चित्र सार्वभौम-रंग सम्राट: रघुवीर मुळगांवकर.
गेल्या शतकात या महाराष्ट्रात विधात्याने अनेक कलाकार, साहित्यीक, गायक, संगीतकार, नाटककार, कवी अश्या सर्वच क्षेत्रातील व्यक्तींची अक्षरशः भरघोस निर्मिती केली. आजही ती नावे घेतली तर त्यानंतर प्रचंड पोकळी जाणवते. आणि हे सर्व कलावंत जन्माला आले तेही बहुदा एकाच सुमारास ! हे कलाकार जणू ईश्वरी वरदहस्त घेऊनच जन्माला आले होते. या लोकांनी केवळ आपल्या कलेची सेवाच केली असे नाही तर, अवघ्या महाराष्ट्रावर त्यांनी मोहीनी घातली, आपल्या कुंचल्याच्या ठसा उमटविला.संपूर्ण महाराष्ट्र स्वतः भोवती फिरवीला. अश्याच पैकी एक मनस्वी आणि दैवी देणे लाभलेले आणि आपल्या सामर्थ्यवान कुंचल्याने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून सोडणारे चित्रकार म्हणजे रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगांवकर ! मुळगांवकर हे नाव त्यांच्या विशीष्ट शैलीमध्ये त्यांच्या आकर्षक आणि मनमोहक चित्रांच्या खाली नीटनेटकेपणे लिहिलेले पाहायला मिळे. त्यामुळे महाराष्ट्रात घरोघरी त्यांचे नाव त्यांच्या चित्रांसह सर्वांच्या तोंडी झाले. त्या काळात मुळगांवकर आणि दलाल ह्या दोघां समकालीन चित्रकारांची नावे सर्वसृत होती. त्यातही प्रामुख्याने मुळगांवकरांची चित्रे सर्वत्र पाहायला मिळत. त्यामुळे मुळगांवकर हे नाव आणि त्यांची विलोभनीय चित्रे शाळकरी मुलांनाही माहीत होती. इतकेच नव्हे तर मुलांमध्ये चित्रकलेची गोडी उत्पन्न करायला त्यांची चित्रेच कारणीभूत होत.आपणही मुळगावकर व्हावे अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात उमटत असे.
मुळगांवकरांचा जन्म १४ नोव्हेंबर १९१८ रोजी गोव्यातील अस्नोडा या गावी एका चित्रकाराच्या कुटुंबात झाला. वडील शंकरराव हे नामांकित चित्रकार होते. ज्येष्ठ बंधूही त्याच व्यवसायातले. त्यामुळे रघुवीरमध्ये हा वारसा आला नसता तर नवलच ! त्यातून गोमंतक ही भूमी कलावंत निर्माण करण्याची खाणंच आहे. छोटा रघुवीर वडिलांकडून चित्रकलेचे धडे घेत होता, तसेच त्यांच्या शेजारी बुजुर्ग चित्रकार त्रिंदाद राहत असत. तेथेही त्यांचे सतत निरीक्षण चालूच असे. पण चित्रकाराचा पेशा पत्करल्याने लागलेल्या आर्थिक झळांमुळे शंकररावाना वाटे की, रघुवीरने चांगले शिक्षण घेऊन कोठेतरी नोकरी करावी व चांगला पैसा मिळवावा. पण त्रिंदादानी रघुवीरचे कलागुण ओळखले होते. त्यांनी शंकररावांना समजावीले. ' रघुवीर मधील कला त्याला स्वस्थ बसवणार नाही. तिच्यामुळेच या मुलाचा उत्कर्ष होणार आहे. तरी त्याला त्या वाटेनेच जाऊद्या ! ' यानंतर मुळगांवकर मुंबईला आले. येथे आल्यावर त्या काळचे ख्यातनाम चित्रकार एस. एम. पंडीत यांच्याकडे काहीकाळ ते राहिले. कारण त्यांना शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचे होते. मुख्यत्वे पंडितजींची चित्र काढण्याची, रंगलेपनाची पद्धत त्यांना अनुभवायची होती. पण पंडित चित्रे काढताना सहसा कोणाला दाखवीत नसत. त्यांच्या स्टुडिओ मध्ये सर्व चित्रकार भिंतीकडे तोंड करून काम करीत, व पंडितजींचे टेबल मागे असे. त्यामुळे पंडितांना सर्वांची कामे पाहता येत, पण त्यांचे काम मात्र कोणाला दिसत नसे. आणि मुळगांवकरांना तेच तर पाहायचे होते. त्यावर त्यांनी एक तोडगा काढला.त्यांनी पंडितजींचे चरित्र लिहायला घेतले. काही पाने लिहिल्यावर त्यांनी ती पंडितांना दाखविली. व आपले टेबल पंडितांच्या शेजारी ठेवण्याची परवानगी मागितली, ज्या योगे काम करता करता चरित्रासाठी त्यांची माहिती घेता येईल. अश्या रीतीने त्यांना पंडितांना काम करताना पाहण्याची संधी मिळाली.
मुळगांवकरानी जरी चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नव्हते, तरी त्यांना ती ईश्वरी देणगी होती.कोणाकडेच ते चित्रकला शिकले नाहीत. मला परमेश्वराने शिकवले आहे असेच ते सांगत. आणि ते खरेच होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी आपल्या चित्राला पोर्तुगीज सरकारचे बक्षीस मिळविले होते. मुंबईला आल्यावर ते गिरगांवातील भटवाडीत स्थायिक झाले. तेथे त्यांना कुलकर्णी ग्रंथागार, केशव भिकाजी ढवळे, जयहिंद प्रकाशन, ग.पां.परचुरे आदी प्रकाशकांच्या पुस्तकांची वेस्टन संकल्पनांची कामे मिळू लागली.तेव्हाच्या लेखकांची नावेही मोठी होती व त्यासाठी चित्रकारही तेवढ्याच ताकदीचा लागत असे. त्यामुळे मुळगांवकरांच्या चित्रांचा बराच बोलबाला होऊ लागला.अल्पावधीत ते एक प्रतीथयश, लोकमान्य चित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. तो काळ म्हणजे मासिके, पुस्तके, दिवाळी अंक आणि कॅलेंडरचा सुवर्णकाळ होता. अनेक दर्जेदार मासिके प्रकाशित होत असत. दिवाळी अंक हे तर खास असे वैशीष्ट्य होते. मुळगांवकरांनी आपल्या कुंचल्याद्वारे ही मासिके सजविली, नटविली. आतील कथानाही त्यांची आशयपूर्ण चित्रे असत. कधी लाईन तर कधी हाफटोन तर कधी अलंकारीक अश्या विविधतेने शृंगारलेली मुळगांवकरांची चित्रे म्हणजे उत्कट सौंदर्याचा आविष्कार असे. तसेच कॅलेंडरसाठीही त्यांनी बरीच चित्रे काढली. विशेषतः देवदेवता हा विषय मुळगांवकरांनीच हाताळावा ! पूर्वी राजा रविवर्म्याने पौराणिक चित्रे घरोघरी पोचविली. ज्या जमान्यात विष्णुपंत पागनीस हे ' संत तुकाराम ', शाहू मोडक म्हणजे ' कृष्ण ', महिपाल म्हणजे ' राम ' या अर्थाने लोक त्या देवांच्या रुपाकडे पहात, त्या काळात मुळगांवकरांनी या सर्व देव देवतांना चेहरे दिले. प्रत्येक देवाची प्रतिमा आपल्या मनात कशी असावी, हे मुळगांवकरानी सर्वाना दाखवून दिले. आज कलेचे शास्त्र खूप पुढे गेले आहे. आपल्या उत्पादनावर आधारित कल्पना लढवून कॅलेंडर बनविली जातात. पण त्या काळात उत्पादन कोणतेही असो, त्याच्या नावाची पट्टी खाली असे. पण वर मुळगांवकरांचे नयनमनोहर चित्र असे जे नंतर कोणाच्याही घरी भिंतीवर गेलेले असे. त्याकाळात बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्य कथा त्यांच्या कथानायक धनंजय - छोटू, झुंजार-विजया, काळा पहाड, सुदर्शन अश्यांसाहित खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. मुळगांवकरानी या सर्व कथानायकांना चेहरे देवून त्यांना अमर केले, त्यातही सातत्य राखले. त्यामुळे कैक वाचक हे कथानायक खरोखरीच अस्तित्वात आहेत असे वाटून त्यांना पत्रेही लिहीत असत.
मुळगांवकरांच्या चित्रांमध्ये सौंदर्य हे खचखचून भरलेले असे. त्यांची पौराणिक, ऐतिहासिक चित्रे महाराष्ट्राला मोहवून टाकत. स्त्री सौंदर्य रेखाटावे तर मुळगांवकरांनीच ! स्त्रीचे आरक्त गाल, तिचा कमनीय बांधा, चेहऱ्यावरील मार्दव, तिच्या सोबत पानाफुलांची बहरलेला निसर्ग, सभोवार बागडणारी हरणे, हंस, कबुतरे, अश्या प्रकारे शृंगारप्रधान त्यांची चित्रे अश्लीलतेपासून कित्येक कोस दूर होती. डौलदार मोहक आकृत्त्या, त्याला साजेशी मोहक रंगसंगती, चेहऱ्यावरील भावाविष्कार, आणि त्यावर त्यांचा खास असा ' मुळगांवकरी ' साजशृंगार यानी त्याची चित्रे ओतप्रोत भरलेली असत. कोणालाही आपली पत्नी मुळगांवकरांच्या चित्रातील तरूणी प्रमाणे हवी असे, तर मातेला आपले मूलही मुळगांवकरांच्या चित्राप्रमाणेच हवे असे. एवढा प्रचंड पगडा बसला होता मुळगांवकरांच्या चित्रांचा जनमानसावर. सुमारे पांच हजारांवर चित्र निर्मीती करणारे मुळगांवकर ' स्प्रे ' हे माध्यम मोठ्या कुशलतेने वापरीत. त्यांच्या कामाचा वेगही प्रचंड होता. असे म्हणतात की त्यांच्या ब्रशवरील रंग कधीच सुकत नसे. त्यांच्या एवढी विपूल चित्रसंपदा निर्माण करणारा चित्रकार दुसरा कोणी झाला नाही. त्यांची चित्रे केवळ संखेने विपूल नसून त्यांचा दर्जा आणि मोहकता यामुळे महाराष्ट्रातील घरोघरी त्यानी ती पोचविली. अजूनही अनेकांच्या देवघरात त्यांची चित्रे आढळतात. शास्त्रशुद्ध शिक्षण नसल्याने त्यांचा ॲनाटोमीचा अभ्यास झाला नव्हता. पण ती कसर त्यांनी आपल्या रंगलेपनामधून आणि चित्र सौंदर्यामधून पुरेपूर भरून काढली. काळा रंग मुळगांवकर वापरीत होते, तसा कोणालाच कधी वापरता आला नाही. त्यांच्या रंगीत चित्रांइतकीच त्यांची कृष्णधवल चित्रेही सौंदर्याचा परीपाक होती.
ग.का. रायकरांचा ' दीपलक्ष्मी ' तसेच नलीनी मुळगांवकरांचा ' रत्नप्रभा ' या दिवाळी अंकामध्ये मुळगांवकरानी चित्रमालिका सुरू केल्या. थोड्याच काळात स्वत: संपादीत केलेल्या ' रत्नदीप ' या दिवाळी अंकामध्ये त्यांच्या खास अशी पौराणिक, ऐतिहासीक चित्र मालीका प्रसीद्ध होवू लागल्या. त्यांचे विषयही तसेच काव्यमय असायचे. मग ती मेनका असो, मस्तानी असो, मिलनोत्सूक रती असो वा देवयानी असो. सौंदर्याने मुसमुसलेल्या या नायीका पहाताना रसीक खचीतच एक वेगळ्या विश्वात भ्रमण करीत असत. खास चित्रकलेला वाहीलेल्या या दिवाळी अंकाने आपला वाङ्मयीन दर्जाही राखला होता. आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, चिं.वी.जोशी. अ.वा.वर्टी, वि.आ.बुवा, ग.दि.माडगूळकर, ना.धों. ताम्हणकर अश्या तोलामोलाच्या शैलीदार लेखकांचे लेखन सहाय्य या अंकाला मिळाले होते. कला साहीत्याचा हा एक सुरेख संगमच होता. शिवाय हंस, वसंत, यासहीत कैक नावाजलेल्या मासीकांची मुखपृष्ठेही मुळगांवकरानी आविष्कृत केली. कित्येक नव्या संपादकांना त्यानी विनामूल्य चित्रे दिली. मात्र छपाई उत्कृष्ट हवी हा त्यांचा आग्रह असे. कित्येकदा ते स्वत:च त्यांचे पैसे देत. पण त्याची जाहीरात त्यानी कधीच केली नाही. गुणांची पारख असलेल्या व्ही. शांताराम यानी मुळगांवकराना राजकमलचे कला सल्लागार म्हणून नेमले होते. या वाङ्मयीन प्रवासात ग.का.रायकर, अनंत अंतरकर, जयंतराव साळगांवकर, बाबुराव अर्नाळकर यांच्याशी त्यांचे विशेष सख्य जमले. मुळगावकरांनी स्वतःच्या आयुष्याला एक प्रकारची शिस्त लावली होती. ती जशी त्यांच्या कलेच्या बाबतीत होती, तशीच त्यांच्या दैनंदीन जीवनातही होती. त्यांचा पोशाख त्यांच्या व्यक्तिमत्वाला खुलून दिसत असे. डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा, स्वच्छ सफेद धोतर, कोट, लांबसडक बोटात पकडलेला ब्रश या सर्व गोष्टी त्यांच्यातील असाधारण कलाकाराचे दर्शन घडवीत असत.त्यांच्या घरी असलेला टीपॉय देखील प्यालेट च्या आकाराचा होता . काम करताना शेजारी असलेल्या ग्रामोफोनवर लता रफींच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रीका लावून त्यांचे काम सुरु असे. अश्या संगीतमय वातावरणात त्यांची चित्रसंपदा चालू असे.
- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष.



ज्ञानात भर घालणारे उत्कृष्ट लेखन. माझा आला
ReplyDeleteRangareshancha jadugar raghuveer mulgaokar... Trivar vandan
ReplyDelete