, तर कृष्ण भक्तीने ओथम्बलेली कृष्णाला सर्वस्व वहाणारी मीरा त्यातून उभी राहीली. ' चित्रे डोक्याने काढा ' अर्थात विचारपूर्वक काढा, ही त्यांची विचार प्रणाली होती.
अश्या या पवार सरांवर डीन हणमंते सरांनी एकदा ' स्टुडंट मजलीस ' च्या चेअरमनपदाची माळ घातली. हे ऐकल्यावर आम्ही उडालोच ! पवार सरानी अशी प्रशासकीय कामे कधीच केली नव्हती. पण एकदा का काम हाती घेतले की ते मनापासून करून त्याला योग्य न्याय द्यायचा ही त्यांची वृत्ती. आम्हां कांही खास लोकांना बोलावून त्यांनी वर्षभर कांही खास उपक्रम करायचे यावर चर्चा केली. त्यात आजवर संस्थेत घडली नाही अशी घटना करायची या दृष्टीने ' आर्ट जत्रा ' ही संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांच्या बैठकीत मांडली व सर्वानीच ती उचलून धरली. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जे २ डी, ३ डी, शिकवले जात असे त्या आधारावर अगदी क्षुल्लक अश्या वस्तूपासून कलात्मक नित्योपयोगी वस्तू बनविणे व जत्रा भरवून त्या विकणे ही ती संकल्पना होती. सर्वचजण या अनोख्या कल्पनेने भारावून गेले. सर्व विद्यार्थ्यांना जेजे साहीत्य मिळेल तेते गोळा करण्यास सांगितले. कोणी वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या आणल्या, कोणी बांबूची नळकांडी, कोणी धाग्याची लाकडी रिळे तर कोणी बटणे, फाटक्या जीन्स, शिंपले, रंगीत गोफ अश्या विविध वस्तूनी वर्ग भरून गेले. पवार सर सर्वांशी चर्चा करून त्यात सुधारणा सुचवीत. अनेक वस्तू आकार घेऊ लागल्या. त्यामध्ये बाटलीचा झाला सुंदर असा फ्लॉवर पॉट, काचेच्या अबला व रंगीत गोफाने विणलेला, कोणी रिळे, शिंपले वापरून ल्याम्प शेड केल्या. कोणी बांबूचे मग बनविले, कोणी लाॅकेट बनवली, कोणी पेन स्टॅंड, कोणी खांद्यावरच्या पिशव्या, अन बघता बघता शेकडो वस्तू बनल्या. त्यांची भव्य अशी जत्रा संस्थेत भरवली. ही घटना ' टाॅक ऑफ द टाऊन' बनली. बरीच विक्री झाली. विद्यार्थ्यांचे खिसे खुळखुळू लागले. उरलेले सर्व साहीत्य महाराष्ट्र लघु उद्योगाचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब नेवाळकर यांनी त्यांच्या महामंडळासाठी विकत घेतले. शहरभर गाजलेल्या या घटनेने पवारांना एक प्रचंड असे मानसीक समाधान लाभले. एक ' न भूतो न भविष्यती ' अशी घटना संस्थेच्या इतिहासांत घडली होती. याचा फायदा पुढे अनेक विद्यार्थ्यांना झाला व स्वतंत्रपणे ते हा व्यवसाय करू लागले. उपयोजीत कलेच्या विदयार्थ्यांना एक नवीन दालन उघडले गेले होते.
आपल्या मनात एखादी कल्पना आली की ती तडीला नेणे हे पवार सरांचे ध्येयच होते. अगदी बारीक सारीक विषयही यातून सुटत नसत हे विशेष. जेजेला चाळीस वर्षे उलटून गेली तरी संस्थेतील अध्यापक वर्गाकडे स्वतःचे ओळखपत्र नव्हते. कधी गरज लागली तर ऑफीस दोन ओळी टाईप करून त्यावर अधिष्ठात्याची सही घेऊन देत असे. नेमकी हीच गोष्ट पवारांनी ओळखली अन ते कायम स्वरूपी ओळखपत्र करण्याच्या मागे लागले. उभट आकाराचे, जाड पुठ्यावर गडद निळ्या रंगाचे कापडी आवरण असलेली ओळखपत्रे बनवून त्यावर सोनेरी रंगात सरकारी तीन सिंहाची मोहर छापून त्यांनी घेतली. व त्यावर संस्थेचे नांव काळ्या रंगात उभे छापले. आम्हाला आच्छर्य वाटले की एवढा रंगात डुंबणारा हा माणूस आणि याने गडद निळ्या रंगावर काळ्या रंगाने नांव का टाकले ? ते अगदी निरखून पाहील्याशिवाय दिसतच नव्हते. आम्ही त्यांना विचारताच ते त्यांच्या नेहमीच्या सवयीने ओठ दाबून स्मीत केले. पण नंतर जेव्हां ट्याक्सीवाला ट्याक्सीत घेत नसे, एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळत नसे, तेव्हां वरच्या खिशातून हे कार्ड दाखवताच ट्याक्सीवाले निमूटपणे थांबत. कोठेही सहज प्रवेश मिळे. तेव्हां आम्हांला यामागील इंगीत कळले. ते जरी आमच्या संस्थेचे कार्ड असले तरी त्याचे पोलीस खात्याशी साधर्म्य दाखवणारे होते. ठळकपणे दिसे ते त्यावरील तीन सिंहाचे चिन्ह, त्यामुळे ते पोलीस खात्याचे वाटत असे. आणि आजचे महाराष्ट्र पोलिसांचे हात असलेले जे बोधचिन्ह आहे, तीही पवार सरांचीच निर्मिती आहे. त्यांच्याच कल्पकतेतून अन कुंचल्यातून उतरलेले!
पवार सर हे चित्रकार होतेच, शिवाय ते कवी होते. साहीत्य -नाट्य या विषयाचे अधीकारी होते. नेपथ्यामधील त्यांचे कार्य लक्षणीय होते. प्रदर्शन मांडणीमध्ये त्यांची ताकद जबरदस्त होती. या गोष्टींना मी केवळ साक्षीदारच न राहता त्यांच्या कामातील एक घटक बनलो. त्यांच्याकडे आपापल्या क्षेत्रांत नावाजलेली मंडळी येत असे. ते कांही केवळ गप्पा मारण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या लिखाणावर, काव्यावर, कलाकृतीवर त्यांना हवे असे ते पवारांचे अभ्यासपूर्ण व परखड असे मत व विचारांची देवाण घेवाण. आणि या व्यक्ती तरी कोण होत्या ? चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू, गोपाळ मयेकर, कमलाकर सोनटक्के, मनोहर काटदरे, अशोकजी परांजपे, अश्या, जे कोणाच्या खुशमतीने कधीही हुरळून न जाणारे. त्यांच्या गप्पा ऐकणे, अधूनमधून त्यात भागही घेणे हे आमच्या अंगवळणी पडू लागले.
पवार जसे चित्रांत रमत होते, तसेच काव्यांत डुंबत होते. काव्य त्यांच्या मनांत स्फुरलं की कधी ते त्यांच्या वहीत उतरे ते कळत नसे. या वहीत अतीशय सुंदर व बारीक अक्षरांत जणू कॅलीग्राफी केली आहे अश्या तऱ्हेने ते आपल्या कवीता लिहीत असत. त्यांची ही वही त्यांच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये निवांतपणे पडलेली असे. आणि जेव्हां काव्याचे दर्दी तेथे येत, तेव्हां ही वही आनंदाने उजळून निघत असे. कधी आरती प्रभूंच्या स्पर्शाने मोहरून जाई तर कधी अशोकजी परांजपे यांच्या ' क्या बात है ! ' या दाद देण्याने उगाचच संकोचून जाई. एकदा पवार सर वर्गावर असताना आरती प्रभू तेथे आले. केबिनमध्ये बसले असतांना त्यांनी ड्रॉवर उघडला. कवितेची वही उचलली आणि थेट ते गेले सत्यकथेच्या राम पटवर्धनांकडे व त्यांना ही वही दिली. कांही दिवसांनी पटवर्धनांनी पवारांकडे तिची प्रुफे तपासण्यासाठी पाठविली, तेव्हां पवारांना कळले. व त्यांनी त्या छ्यापण्यास नकार दिला. पण पटवर्धन म्हणाले, ' तुमचीच निर्मीती आहे. रसीकांपुढे येऊ द्या. आपण कलावन्त आहात. छापूद्या !' आणि या कविता प्रसीद्ध झाल्या. त्यावर थोर समिक्षक प्रा. काळेले यांनी लिहीले, ' मराठीला एक उत्तम कवि लाभला.'
भोईवाडा, परळ अश्या भागात १७ ऑगस्ट १९३६ साली जन्मलेल्या आणि वाढलेल्या पवार सरांचे जेजे मधील व्यक्तीमत्व वादग्रस्त होते.ते रगेल तसेच रंगेल होते. बरेच शिक्षक त्यांच्याविषयी हळूहळू कुजबुजत असत. त्यांचा वर्गाबद्दलचा आग्रही स्वभाव, निवडकच काम प्रदर्शनांत लावणे, चित्रे मनाप्रमाणे न झाल्यास ती फाडून टाकणे,बैठकीला सर्वात शेवटी येऊन हजेरी लावणे. त्यांची प्रेमप्रकरणं यावर त्यांच्यामागे चर्चा सुरु असे. पण तेच शिक्षक त्यांच्या तोंडावर मात्र अगदी जिवणी रुंदावून हास्य करीत. त्यांचे गोडवे गात. पवारांनी सर्व रस उपभोगले. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातील महत्वाचे दोन रस होते ते शृंगार आणि मदिरा. मदिरा घेतल्याशिवाय त्यांच्या कामाला खरा जोर येतच नसे. मोठमोठी प्रदर्शने, चित्ररथ अश्या कामांच्या वेळी तर खाणे अन पिणे याला सुमार नसे. पण कधीही मदिरेला त्यांनी स्वतःवर स्वार होऊ दिले नाही. पवार सरांची कामे तशी खास असायची. विशेषतः भाऊसाहेब नेवाळकरांशी त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे ते सर्वेसर्वा. त्यांची बरीच कामे पवार सर करीत असत, आणि माझाही सहभाग त्यात असणे हे ओघानेच येई. मग ते दिल्लीतील प्रगती मैदानावरील भव्य प्रदर्शन असो, डिस्प्ले असो वा कॅटलॉग, फोल्डरसाठी केलेली कामे असोत, पवारांचा खास टच त्यातून दिसून येत असे.
पवार सरांच्या सान्नीध्यात अनेक बुध्दिवंत आले. अन पवारांनी त्यांना आपलेसे केले. एक दिवस प्रा. दामू केंकरे एका व्यक्तीला त्यांच्याकडे घेऊन आले, व म्हणाले, ' षांताराम, हे वसंत दावतर. त्यांना त्यांच्या आलोचना ह्या मासिकासाठी मुखपृष्ठ करून हवे आहे. ' आलोचना ' हे उच्चशिक्षितांचे समीक्षणात्मक मासीक होते. दावतरांशी बोलणे होताच पवारांना जाणवले, या माणसाच्या विचारामध्ये किती प्रगल्भता आहे किती दूरदृष्टी आहे. आणि पुढे अनेक वर्षे ' आलोचना' च्या प्रत्येक अंकाचे मुखपृष्ठ पवार सरांच्या हातचे राहीले.असाच एक उपक्रम पवारांनी १९७१ सालचे महाराष्ट्र शासनाचे खास कॅलेंडर बनवून केला होता. एरवी शासकीय कॅलेंडर म्हणजे भिंती अडवण्यासाठी अथवा शासकीय कर्मचाऱ्यांना वैकल्पिक सुट्या पाहण्यासाठी उपयोग होत असे. पण त्यावर्षी शासकीय मुद्रणालयाचे संचालक श्री सप्रे व व्यवस्थापक श्री धोंड यांनी परदेशातही पाठवता येईल असे एक डिलक्स कॅलेंडर काढण्याचे ठरविले व ते काम जे. जे. उपयोजीत कला संस्थेकडे म्हणजे पर्यायाने पवार सरांकडे हे काम आले. पवारांनी याची संतवाणी व त्यांची मानवतेची शिकवण या कल्पनेवर आधारित स्वतः व इतर तिघे असे चारजणांनी मिळून एकूण १२ चित्रे केली व वसंत दावतरानी त्याचे इंग्रजी मध्ये सुंदर विश्लेषण केले होते. १९७२ साली प्रथमच महाराष्ट्र शासनाने केलेल्या या डिलक्स कॅलेंडरने इतीहास घडवला.
जे.जे. मध्ये पवार सर परंपरावाद सोडून नेहमीच विद्यार्थ्यांना नवीन दृष्टी देत राहीले. नवनवीन प्रयोग ते सातत्याने करीत राहीले. नवीन प्रकार आजमावले. आणि त्यातून नवनिर्मिती देखील केली. हे त्यांचे विविध प्रकार त्यांनी जी अनेक मुखपृष्ठे बनविली त्यामध्ये आवर्जून वापरले. त्यातून विषयानुरूप माध्यमे स्वीकारली. आणि त्यातून त्यांनी चित्रकाव्य निर्माण केले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे विंदा करंदीकरांच्या ' आदिमाया ' या स्त्री चित्रणावरील समीक्षणात्मक पुस्तकाचे पवारांनी केलेले मुखपृष्ठ. ग्रंथालीतर्फे हे पुस्तक प्रकाशीत होणार होते. पवारांकडे ते काम आले. सर्व पुस्तकाचा अंदाज घेतल्यावर केवळ त्याचं मुखपृष्ठ न करता आतील सर्वच चित्रे करण्याची जबाबदारी पवारांनी स्वीकारली. पवार चित्रांकीत ' आदीमाया ' प्रकाशीत झाले, अन ते पुस्तक विंदांऐवजी पवारांचंच वाटू लागलं. दया पवारांच्या 'बलुतं ' साठी मुखपृष्ठ करतांना दलितांची अवस्था, त्यांना सोसावे लागलेले परीस्थितीचे चटके यावर आधारित फाटकी ठिगळे लावलेली गोधडी दाखवण्याचे त्यांनी ठरवीले. खरं तर प्रत्येक पुस्तकाच्या प्रतीवर फाटक्या गोधडीचे तुकडे चिकटवून तयार करण्याचे त्यांनी ठरवीले. एक अनोखा प्रकार होता तो ! पण ते व्यवहार्य नसल्याने प्रत्यक्षांत उतरले नाही. आणि गोधडीच्या छायाचित्रावर भागले. पुढे दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी पवारांवर ते करण्याची वेळ आली, तेव्हां पवारांनी आधार घेतला तो, इसापनीतीतील कावळा आणि घडा या गोष्टीचा. पाणी वर आणून तहान भागविण्यासाठी त्यात खडे टाकणारा कावळा त्यांनी दाखवला. एकीकडे घडाच फुटका होता, तर दुसरीकडे घडाच नव्हता. हृदय पिळवटून टाकणारे हे संकल्पन होते. वसंत दावतरांच्या ' गीतकाव्य ' या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी त्यांनी चक्क बोरूच्या लेखणीचेच मुरलीमध्ये रूपान्तर केले. ' तुघलक ' नाटकाच्या जाहिरातीसाठी त्यांनी एखाद्या सम्राटाच्या आवेशातील तुघलक दाखवून, त्याची विनाशक वृत्ती दाखवण्यासाठी त्याच्या हातातील गुलाब मात्र मानवी कवटीप्रमाणे दाखवला. 'आलोचना' मासिकाच्या पंचवीसाव्या वर्ष्याच्या सोव्हिनीरसाठी पवारांनी २५ सिगारेटची थोटकं निळ्या शाईमध्ये दाखवली. माणूस विचारात मग्न असला की त्याचे धूम्रपान अखण्डित चाललेले असते. आलोचनाच्या चळवळीत या परीवाराने असंख्य दिवस रात्री कश्या घालवल्या आहेत, त्याचे हे द्योतक ! असेच एका समाजसेवकाच्या गौरव ग्रंथाला त्यांनी त्या कार्यकर्त्याची वणवण दाखविण्यासाठी त्याच्या झिजलेल्या वहाणा दाखवून त्याच्या बाजूला पोथीचे दंडक दाखविले. पूज्य आदरभाव व्यक्त करण्यासाठी.
मात्र पवार सरांना एका गोष्टीची खन्त होती, ती एकदा त्यांनी मला बोलूनही दाखवली होती, ती म्हणजे आजपर्यंत त्यांच्यावर काही लिहिले गेले नाही. तेही अनेक पत्रकार - संपादक, लेखक त्यांचे मित्र असतांना. आणि हे बरेचसे त्यांच्या सहवासात आले होते ते त्यांच्या भवीष्य वाणीमुळे. ही भविष्याची देणगी त्यांना कशी मिळाली हेही त्यांनी एकदा मला सांगितले होते. या निसर्गात अनेक मूलभूत आकार आहेत, जसे त्रिकोणी डोंगर. नागमोड्या वेली, सरळ असलेले वृक्ष, आणि गोलाकारातील सूर्य चंद्र. आणि हे आकार त्यांना खुणावू लागले. त्यातून त्यांना लाभले ते अंतर्ज्ञान. पण यात चौकोन कोठून आला ते समजत नव्हते. याच वेळी ते कोणार्कला सूर्यमंदीरात गेले होते, तेथील असलेल्या प्रचंड रथाच्या चाकाचे केलेले सम भाग. तेव्हां त्यांना उत्तर मिळाले.यातून त्यांनी स्वतःचे ग्रीड बनविले. त्यावरून अभ्यासली एक भवीष्य सांगण्याची स्वतःची पद्धत. एखाद्याला ते कागदावर त्रिकोण, चौकोन, लहान त्रिकोण, वर्तूळ, नागमोडी रेषा, पुन्हां चौकोन असे आकार मनाला येईल तसे पटापट काढायला लावीत. नंतर त्याच्याकडे नीट लक्षपूर्वक पाहून त्याद्वारे आपले भवीष्य सांगण्यास सुरुवात करीत. आणि हे अगदी खरोखर असायचे. मीही त्याचा अनुभव घेतला आहे. आणि या त्यांच्या भविष्यवाणीने ते इतके प्रसिध्द झाले की , मोठमोठे लोक त्यांच्याकडून ते ऐकण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. पण पुढे त्यातून कांही लोकांची बिंगे बाहेर पडू लागली. लोक दुखावू लागले तेंव्हा त्यांच्या पत्नीने दुसऱ्यांचे भवितव्य पाहण्यास त्यांना मनाई केली. मात्र कामं झाल्यावर याच लोकांनी पाठ फिरवल्याचे त्यांना दुःख होते तशीच आपणावर न लिहिल्याची खंतही त्यांना जाणवत होती. आणि पुढे मीच त्यांच्यावर कांही लिहू शकेन या त्यांच्या विश्वासाने त्यांनी स्वतःवर लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. आणि पुढे त्यांच्यावरील जो
' दीपस्तंभ ' हा जो गौरव ग्रंथ झाला हे त्याचेच एक द्योतक होय!
पवार सरांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवीले, अनेकांना चित्र साक्षर केले, त्यांच्या रिकाम्या वेळेत त्यांच्या सहकाऱ्यांशी ज्या चर्चा चालत, त्या जाहीरात कला, चित्रपट, काव्य, साहीत्य, नाट्य अश्या सृजनशील विषयांवर असत. दुसऱ्या विषयांना तेथे थारा नसे. ते सतत काव्यात अन चित्रमय जगात मग्न असतात. त्यांच्या विचारातून ती चालूच आहेत. पण हे करतांना त्यांना भान असतं की, जरी आपण सर्वज्ञात असलो तरी अती विचारानेही घात होतो. नेमकं आपण कुठं थांबायचं ते माहीत हवं. मग ती पोएट्री असो किंवा व्हिजुअल . या क्षेत्रांमध्ये पवार सर ज्या ठिकाणावर, ज्या स्थळावर पोहोचले, तेथील अंतर गाठण्यासाठी त्यांना अनंत वळसे घालावे लागले. ते म्हणतात, ' मला वळसे घालावे लागले म्हणून तर मला हे कळसे सापडले. ' हे कळसे होते अनुभवाच्या धनाचे ! अक्षय घट. ज्ञानाने भरलेले. कधीही रीते न होणारे. प्रत्येकाने त्यातून मूठी भरभरून उचलले तरी ओसंडून वाहणारे. त्यातून येणाऱ्या कैक पिढयांना या कला क्षेत्रांत आरामात गुजराण करता येईल !
मी त्यांच्यावर लिहीत असलेल्या ' षांतारामायण ' ( जे नंतर दीपस्तंभ म्हणून त्यातील काही भाग वापरण्यात आला ) या त्यांच्या चरित्राचे लिखाण पूर्ण झाले तेव्हां मी पवार सर, त्यांची पत्नी लीना, त्यांची कन्या गीताली व आमचे समाईक मित्र विनय नेवाळकर यांच्या समवेत त्याचे वाचन केले. त्यातील कांही घटनां वाचतांना पवार सर भावनाशील होतं. कित्येकदा त्यांचे डोळे भरून येत होते. मग हळूच आत जाऊन अश्रूंना मोकळी वाट करून देत. वाचन पूर्ण झाले. पवार सरांनी माझी वही हातात घेतली. पेन उचलले. आणि त्यांच्या मनातील ओळी कागदावर उतरल्या,
तो गेला
तेव्हां मला कळले
तो माझ्याबरोबर होता.
- मं. गो. राजाध्यक्ष












सर .. शब्द संपले
ReplyDeleteएक मोठ्ठा माणूस, गेला.
ReplyDeleteएक अविस्मरणीय व्यक्ती चित्र उतरवले आहेस.दीप स्तंभ मालवला.
ReplyDeleteव्वा! अप्रतिम श्रध्दांजली! माझा पवार सरांशी प्रत्यक्ष कधी संबंध आला नव्हता पण आईकडून त्यांंच्या कामाविषयी ऐकून होते. ह्या लेखामुळे त्यांची छान ओळख झाली. आपल्या लेखांची (व्यक्तीचित्रांची) कमाल हीच्....त्या व्यक्तींच्या आयुष्यात डोकावण्याची संधी मिळते आणि नकळत ती आपलीशी होऊन जातात!! मनःपूर्वक धन्यवाद! आपण खरेच सुदैवी....आपल्यास पवारसरांसारखा गुरू, बंधू आणि सखा मिळाला!!🙏🙏
ReplyDeleteभावपूर्ण श्रध्दांजली.
ReplyDeleteअसामान्य, दैवी कल्पनाशक्ती लाभलेलं शांताराम सर!
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली